|| श्री स्वामी समर्थ ||
प्रगती ,समाधान , आरोग्य आणि आनंदाला ग्रहण लावणारे – मत्सर , द्वेष , इर्षा , निंदा , तिरस्कार
समाजात अनेक विविध स्वभावाची माणसे असतात आणि प्रत्येक माणूस हा षडरीपुनी प्रेरित आहे हे नाकारता येणार नाही. हे रिपू कमी अधिक असतील पण असतात . पण हे रिपू प्रमाणाच्या बाहेर असतात तेव्हा त्यातून मग असूया , मत्सर , द्वेष , दुसर्याला पाण्यात बघणे , निंदा , इर्षा , संताप अश्या अनेक गोष्टींची अपोआप निर्मिती होते . आपल्याला जेव्हा एखाद्याबद्दल मत्सर , द्वेष , तिरस्कार वाटतो त्याचे खरे कारण काय आहे माहित आहे का? आपण त्याचे श्रेष्ठत्व मनोमन स्वीकारलेले असते . त्याचे चालणे बोलणे लोकांच्यात सहजतेने मिसळणे , समाजातील त्याची उठबस , श्रीमंती , त्यांची बुद्धी विद्वत्ता , समाजातील दर्जा मानसन्मान ह्याची बरोबरी आपण करू शकत नाही आणि मग त्या व्यक्ती बद्दल मनात इर्षा , जळफळाट , मत्सर उत्त्पन्न होते . त्याला जे जमले ते मला नाही हि खंत असते .
“ मी त्याच्यासारखा का नाही ? “ ह्या प्रश्नाला उत्तर नाही. खरतर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले असतेच पण ते विसरून सतत दुसर्याची बरोबरी करायला आपण जातो आणि तिथेच संघर्ष स्पर्धा सुरु होते . त्यापेक्षा आपल्यातील चांगले गुण अधिक कसे विकसित होतील आणि आपल्याला ते आनंद कसा देतील ह्यावर लक्ष्य केंद्रित केले तर आयुष्य बदलून जायील . शिक्षण कमी असो अथवा अधिक द्वेष मत्सर करणे हि एक मानसिकता , मनोवृत्ती आहे . दुसर्याचा द्वेष मत्सर करून आपण आपल्या मनातील नको त्या विचाराना खतपाणी घालतो पण हाती काहीच लागत नाही . उलट ह्या चुकीच्या विचारातून बर्या न होणार्या आजारांची निर्मिती मात्र होते . का सतत दुसर्याला पाण्यात बघायचे ? कुणाच्यातील काहीच चांगले दिसत नाही का आपल्याला ?
सततचा राग काही जणांच्या डोक्यात असतो कारण त्यांना हवे तसे सुख आनंदी आयुष्य मिळालेले नसते. पण दुसर्याचा द्वेष करून ते मिळणार आहे का? नाही . उलट शुक्लकाष्ट मागे लागतील. बघा विचार नक्की करा. आपण दुसर्याचा हेवा करून वाईट चिंतून आपलीच कर्मे वाढवून घेतो आणि ती फेडायला मग पुनरपि जननं . हे असे आहे सर्व .
आपले आयुष्य जे आणि जसे आहे ते आपण स्वीकारले तर अधिक आनंदी होवू आणि निरोगी आयुष्य जगू . देवाने प्रत्येकाचा एक कोपरा रिता ठेवला आहे. सगळ्यांना सगळे नाही दिले. प्रत्येकाला काहीतरी प्रश्न विवंचना आहे अनेकदा ती आपल्याला माहित नसते . पण एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून दुसर्याचा हेवा करणे हे त्यावर उत्तर असूच शकत नाही . प्रचंड मेहनत करणाऱ्या दोन व्यक्तींचे आयुष्य वेगवेगळे असते कारण त्यांचे प्रारब्ध वेगळे आहे .
एखादा स्वामीना मनोभावे पुजतो आणि त्याची इच्छा पूर्ण होते पण एखादा जन्मभर माळ ओढत राहतो पण प्रश्न सुटत नाहीत. सगळे प्रश्नही आपले आणि उत्तरही आपल्याकडेच असतात . श्री गजानन विजय ग्रंथात एक सुरेख वाक्य दासगणू महाराजांनी लिहिले आहे. कायिक वाचिक मानसिक जी पापे झाली जी अनेक ती माफ कर गुरुराया ... म्हणजे काय तर अगदी मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये . कारण हिशोब सगळ्याचाच होणार आहे. कुणाचे पैसे दिले नाहीत त्याचाही आणि कुणा वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत केली त्याचाही .
त्यामुळे दुसर्या सारखे यश मिळत नाही म्हणून त्याचा मत्सर करणे म्हणजे त्याच्यातील चांगले गुण स्वीकारणे पण उघड नाही तर मनोमनी . त्याला वाहवा मिळते मला नाही , त्याला सन्मान मिळतो मला नाही , त्याच्याकडे पैसा आहे संपत्ती ऐश्वर्य दारात चार गाड्या आहेत पण माझ्याकडे नाही...म्हणून त्याचा राग करून ते सर्व वैभव आपल्याला मिळणार आहे का ? नाही .
बुद्धीची कीव करावी अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात . का मिळत नाही आहे हे सर्व आपल्याला कारण आपण कायम दुसर्याची निंदाच करतो कुणाला चांगले म्हणणे , कुणाच्या चांगल्या गुणांचे कौतुक कधी केले आहे आपण ? मोठे मन लागते त्यासाठी ते करा निदान प्रयत्न करा बघा मनावरचा ताण जायील, लोकांना आपलेसे करा सतत खोचून टोचून बोलण्यापेक्षा आणि मी इतरांच्या पेक्षा कसा शाहणा आहे हे दाखवण्यात आयुष्य व्यर्थ खर्च करण्यापेक्षा इतरांचे शहाणपण मान्य केलेत तर सगळे तुम्हाला आपलेसे करतील ते समजणार सुद्धा नाही . शेवटी परमेश्वर हा माणसातच आहे .
कुणा नातेवाईकाने घर घेतले अहो कष्ट केले आहेत त्यांनी करा कि जरा त्यांचे कौतुक , सदा सर्वकाळ सगळ्यांनी तुमचीच वाहवा करायची कि काय ? दुसर्या कुणाला अक्कल नाही का? सगळी अक्कल फक्त आणि सगळे चांगले गुण तुम्हालाच दिले आहेत कि काय देवाने ? डोळे उघडा जरा आजूबाजूला बघा , मन मोठे करा , सतत देश करण्यापेक्षा कौतुकाने पाठीवर शाबासकीचा हात फिरवा बघा हीच शाबासकी काही दिवसात तुम्हालाही मिळेल . कुणी विद्यार्थी पास झाला करा कि त्याचे अभिनंदन . कुणी नवीन ड्रेस घेतला , घर सजवले , नवीन वास्तू घेतली , कुणाचे लग्न ठरले , कुणाला कसले बक्षीस मिळाले त्यांचे भरभरून कौतुक करा , आनंद साजरा करा त्यांच्यासोबत कारण जे जे द्याल तेच दुप्पट होवून तुम्हालाच परत मिळणार आहे . द्वेष कराल , मत्सर कराल तेच तुमच्याही कडे परत येयील तेही दाम दुप्पटीने. सृष्टीचा नियम आहे जे द्याल तेच परत मिळणार .
दुसर्याच्या आनंदात सहभागी होवून आपली कर्म कमी करण्याची संधी देव आपल्याला देत असतो आणि सोबत आपली परीक्षाही पाहत असतो ज्यात अनेकदा आपण पूर्णतः नापासच होत असतो.
द्वेष , मत्सर हा मनाला जडलेला आजार आहे. दुसर्याचे चांगले न बघवणे हा मानसिक आजार आहे ज्यातून फक्त आणि फक्त मोठ्या आजारांची नांदी मात्र होते. म्हणतात न घरचे विचारात नाही , दिव्याखाली अंधार तसे जग आहे आता . आपल्या अगदी लहान सहान गोष्टींचे कौतुक जगभर होते पण घरचे विचारत नाहीत. ज्यांच्या सोबत वाढलो मोठे झालो त्यांच्याबद्दल प्रेम नाही उलट तिरस्कार द्वेष का? कश्यासाठी ? जो तो आपापले जगतोय , कोण कुणाचे खातो आपला राम आपल्याला देतो.
निंदा नालस्ती करून आजार निर्माण होतात शरीरात आपण आपली कर्मे पापे वाढवून घेतो . असा जळफळाट करून समोरच्याचे काही वाईट होत नाही , वाट लागते ती आपली तीही कायमची. आहे ती संपत्तीही जाते आणि मनावर पापांचे थर चढून शरीर मन दुर्बल होते . आपला राग समोरच्याची प्रगती थांबवेल इतके पुण्य नाही आपल्या पदरी .
मत्सर करणे हि एक वृत्ती आहे जी अर्थात वाईट आहे आणि आपण काहीही चांगले करू शकत नाही ह्याची पोचपावती सुद्धा आहे. कुणाचेही चांगले पाहवत नाही कारण आपले काहीच चांगले नाही , जो तो आपापले नशीब घेवून येणार आणि जाणार . आपण निंदा करून न सूर्याचे तेज कमी होणार ना इतर ग्रहांच्या गतीत फरक पडणार , आपल्या आनंदाला , आयुष्यातील प्रगतीला ग्रहण मात्र नक्कीच लागेल .
दीर्घद्वेषी आणि शीघ्र कोपी माणसांनी दुसर्याचा केलेला द्वेष , मत्सर अनारोग्याच्या पायर्या आहेत मग आहेच BP, पक्षाघात आणि अजून बरच काही ...अश्या माणसांचे आयुष्य बघा खायची जगायची भ्रांत असते. दुसर्याच्या उपकारावर जगावे लागते .नखशिखांत अहंकार शरीर मन पोखरून काढतो आणि ओंजळीतून सगळेच निघून जाते ...
हवी कश्याला दुसर्याची बरोबरी . आपण जसे आहोत तसे छानच आहोत कि .
वेळीच सावरा ...परमेश्वर माफ करायलाच बसलेला आहे .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230