|| श्री स्वामी समर्थ ||
जीवाला सर्वात लागणारी गोष्ट म्हणजे “ आपल्याच लोकांनी केलेली फसवणूक “ . मग जमिनीचे व्यवहार असोत अथवा भाऊ बंदकी ,पैसा असो अथवा अन्य काहीही. जेव्हा जोडीदाराची पसंती सर्वांच्या संमतीने होते , मनात नवीन संसाराचे चित्र रेखाटले जाते त्यात प्रणयाचे रंग भरले जातात , आटोपती घेतलेली खरेदी , हातावरील मेहेंदी आणि वाटलेल्या पत्रिका , केलेले कुलाचार आणि न संपणारी केळवणं... असा माहोल असताना पलीकडून जेव्हा “ स्पष्ट कारण न देता विवाह मोडला जातो “..तेव्हा मनाच्या किती आणि कश्या ठिकर्या उडत असतील ह्याची कल्पना न केलेली बरी. सगळ्याची माती होते . लग्नाचा सगळा खर्च फुकट त्यात निमंत्रणे झालेली , यजमानांना काय करावे समजत नाही. हे सर्व न भरून निघणारे नुकसान पण त्याही पेक्षा मोठे ज्या नव वधूची ह्यात काकणभर सुद्धा चूक नाही अश्या मुलीच्या कपाळी फसवणुकीचा शिक्का .किती यातना , देवावरचा विश्वास उडेल इतपत .
आज समाजात अनेकदा अश्या घटना आपण बघतो ,ऐकतो . आपल्या परिचितांच्या कडून , ओळखीतून . हे सर्व चित्र विवाह संस्थेला सुरुंग लावणारे आहे. मुला मुलींचा विवाहा वरील विश्वास उडवणारे आहे.
आजकाल मुळात जिथे विवाहच जमत नाहीत तिथे एखादा जमला तर पुढे तो टिकेल न ह्याची चिंता उर्वरित आयुष्य करावी इतके हे चित्र गंभीर आहे. आपण शिकले सवरलेले स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे लोक जेव्हा असे वागतो तेव्हा न्यायव्यवस्थेला हाक मारावीशी वाटते. कुणीही कसेही वागावे हे का ऐकून घ्यायचे .
अश्या वेळी पुढे काय हा प्रश्न उभा राहतो . पण त्याही आधी हि वेळ आलीच का ह्याचा शोध लावला पाहिजे .
अश्या पत्रिकांचा अभ्यास करताना खालील गोष्टी प्रामुख्याने लक्ष्यात आल्या आहेत . फसवणूक हि वाईट च आहे आणि त्याची शिक्षा जो करतो त्याला मिळतेच ह्यात दुमत नाही पण फसवला कोण जातो ??? तर ज्याच्या पत्रिकेत फसवले जाण्याचे योग आहेत तो. पटतंय का? हा विषय समजून घ्यायला तितका सोपा नाही. ज्याने फसवले त्याची बाजू चुकीचीच आहे त्याचे समर्थन परमेश्वर सुद्धा करणार नाही पण आपणच का फसलो ? हाही संशोधनाचा विषय आहे.
मुळात विवाहासाठी वधु किंवा वरची पत्रिका पाहताना सर्वात आधी आपल्या पाल्याची पत्रिका पाहणे गरजेचे आहे . आपल्याच मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेचा सखोल अभ्यास केला तर त्या पत्रिकेतील बारकावे , किंतु परंतु , ह्या मुलाची भविष्यात विवाह बाबत होवू शकणारी फसवणूक ह्या बाबी आरशा सारख्या लक्ख समोर येतील आणि आपण स्थळे पाहताना सतर्क राहू .
फसवणूक म्हंटले कि डोळ्यासमोर येतो तो राहू . पण हा एकटाच ह्या घटनेला कारण नसून अन्य ग्रहस्थिती सुद्धा असते. सप्तम भावातील हर्शल नेप , अचानक विवाह ठरवतील आणि मग काहीतरी गूढ जसे मुलीचे किंवा मुलाचे अन्य कुणावर प्रेम असणे किंवा आजार , मानसिक विकृती , कोड असे काहीतरी गूढ गूढ कारण जे शेवटच्या क्षणी समजते ते समोर येते आणि विवाह मोडतो.
फसतो कोण ??? कुणाची फसवणूक होते ? जातकाची ? जातक म्हणजे लग्न भाव आणि लग्नेश . लग्नेश राहूच्या नक्षत्रात म्हणजे ह्या व्यक्तीची नक्कीच फसवणूक होणार फक्त विवाहाच्या बाबत नाही तर अन्य ठिकाणीही. पण जर लग्नशा सोबत सप्तमेश असेल तर सप्तम भावाच्या म्हणजे विवाहात फसवणूक होणार. लग्नेश राहूच्या नक्षत्रात आणि लग्नेश आणि सप्तमेशा वरून जर राहूचे भ्रमण होत असेल तर शेवटच्या क्षणी विवाह मोडला नाही तरच नवल. राहुने त्याची करामत दाखवली पण ती आपल्यालाच का ? कारण आपल्याच पत्रिकेत फसवणूक होण्याचे योग आहेत म्हणून. आपण पत्रिका मिलन नीट केले का? स्थळाची चौकशी नीट केली का? साखरपुडा करण्याची आणि विवाह करण्याचीही घाई मग घ्या आता . मुलाचे मुलीचे वय वाढते आहे म्हणून आलय स्थळ घ्या उरकून असे न करता संभाव्य धोके पुढे नाहीत ना ह्याची खातरजमा करून घ्या . अनेकदा मुलगा नोकरीत आहे असे चित्र असते पण विवाहानंतर समजते कि मुलाला नोकरीच नाही . मुलाला मानसिक आजार आहेत त्यामुळे त्या दोघांचे मनोमिलन होणे कठीण होते.
सप्तमेश आणि लग्नेश , चंद्र ह्यांच्याशी राहूचा संबंध नाही ना ते बघा . राहू दशा चालू असेल तर डोळ्यात तेल घालून सतर्क राहा . स्वतः प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्या . मुलाचे शिक्षण , नोकरी तपासा. नोकरीच्या ठिकाणी जातीने जावून खात्री करून घ्या . आपल्या मुलीच्या /मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी होणार नाही ह्यासाठी प्रत्येक गोष्ट बघा.
ज्योतिषावर विश्वास नाही म्हणणरे मग घटस्फोट घ्यायची वेळ आली कि बरोबर त्यांना ज्योतिषी आठवतो . असो तात्पर्य असे कुणाचीही फसवणूक वाईट . ह्या घटना घडल्यावर कुटुंबियांना आणि वधू किंवा वराला जो मानसिक त्रास होतो , अगदी स्वतःवरील विश्वास उडतो तो वाईट असतो.
विवाह आणि विवाह संस्था हि “ विश्वासावर “ उभी आहे. कुणाचीही फसवणूक करून , अर्ध सत्य सांगून विवाह होईल पण पुढे काय ? असा विवाह टिकेल का? त्यात आनंद असेल का? फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला देव अजिबात सोडणार नाही कारण त्याने त्याचे कर्म वाढवून ठेवले आहे पण जो फसवला गेला त्याचे भोग पुढे त्याला मानसिक दृष्टीने कुठवर नेतील हा प्रश्न आहे आणि हा फक्त त्या कुटुंबाचा नाही तर समाजाचा सुद्धा आहे.
पुरेशी चौकशी नाही आणि एक दोन भेटीत विवाह ठरवण्याची घाई करणे दोन्हीकडून टाळावे ...तसेच ज्योतिष मार्गदर्शन करून घ्यावे जेणेकरून आपल्या स्वतःच्या पत्रिकेचे सर्व कंगोरे आपले आपल्याच समजतील .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment