Wednesday, 25 June 2025

महादशा कि राजयोग ?? महत्वाचे काय ??

 || श्री स्वामी समर्थ ||




ग्रहांचा मानवी जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे आणि आपल्या जीवनावर त्यांचा विशिष्ठ ठसा सुद्धा आहे . प्रत्येक ग्रह आपल्या दशेत आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव टाकत असतो. दशा म्हणजे ग्रहाला दिलेला कालावधी ज्यात ग्रह ज्या भावात आहे तो भाव , त्याच्या राशी जिथे आहेत तेही भाव , तो ज्या नक्षत्रात आहे तो नक्षत्रस्वामी ज्या भावात आहे तोही भाव , ग्रह दृष्टी टाकतो ते भाव असे सर्व फळे देण्यास उत्सुक होतात . अजून खोलात शिरले तर उप नक्षत्र स्वामीही आहेच. 

आपल्या पत्रिकेत अनेक ग्रह स्वराशीत , उच्च अवस्थेत असून अनेकदा त्यांचा राजयोग सुद्धा होत असतो . प्रत्येक वेळी हे राजयोग फलित देतात का? तर नाही. ग्रहांची फलिते हि संपूर्णतः आपल्या दशा अंतरदशेवर अवलंबून असतात . उदा. एखाद्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा किंवा बलवान आहे. पण त्याची दशाच आली नाही तर त्याची सर्वात उच्च फळे आपल्याला अनुभवताच येणार नाहीत . इतर ग्रहांच्या दशेत शुक्राची अंतर्दशा येयील तेव्हा थोडी फळे अनुभवायला मिळतील पण महादशा म्हणून शुक्र येणे वेगळे ती फळे मिळणार नाहीत .

अश्या वेळी शुक्र पत्रिकेत कितीही बलवान असला तरी त्याची दशा नसल्यामुळे त्याची फळे मिळणार नाहीत . म्हणूनच आयुष्यात राजयोग तेव्हाच फलित देतात जेव्हा त्या ग्रहाच्या दशा अंतर्दशा असतात . एकदा एका व्यक्तीची शुक्राची दशा ६५ व्या वर्षी आली. आयुष्यात कधी बायकोला गजरा न आणलेला व्यक्ती बायकोला गजरा आणू लागला, तिच्यासोबत वेळ घालवू लागला, आपण ह्या टूर ला जावू त्या प्रदर्शनाला सिनेमाला जावू असे होवू लागले. हीच शुक्राची दशा त्यांच्या ऐन तारुण्यात आली असती तर अनेक सुखांची दालने तेव्हाच उघडली असती. 

प्रत्येक ग्रहाला अमुक एक काळ दिलेला आहे जसे रविला ६ वर्ष मंगळाला ७ वर्ष , सर्वात अधिक काळ शनीला १९ राहुला १८ वर्ष असा दिलेला आहे. आपल्या पत्रिकेत तो ग्रह चांगला असेल तर ती दशाही चांगली जायील अन्यथा नाही. दशा संपूर्ण चांगली वाईट नसते कारण मध्ये मध्ये अंतर्दशा सुद्धा येतात आणि त्यांचे ग्रह कसे आहेत त्यावर त्यांचे फलित असते. 

अनेकदा माझा अमुक ग्रह स्वराशीत किंवा उच्चीचा आहे पण त्याचे फल मिळत नाही कारण त्याच्या दशेतच ग्रह सर्वाधिक फळे देतो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यावेळी आवश्यक ग्रहाची दशा आली तर उपयुक्त ठरते . जसे शुक्र हा आनंद पर्यटन विलास खरेदी भिन्नलिंगी आकर्षण विवाह तारुण्य मौजमजा  दागिने अत्तरे फुले एकंदरीत भौतिक सुखाचा कारक ग्रह आहे त्याची दशा २० वर्षाची असून ती ऐन उमेदीत आली तरच त्याचा पूर्ण उपभोग घेता येयील. शुक्राची दशा आयुष्याच्या उत्तरार्धात येवून उपयोग नाही . आयुष्याच्या संध्याकाळी विरक्त अश्या शनीची दशा आली तर त्यावेळी योग्य अशी अध्यात्मिक वाटचाल आणि शांत विरक्त जीवन जगता येयील.

