Friday, 27 June 2025

राजेशाही थाट ( सिंह लग्न )

 || श्री स्वामी समर्थ ||




काही दिवसात बर्याच सिंह लग्नाच्या पत्रिका पहिल्या म्हणून आज ह्या लग्नाविषयी लिहावेसे वाटले. सिंह म्हणजे वनाचा राजा आणि राजा म्हंटला कि सगळा तामझाम आलाच . राजासारखा राजाच असतो नाही का. सिंह हि राजराशी आहे राशीचा स्वामी ग्रह हा रवी आहे आणि रवी चे अस्तित्व अबाधित आहे सर्व ग्रहानी त्याचे वर्चस्व , अधिपत्य मान्य केले आहे म्हणूनच त्याच्या भोवती सौर मंडळात सर्व ग्रह त्याच्या भोवती आपापल्या कक्षेत आपापल्या गतीने भ्रमण करत असतात .

सिंह राशी हि पाचवी राशी असून काल पुरुषाच्या कुंडलीत ती पंचम भावात येते. पंचम भाव हा धर्म त्रिकोणातील गाभा असून पुर्व जन्माशी जोडलेला आहे तसेच त्याला कोण स्थान सुद्धा म्हंटलेले आहे. चतुर्थ ( काही ग्रंथ ), पंचम भावावरून आपण आपले हृदय पाहतो आणि म्हणून पंचम भाव शुद्ध असेल तर हृदय दुसर्यासाठी धडकत राहते शेवटपर्यंत. पंचम भाव म्हणजे प्रेम प्रणय विद्या संतती कला खेळ ज्योतिष तंत्र मंत्र आणि शेअर मार्केट सुद्धा .

सिंह लग्न हे अध्यात्मिकता दर्शवते. हे लोक पंचमेश गुरु असल्यामुळे देवावर विश्वास श्रद्धा असणारे असतात . राजाच्या दरबारी सुद्धा राज गुरु , राज पुरोहित , राज ज्योतिषी असत . गुरुतुल्य व्यक्तींचा राजा नेहमीच आदर सन्मान करत असे. तसेच हे लोक सुद्धा असतात . गुरु म्हणजे ज्ञान आणि गुरूची धनु राशी पंचमात आल्यामुळे हे लोक ज्ञान पिपासू , सत्शील असतात . राजाचे सर्व गुण ह्यांच्या ठायी असतात . अनेकदा हलक्या कानाचे स्तुतीप्रिय असतात . ह्यांना सतत कुणीतरी वाह वा म्हणायला लागते. रविचे लग्न असल्यामुळे मुळात शारीरिक ताकद उत्तम ,उत्तम जीवनशक्ती , व्यायामाची आवड , शारीरिक कष्टाला न घाबरणारे , जिद्द त्याच सोबत अहंकार , ओतप्रोत मी पणा हेही गुण उपजत असतात . करारी तडफदार नेतृत्व गुण असल्यामुळे मोठ मोठी पदे भूषवतात  . अंगावर घेतलेले  काम जबाबदारीने पूर्णत्वाला नेतात . संघटन कौशल्य असते. दिलदार , प्रेमळ आणि ईश्वरावर प्रचंड श्रद्धा .

प्रत्येक गोष्ट अर्थात राजा असल्यामुळे उत्तम लागते. ह्यांना दुय्यम स्थान पचनी पडत नाही. खाईन तर तुपाशी असली अवस्था असते. रवी भोवती इतर ग्रह फेर धरून भ्रमण करतात तसे प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा त्यांच्या भोवती खुशमस्करे अवती भोवती असेल कि ते मनातून सुखावतात . 

ग्रहांचा राजा त्यामुळे दानशूर , कलाकारांचा सन्मान करणारा , प्रजेचे हित पाहणारा राजा कुणाला त्रास देत नाही . कुणाचे अहित करणार नाही , परोपकारी , तत्वनिष्ठ , न्याय प्रिय पण अहंकारी मानी वृत्ती चा असतो. राजावर कुणी वर्चस्व गाजवलेले आवडत नाही .स्वतःचे व्यक्ति स्वातंत्र जपणारे हे लोक असतात .कर्तुत्व अफाट पण मानी स्वभाव त्यामुळे अनेकदा माणसे तुटतात , दुरावतात . स्वाभिमान असतो , धाडसी असतात . मंगळ लग्नाला योग कारक ग्रह आहे. राजाचा सेनापती चांगल्या स्थानी आणि चांगल्या नक्षत्रात असेल तर मंगळाची दशा उत्तम जाते. सिंह लग्नाचे लोक सतत इतरांना मदत करणारे, परिणामांची धास्ती न बाळगणारे असतात .खरेपणा , कष्टाळू , धार्मिकता असते . शासनाचे नियम तंतोतंत पाळणारे असतात .

अग्नितत्वाचे हे लग्न असल्यामुळे धर्म त्रिकोणात सगळ्या अग्नी राशी येतात . राजा असल्यामुळे थोडीशी हुकुमशाही वृत्ती , धाडस , जिद्द , अधिकाराचे तेज आणि लालसा असणारे, विवेकी , आचार विचारांनी शुद्ध स्विक राहणीमान , अत्यंत मोकळ्या मानाने जगणारे , उत्साही असतात . देवावर श्रद्धा त्यामुळे उत्तम साधना , ध्यान तेजस्वी व्यक्तिमत्व , रुबाबदार राहणीमान असते. कलासक्त , थोडेसे गर्विष्ठ आणि थोडा मी मी पण असतोच. अग्नीतत्व असल्यामुळे आणि सकारात्मकता असल्यामुळे आजारातून लवकर बरे होतात . व्यायामाची आवड असते. अहंकारी वृत्तीचा त्याग केला तर जनमानसात त्यांच्यासारखी आपलीशी वाटणारी व्यक्ती दुसरी नाही.  

खोटेपणा अंगी नसतो , उंची खाणे पिणे , पेहराव जीवनशैली पसंत करतात . लग्नेश रवी सुस्थितीत असेल तर आरोग्य उत्तम असते. सिंह लग्नाला  शनी  अनिष्ट ग्रह आहे त्यामुळे त्यांच्या दशा त्रासदायक असतात .  सतत वाचन मनन चिंतन आवडते . लाभेश बुधाची राशी असल्यामुळे सर्व वयोगटाच्या लोकांशी त्यांचे जमते. व्यासंग दांडगा असतो. 

मनात काही नसले तरी वागण्यातून बोलण्यातून मी म्हणजे कोण हि भावना डोकावते त्यामुळे अनेकवेळा ते एकटे राहतात . इतरांचे गुण आपलेसे न करणे हा स्वभाव त्यांना एकांतात नेतो . नामस्मरण , जप करून उत्तम साधक होण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते. राजा असल्यामुळे राजकीय क्षेत्र , मोठे व्यवसाय , मोठी पदे, व्यवस्थापन क्षेत्र ह्यात नेत्रदिपक कामगिरी करतात . स्वकष्टाने आयुष्यात पुढे येतात कारण कष्टाला कमी पडत नाहीत . मनापासून मित्र जपणारे असतात . लोकांच्यात रमणारे , कलासक्त असतात . सिंह लग्नाचे लोक चारचौघात नेहमीच उठून दिसतात . सप्तमेश शनी असल्यामुळे वैवाहिक सौख्य कमी अधिक असू शकते आणि त्यात त्यांना थोडे अपयश सुद्धा येते किंवा सर्वार्थाने संसारात तडजोड करावी लागते आणि तो त्यांचा मुळ स्वभाव नसल्यामुळे त्यांना अधिक कष्ट होतात .

सिंह हा राजा आहे आणि प्रजेचे हित जपणारा आहे. पंचमात चंद्र असेल तर प्रेमळ , सर्वांच्यात मध्यभागी असण्याचा प्रयत्न असतो. दानशूर , महत्वाकांक्षी , शूर , निडर पण तितकाच संवेदनशील व्यक्ती , धर्माचे आचरण करणारा आणि सगळ्यात असूनही आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवणारा हा सिंह लग्नाचा जातक डोळ्यात भरल्याशिवाय राहत नाही आणि आपण आपल्याही नकळत त्याच्यासमोर नतमस्तक होतो. त्याच्या तेजामुळे फक्त सौरमंडळ नाहीतर संपूर्ण पृथ्वी तेजोमय होते. विशाल हृदयाचा , कनवाळू , दुसर्याचे दुक्ख समजून घेणारा आणि वेळीच मदतीचा हात पुढे करणारा .अनेकदा त्यांना महत्व दिले नाही किंवा दुय्यम स्थान दिले तर खपत नाही. 

स्पर्धा इर्षा आणि अहंकार ह्या गोष्टीना तिलांजली दिली तर सिंह जातका सारखा जातक नाही. सिंह राशीत रवी मंगळा सारखे ग्रह आले तर अरेरावी अहंकार ह्या दुर्गुणांच्या मुळे पिछाडीला जावू शकतात . हे गुण आटोक्यात राहिले तर उत्तम संघटन कौशल्य आणि नेतृत्व करतील . गुरुतुल्य असतात , मनन चिंतन , अध्यात्म ह्यात जीवन व्यतीत होते . खोटेपणाचा लवलेश नसतो , पण अति स्पष्टवक्ते असतात , आतबाहेर एकच वर्तन असते , माघार घेणे , झुकणे  माहित नसते त्यामुळे अनेकदा नाती संबंध तुटतात . सहसा आपली चूक मान्य करत नाहीत .शनी सप्तमेश त्यामुळे वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागते. समजात  जीवनात उठून दिसतात कारण काहीतरी असामान्य असे देवून जातात .  


आपल्या ओळखीत सिंह लग्नाचे लोक असतील तर ह्या सर्व गुणांचा आरसा त्यांच्यात नक्कीच बघायला मिळेल . राजासारखी राहणी आणि व्यक्तिमत्व असणार्या ह्या सिंह जातकांना मानाचा सलाम.


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment