Wednesday, 11 June 2025

शुक्र केतू युती

 || श्री स्वामी समर्थ ||


गोष्ट आहे एका मैत्रिणीची . सतत उदास , निराश , शून्यात कुठेतरी बघत राहणार , पटकन कश्याचेही उत्तर नाही. चेहऱ्यावर सतत गूढता, मनाचा थांगपत्ता लागणार नाही. आपल्या वयाप्रमाणे छान कपडे , केश वेशभूषा नाही . सतत आपले जगबुडी झाल्यासारखे भाव घेवून फिरणारी हि व्यक्ती मला नेहमी कोड्यात टाकत असे. 

ज्योतिष शास्त्र शिकल्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती , त्यांचे चालणे बोलणे ह्याकडे ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून बघण्याची अपोआप सवय होते. खूप वेगाने चालणारी व्यक्ती मग त्याचे चर लग्न असेल. पैसा पैसा करणारे मग त्यांचा धनेश पृथ्वी तत्वाच्या राशीत असेल. राहू धनात , मोठमोठ्याने बोलणे, कदाचित व्यसन सुद्धा अनेकदा स्मोकिंग , गालावर खळी लग्नात शुक्र , असो असे ठोकताळे मांडायची सवय होत जाते. 


हिचे व्यक्तिमत्व इतके गूढ होते कि अपोआप माझी उत्सुकता ताणली गेली आणि तिच्या पत्रिकेच्या अभ्यासाला सुरवात केली. प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागे तसेच आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा क्रम पाहिला तर त्याही मागे एक ठोस असे कारण असते. 

हिचा विवाह झाला , मुले हि झाली आणि पतीचे निधन झाले. दुसरा विवाह नाही , तसा योगही नाही. पत्रिका पाहताना सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते तृतीयात असलेल्या शुक्र केतू अंशात्मक युतीने . शुक्र वैवाहिक सुखाचा कारक आणि केतू विरक्त ज्या ग्रहासोबत असेल त्या ग्रहाचे सर्व गुण शोषून त्याला रिता करणारा. केतूला दिसत नाही पण त्याला मनाचे चक्षु आहेत , स्पर्शज्ञान आहे . अंतर्मनाची संपूर्ण ताकद आहे .पण शुक जे सुंदर जग दाखवेल आणि ते उपभोगायचे मार्गही देयील ते केतुकडे काहीच नाही. 

साधी वेणीही नाही सारखा तो कसातरी केसांचा अंबाडा घालायचा , एकटे एकटेच राहायचे , फारसे बोलणे नाही , सतत चिंतायुक्त चेहरा आणि मोकळेपणाने हास्य सुद्धा नाही, चांगले ड्रेस , नटणे नाही ह्याचे उत्तर मला शुक्र केतू युतीने क्षणात दिले. शुक्र नुसता कोरडा तर कसे वाटेल नटावे चांगले राहावे. असो. शुक्र आयुष्यातील सगळ्या भौतिक सुखाचा कारक केतुमुळे दुषित झाला. तृतीय भाव हे विवाहाचे भाग्य आहे त्यात शुक्र केतू युती . 

सप्तम भाव पाप कर्तरी योगात . सप्तमेश अष्टम भावात स्तंभी . कुटुंब भावात हर्शल . शनी हर्षलामुळे बिघडला आणि पतीचे निधन अचानक झाले. लग्नातील गुरूने हि घटना वाचवली नाही . चतुर्थ भावात आमावस्या योग . बुध वृश्चिकेत नेप सोबत .

मुलांची जबाबदारी आणि घरची बेताची परिस्थिती . असो. अनेकदा वैवाहिक सुखाचा कारक शुक्र हा जर केतु सोबत युती करत असेल तर त्या व्यक्तीला संसार सुख किती आहे हे तपासून पाहिले पाहिजे . शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि शुक्र रस आहे. शुक्र केतू युती असेल तर संसारातील रसच निघून जायील आणि मग निरस आयुष्य वाट्याला येयील. 

अनेकदा सप्तम भाव बिघडतो म्हणून विवाह मोडतो पण त्याही पेक्षा त्याचे खरे कारण म्हणजे शुक्राची पत्रिकेतील स्थिती . शुक्र चांगला असेल तर सकारात्मकता , जीवनात पर्यायाने संसार सुखात आनंद चैतन्य निर्माण होते. शुक्र म्हणजे नुसते  शारीरिक सुख नाही तर आत्मिक , अध्यात्मिक सुखाची बरसात करणाराही हा शुक्र आहे. शुक्र म्हणजे सळसळता उत्साह . संसारात गोडवा शुक्र निर्माण करतो , पती आणि पत्नी ह्यात ओढ निर्माण करणे , एकमेकांच्या सहवासाची ओढ, चांगला स्वयंपाक , गृहसजावट , पै पाहुण्याची उठबस , काहीतरी नवीन करण्याची आवड , कलात्मकता ,  पर्यटन ह्या सर्वाचा एकत्रित मेळ कुटुंबाचा सर्वांगीण विकास , मानसिकता आणि कुटुंबात एकोपा निर्माण करण्यास पूरक ठरतो. 

चेहऱ्यावर प्रसन्नता , गोडवा आणि माणसाबद्दल प्रेम निर्माण करणारा हा शुक्र केतुसारख्या विरक्त शुष्क ग्रहासोबत असेल तर वेगळेच चित्र दिसेल. हि युती मीन राशीत असेल तर अध्यातातील प्रगती  होवू शकते कारण शुक्र हा सगुण भक्तीचाही कारक आहे आणि केतू सारख्या अध्यात्मिक ग्रहासोबत तो मोक्षाचा मार्ग स्वीकारेल. पण संसार सुखाला पारखाच होईल.   

केतू हा घरात असून नसल्यासारखा . त्यामुळे घरातील स्त्री कुटुंबात रममाण होणार नसेल तर संसार कसा होईल हा प्रश्नच आहे. शुक्र केतू युती हे माझ्या मते संसार सुखाला पारखे करणारी युती आहे. पत्रिका मिलन करताना अश्या सर्व बाबी तपासून बघितल्या तर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  


No comments:

Post a Comment