|| श्री स्वामी समर्थ ||
प्रेम हि भावना आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. ज्यांना शुद्ध निस्वार्थी प्रेम मिळते ते खरेच भाग्यवान आहेत . प्रेम हि भावना आहे आणि ती व्यक्त होणे तितकेच गरजेचे आहे. आपण कुणालातरी आवडतो हि कारण सुद्धा जगायला कारणीभूत होते. कलियुगात असे प्रेम जरा दुर्मिळ झाले आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. काहीतरी काम असल्याशिवाय कुणी कुणाला साधा फोन सुद्धा करत नाही , कुणाला भेटतही नाही . असो. प्रत्येक वयातील प्रेम वेगळे असते तसेच प्रत्येक नात्यातील सुद्धा. आईचे मुलावर असणारे प्रेम खरच अमर्याद असते , तिला फक्त देणे माहित असते घेणे नाही . आपले नातेवाईक मित्र आप्तेष्ट हे सगळेच प्रेमाच्या धाग्याने बांधले गेलेले असतात .
आपल्या प्रेयसीचे , पत्नीचे प्रेम हेही विविध छटा दर्शवते. पुढे मुले नातवंडे , प्रेमाचा ओघ सुरूच राहतो. आज आपण विवाहातील प्रेम संबंध कसे असू शकतात किबहुना कसे असणे अपेक्षित आहे ह्यावर चर्चा करूया . आपणही आपली मते मांडा ती स्वागतार्ह असतील.
आजकाल वाढत्या वयातील घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे तर तरुणाई अनेकदा आकर्षणाच्या मोहाच्या क्षणात फसताना दिसते . लग्न नकोच असेही काही जणांचे विचार आहेत . हे सर्व ऐकून अनेक प्रश्न मनात येतात म्हणूनच आजचा लेखन प्रपंच .
एखाद्या मुलाला मुलगी आवडते म्हणजे नक्की काय होते ? प्रेम ? अजिबात नाही . त्या “ click “ चा अर्थ दर्शनी दिसणारे रूप , देहबोली बाह्य रूप असा आहे. तिचे दिसणे , असणे , आपल्या मित्रांची हीची ओळख करून देऊ शकतो हा विचार डोक्यात चाललेला असतो. तिचा modern , stylish लुक सोलिड आवडलेला असतो . पटतंय का? तिच्या बरोबरच्या कॉफी हाउस मधल्या चार दोन भेटी विवाह ठरवतात , २४ तासातील ४८ तास चाललेले चाटिंग , प्रेमात आकंठ बुडायला लावते. मनाने अनेकदा ते दोघे हनिमून ला सुद्धा जावून आलेले असतात . हे सर्व आहे हे असे आहे. पण मग विवाह पश्च्यात काही दिवसात किंवा महिन्यात वर्षात असे काय होते कि वेळ घटस्फोटा पर्यंत येते.
मग प्रश्न पडतो ते प्रेम होते कि नुसतेच आकर्षण ????????? आकर्षणाला प्रेम समजण्याची गल्लत त्यांनी केलेली असते . तुम्हाला सुद्धा असे प्रश्न पडत असतील. तिचे आणि त्याचे गुण अवगुण समजायला पुरेसा वेळ एकमेकांना न देताच लावलेले लग्न . अनेकदा अवगुण दिसूनही दृष्टी आड सृष्टी असे म्हणून त्याकडे केलेले दुर्लक्ष्य . संसारातील लहान सहान सुखात रममाण होण्यापेक्षा पैशाची मोठी गणिते मांडण्यात हरवणारे ते दोघे एकत्र जेवणाचे , एकत्र गप्पा मारण्याच्या सुखाला कुठेतरी वंचित राहतात . नुसती मोठ मोठी बिले भरत राहणे आणि परदेशी वार्या म्हणजे संसार नाही.
कुणालातरी सारखे इंप्रेस कश्याला करत राहायचे ? मग ते उंची कपडे अत्तर असो किंवा घर गाडी . ह्या सगळ्यात संसार करणे राहूनच जाते आणि मग संवादाला पारखे झालेल्या त्या दोघांना लग्ना पूर्वीच्या दिवसांचा विसर पडतो . घेलेल्या आणाभाका ? साधा चहा करण्यावरून वाद ? होतातच कसे ?? अरे आवडली होती न तुला ती इतकी ? मग आता काय झाले?
थोडक्यात सांगायचे आहे कि विवाह ठरवताना आपली मते दोघांनीही स्पष्ट मांडावीत , आपले विचार मग ते आर्थिक , वैचारिक सामाजिक अगदी लैंगिक सुद्धा कसेही असोत त्यावर मोकळेपणाने चर्चा करा. अश्यावेळी अनेक गोष्टी उलगडत जातील जसे मुलगा म्हणेल मी पावसाळ्यात शनिवार रविवार पावसात मित्रांसोबत जातो माझे अनेक ग्रुप आहेत पण तिला नसेल यायचे किंवा तिला त्या ग्रुप सोबत न जाता स्वतःच्या ग्रुप सोबत जायचे असेल तर हे सर्व आधीच स्पष्ट होणे आवश्यक आहे. इतक्या लहान सहान गोष्टींचे पुढे मेरू पर्वत होतात हे नक्की.
प्रेम असेल ते टिकून राहते , प्रेम असेल तर ती दोघे एकमेकांसाठी समर्पण त्याग करतील , एकमेकांचा समजून घेतील आणि समोरच्याच्या विचारांचा मान ठेवतील , एकमेकांना व्यक्ती स्वतंत्र देणे म्हणजे प्रेम , प्रत्येक वेळी तू मुलांसाठी घरात थांब हे प्रेम नाही हि तिला करायला लागणारी तडजोड आहे. मुले फक्त तिचीच आहेत का?
गेल्या १-२ वर्षात माझ्या ओळखीत जवळ जवळ लग्नाला २५ -३० वर्ष होवूनही घटस्फोट झालेले आहेत . संयम संपला.
गेले २५ वर्ष एकमेकांना सांभाळून घेतले आता मुलांचे विवाह तोंडावर असताना स्वतःच घटस्फोट घ्यायचा म्हणजे नक्कीच तसेच कारण असणार . असो.
लग्नापूर्वी तो किंवा ती अशी नव्हती हे वाक्य आता उगाळून कोळसा झाल्यासारखे वाटते . लग्नानंतर तिचा काळा रंग गोरा झाला कि काय ? तीही तशीच आहे आणि तुही , बदलला आहे तो दृष्टीकोन . इथे कुणीही परीकथेतील
राजकुमारासारखे नाही आणि कुणी सिंड्रेला सुद्धा नाही . आपण सर्व सामान्य माणसे आहोत. वयानुसार आपली देहबोली दिसणे विचार आवडी नक्कीच बदलत राहणार आणि त्या एकमेकांनी आहेत तश्या स्वीकारणे म्हणजे प्रेम . हे होत नसेल तर ते प्रेम नव्हतेच होते ते फक्त आकर्षण आणि म्हणूनच ते क्षणात विरले आणि मग जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा ते आपल्याला स्वीकारायला जड जाते . लग्न ठरवताना घाई करू नका आवडली मुलगी तर लगेच पत्रिका छापा असे करू नका कारण हे बंध आयुष्यभराचे आहेत . ते दिवसागणिक वृद्धिंगत व्हावे , विरळ होवून विरून जायला नकोत हीच इच्छा आहे.
प्रेम आणि आकर्षण ह्यात आपण नेहमीच गल्लत करतो , प्रेम अपेक्षा विरहित असते आणि टिकून राहण्याकडे कल असतो , तिथे अटींचे बंधन नसते , सहवासोत्तर ते वाढते पण आकर्षण क्षणिक असते बहुतेक ९९% ते शारीरिक आकर्षण असते . म्हणूनच ते टिकत नाही .
आजकालच्या विवाह करण्यास उत्सुक सर्वच मुलामुलींनी ह्याचा गांभीर्याने विचार करावा . आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्याला संसार करायचा आहे , आपल्या रूढी परंपरा जपायच्या आहेत . लग्न हे लग्न असते ते पूर्वीचे आधुनिक अशी लेबले नसतात त्याला. विवाह हा एक शुभ संस्कार आहे , नात्या सोबत अनेक अपेक्षा येतात आणि त्यात शिथिलता नसेल तर त्यांचे ओझे वाटू लागते . एकमेकांना हवेहवेसे वाटणे हे नक्की काय ह्याची कारणे स्वतःची स्वतःच तपासावीत कारण ती किंवा तो कालानुरूप बदलत जाणार आहे . नुसत्या बाह्य आकर्षणाला प्रेम समजण्याची गल्लत केली तर संसाराची गाडी समांतर रेषांसारखी जायील .
आकर्षण आयुष्यात अनेक गोष्टींचे असते पण संसारात “ आकर्षण “ उपयोगी नाही . विश्वास प्रेम ह्यावर संसाराची इमारत उभी असते . नुसतेच आकर्षण असेल तर संसाराची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कधी कोसळेल आपल्याला सुद्धा समजणार नाही. प्रेम एकमेकांच्या चुका स्वीकारायचे धारिष्ट्य दाखवते आणि फुलत जाते. समोरचा आपलेही अवगुण स्वीकारणार आहे तेव्हा आपणही ते स्वीकारण्याचे मोठे मन दाखवले पाहिजे . छान छान दिसण्याचे गुडी गुडी बोलण्याचे ते चार दिवस फुलपाखरासारखे उडून जातात आणि मग खरा संसार सुरु होतो तेव्हा प्रेमाची खरी ताकद समजते . वयासोबत परिपक्व होणे , प्रगल्भता येणे अपेक्षित आहे . एकमेकांचे होणे म्हणजे प्रेम आणि म्हणूनच प्रेम कि आकर्षण ह्यातील फरक समजून घेतला तर संसार नक्कीच सुखाचा होईल.
गेल्या काही दिवसात येणाऱ्या पत्रिका ह्या घटस्फोटाची नांदी करणाऱ्या होत्या पण एक विशेष गोष्ट म्हणजे त्यातील बर्याच जणांचे प्रेम विवाह होते . नक्की ते प्रेम होते कि नुसतेच आकर्षण ? कुठे चुकत गेले ? का? जन्मभराच्या आणा भाका घेतलेल्या गेल्या कुठे ? एकमेकांमधील so called interest गेला कुठे ? कि तो नव्हताच कधी ? असे असंख्य प्रश्न पुढे राहतील अशी स्थिती म्हणून ह्या विषयावर लिहावेसे वाटले. रूप रंग दिसणे हसणे हे क्षणिक आहे , मनाची उदात्तता , संसार करण्याची मनोवृत्ती , कुटुंबातील लोकांना आपलेसे करून घेण्याची क्षमता आणि वेळ प्रसंगी समर्पण ह्या सर्व गोष्टी विवाहाच्या दीर्घ प्रवासात उपयोगी पडणार्या आहेत .. त्याबद्दल जागरूक असले पाहिजे .आकर्षणाला अस्तित्व नसते , ते क्षणिक आकर्षण नुसते त्या दोघांचे नाही तर दोन कुटुंबांचे विवाहाचे स्वप्न धुळीस मिळवते .
म्हणूनच म्हणावेसे वाटते गुण मिलन , ग्रह मिलन आणि सगळ्यात मुख्य मनोमिलन .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment