Friday, 30 June 2023

सतचित आनंद – गुरु

 || श्री स्वामी समर्थ ||

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरु ह्या ग्रहाबद्दल अधिक जाणून घेवूया . ग्रह मालिकेतील नैसर्गिक शुभग्रह “ गुरु “ . अत्यंत सात्विक , समाधान देणारा , ज्ञानाचा अखंड स्त्रोत म्हणजे गुरु . गुरु ग्रहाला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण असे महत्व आहे . 

गुरु म्हणजे आत्मिक समाधान देणारा बलाढ्य ग्रह . आयुष्याचे सर्वार्थाने सोने करणारा आणि आयुष्य तेजाने प्रकाशमान करणारा गुरु. प्रगल्भ बुद्धिमत्ता , आकाशासारखा विशाल दृष्टीकोण आणि असामान्य प्रतिभा देणारा हा ग्रह खरच अलौकिक आहे. विद्या ज्ञान ह्यांनी खर्या अर्थाने आपले आयुष्य उजळून टाकणारा दुसरा कुणी नसून गुरूच आहे . 


आयुष्यात जिचे बोट धरून आपण पदार्पण करतो ती आई खर्या अर्थाने आपली प्रथम गुरूच म्हंटली पाहिजे . उच्च मुल्यांचा स्वीकार आणि आदर , आपल्या धर्माप्रती निष्ठा , शुद्ध आचरण आणि सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवणारा आणि यशाची शिखरे चढून सुद्धा पाय जमिनीवर ठेवायला शिकवणारा गुरूच . नैतिक मुल्यांची जाण, परोपकार , संस्कृती , सभ्यता , मदत करण्याची सामाजिक जाणीव , समाजातील मानसन्मान , तीर्थाटन ह्या सर्वांची निव ठेवणारा गुरूच.

जगातील सर्व भौतिक सुखे एका बाजूला आणि गुरुचरणाशी मिळणारी शांतता एका बाजूला.  आयुष्यातील परमोच्च सुखाचे आनंद वेचायला मिळतात ते फक्त गुरुमुळेच . प्रपंच करून परमार्थ करा हा मोलाचा संदेश देणारा गुरु . गुरु कडे प्रसन्न मुद्रा आहे म्हणूनच आपल्या गुरूंची नुसती आठवण झाली किंवा त्यांची मूर्ती वा छबी डोळ्यासमोर आणली तरी मन प्रसन्न होते. सुख समृद्धी ज्याच्यामुळे प्राप्त होते आणि जीवन जगण्यासाठी लागणारा सकारात्मक दृष्टीकोण देणाराही गुरूच .

गुरूला जीव कारक म्हंटले आहे त्यामुळे ह्या जगात नवीन जीव येण्यासाठीच म्हणजे संतती होण्यासाठी ह्याच गुरूचा आशीर्वाद लागतो. समोरच्याचे मन समजून घेणारा हा गुरु माया ममता प्रेम ह्याने जणू ओथंबलेला आहे.  

 आयुष्याची नवीन सुरवात म्हणजेच विवाह बंधन गुरूच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही .  ग्रह मालिकेतील गुरु आणि शनी ह्या दोन्ही ग्रहांचा प्रभाव जीवनावर अपरिमित आहे . दोघांचाही उद्देश एकच आहे मोक्षप्राप्ती पण मार्ग वेगवेगळे आहेत . शनीला मुळी प्रपंचाचा तिटकारा आहे तर प्रपंच नेटका करून परमार्थाला चला हा संदेश देणारा गुरु आहे. 

गुरुप्रधान व्यक्तींच्या चेहऱ्यावर सात्विकता , ज्ञानाचे तेज दिसते तिथे हाव नसते . कुटील कारस्थाने करणारी बुद्धी गुरूच्या तेजासमोर टिकणारच नाही. असामान्य कर्तुत्व , समृद्धी आणि सफलता गुरुशिवाय अशक्य आहे . 

वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्या जीवनात गुरुमहाराजांचे स्थान किती महत्वाचे आहे त्याची जाणीव होईल. आपल्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत आणि शुभ भावात असेल तर आयुष्य जिंकले असेच म्हणावे लागेल . 

नामकरण , विवाह , वास्तू अश्या सर्व शुभ कार्यासाठी गुरुचे बळ आवश्यक असतेच असते . व्यवसाय , नोकरी आणि अश्या प्रत्येक गोष्टीत यशवंत करणारा हा गुरूच आहे. अध्यात्मिक प्रगती , साधना करण्यासाठी लागणारे सामर्थ्य गुरूच प्रदान करणार . ज्ञानाचा स्त्रोत म्हणजे गुरु . ज्ञानामुळे जीवनातील अंधकार सरतो आणि जीवन प्रकाशमान होते .

आपल्या साधनेमुळे उच्च कोटीची सेवा हातून घडवणारा आणि त्या योगे आत्मा आणि परमात्म्याचे मिलन घडवणारा असा हा गुरु केवळ अलौकिक आणि असामान्य . गुरुप्रधान व्यक्ती अत्यंत आशावादी असतात . नको नाही बघतो सांगतो परंतु हे शब्दच त्यांच्या शब्द कोशात नसतात . गुरूला आकाशतत्व दिले आहे जे इतर सर्व तत्वांना सामावून घेणारे आहे त्यामुळे गुरुप्रधान व्यक्ती अथांग सागरासारख्या सर्वाना सामावून घेवून आयुष्याचा प्रवास करणाऱ्या असतात . मनाचा मोकळेपणा आणि उत्तम वैचारिक बैठक ह्या लोकात पहायला मिळते . गुरु देणारा आहे घेणारा नाही त्यामुळे हे देणारे असतात . देत राहण्यात ते धन्यता मानतात . जीवनाचा दृष्टीकोण आनंदी ठेवुन सत्कर्म घडवणारा गुरु आयुष्यात कधीच एकटेपणा देणार नाही . 

गुरुप्रधान व्यक्ती सदैव कार्यमग्न आढळतात .देवाप्रती आणि धर्माप्रती विशेष श्रद्धा असणारी हि मंडळी सामाजिक कार्यात स्वतःला अर्पण करतात . कुठल्याही संकटातून मार्गस्थ होतात . उत्साह , आनंद म्हणजेच गुरु . आपल्या आयुष्यात अनेक वळणांवर होणारी सत्कर्मे गुरुमुळेच शक्य होतात . गुरूकडे संयम आहे उथळ नाही त्यामुळे सारासार विचारशक्ती , मोठे मन, नम्रता आणि उत्तम श्रवणभक्ती ह्यामुळे यशाची उच्च शिखरे अश्या व्यक्ती सहज पार करताना दिसतात . ऐकणारा आणि ऐकवणारा सुद्धा हा गुरु आहे पण सामंजस्याने हाच फरक आहे. 


गुरुंच्या चरणावर आपला उभा संसार अर्पण करणारे आयुष्य गुरुसेवेत व्यतीत करतात , ना कसला लोभ ना कसला अहंकार , ना काही मिळवायचे असते ना गमावल्याचे दुक्ख असते. अत्यंत निर्विकार वृत्ती आणि मन ह्यामुळे गुरुकृपा बरसत राहते आणि जीवनातील मानसन्मानाचे धनी होतात .मोठ्या लोकांमध्ये उठबस होते , त्यांचे अस्तित्व लोकांना हवेहवेसे वाटते , त्यांच्या मताला आणि त्याहीपेक्षा त्यांच्या असण्याला महत्व प्राप्त होते. जीवनात अनेक संधी समोरून येतात आणि अशक्यप्राय गोष्टीही घडून येतात . गुरुकृपा म्हणजे लाख दुखोकि एक दवा आहे . 

हाच गुरु कुंडलीत अशुभ असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी तरसेल. प्रत्येक क्षेत्रात पीछेहाट होईल. जीवन निरस , उदास आणि निराशेच्या गर्तेत जायील . यश हुलकावण्या देत राहील.

गुरु पौर्णिमा. गुरु सेवा करून , गुरुंनी सांगितलेल्या मार्गावरून चालणे म्हणजेच कुंडलीतील गुरु बलवान करणे . आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा करून आपले जीवन कृतार्थ करुया आणि गुरु सेवेचे अखंड व्रत घेवून जीवनाची दिशा निश्चित करुया .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क    : 8104639230 


Sunday, 25 June 2023

शास्त्राला वेठीस धरू नका .

 || श्री स्वामी समर्थ ||


आजकाल ज्योतिषाकडे जाणे हे काही अंशी “ फ्याड “ झाले आहे असे वाटायला लागावे अशीच स्थिती आहे. तुमच्या प्रापंचिक जीवनातील संकटात उत्तर शोधताना शास्त्र तुम्हाला निश्चित मदत करेल पण मदत कश्यासाठी तेही समजले पाहिजे ? उठसुठ ज्योतिष बंद करा कारण आपण त्यातच अडकून राहतो.


श्री. (कै.) शहासने ह्यांनी सुद्धा अनेकदा हे नमूद केले आहे कि लौकिक जगातील प्रश्नांची उत्तरे जर काही वेळातच अपेक्षित असतील तर त्यासाठी शास्त्राला वेठीस धरू नका. संयम ठेवा तुम्हाला तुमचे उत्तर काळच देणार आहे. 

एखाद्या मुलाची नोकरीसाठी मुलाखत झाली तर त्याचा निकाल काय असेल हे विचारण्यासाठी लगेच ज्योतिष शास्त्राचा आधार घेणे अनुचित ठरेल . कारण काही दिवसात कदाचित 2-3 दिवसात त्याचा निर्णय तसाही लागणारच आहे. नोकरी मिळण्याची दशा अंतर्दशा आहे ना? मग मिळेलच कि हि नाही तर दुसरी मिळेल पण मिळेल नक्की. पणआपल्याजवळ नसतो तो संयम म्हणून लगेच आपण ज्योतिष ज्योतिष करू लागतो. खिशात पैसे आहेत म्हणून लगेच ज्योतिषाचे मानधन देतो आणि प्रश्न विचारतो. अश्यावेळी ज्योतिष महोदयांनी सुद्धा मानधन न घेता जातकाला संयमित राहायला शिकवले तर ह्या शास्त्राचा मान दुपटीने वाढेल. ह्या विद्येचा वापर नक्की कधी आणि कश्यासाठी करायचा ह्याचे भान सुटता कामा नये.


कुणीतरी पैसे देत आहे मग बघा लगेच प्रश्न असे करायला ज्योतिष इतके स्वस्त झाले नाही. ते महान दैवी शास्त्र आहे आणि त्याचा सर्व परीने मान राखणे हे आपले सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. 

एखादी मुलगी पसंत पडली आहे तेव्हा त्यांच्याही कडून पसंती कळवणारा फोन कधी येईल ? स्पर्धा परीक्षेत पास होणार का? ह्या वर्षी 10 वी मध्ये किती मार्क मिळणार असे प्रश्न विचारून आपण ह्या शास्त्राचा अवमान करत आहोत .

आता 10 वी चा निकाल 2 महिन्यात लागणार त्यासाठी कश्याला हवे ज्योतिष ? विचार करा . उत्तम मार्क मिळाले आणि खुठली शाखा निवडावी हा प्रश्न नक्कीच योग्य आहे पण तो मार्क मिळाल्यावरच विचारला तर येणारे उत्तर सुद्धा हमखास बरोबर येयील पण आधीपासूनच विचारणे मात्र अयोग्य आहे .

विवाहाचा योग आहे ना ? झाले तर मग हि मुलगी नाही तर अजून कुणी पण लगेच त्यासाठी ज्योतिष कश्याला ? ज्योतिष म्हणजे चमत्कार नाही . हे असले प्रकार म्हणजे आपला संयम संपल्याची लक्ष्यणे आहेत. 

उद्या आमटी भाजी कुठली करू ? कुठल्या रंगाचे कपडे घालू ? ह्यासाठी सुद्धा ज्योतिष सल्ला घ्याल कि काय ? अत्यंत आवश्यक असेल तर आणि तरच आणि समस्या निर्माण झाल्याशिवाय ह्या शास्त्राचा उपयोग करू नये. 

ह्या शास्त्राचे उत्तम अध्ययन करून मनन चिंतन आणि उपासना केली तर आपल्यातील संयम वाढेल आणि हे उठसुठ ज्योतिष बंद होयील ह्यावर विचार करणे आवश्यक आहे म्हणून हा लेखन प्रपंच .

तुम्हीही कितीही ह्या शास्त्राला नावे ठेवा सूर्य उगवायचा तो उगवणारच आहे. त्यामुळे हे शास्त्र आहे कि नाही हा प्रश्नच नाही पण ते वापरताना तारतम्य बाळगले पाहिजे इतकेच . कुणीतरी आपले मानधन देत आहे म्हणून लगेच पंचांग उघडून बसणे हि शास्त्राशी केलेली प्रतारणा आहे. जातकाने आणि ज्योतिषाने सुद्धा लक्ष्मीचा आणि पर्यायाने शास्त्राचा योग्य मान ठेवावा असे माझे मत आहे .

निसर्ग सुद्धा तुम्हाला संकेत देत असतो पण ते ऐकण्यासाठी , पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कान नाक डोळे उघडे हवे ना ...पण नाही आम्हाला रेडीमेड अगदी इंस्तंट उत्तरे हवे असते कारण संयम नाही. कुंभ राशीतील शनी हाच संयम संपूर्ण विश्वाला शिकवत आहे, विचार करा आणि तो विचार कृतीत सुद्धा उतरवा. 

ज्योतिष आणि अध्यात्म ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हंटले जाते ह्याचे कारण अध्यात्म आपल्याला संयम शिकवतो त्यामुळे हे शास्त्र शिकण्यासाठी लागणारी बैठक पक्की होते . आपली उपासना आपल्याला आपल्या आतील आवाज ऐकायला शिकवते कारण तेच तर सगळ्यात महत्वाचे असते . So turn Inward. सहमत ????

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क    : 8104639230


जुलै कार्यशाळा 2023

|| श्री स्वामी समर्थ ||
 

Sunday, 18 June 2023

रिक्त भाव खरच रिक्त असतात का ??

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या पत्रिकेत 12 भाव असतात . प्रत्येक भाव कुठल्या ना कुठल्या तरी राशीच्या अमलाखाली असतो . काही भावात ग्रह असतात मग ते एक किंवा एकापेक्षा अधिक सुद्धा असू शकतात . पण काही भाव हे रिक्त असतात म्हणजे काही भावात एकही ग्रह नसतो . मग हे रिक्त भाव फलादेशात आपले योगदान देतात कि नाही ? आजचा आपला विषय हाच आहे. 

12 भाव आणि 9 ग्रह त्यामुळे कुठला ना कुठला भाव हा रिक्त असणारच . अश्या ह्या रिक्त भावाला फलादेश करताना वगळायचे का? अर्थात नाही. ज्या भावात ग्रह असतात तो भाव फळे देण्यास जितका सक्षम असतो किबहुना त्याहीपेक्षा अधिक रिक्त भाव असतो . कुठलाही भाव , ग्रह राशी नक्षत्र बिन कामाचे पत्रिकेत नसते , त्यांना दिलेले काम ते चोख बजावत असतात . 

रिक्त भाव कसा परिणाम करेल हे बघताना रिक्त भावाचा स्वामी पत्रिकेत कुठे आहे? म्हणजे उदा. चतुर्थ भाव रिक्त आहे आणि चतुर्थ भावात वृश्चिक राशी आहे तर त्या राशीचा स्वामी मंगळ पत्रिकेत कुठे आहे  ते बघा . तो केंद्रात आहे कि त्रिक भावात कि अजून कुठे.

समजा लग्न भाव म्हणजेच तनु स्थान रिक्त आहे पण त्यावर गुरूची दृष्टी आहे तर लग्न भाव बलवान झाला कारण गुरूसारख्या शुभ्ग्रहाची दृष्टी आहे . पण ह्या तनु भावाकडे राहू आणि शनीचीही दृष्टी असेल तर हाच लग्न भाव कमकुवत होईल. लग्नेश कुठे आहे? पाप कर्तरीत आहे का? लग्नेश स्वतःच्या भावापासून 6 8 12 ह्या पैकी भावात आहे का?  नीच कि उच्च आहे ?

समजा भाग्य भाव रिक्त आहे आणि त्याचा भावेश गुरु अष्टम भावात असेल तर भाग्य भाव बलवान होणार नाही. कारण भाग्येश भाग्य भावाच्या व्यय भावात आहे. 

सप्तम भाव रिक्त आहे आणि सप्तमेश व्यय भावात असेल तर सप्तम भावाची फळे चांगली मिळतीलच असे नाही .

पण हाच सप्तमेश लग्न भावात असेल तर सप्तमेश स्वतःच्याच भावाला म्हणजे सप्तम भावाला बघेल आणि त्या भावाला बलवान करेल. 

पंचम भाव रिक्त आहे आणि संततीचा कारक ग्रह गुरु जर चतुर्थ भावात असेल तर संततीचे सुख मनासारखे प्राप्त होणार नाही त्याचसोबत जर पंचमेश सुद्धा चांगल्या भावात नसेल तर अजूनच ह्या निदानाला अर्थ प्राप्त होईल.

प्रत्येक भावात राशी असेल पण ग्रह असतीलच असे नाही . पण त्या राशीचा स्वामी त्या रिक्त भावाची फळे देणारच.

ह्याच भावाचा राशीस्वामी नवमांश कुंडलीत कसे काम करतो आहे हेही महत्वाचे आहे .एखादा भाव रिक्त असेल पण त्यावर दृष्टी टाकणारे ग्रह , मग ते शुभ असो अथवा अशुभ , त्या भावाची फळे देण्यास सक्षम असतात .

ह्या भावातील राशी स्वामीच्या दशा अंतर दशेत सुद्धा त्या भावाची फळे मिळतात .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230