|| श्री स्वामी समर्थ ||
खुलभर दुधाच्या गोष्टीत जगातील सगळे अध्यात्म समाविष्ट आहे असे मला नेहमी वाटते. ह्या गोष्टी आपण लहानपणी आई आज्जी कडून अनेकदा ऐकल्या आहेत आणि त्या आपल्या मनावर खोलवर बिंबल्या आहेत. देव कुठलाही असो अंतर्मनापासून त्याला शरण गेलो तर तो आपल्याला मार्ग दाखवतो.
संसारात प्रपंचात प्रत्येक पावलावर आव्हान असते पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साकडे घालणे इष्ट होयील का. ५ नारळाचे तोरण बांधीन मला हे द्या , लाडूचा प्रसाद वाटीन ते द्या हे खरच करायची गरज आहे का? मनातील सच्चा भावासाठी ते भुकेलेले आहेत . आपणही म्हणतो कि मला आयुष्यात खरा मित्र मिळावा , सच्चा दोस्त हीच आपली आयुष्यातील मोठी संपत्ती असते , अगदी तसेच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे.
कश्यासाठी तरी सेवा करायची गरजच नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही . अक्कलकोट ला जाण्यासाठी खिशात पैसा नसेल आणि भक्ताने आहे तिथून महाराजांना मनापासून हाक मारली तर ते असे थोडेच म्हणणार आहेत कि आधी तू इथे ये मग बघतो तुझा प्रश्न . अक्कलकोट ला तो शरीराने पोहोचेल सुद्धा पण ह्या क्षणाला तो मनाने महाराजांच्या चरणाशी पोहोचलेला आहे आणि हे फक्त त्यांनाच माहित आहे.
आपले मन आणि हेतू किती स्पष्ट आहे त्यावर आपली प्रचीती अवलंबून आहे. नुसते स्वामी स्वामी करून अहंकार जोपासतो आपण. मी अक्कलकोट ला जावून आलो आणि १०० वेळा तारक मंत्र म्हंटला पण मन अशुद्ध काय उपयोग आहे त्याचा. महाराजांच्यावर प्रेम अथांग समुद्रासारखे असले पाहिजे , कुठलीही शंका कुशंका नसावी .
एकदा दोन बायका महाराजांच्या कडे गेल्या आणि म्हणाल्या आम्हाला अपत्य नाही . महाराजानी त्यांच्याजवळ एक हाडूक पडले होते ते एका बाईच्या पदरात टाकणार इतक्यात तिथे पदराची झोळी मागे केली कारण ती ब्राम्हण होती . सोवळे आड आले. पण दुसरीने ते हाडूक प्रसाद म्हणून घेतले ती ब्राम्हण नव्हती म्हणून नाही तर हे महाराजांनी दिले आहे आणि त्यात माझे भले आहे. तिला मुल झाले. अशी निरपेक्ष भक्ती केली पाहिजे . त्यांच्याशिवाय कुठलाच विचार मनात नसावा. त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे , तनमन धन अर्पण करून भक्ती भक्ती आणि भक्तीत रमले पाहिजे .
प्रपंचातून सगळी आसक्ती सोडण्यासाठी अध्यात्म आहे त्यामुळे महाराजांच्याकडे भौतिक सुखे मागण्याचा प्रश्नच येत नाही . परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जसजशी जाणवू लागते प्रपंचातून मन मुक्त होत जाते , विरक्ती येते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य हवे इतकेच वाटते. महाराजांच्याकडे सगळा स्वछ्य कारभार आहे. मनात एक ओठात एक पोटात एक त्यांना चालत नाही. आपल्यासाठी महाराजांचे नाव मुखात येणे हे आपले परमभाग्य आहे. महाराज हे अनाकलनीय , असामान्य , अद्वितीय विभूती आहेत , महाराज समजणे हे आपल्या सामान्य बाल बुद्धीच्या पलीकडे असणारी झेप आहे. मागच्या जन्माचे पूर्व सुकृत चांगले म्हणून ह्या जन्मी त्यांचे चरण लाभले आहेत आणि हाच भाव भक्ती करताना असेल तर महाराज तुमच्या नक्कीच जवळ येतील.
अध्यात्म आपल्याला जगवते. सकाळी उठल्यापासून आपण महाराजांचे सानिध्य अनुभवतो आणि त्यांच्याच सानिध्यात राहतो. देव भोळ्या भक्तीचा भुकेला आहे . आपण त्याला उगीचच पेढे बर्फी लाडू ह्यात अडकवून ठेवतो. महाराजांच्या सेवेत असणार्या आणि त्यांच्याच सोबत राहणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्याच्या प्रश्नाचे उत्तर इतर कुणाला विचारायची आवश्यकताच नाही . आपली स्वतःची साधना उपासना आपले उत्तर निश्चित देणार , देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो ते शोधले पाहिजे .
सतत भयभीत राहून चिंता करणे आणि स्वामी स्वामी करणे . एक काहीतरी करा ..भक्ती तरी करा नाहीतर चिंता . एक क्षण सुद्धा त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत नाही . देव्हार्यासमोर उभे असतो पण लक्ष्य कुकरच्या शीटीकडे. प्रपंचातून विरक्त करणारी साधना आहे . आपला सगळा जीव ह्या भौतिक सुखात अडकलेला आहे. माझा चांदीचे भांडे , माझी दुलई , माझे हे आणि माझे ते. इथून काहीही न्यायचे नाही कारण काही घेवून आलो नाही तरीही सगळे जमा करण्याचा अट्टाहास असतो. जमवायचेच असेल तर नामस्मरण , अनुभव , प्रचीती ह्याचे गाठोडे करा ते न्यायचे आहे सोबत .
कलियुगात वस्त्राप्रमाणे देव पण बदलले जातात . रोज नवा ज्योतिषी रोज नवीन उपाय रोज नवीन गुरु रोज नवनवीन साधना . कश्याचा काही ताळमेळ नाही . कुठे वाहवत चाललो आहोत आपण आपले आपल्यालाच समजत नाहीय. कुठेही एकाग्रता , सारासार विचारबुद्धी नाही म्हणून कुठे थांबायचे तेच समजत नाही. दिशाहीन आयुष्य झाले आहे . चिंतेतून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत पण त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघताय कोण ? कधी प्रेमाने त्यांच्या जवळ बसतो का आपण चार शब्द खुशालीचे महाराज कसे आहात ? थंडी वाजतेय का तुम्हाला ? आजचा नेवैद्य आवडला का ? काहीतरी गोड शब्द बोलतो का आपण . २४ तास सगळ्यांनी आपल्याच दिमतीत राहायचे , जरा मनाविरुद्ध झाले कि थयथयाट सुरु . संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपलाच विश्वास नाही .
काम धाम सोडून त्यांच्याजवळ बसाल तर हाकलून देतील ते तुम्हाला . शेत पिकवून खा हा त्यांचा आदेश आहे . प्रपंचातील सर्व कर्तव्ये पार पाडून क्षणभर त्यांना द्या पण तो क्षण खरा असावा , त्या क्षणात त्यांना आपलेसे करण्याची ताकद ठेवा . मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा हवा . समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काहीतरी मागणारा , गरजू लोकांना मदत करणारा भक्त हवा .
अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर करते . सगळे सोडून जातील पण महाराज नाही हा विश्वास हवा . द्या सगळा संसार , प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून...मग बघा ..अंतर्बाह्य अनुभूती ते दिल्याशिवाय राहणार नाहीत . त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील शुद्ध भाव .
शरणागत दिनार्थ परित्राण परायणे |
सर्व स्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते ||
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment