|| श्री स्वामी समर्थ ||
मुलगा असो अथवा मुलगी वयात आले कि घरात त्यांच्या विवाहाची चर्चा सुरु होते . तुझे कुठे ठरले असेल तर सांग बाबा असा कालानुरूप असलेला आधुनिक विचारणा , सल्लाही दिला जातो. पिढी कुठलीही असो विवाह हा जिव्हाळ्याचा विषय संपूर्ण कुटुंबासाठी असतो. आज विवाहाचे संपूर्ण चित्र बदलले आहे , पण तरीही अजूनही मंगलाक्षत ऐकताना आधुनिक नवरीच्या आधुनिक उच्च शिक्षित आईचे डोळे पाणावल्याशिवाय राहवत नाहीत ते तितकेच खरे आहे.
विवाहाचे सर्व विधी आणि त्या सर्व रूढी परंपरा अगदी रीतसर मुहूर्त काढण्यापासून ते पारंपारिक पेहराव , दागिने घालण्याकडे मुलींचा कल आजही दिसून येतो. विवाह म्हणजे आयुष्यातील मांगल्य आणि त्याचा सोहळा त्यातील गोडवा लुटण्यासाठी दोन्हीही बाजूची कुटुंबे जोमाने तयारीला लागलेली असतात . अनेकदा आयुष्याच्या पुढील वळणावर हा आनंद द्विगुणीत होतो तर अनेकदा ह्या आनंदाला सौख्याला ओहोटी लागते . असंख्य करणातून नेमके कारण शोधणे कठीण होवून जाते . असो .
विवाह आणि त्यासंबंधी तत्सम गोष्टी जसे विवाह नेमका कधी कुणाशी करावा ? पत्रिका बघावी कि नाही ? ज्योतिषीय सल्ला घ्यावा का? मंगळ आहे त्याचे काय ? अश्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न पुढील काही लेखातून करायचा प्रयत्न करत आहे. आजचे वास्तव खूप वेगळे आहे आणि त्या सर्वाशी मिळते जुळते घेवून पुढील आयुष्य जगण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते .
आजकाल मुला मुलींची शिक्षणे , नोकरी ह्यामुळे विवाहाचे वय पुढे जात आहे . आता मुलांच्या सारख्या मुलीसुद्धा आपल्या करिअर च्या बाबत जागरूक आहेत , देशोविदेशात प्रवास करणाऱ्या स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे कल असणार्या असल्यामुळे त्यांचीही मते महत्वाची आहेत .
पूर्वीचे चहापोहे आणि देण्याघेण्याच्या याद्या आज जरी इतिहासजमा झाल्या असल्या तरी त्या काळाच्या आड जाणे कितपत योग्य आहे ते येणारा काळच ठरवेल. प्रत्येक वेळी पूर्वीच्या लोकांना आणि त्यांच्या चालीरीतींना नावे ठेवून चालणार नाही कारण शेवटी जुने ते सोने म्हंटले आहेच.
विवाह संस्था टिकून राहणे ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि विवाह जुळवण्यासाठी सामाजिक घटक म्हणून प्रयत्न सुद्धा केले पाहिजेत . ज्योतिषीय दृष्टीकोन त्याचप्रमाणे सामाजिक व्यवस्था , वधू आणि वराचे आधुनिक विचार , तडजोड , एकत्र कुटुंब अवस्था कि विभक्त ह्या सर्वच गोष्टींचा उहापोह पुढील काही लेखांतून करूया आणि ह्यातील अनेक पेहलु तपासून आणि अभ्यासाची दिशाही ठरवूया .
एकूण 21 लेखांची “ रेशीमगाठी “ हि लेखन मालिका आपल्याला उपयुक्त ठरेल अशी आशा आहे,
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिका मार्गदर्शन संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment