Saturday, 31 July 2021

कुंडली मंथन

 || श्री स्वामी समर्थ ||



“ पत्रिका “ काय असते बरे ते ? तर आपण जन्माला येतो तेव्हा आकाशात असणारी ग्रहांची स्थिती गणिती रुपात मांडले गेलेले कोष्टक . ग्रह हे सूर्याभोवती अव्याहत फिरतच असतात . आपल्याला जन्माला घालून त्यांचे काम संपत नसते . आपली पत्रिका किंवा कुंडली म्हणजे गत जन्माचा आरसाच आहे. आपण मागील जन्मात केलेल्या चांगल्या वाईट गोष्टींची फळे जर भोगली नसतील किंवा ती अपूर्ण राहिली असतील तर त्या भोगवासना घेऊन मनुष्य पुन्हा जन्म घेत असतो आणि अश्याच प्रकारे पुनरपि जननं पुनरपि मरणं हे चक्र चालूच असते. आपल्या पत्रिकेचा नीट अभ्यास करताना समजेल कि पत्रिका हि १२ भावात विभागली गेली आहे. प्रत्येक भाव ३० अंशाचा म्हणून संपूर्ण पत्रिकेला ३६० अंश दिले गेले आहेत . ह्या शास्त्राचा अभ्यास करताना किंवा त्याचे एकेक पदर उलगडताना असे लक्ष्यात येते कि सर्वप्रथम नक्षत्र मग राशी ह्यांचा शोध किंवा अभ्यास झाला. मग त्यातून पत्रिकेची निर्मिती झाली असावी. प्रत्येक शास्त्राचा काहीतरी पाया असावा  लागतो त्याच प्रमाणे “ निसर्ग कुंडली “ जी दुर्वास ऋषींनी तयार केली  हा ह्या शास्त्राचा मुलभूत पाया आहे. 

पत्रिका उघडून बघितली तर त्यात चंद्र कुंडली , रवी कुंडली , लग्न कुंडली , नवमांश अश्या अनेक कुंडल्या आपल्याला दिसतात . मग त्यातील नेमकी कुठली कुंडली बघायची तर “ जन्मलग्न कुंडली “. मनुष्याच्या जीवनात असा कुठलाही प्रश्न नाही कि ज्याचे उत्तर ह्या जन्मलग्न कुंडलीचा अभ्यास करून देता येत नाही . अश्या ह्या कुंडलीत आपल्याला काय दिसते तर १२ भाव आणि त्यात असणारे ग्रह . प्रत्येक भावात ग्रह असतीलच असे नाही . काही भावात  एकच ग्रह असेल काही भावात  अनेक तर काही भाव रिते असतील. आता हे असे का? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या ह्या  जन्माची नाळ हि गत जन्माशी जोडली गेली आहे. म्हणूनच आपल्या पूर्व सुकृता प्रमाणे ग्रहांनी पत्रिकेत  अमुक अमुक स्थान पटकावली आहेत .  प्रत्येक ग्रहाचे विशिष्ठ तत्व आणि कार्य आहे आणि ग्रह ते इमाने इतबारे  करत असतात .त्यांचे कुणी आवडते नावडते नसते .

प्रत्येक  ग्रह कुठल्या भावात आणि राशीत आहे त्याप्रमाणे त्याचे फलित असते . प्रत्येक ग्रह हा दुसर्या ग्रहाचा मित्र किंवा शत्रू असतो . म्हणूनच बुध जर त्याच्याच स्व राशीत म्हणजे मिथुन किंवा कन्या राशीत असेल तर फलीताच्या दृष्टीने उत्तम असतो  . बुध जर त्याच्या शत्रू राशीत म्हणजे मंगळाच्या राशीत  असेल तरी त्याचे फळ वेगळे. पत्रिकेत प्रत्येक ग्रहाला त्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि कार्य आहे. हे ग्रह फलित देण्यासाठी विशिष्ठ योगात यावे लागतात . जसे सचिन तेंडूलकर उत्तम फलंदाज आहे पण त्याचे कर्तुत्व गाजवायला त्याला धावपट्टीवर खेळायची संधीच मिळाली नाही तर कसे होणार .  ग्रहांचेही  अगदी तस्सेच आहे . विशिष्ठ योगात ग्रह फलद्रूप होतात .

आपण समाजात वावरताना बघतो कि काही माणसे चांगली तर काही वाईट वागतात पण म्हणून त्यांचे चांगले आणि वाईट असे वर्गीकरण करणे उचित नाही . नाक्यावर उभी राहून दंगा करणारी मुले संकट प्रसंगी जीवाचे रान करून लोकांना मदत करताना दिसतात . कुणा वयस्कर व्यक्तीला रिक्षा करून देतील  , कुणाला रस्ता ओलांडायला मदत कर अश्या प्रकारची कामे नेहमीच करत असतात .मग त्यांना पूर्णतः वाईट कसे म्हणायचे सांगा बर . अगदी तसेच  शुभ ग्रह हे पूर्णतः शुभ आणि पाप ग्रह हे पूर्णतः अशुभ नसतात . गुरु सारखा अत्यंत शुभ ग्रह सुद्धा बिघडला तर अत्यंत अशुभ फलदायी होतो. 

ह्यावरून आपल्याला एक समजते कि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट घटना ह्या केवळ एका ग्रहामुळे ,एका भावामुळे किंवा योगामुळे घडत नाहीत तर सगळे ग्रह , भाव , ग्रह ज्या नक्षत्रात असतात ती नक्षत्रे ,योग , ग्रहांच्या दृष्ट्या , महादशा ह्या  सर्वांचे ते एकत्रित फळ असते. 

ग्रहांप्रमाणे प्रत्येक भाव सुद्धा आपले नेमून दिलेले कार्य करत असतो . 

आपल्या पत्रिकेत पंचम स्थान , पंचमेश आणि गुरु सुस्थित नसेल तर संततीचे सुख लाभणार नाही . मंगळ बिघडला असेल तर भावंडांशी सख्य नसेल , सप्तम स्थान , सप्तमेश आणि विवाहाचा कारक ग्रह शुक्र दुषित असेल तर वैवाहिक  सौख्य मनासारखे मिळणार नाही . परमेश्वराने सगळ्यांना सगळे दिले नाही म्हणूनच त्याचे महत्व अबाधित आहे . वेळ प्रसंगी आपण त्याच्याच समोर नतमस्तक होत असतो. 

चला म्हणजे आज आपल्याला हे नक्की समजले आहे कि कुठलाही एक ग्रह एखादी घटना घडवायला समर्थ नसतो . म्हणूनच आता माझा शुक्र चंद्रासोबत पंचमात आहे मग त्याचे फळ काय ? माझा रवी  धनस्थानात आहे मग मला पैसा मिळेल का? माझा शनी इथे आहे आणि गुरु राहू तिथे आहेत असे प्रश्न विचारणे आपण बंद करायला हवे , पटतंय का? 

पत्रिकेचा  सखोल अभ्यास करूनच आपण पत्रिकेचे एक एक पदर उलगडू शकतो आणि आपल्या उत्तरा पर्यंत पोहोचू शकतो . 

माझा शुक्र पंचमात का आहे आणि चंद्र लग्नात का आहे हे प्रश्न मात्र आपल्याला नक्कीच पडायला हवेत. ज्योतिष शास्त्र हे तर्कशास्त्र आहे. जसे लग्नी चंद्र असेल तर चेहरा गोल असतो कारण चंद्र वाटोळा असतो , चेहऱ्यावर आद्रता असते कारण चंद्र जलतत्व दर्शवतो . 

मला खात्री आहे आता माझा राहू कर्म स्थानात आहे मग काय होईल ? मंगळ अष्टमात आहे मग माझा अपघात होणार का ? असे प्रश्न कुणालाच विचारणार नाही , कारण अर्धवट ज्ञान सुद्धा घातक असते. अथांग महासागरासारखे हे शास्त्र शिकायला आपला उभा जन्मही अपुरा होईल . लिहिण्यासारखे खूप आहे . तरीही आज इतकच .

अस्मिता

#अंतर्नाद#ग्रहयोग#फलादेश#नवग्रह#जन्मलग्नकुंडली#चंद्रकुंडली#पत्रिका#महादशा#ज्योतिषशास्त्र#तर्कशास्त्र












 






Wednesday, 21 July 2021

परीसस्पर्श

|| श्री स्वामी समर्थ ||

डॉ.सौ.चंद्रकला जोशी


आयुष्याच्या अनेक वळणांवर अनेक व्यक्ती भेटत जातात . अगदी चार तासाच्या प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी सुद्धा कधीकधी आपले बंध घट्ट होतात. बरेचदा एका छताखाली राहणारी माणसे सुद्धा कायम समांतर रेषेसारखीच जगतात तर काही माणसे काही भेटीतच आपलीशी होवून जातात . अनेक व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यावर छाप पाडतात तर काही आपले आयुष्य समृद्ध करतात . अनेकांच्या विचारांनी आपण प्रभावित  होत असतो . आज गुरुपौर्णिमेच्या निम्मित्ताने अश्याच एका उत्तुंग गुरुतुल्य व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख करून देताना मला अत्यानंद  होत आहे .त्यांच्यामुळे  माझ्याही आयुष्यात , विचारात माझ्याही नकळत परिवर्तन झाले आहे . मला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन प्राप्त झाला आहे. 



एक दिवस असेच अनेक व्हीडीओ बघत असताना अचानक एक व्हीडीओ पाहण्यात आला. मी अक्षरशः भारावून गेल्यासारखी कितीतरी वेळा तो पुन्हापुन्हा पाहिला.  काय माहित नाही पण एकदम “Click “ झाले कि हे सामान्य व्यक्तिमत्व खचितच नाही.  

हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांनाच  अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून  परिचित असणार्या डॉ.(सौ.) चंद्रकला जोशी . 



आपल्या आयुष्यात गुरुकृपे शिवाय गुरुतुल्य व्यक्ती येत नसतात ह्याचा पुनश्च अनुभव मी घेत होते. माझ्या जीवनातच काय तर अगदी घरात सुद्धा येणारी प्रत्येक व्यक्ती महाराजांची इच्छा असल्याशिवाय येत नाही ह्यावर सुद्धा माझी नितांत श्रद्धा आहे. कारण मी त्यांच्याच घरात राहते. 

सारखे मनात येत होते कि आपल्याला त्यांच्याशी कधी २ शब्द बोलायला मिळतील  का  ?  एक दिवस धीर करून फोन केला. खर सांगते त्यांचा आवाज ऐकून सुद्धा माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. माणसे मोठी का होतात हे त्यांच्याकडे पाहून समजते. अत्यंत सात्विक शांत बोलणे.  त्यांचा प्रेमाने ओथंबलेला प्रत्येक शब्द मला त्यांच्या समीप नेत होता . खर सांगते अतिशयोक्ती नाही पण गुरुकृपा झाल्याचा आनंद मी प्रत्यक्ष अनुभवत होते. काय ती मंत्रमुग्ध करणारी रसाळ वाणी , मोजक्या शब्दात व्यक्त केलेला प्रचंड खोल आशय सर्वच शब्दांच्या पलीकडे आहे. त्यांच्या बोलण्यातून सामोरच्या व्यक्तीबद्दल असणारा आदर , प्रचंड विनम्रता  ,तितकाच साधेपणा आणि ओतप्रोत भरलेली अध्यात्मिकता जाणवल्याशिवाय राहिली नाही. 



त्यांच्याशी मी प्रथमच बोलत आहे ह्यावर माझाच विश्वास बसत नव्हता इतक्या सहज सोप्प्या साध्या शब्दात प्रेमाने त्या माझी चौकशी करत होत्या आणि म्हणून मीसुद्धा त्यांना लगेच सांगून टाकले मी तुम्हाला “ काकू “ म्हणीन . मला म्याडम म्हणायला अजिबात आवडत नाही . क्षणात आमचे बंध घट्ट झाले. अनेक वर्ष ओळख असल्या सारख्या आमच्या गप्पा रंगल्या. 



चंद्रकला काकू ह्या मुळच्या पैठणच्या . त्यांचे वडील भगवानराव जोशी  हे प्रख्यात ज्योतिषी होते त्यामुळे त्यांना ह्या विषयाचे बाळकडू लहानपणीच मिळाले. शालेय जीवनात सुद्धा त्यांच्या कलागुणांचे कौतुक होत असे. पीयुसी कला विभागात सर्वप्रथम आणि प्रतिष्ठान महाविद्यालयातून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांना मिळाल्यामुळे त्यांचा नगरपालिकेच्या वतीने सत्कारही झाला होता. पुढे विवाहानंतर औरंगाबाद इथे आल्यावर त्यांनी श्री. मग्गीरवार सरांकडे आपले ज्योतिषातील पुढील धडे गिरवले. कालिदास  संस्कृत युनिवर्सिटीतून “ ग्रहस्थितीनुसार मानवी आयुर्दायाचा अभ्यास “ ह्या विषयावर प्रबंध लिहून Ph. D मिळवली तीसुद्धा वयाच्या 60 व्या वर्षात . स्वतःचे घर, मुले कुणाचीही कसलीच आबाळ न करता स्वतःची प्रतिभा सकारात राहिल्या .मुलांवर नुसते संस्कार नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी त्यांची धडपड सतत चालू असे. 



आमच्या आईने दिलेल्या संस्कारांच्या  शिदोरीमुळेच आम्ही आज आयुष्यात अत्यंत यशस्वी झालो आहोत हे त्यांची मुले अभिमानाने सांगतात ह्यातच सर्व आले.   त्यांनी आजवर  किती मुलांना  घडवले ह्याचा परामर्श घेणे म्हणजे अंबरीच्या चांदण्या मोजण्या सारखेच आहे. आज वास्तू , भविष्य ह्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना अनेक कॉन्फरन्स मधून बोलावणे येत असते . गेली 20 वर्षाहूनही अधिक काळ वास्तू , ज्योतिष ह्यासाठी विनामुल्य सेवा देणे हि खचितच सोपी गोष्ट नाही. 



भाषेवरचे प्रभुत्व , उच्च प्रतीची शब्दसंपदा , स्पष्ट विचार आणि तितकीच समोरच्याला आपलेसे करणारी वाणी , अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास ,दांडगा व्यासंग , प्रत्येक विषयावरची पकड, एखादा विषय कसा शिकावा आणि कसा शिकवावा ह्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही.  कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास , त्यातील बारकावे, त्याला असलेल्या शास्त्राचा आधार ,अगणित ग्रंथांचे वाचन ,त्यातील सातत्य , ज्ञानप्राप्तीची भूक , तेजस्वी वाणी आणि अमृताहूनही गोड वाटणारी शब्दसंपदा ,परखड पण आपलेसे करणारी  मधुर वाणी .



ज्ञान घेण्या आणि देण्यासाठी असणारी  धडपड , तळमळ  त्यांच्या व्याख्यानातून दिसते. एखाद्या विषयाची खोली  त्याचे गांभीर्य त्यातून आपल्याला काय मिळू शकते किबहुना काय घ्यायचे आहे हे अत्यंत सहजरीतीने समजावून सांगायची त्यांची हातोटी अवर्णनीय आहे. दुसर्याला आपलेसे करण्याची वृत्ती , सर्व वयोगटात मिसळून कुणाचेही मन न दुखावता साधलेला संवाद विलक्षण आहे. प्रत्यक्ष सरस्वती त्यांच्या मुखात आहे . 

ज्ञानाच्या इतक्या उत्तुंग शिखरावर विराजमान असूनही तसूभरही अहंकार नाही, नव्हे त्याचा लवलेश सुद्धा नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी . कुठल्याही गोष्टीचा मी पणा नाही. मी माझे अजिबात नाही. कसलाही डामडौल नाही ,कुणी आपल्यावर स्तुतीस्तुमने उधळावी प्रशंसा करावी हि अपेक्षाही नाही.  



फक्त देत राहणे हेच माहिती आणि तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता . त्यांच्याकडे बघून मला नेहमीच विंदा करंदीकर ह्यांची कविता आठवते  

देणाऱ्याने देत जावे ,

घेणाऱ्याने घेत जावे |

घेता घेता एक दिवस 

देणाऱ्याचे  हात घ्यावेत ||

त्यांची ओंजळ कधीच रिती नसते , रात्र असो अथवा दिवस फोन ,मेसेज , व्याख्याने काही ना काही चालूच असतात . एखाद्या तरुण माणसाला लाजवतील इतक्या प्रचंड उर्जेने त्यांना काम करताना बघून खरच असे वाटते कि इतके बळ येते तरी कुठून ? त्यांच्याही गुरूंची त्यांच्यावर असणारी असीम  कृपा त्याशिवाय हे सर्व शक्यच नाही.



कुणी आवडते नाही कुणी नावडते नाही , प्रत्येकाशी तितक्याच गोड वाणीने बोलणार आणि प्रत्येकाला क्षणात आपलेसे करणार . सर्व श्रेय दुसर्याला देवून निघून जातील . आज समाजामध्ये वावरताना मी जे काही पाहते ,ऐकते आणि अनुभवते त्यावरून  ह्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण मनात भरल्याशिवाय राहातच नाही .  उपजत शिकण्याची तळमळ असल्यामुळे त्यांनी अनेक  शास्त्रे , वेद , उपनिषदे ह्यांचे पठण केले. उदात्त विचार आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या चंद्रकला काकुंचे माझ्या आयुष्यात येणे हे मी माझे सौभाग्य समजते. त्यांच्यामुळे माझ्या विचारांना आणि आयुष्यालाही  वेगळीच दिशा मिळाली आणि माझा प्रवास आता एका अद्भुत पण चैतन्यमयी मार्गावरून होतो आहे ह्याचा मनाला आनंद आणि त्याहूनही अधिक समाधान आहे. आता शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे बोट सोडणे नाही .

कुठेही स्वतःच्या कर्तुत्वाचा साधा उल्लेख सुद्धा न करता सगळ्यात असूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवणाऱ्या चंद्रकला काकुंचे व्यक्तिमत्व खरच मनाला भावते  आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने  माझ्या मनातील त्यांच्या विषयीच्या भावना आणि कृतज्ञता मी माझ्या तोडक्या मोडक्या लेखणीतून साकारण्याचा ,व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय .



त्यांच्यासारख्या गुरु मिळणे हे मी माझे परमभाग्य समजते. गुरूंचे अस्तित्व आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देते ह्याचा अनुभव मी घेते आहे. 

माझे अनेक जन्माचे सुकृत चांगले म्हणून  अश्या गुरुतुल्य व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझे गुरु संत शिरोमणी शेगावनिवासी श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्यांची मी ह्या अमुल्य भेटीसाठी मनापासून ऋणी आहे. त्यांनी मला चंद्रकला काकूंच्या रुपात जी अनमोल भेट दिली आहे त्याची किंमत कश्यातच करता येणार नाही .कुठेतरी वाचले आहे कि गुरु हे जन्मोजन्मी आपल्या सोबत असतातच ,आपल्यातील  शिष्यत्व जागृत करता आले पाहिजे.

आज गुरु पौर्णिमा .  माझ्या सर्व गुरूंना मी  त्रिवार वंदन करते. चंद्रकला काकू तुमच्या  ज्ञानासमोर मी नतमस्तक आहे. आपले हे गुरु शिष्याचे नाते नसून आई आणि मुलीचे आहे . मुले कितीही मोठी झाली तरी आईला लहानच असतात आणि मुलांचे हट्ट आई सदैव पुरवत असते. म्हणून आज हक्काने हट्टाने मागत आहे कि .. तुमच्या प्रेमळ आशिर्वादाला मला कधीच पारखे ,वंचित व्हायचे नाही . मी कधी चुकले तर माझा कान धरा , ओरडा पण मला कधीच दूर लोटू नका. आपला प्रत्येक शब्द माझ्यासाठी आदेश आहे आणि वंदनीय  आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्या त्या व्यक्तींची योजना महाराजांनी केलेली असते . आपली भेट हेही एक पूर्व संचितच म्हंटले पाहिजे .



काकू म्हणजे ज्ञानाचा मूर्तिमंत झरा आहेत. वयाची सत्तरी उलटली तरी त्यांचा ज्ञानयज्ञ अव्याहत चालूच आहे. लहान मुले हि कृष्णासमान आहेत  त्यामुळे त्या लहान मुलात अधिक रमतात . घरी आलेल्या प्रत्येकाला परमेश्वर स्वरूप समजून त्यांचे आदरातिथ्य करणे ,त्यांना आवडीचे पदार्थ खाऊ घालणे , सतत वाचन मनन चिंतन आणि नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास ह्या तुम्ही आम्ही घेण्यासारख्याच गोष्टी आहेत . आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आयुष्यातील प्रत्येक नात्याला न्याय देत चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजत राहणाऱ्या  प्रतिभासंपन्न अश्या चंद्रकला काकुना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावे हीच स्वामींच्या चरणी आज प्रार्थना . 

माझ्या आयुष्याला तुमचा लाभलेला हा “  परीसस्पर्श  “   मी मनापासून अनुभवते आहे. 

अस्मिता

#अंतर्नाद#परीसस्पर्श#गुरुपौर्णिमा#सद्गुरू#पादुका#ज्ञान#चंद्रकलाजोशी#उपनिषदे

#वेदाचेअध्ययन

 






 










 
















अस्तित्व ( गुरुपौर्णिमा विशेष )

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्य नागमोडी वळणे घेत असते .अनेक चढ उतार असतात . अनुभवांनी आपण समृद्ध होत जातो. जगाच्या कुठल्याही शाळेत जे शिकायला मिळत नाही ते आपल्याला आलेले अनुभव शिकवतात . प्रपंचातील अडचणीने माणूस सैरभर होतो आणि मग जो जे सांगेल ते उपाय करत राहतो . दुक्ख गळ्यापर्यंत आल्याशिवाय अध्यात्मात पाऊल पडत नाही असे म्हणतात ते वावगे नाहीच.

अपराध माझे गुरुवरा आज सारे क्षमा करा | वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी ||

भौतिक जगात आपल्याच धुंदीत जगणारी आपली पावले आपल्याही नकळत मंदिराची ,मठाची पायरी चढायला लागतात आणि तोच आपल्या जीवनातील खरा टर्निंग असतो.  डोळ्यासमोर अंधार असतो वाट सापडत नसते आणि अश्यावेळी त्या मिट्ट काळोखात चाचपडणाऱ्या भक्ताचे बोट  दुसरे तिसरे कुणी नाही तर प्रत्यक्ष सद्गुरू धरतात तेव्हा  संपूर्ण शरीरातून वीज चमकावी तसे काहीसे होते , दिव्य अनुभूती मिळते. अंधुकसा का होईना पण प्रकाश दिसू लागतो आणि आपण आपल्या संकटांवर मात करू पाहतो.  हा मोठा आधार आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो आणि त्या शक्तीपुढे आपण केवळ नतमस्तक होतो . आयुष्यात सद्गुरू प्राप्ती हि आपल्या पूर्वसंचीतावर सुद्धा अवलंबून असते.

श्रीगजानन लीलेचा पार कधी न लागायाचा|अंबरीच्या चांदण्याचा हिशोब कोणा न लागे कधी ||

आता आपले चित्त कुठेच लागत नाही. आयुष्य होत्याचे नव्हते होत असताना अगदी तळ गाठून आलेले आपण कात टाकल्या सारखे पुन्हा सुखासीन आयुष्य जगू लागतो पण आपल्या चित्तवृत्ती आणि मन मात्र त्यांच्याच चरणांशी गुंतते तेही कायमचे .

आयुष्यात गुरूंचे स्थान अढळ आहे.  त्यांच्या नुसत्या विचारांनी डोळ्यातून अश्रू येऊ लागतात .त्यांच्यासाठी काय करु आणि काय नको असे झालेला भक्त आपले संपूर्ण जीवन त्यांच्या चरणाशी समर्पित करतो. महाराज आणि भक्ताचे नाते हे आई आणि लेकरा सारखेच आहे . समर्पणाची भावना जितकी दृढ तितकी भक्ती परिपूर्ण होते. मग नामस्मरण पारायण मानसपूजा ह्या सर्वातून महाराजांच्या आपल्या गुरूंच्या सेवेत भक्त रुजू होतो आणि तिथेच रमतो. आता काहीच नको असे वाटायला लागते.

गजानन पदी निष्ठा ठेवा | सुख –अनुभव सर्वदा घ्यावा |कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपल्या मानसी ||

शांतपणे विचार केला तर आपल्याला आयुष्यात कश्याकश्यातून ,किती कठीण प्रसंगातून त्यांनी बाहेर काढले आहे हे फक्त आपले आपल्यालाच माहित असते. आपले अनन्य अपराध त्यांनी आईच्या मायेने पोटात घातलेले आहेत ह्याची क्षणोक्षणी जाणीव होत राहते.

प्रत्येक गोष्टीचा संचय करण्याकडे मनुष्याचा कल असतो पण तो करताना आपण किती गोष्टींचा   हव्यास धरायचा , काय जोडायचे काय सोडून द्यायचे ह्याचे भान उरत नाही आणि मग हव्यास हेच जीवन बनते . आयुष्यातील शांतता त्यामुळे भंग होते कारण समाधान कश्यातच नसते अजून हवे अजून हवे ह्यातच जीवन व्यतीत होते. प्रत्यक्ष महाराजांनी भक्तांना सांगितले आहे किती जमवशील कश्या कश्याचा संचय करशील.. हे म्हणजे अग्नीत तुपाची धार ..जितके तूप घालाल तितका अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होणार . तसाच हव्यास वाढतच राहणार .



गुरूंची सेवा आपल्याला कुठे थांबायचे त्याची जाणीव करून देते . गरजेपेक्षा आयुष्यात काहीही असले तरी ते वाईटच थोडक्यात हव्यास आपल्याला बेधुंद करतो. संचय करायचाच असेल तर तो  भौतिक गोष्टींचा नाही तर भक्तीचा हि शिकवण आपल्याला अध्यात्म देते .आपण इथून काहीही घेवून जाणार नाही पण आपली गुरुसेवा अखेरच्या क्षणी आपल्याला मोक्षाचे दरवाजे नक्कीच खुले करून देयील .

अनन्याश्चीन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते | तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम ||

गुरूंचे आयुष्यात पदार्पण हि खचितच सोप्पी गोष्ट नाही . भक्त आणि गुरु हे समीकरणच वेगळे आहे. ह्यासारखा दुग्ध शर्करा योग दुसरा नाही. गुरुसेवेमुळे मनुष्य शांत होतो, तम आणि रज गुणांचा प्रभाव कमी होवून सात्विकता ,परोपकाराची भावना वाढू लागते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो . सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकटेपणा वाटत नाही. समस्या येत राहतात पण त्यातून मार्ग मिळत राहतो. गुरु कृपेचा अनुभव क्षणोक्षणी मिळतो आणि गुरुपदी निष्ठा समर्पित होतात .

मी कश्याला घाबरू ,मी कसलाच विचार करत नाही..महाराज आहेत ते बघतील हा विचार मनात रुजतो आणि त्यांच्या चरणी मन एकाग्र होते. आनंदाच्या व्याख्याच जणू बदलतात. हव्यास कमी होतो .

अध्यात्मिकता आयुष्य बदलून टाकते त्यागाची वृत्ती येते ,नुसते घेणे नाही तर देण्यातील आनंद आपण अनुभवू लागतो. कात टाकल्याप्रमाणे आपल्यात नखशिखांत बदल होतो.  जिथे सर्व काही संपणार होते तिथेच जीवन नव्याने सुरु झालेले असते.



अश्या ह्या  गुरूंसाठी काय करू आणि काय नको असे भक्ताला वाटले नाही तरच नवल. अश्या ह्या गुरूंच्या सेवेत रुजू होवून आपले आयुष्य सार्थकी लावणे हेच आपले कर्म आहे.

आज गुरुपौर्णिमा . गुरुसेवेसाठी मिळालेली अभूतपूर्ण  अशी पर्वणी. माझ्या आयुष्यात मला प्रत्येक क्षणी प्रचीती देणारे आणि भरभरून प्रेम देणारे माझे दोन्ही गुरु शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ह्या दोघांनाही माझा साष्टांग दंडवत . त्यांच्या चरणी मी माझे आयुष्य कधीच समर्पित केले आहे. मी आज जे काही आहे ते त्यांच्याच मुळे ह्याचा क्षणभर सुद्धा विसर मला पडत नाही .

त्यांनी मला काय दिले आहे हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दसंपदा नाही. मी त्यांच्या ऋणात आजन्म राहणार आहे आणि निरंतर त्यांची सेवा करणार आहे. मला काहीही मिळवायचे नाही . माझ्या आयुष्याचा सुकाणू त्यांनी धरला आहे त्यामुळे ते माझ्या साठी जे जे करतील ते माझ्यासाठी  योग्यच असणार आहे ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. असंख्य अनपेक्षित गोष्टी आयुष्यात करणारे माझे दोन्ही गुरु माझ्या हृदयात विराजमान आहेत .  पराकोटीची अनुभूती त्यांनी मला दिली आहे कि मी रात्रंदिवस बसून लिहिले तरी ते अपूर्णच असेल.

काही गोष्टी आपण फक्त अनुभवायच्या असतात . आयुष्यात आपल्याला हवे असते तेव्हा त्या त्या गोष्टींचा लाभ होणे  हेच भाग्य अशी साधी सोपी सुटसुटीत व्याख्या मी करीन . माझ्या आयुष्यातील सुखाला, आनंदाला आणि सर्वात मुख्य म्हणजे समाधानाला चार चांद लागले आहेत ते फक्त आणि फक्त सद्गुरू कृपेमुळेच.

|| अशक्यही शक्य करतील स्वामी ||

नामस्मरण पारायण हि आपल्या सरभैर झालेल्या मनाला एका जागी स्थिर करण्याची माध्यम आहेत . कालांतराने ह्या कश्याचीही गरज उरत नाही. आपल्या  दैनंदिन जीवनात व्यवहारात वागताना त्यांच्या असण्याचे भान ठेवले तर आपली कर्म शुध्द सात्विक राहतील ह्यात वादच नाही. मी मी म्हणणारे आपण अहंकाराच्या मायेत सतत गुरफटलेले असतो .  देवाचिया द्वारी उभा क्षणभरी .म्हणणारा देव  जणू आपल्याला सांगत आहे अरे वेड्या मला तुझा एक क्षणच दे पण तो भक्तीरसाने ओथंबलेला असुदे . मायेचा वर्षाव करणारा असुदे .  परमेश्वराशी आपले अतूट नाते हवे  आणि ते एकदा निर्माण झाले कि मग काही मागणे हे उरतच नाही .

सद्गुरूंचे आयुष्यात असणे ह्यासारखा दुसरा आनंद असूच शकत नाही . असा भक्त भाग्यवानच म्हंटला पाहिजे. सद्गुरुप्राप्ती आयुष्यातील दुक्ख संकटांची होळी करते .  आयुष्य पुढे सरकत आहे , आपले प्रत्येक पाऊल मृत्यूकडे जात आहे आणि म्हणूनच आपल्याकडे वेळ खूप कमी आहे ,प्रत्येक क्षण ओंजळीतून जणू निसटून चालला आहे.  हा वेळ गुरूंच्या सेवेत राहून आयुष्याचे सार्थक करणे हे आपल्या हातात नक्कीच आहे . आयुष्यात प्रत्येक क्षणी मला प्रेमाची आणि त्यांच्या असण्याची अनुभती देणाऱ्या माझ्या दोन्ही गुरूंच्या मुळे आज माझे  “ अस्तित्व “ आहे आणि म्हणूनच त्यांच्या चरणी माझे जीवन समर्पित आहे.

अस्मिता

#अंतर्नाद#गुरुपौर्णिमा#व्यासपौर्णिमा#भक्तीरस#समर्पण#गजाननमहाराज#श्रीस्वामीसमर्थ#मानसपूजा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


















 



 




Thursday, 15 July 2021

गण

 || श्री स्वामी समर्थ ||


देवगण – सत्वगुणी , सत्शील प्रवृत्ती , धर्म अनुष्ठान , ईश्वरनिष्ठा हे गुण असतात . अत्यंत साधी राहणी आणि मृदू हृदय असते. कुणालाही त्रास न देता आपले जीवन व्यतीत करणारी असतात . परमेश्वरावर श्रद्धा विश्वास असते . सात्विक वृत्ती असते. साधू संत , विद्वान माणसे हि ह्या गणाची असतात . कुठल्याही प्रसंगात धीराने वागणारी न घाबरता कुणालाही न दुखावता मार्ग काढणारी असतात . परोपकारी वृत्ती असते. देवगणी आणि  मनुष्य गणाच्या व्यक्तींचे एकमेकांशी पटते .पण ह्या लोकांचे राक्षसगण असणार्या लोकांशी पटत नाही.

अश्विनी , मृग , पुनर्वसू , पुष्य , हस्त , स्वाती , अनुराधा , श्रवण , रेवती.

मनुष्यगण –रजोगुण असतो . जगातील सर्व सुखांचे भोक्ते असतात पण धार्मिकतेचे पालन करणारी असतात . देवांचे करतील पण पोटात स्वार्थ असतो. संकटाच्या समयी दुसर्याकडून मदत घेतील अगदीच असह्य झाले तर आत्महत्या सुद्धा करू शकतात . सहनशीलता कमी असते . देवगणाच्या लोकांशी जमवून घेतील पण राक्षस गणाशी पटणे कठीण ,वाद होतात . 

भरणी , रोहिणी ,आर्द्रा , पूर्वा , उत्तरा , पूर्वाषाढा , उत्तराषाढा , पूर्वा भाद्रपदा , उत्तरा भाद्रपदा .

राक्षसगण- तमोगुण असतो . उच्च प्रतीची महत्वाकांक्षा कारण हाव असते. संपत्तीच्या पदाचा हव्यास , कामुकता अधिक .कुठलाही सरळ मार्ग न घेता वाकड्यात शिरणे हा त्यांचा स्वभाव असतो. कायद्याचे पालन न करणे ,कुरापती उकरून काढणे ,कुळाला बट्टा लागेल असे काम करणे. मारामार्या , भांडणे, स्वार्थासाठी चोरी दरोडे . संपत्तीचा ह्रास करतात . व्यसनी असतात . धाडस आणि कर्तुत्व देखील असते त्यामुळे प्रसंगात घाबरणार नाहीत मार्ग काढतील. ह्या लोकांची इंटूशन पॉवर उत्तम असते. मनुष्य गणाला मानतात ,प्रसंगी वादविवाद सुद्धा करतील. देव गणाशी पटणे कठीण . मनुष्य गणाला ते धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात ,काही प्रमाणात त्यांना यश मिळते. देवगणला काहीच करू शकत नाहीत . केलेच तर त्यांचाच विनाश होतो.

राक्षसगण काय किंवा एखादी व्यक्ती काय संपूर्णपणे वाईट किंवा चांगली नसते. प्रत्येक व्यक्ती प्रसंगानुरूप वागत असते. पूर्वीच्याकाळी राक्षसगणी मुलगी नको असे पण आत्ताच्या कलियुगात ह्या संकल्पना, तत्वे मोडीत निघाली आहेत. राक्षसगणी मुलगी असेल तर सकाळचे घरातील सर्व कामे करून कार्यालय गाठेल आणि संध्याकाळी पुन्हा घरी येवून मुलांचा अभ्यास ,स्वयंपाक आल्यागेलेल्याचे करेल. वेळप्रसंगी आरे ला कारे सुद्धा करेल. आपल्या हक्कांसाठी भांडेल सुद्धा पण त्यात काहीच गैर नाही. पूर्वीच्याकाळी एकत्र कुटुंब होती. मुलींनी डोक्यावरचा पदर ढळू न देता कामे करावी ,सासू सासरे आणि घरातील मोठ्यांचे ऐकावे आदर द्यावा हीच अपेक्षा होती किबहुना त्यांना तसेच बाळकडू पाजले जात असे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असे आणि 5-50  माणसांचे घर असे त्यामुळे अश्या घरात राक्षसगाणी मुलगी नको असे. पण बदलत्या काळानुसार सगळ्याच संकल्पना आणि गरजा बदलल्या आहेत. कलियुगात नवर्याच्या बरोबरीने मोठमोठ्या पदावर काम करणाऱ्या आणि त्याच बरोबर घराचा संसाराचा गाडा उत्तमपणे ओढणाऱ्या स्त्रिया आहेत . बाहेरील कामे करत असल्या तरी घरातील जबाबदार्यांचे उत्तम पालन करणाऱ्या आहेत.

कृत्तिका आश्लेषा मघा चित्रा विशाखा जेष्ठा मूळ धनिष्ठा शततारका . 

ह्यातील आश्लेषा विशाखा धनिष्ठा कठोर आहेत .मघा मूळ कर्तुत्ववान असतात .हि नक्षत्रे मोठी योग्यताही देतात . जेष्ठा हे क्रूर नक्षत्र असून खुनशी आहे . आपले हेतू कुणालाही सांगणार नाहीत , खुनशी स्वभाव ,दुष्टपणा ,सूडबुद्धी असते.

अस्मिता

#अंतर्नाद#देवगण#मनुष्यगण#राक्षसगण#नक्षत्र#सत्वगुण#रजोगुण#तमोगुण#फलादेश