Saturday, 7 June 2025

माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू ????

 || श्री स्वामी समर्थ ||




संथ असणारया पाण्यात खडा टाकला तर जे होते तेच राहू दशा सुरु झाली कि आपल्या आयुष्याचे होते . राहू ह्या भावात चांगला आणि राहू ह्या नक्षत्रात चांगला हे सबकुछ झूट आहे. राहू केतू हे राक्षस आहेत आणि त्यांना कितीही आंजरले गोंजारले तरी त्यांचे मुळ स्वभाव गुणधर्म जाणार नाहीत . प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तश्याच राहुला सुद्धा आहेत . 

राहू हा चंद्राला ग्रहण लावतो म्हणजे नेमके काय होते. आयुष्यात अश्या घटना घडायला सुरवात होते ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो , आपली शांत झोप उडते, मन सैरभैर होते आणि नक्की काय चाललय तेच समजेनासे होते. आपल्या मनाच्या ठिकर्या उडाल्या कि राहूचा विजय झालाच म्हणून समजा कारण तेच तर त्याचे घ्येय आहे . मन शांत नसेल तर काहीच सुचणार नाही , प्रत्येक गोष्ट निरस वाटू लागेल आणि जगण्यातील एकंदरीत सगळाच आनंद विरून जायील .

लहान पणापासून ज्या भावंडासोबत, मित्रांच्यासोबत लहानाचे मोठे झालो त्यांच्याशी अगदी शुल्लक गोष्टीवरून वितुष्ट येयील .  वास्तविक ज्या कुटुंबात आपण लहानाचे मोठे झालो त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला पूर्णतः ओळखते मग असे गैरसमज होतातच कसे? कुठल्याही लहान गोष्टीवरून गैरसमज कुणामध्ये होतील ? जे एकमेकांना अनभिद्य आहेत पण इथे तर एकाच कुटुंबातील व्यक्ती एकमेकांची तोंड पाहिनाशी झालेली आहेत . समज गैरसमज मनाला त्रास देत राहतात एक दोन नाही तर पूर्ण १८ वर्ष . आयुष्यभर एकमेकांच्या शिवाय राहू न शकणारे भाऊ बहिण एकमेकापासून दुरावतात एकाच शहरात राहून एकमेकांची तोंडे पाहंत नाहीत . अगदी एकमेकांच्या नावाने अंघोळ करतात म्हंटले तर वावगे ठरू नये. 


मित्र मैत्रिणी जवळची सगळी माणसे लहान सहान अत्यंत शुल्लक कारणांनी हळूहळू दूर व्हायला लागतात . मग फोन बंद होतात आपण केला तरी तितकेच बोलणे मोजकेच त्यात भावनिकता लोप पावलेली असते, सगळ्या संवेदना नष्ट होतात , प्रेमाचा ओलावाही नसतो फक्त आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार . ज्या दिवशी तुम्ही समोरच्या व्यक्तीला फोन करायचे बंद होणार त्या दिवसापासून तुमचा संबंध संपला कारण समोरून कधीही फोन येणार नाही . तुम्हाला हौस असेल तर करत राहा फोन. राहू आपली मज्जा बघत राहणार . आपल्याला समजायला लागते कि आपण एकटे पडत चाललो आहोत आणि हा एकटेपणा अत्यंत भयंकर असतो . आपण मनापासून जगतो , सामोर्च्यासाठी खूप काही सातत्याने करत असतो आणि मानसिक गुंतवणूक ती तर विचारूच नका . आयुष्यभराची साथ सोबत असलेली माणसे हळूहळू आपल्यापासून इतकी दुरावतात कारण काहीच नसते . दोन व्यक्तींच्या मधील गैरसमजाची एक अदृश्य भिंत . हे गैरसमज संपत नाहीत , ते दूर होत नाहीत अशी स्थिती राहूच निर्माण करतो.  राहू भोग भोगायला लावतो .


ह्या सगळ्या घटना मन अत्यंत उदास विषण्य करतात आणि शेवटी भावनिक दृष्ट्या आपण कोलमडून पडतो. आपली तब्येत ढासळू लागते , आर्थिक सुबत्ता कमी होते कामात लक्ष लागत नाही आणि काहीच नकोसे वाटते . जीवन हे एकटेपणाने नाही तर आपल्या आप्त , मित्र नातेवाईक ह्यांच्यासोबत जगण्यासाठी आहे . 


आपण आजवर प्रत्येकासाठी किती काय काय केले वेळ प्रसंगी कसे मदतीला धावून गेलो , कश्याचाही विचार न करता पैसाही खर्च केला हे सर्व आठवत राहते पण त्याचा काहीच उपयोग नसतो आणि ह्या गोष्टी बोलूनही दाखवायच्या नसतात त्या ज्याच्या त्याने समजून घ्यायच्या असतात .

आपली कुणालाही आठवण येत नाही अगदी आपण आहोत कि मेलो ह्याची विचारपूस पण कुणी करत नाही . हि सर्व परीस्थिती निर्माण करणारा राहू अत्यंत बुद्धिवान माहीर आहे. आपल्या मनात यायच्याही कितीतरी आधी त्याने गोष्टी घडवून आणलेल्या असतात . 

गैरसमज हे मोठे विष आहे आणि ते आपल्याही नकळत आपल्या विरुद्ध आपल्याच लोकांच्या मनात भरवून राहुने आपला डाव साधलेला असतो . कसला डाव ? तर आपले मानसिक खच्चीकरण करण्याचा . हेच ते चंद्र ग्रहण जे मनाला लागते . आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे ह्या जगातून निघून जाणे ह्याही घटना राहू दशेत घडतात . पैशाचा अपव्यय आणि माणसांचाही होतो तो वेगळाच.

अनाठायी पैसा खर्च होतो आणि मन चिंतीत राहते. पैसा भरपूर येतो पण टिकत नाही त्याला असंख्य दिशा फुटतात . राहूच्या दशेत काहीच राहत नाही . ओंजळीतून सर्व काही निघून जाते. पैसा गेला पुन्हा कष्ट करून मिळवता येतो पण आयुष्यभर जोडलेल्या माणसांचे काय ? माझी माझी म्हणून जपलेली माणसे आपल्या हृदयाच्या कोपर्यातून क्षणात निघून जातात . असंख्य प्रश्न मनाला भेडसावू लागतात . ह्याच माणसांना मी आपले मानले होते माझी माझी माणसे म्हणून डोक्यावर घेवून त्यांच्या सोबत आज इतका आयुष्याचा प्रवास केला होतो ते सर्व खोट होत का? नात्यांवरचा विश्वास उडतो , आणि मग वास्तवाची जाणीव होते तशी परमेश्वराची आठवण येते . 

सगळे दुरावतात पण देव नाही . त्यामुळे सगळ्यांपासून दूर गेलो कि महाराजांच्या, देवाच्या समीप जातो. क्षमायाचना सुरु होतात , राहूचा जप करा , त्याचे रत्न घाला हे करा आणि ते करा पण त्याने खरच जे झाले ते परत येणार आहे का? मनावर असलेले दुक्खाचे वेदनेचे असंख्य ओरखाडे पुसले जाणार आहेत का? कधीच नाही आणि आता हे सर्व बरोबर घेवूनच जगायचे आहे? पुन्हा नव्याने तीच नाती जोडली जातील ? कदाचित नाही .

फसवणूक , विश्वासघात हे राहूचे दुसरे नाव आहे जणू . जवळच्या नात्याने , मित्राने सहकार्याने कुणीही असो त्याने केलेला विश्वासघात मग तो पैशाचा व्यवहार असो , मनाचा किंवा जमीन जुमला . इतके बेमालून फसतो कि आपला आपल्यावरचा विश्वास उडावा. कधी स्वप्नात सुद्धा येणार नाही अश्या व्यक्ती आपल्याला फसवून आयुष्यातील मोठे धडे शिकवतात . ज्यांच्या वर आपला आपल्याही पेक्षा अधिक विश्वास असतो त्यांच्याकडून झालेली फसवणूक आपल्याला अंतर्बाह्य हादरवून टाकते .जगायचे कुणासाठी आणि विश्वास ठेवायचा तरी कुणावर ‘??? शेवटी एकच उत्तर परमेश्वरावर तो आपलाच आहे आणि आपलाच राहणार . 

राहूच्या दशेत कुठल्याही कागदावर सही डोळस पणे करा , कुणालाही जामीन राहताना विचार करा , प्रेमाचे उमाळे अगदी आपल्या मुलांसाठीही नको . राहू च्या दशेत नको त्या व्यक्तींना आपणच जवळ करतो आणि फसतो . समाजात आपले नाव बदनाम करणाऱ्या व्यक्ती राहूच्या दशेत भेटतात . सामाजिक जीवन बदलते, मित्र मैत्रिणी दूर होतात , गैरसमज तसेच राहतात आणि सगळेच दुरावतात . आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा लोकांचा थोडा विचित्र होत जातो आणि आपल्या लोक टाळतात . आपल्याला हे का होत आहे हेच समजत नाही कारण आपण जसे असतो तसेच असतो . आपण बदललेले नसतो तर राहुने परिस्थिती बदललेली असते .

आज आपण राहुबद्दल वेगळा विचार करूया किबहुना राहु देखील कदाचित हेच सुचवत असावा. आयुष्यभर आपल्याला ओळखणारी आपली आपली म्हणवणारी माणसे आपल्याच बद्दल फालतू कारणानी गैरसमज होवून दूर जावूच कशी शकतात ? आपली बिनबुडाची नाती संपुष्टात येतात ,जी आपण डोक्यावर घेवून आयुष्यभर फिरत होतो , ह्यातच राहूच्या असामान्य ताकदीची ओळख आपल्याला होते. कितीही काहीही म्हणा राहू चे खेळ आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडतात . नात्यांची खरी ओळख करून देतात , तुम्ही कुणासाठीही कितीही काहीही करा ह्या जगात आपले कुणीही नाही त्यामुळे स्वतःसाठी जगा आणि ह्या नात्यांच्या गुंत्यात अडकू नका हेच तर राहुला सांगायचे नाही ना? असाही विचार अनेकदा करावासा वाटतो .


ह्या विश्वात आपण एकटे येणार आणि एकटेच जाणार हेच जणू सांगण्यासाठी राहुने हा खेळ मांडलेला असावा असे अनेकदा वाटते. आपण ज्या लोकांसाठी जीव ओवाळून टाकतो ती क्षणात परकी कशी होवू शकतात ? मग आजवर काय ओळखले आपण एकमेकांना , एखादी चूक होवू शकते पण आपल्या नात्यात इतकीही परिपक्वता नाही कि आपण एकमेकांना माफ करू शकत नाही  . आपण ज्या नात्यांच्या जीवावर उड्या मारतो ती किती कच्ची तकलादू आहेत हेच राहू आपल्या समोर आणायचा प्रयत्न करत असतो. राहूचे खेळ त्यालाच माहिती . 

आजवर असंख्य वेळा राहूचे लेख आपण वाचले ऐकले पण आज ह्याच राहूचा असाही वेगळा विचार मला करावासा वाटला म्हणून हा लेखन प्रपंच. ज्यांनी ज्यांनी राहू दशा भोगली आहे त्यांना माझे म्हणणे नक्कीच पटेल . 

अखंड विश्वाला आधुनिक तंत्रज्ञानाची मोहिनी दाखवणारा राहू हा पूर्णतः वाईट नाही . त्याने तर जग जवळ आणले आहे . आज चे gpay , insta सोशल मिडिया , प्रगत युग राहूचा करिष्मा आहे . प्रत्येक वाईट गोष्टीतूनही काहीतरी शिकण्यासारखा धडा मिळतो तो हा असा . राहुला पूर्णतः समजून घेणे कठीण आहे . अदृश्य शक्ती आपल्या अवती भोवती आहे पण आपण तिला ओळखू  शकत नाही. इथे प्रत्येक माणसात राहू आहे. आपल्यासमोर गोड बोलणारी मागून आपलीच निंदा करणार हे गृहीत धरून चालले तर त्रास कमी होणार . सतर्क राहणे , कमी बोलणे हा राहुसाठी सर्वोत्तम उपाय आहे. 

राहू काय शिकवतोय ? अंतर्मुख व्हा आणि विचार करा . कुणीही आपले नाही पण आपल्या अत्यंत समीप आहे तो आपला देव . आज किती वेळ देतो आपण त्याला. सगळे विश्व फसवे आहे पण देव कधीही आपल्याला अंतर देणार नाही , दिलेहि नाही . उर्वरित आयुष्य त्याच्या चरणाशी समर्पित केले तर झालेला त्रास वेदना दाह नक्कीच  सुसह्य होयील ह्यात शंका नसावी. 



सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  

No comments:

Post a Comment