पत्रीकेतील राजयोगापेक्षाही अत्यंत प्रभावशाली असतात त्या महादशा . प्रत्येक घटना घडवण्याचा काळ निश्चित करण्याचा संपूर्ण हक्क आणि अधिकार राखून ठेवणार्या महादशा सगळे लगाम आपल्याकडे ठेवतात . त्यांच्या अभ्यासा शिवाय घटनेची वेळ सांगता येत नाही. त्यामुळे त्या सर्वप्रथम लक्ष्यात घ्याव्या लागतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष म्हणजे चुकीचे भाकीत .राजयोग करणाऱ्या ग्रहाची दशा येते तेव्हाच त्या राजयोगा ची फलिते प्राप्त होतात .

 आपले जन्मस्थ नक्षत्र जे असते त्या ग्रहाची दशा आपल्याला जन्मतः असते. उदा. जर सिंह राशीतील केतूच्या मघा नक्षत्रात जन्म झाला तर केतू दशेने आयुष्याची सुरवात होते. पुढे शुक्र रवी चंद्र मंगळ राहू गुरु शनी बुध ह्या क्रमाने दशा येत राहतात . सगळ्या ग्रहांच्या दशा आपण भोगू शकत नाही , आपल्या आयुष्य मर्यादेवर ते अवलंबून असते.

दशे मध्ये येणाऱ्या अंतर्दशा सुद्धा महत्वाच्या असतात . खरतर अंतर्दशा ह्या सगळ्यात बलवान असतात . त्यामुळे शुक्र ह्या ग्रहाची २० वर्षाची दशा सातत्त्याने चांगली अथवा वाईट जाणार नाही कारण त्यात येणाऱ्या अंतर्दशा सुद्धा आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या असतात . 

प्रत्येक ग्रहाचे फळ कर्माशी बांधील आहे . म्हणूनच आपल्या कर्मानुसार ग्रह फळ देत असतात . ग्रहांना दोष देणे बंद केले पाहिजे कारण शेवटी कर्म हि आपलीच असतात . अनेकदा माझा हा ग्रह उच्चीचा आहे वगैरे आपण ऐकतो पण मग हव्या त्या घटना का नाही घडत ? 


ह्याला अनुसरून एक लहानसे उदा. द्यावेसे वाटते. मध्यंतरी एका मुलाची पत्रिका पहिली. प्रश्न विवाहाचा होता . वय ३४ च्या आसपास होते . त्याची आई मुलाचे तोंडभरून कौतुक सांगत होती. आईला कौतुक असणारच न आपल्या मुलाचे . कौतुक करण्यासारखी करिअर , पैसा दिसणे सर्व काही उत्तम होते पण विवाह अजूनही झाला नव्हता . त्या म्हणाल्या मुली इतक्या सांगून  येत आहेत पण काय अडते समजत नाही . 

आज मुली सुद्धा ३४-३५ ला लग्न करतात त्यामुळे आजकाल हे वय म्हणजे उशीर असेही म्हणता येत नव्हते. अगदी १०० च्या वरती मुली पाहून झाल्या अनेक सोशल साईट वरून पण लग्न जमत नव्हते . 

ह्या मुलाची पत्रिका पाहिल्यावर लक्ष्यात आले वैवाहिक सुखाचा कारक बिघडला होता आणि मुख्य म्हणजे षष्ठ भावाची दशा चालू होती. षष्ठेशाच्या  नक्षत्रात एकही ग्रह नाही त्यामुळे षष्ठ भावाचा तो एकमेव कार्येश होता. आता त्याची दशा ७ व्या भावाचे सुख कसे देणार . ती दशा सोडून द्यावी लागणार म्हणजे त्याचे वय ४५ च्या पुढे जाणार. असो.

मुख्य मुद्दा असा कि महादशा स्वामीचा ग्रीन सिग्नल असल्याशिवाय गाडी हलणार नाही . म्हणूनच संपूर्ण पत्रिकेचा सखोल अभ्यास महत्वाचा . नुसता गोचर गुरु रवी फिरवून लग्न होत नाही. शास्त्र अचूक उत्तर देतेच देते , अभ्यास  परिपूर्ण हवा .


सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment