|| श्री स्वामी समर्थ ||
आधुनिक जगतात जिथे सर्वच काळानुरूप बदलत आहे तिथे विवाह संस्था कशी अपवाद ठरेल ? विवाह संस्थेचे रूप झपाट्याने बदलत आहे आणि त्याला कारण बदलणारी सामाजिक व्यवस्था आणि मानसिकता . अनेकदा आपला वैवाहिक जोडीदार आपला संसार अर्धवट सोडून जातो अश्यावेळी आयुष्यात भयाण पोकळी निर्माण होते . मग एकटेपणा आणि इतर गोष्टींमुळे पुनर्विवाह करावा असे विचार मनात रुंजी घालू लागतात . पूर्वीच्या काळी पुनर्विवाह हा शब्द फक्त पुरुषांच्या साठीच अस्तित्वात होता . स्त्रियांना पुनर्विवाह दूर राहिला प्रथम वर शोधण्यासाठी सुद्धा मत विचारात घेतले जात नव्हते . घरात 10 12 लेकरे त्यात 5 मुली म्हंटल्यावर त्या कधी एकदा उजवल्या जातील ह्याचीच भ्रांत माता पित्यांना असे. त्यामुळे एखादे स्थळ आले कि पुढचा मागचा विचार न करता मुलीचे लग्न उरकून, हो हो उरकून टाकले जात असे. मुलीचे मत नगण्य असे किबहुना तिला मत आणि मन सुद्धा आहे ह्याची जाणीव सुद्धा नसे .
दुर्दैवाने एखाद्या पुरुषाची पत्नी दिवंगत झाली कि तिचे दिवसवार व्हायची खोटी त्याला लगेच पुन्हा लग्न वेदीवर उभे केले जात असे. मुली पाहून विवाह लगेच होणे आवश्यक कारण घरातील मंडळी, मुले ह्यांच्याकडे पाहण्यासाठी बाई माणूस घरात असणे अत्यावश्यक होते . पुन्हा त्या पत्नीपासून ढीगभर मुले होणे हेही क्रमप्राप्त होतेच. असो.
पण हेच एखाद्या मुलीच्या बाबत झाले तर तिला लाल लुगडे नेसवून जगण्याचे सर्व हक्क जणू काढून घेवून कायमचे अंधारात ढकलले जात असे . त्यामुळे त्या काळात स्त्रीच्या द्वितीय विवाहाचा प्रश्नच नव्हता कारण जिथे तिला माणूस म्हणून सुद्धा वागवले जात नसते तिथे तिच्या मनाचा विचार करणार कोण ? माहेरची दारेही त्यांच्यासाठी बंद असत त्यामुळे सासरीच विधवेचे भयानक जिणे त्यांच्या पदरी येत असे.
आता काळानुरूप सर्वच बदलले आहे. आता स्त्री पुरुष दोघांचेही आयुष्य शिक्षण ,अपेक्षा आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण झपाट्याने बदलत असल्यामुळे विचारात आधुनिकतेचा प्रभाव दिसतोच . जुन्या चालीरीतीना आता बगल देवून द्वितीय विवाह हा दोघांचाही होताना आपण आता बघतो. आज त्याविषयी ज्योतिषीय विश्लेषण करुया .
प्रत्येक वेळेस पटले नाही म्हणूनच नाही तर एखाद्या गंभीर आजाराने सुद्धा व्यक्ती जोडीदारास गमावून बसते आणि त्यातून द्वितीय विवाहाची गरज निर्माण होते . स्त्रीला दुसरा विवाह करण्याची गरज का भासते ? त्यालाही अनेक करणे असू शकतात . जग कितीही पुढे गेले असले तरी शेवटी स्त्रीलाही आधाराची गरज भासते हा आधार मानसिक , आर्थिक, सुरक्षितता अश्या सर्वार्थाने असतो. कधीकधी आयुष्याच्या मध्यावर अचानक जोडीदाराची साथ सुटते मुलांची शिक्षणे चालू असतात , राहत्या घराचा प्रश्न , घेतलेले कर्ज सुद्धा तसेच मानसिकता कोलमडते आणि एकटेपणा . अश्या वेळी हि घडी पूर्ववत करण्यासाठी पुनर्विवाह करावा असे मनात येते .
आज 21 व्या शतकात विलंबाने विवाह हि जशी समस्या आहे तशीच घटस्फोट हि सुद्धा एक ज्वलंत समस्या आहे. घटस्फोट झाल्यानंतर पुढील जीवन एकट्याने व्यतीत करायचे का ? हा प्रश्न पडतो आणि त्यावेळी पुनर्विवाहाचा विचार पुढे येतो. स्त्री आता घराबाहेर पडत आहे आणि स्वतःचे करिअर करत आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे. आजच्या काळात पुनर्विवाहाची कारणे म्हणजे वैचारिक मतभेद , विवाहबाह्य संबंध हीसुद्धा आहेत . पुनर्विवाहासाठी जातक आल्यास त्याला ह्यापुढे उत्तम वैवाहिक सुख मिळणार कि नाही हे पाहावे लागते .
पुरुषांच्या बाबत तर अधिकच घालमेल होते कारण स्वयपाकघर कोण सांभाळणार , मुलांचे भावविश्व कमकुवत झालेले असते कारण त्यांची आई हेच त्यांचे विश्व असते त्यातून आलेले एकटेपण ह्यासाठी पुनर्विवाह करावासा वाटतो. ह्याला कित्येक अपवाद सुद्धा आहेत , बाईचा हात घरात फिरल्या शिवाय घराला घरपण येत नाही असे म्हंटले तरी अनेक उदा आहेत जिथे पुरुषाने दुसरा विवाह न करता आपले आणि मुलांचे आयुष्य यशस्वीपणे पुढे नेले आहे . पण आज आपण ह्याच्या दुसर्या बाजूचा म्हणजेच पुनर्विवाहा बद्दल चर्चा करत आहोत.
स्त्री असो अथवा पुरुष आयुष्याच्या संध्याकाळी जोडीदाराची साथ आणि उणीव खर्या अर्थाने वाटते आणि त्यातून निर्माण होणारा भयाण एकटेपणा अनेक आजारांना सुद्धा निमंत्रित करतो आणि म्हणून द्वितीय विवाहा करण्याची मानसिकता निर्माण होते. अनेकदा मुले हा महत्वाचा प्रश्न दोघांपुढे सारखाच असतो. माणूस एकटा नाही राहू शकत त्याला आपली काळजी घ्यायला आणि करायला , मनातील भावना व्यक्त करायला आपले माणूस लागतेच लागते आणि ह्या सर्वाचा विचार करता पुनर्विवाह करणे हि गरज निर्माण होते.
पण नुसताच पुनर्विवाह केला म्हणजे संपले का अनेकदा दुसर्या विवाहाने आगीतून फुफाट्यात अशी अवस्था होते . त्यामुळे अनेक गोष्टींचा विचार आधीच करावा हे उत्तम . आता पत्नी आली आहे तिच्या गळ्यात मुले घालीन , ती मला वाफाळलेला चहा हातात आणून देयील आणि माझी ग्रहस्थी सांभाळेल ,हुश्श सुटलो एकदाचा ..अशी भावना पुन्हा विवाह करताना असेल तर ह्याही विवाहाचे कडबोळे होईल तेही अधिक तीव्रतेने .अनेकदा तिलाही आधीच्या नवर्यापासून मुल असेल ते आपण स्वीकारणार का ? तितक्याच प्रेमाने त्याचेही करणार का हा विचार आधी करायला पाहिजे नाहीतर तुमच्या आणि तिच्याही मुलांची फरफट होईल.
द्वितीय विवाह करण्याची नक्की गरज काय आहे ? ह्याचा विचार खरतर ज्याचा त्याने केला पाहिजे आणि त्या गोष्टींशी मुळात व्यक्ती स्वतः सहमत असली पाहिजे. आपली पत्नी निवर्तली आणि घरातील मंडळी मागे लागत आहेत म्हणून मी पुन्हा लग्न करावे कि ते करणे सर्वार्थाने मला स्वतःला पटले आहे हे आधी निदान स्वतःपुरते स्पष्ट झाले पाहिजे. द्वितीय विवाह करताना आपले वयही पुढे गेलेले असते तसेच प्रथम वर किंवा कन्या मिळेल असे नाही , समोरच्या व्यक्तीचा सुद्धा हा पुनर्विवाह असू शकतो त्यामुळे आता ह्या वयात पुन्हा हा सारीपाट मांडताना समोरच्याला समजून घेण्याची मानसिकता आपली खरच आहे का? त्या व्यक्तीला सुद्धा अपत्य असू शकते आणि ते नाते अधिक नाजूक असते तिच्या आणि आपल्या मुलांना आपण समान वागणूक देऊ शकू का? दोघांचीही आर्थिक बाजू ह्यात असलेला फरक ह्याचा समतोल राखता येणार आहे का?
पहिल्या विवाहात केलेल्या तडजोडी पेक्षा कित्येक पटीने अधिक तडजोडी करण्याची आणि तेही ह्या पुढे गेलेल्या वयात क्षमता आहे का? कि फक्त स्वतःची जबाबदारी आपण घेवू शकत नाही ती कुणीतरी घ्यावी म्हणून पुन्हा लग्न करायचे आहे ?
समाज आता प्रगत विचारांचा आहे त्यामुळे उलट पुनर्विवाहाला सगळेच आज खुल्या दिलाने सपोर्ट करताना दिसतात . पण इतरांना काय वाटते त्यापेक्षा स्वतःला काय वाटते ? मला पुनर्विवाह करायचा आहे आणि नक्की ह्या कारणासाठी ती कारणे स्वतः स्वीकारली मनाला स्पष्ट झाली तर जरूर करावा. पण फक्त कुणीतरी सांगत आहे म्हणून करू नये. शेवटी संसार तुम्हालाच करायचा आहे सल्ला देणार्यांना नाही .
ज्योतिषीय दृष्टीकोनांतून प्रथम विवाह सप्तम स्थानावरून आपण पाहतो त्याच सोबत 2 5 8 11 हि स्थाने सुद्धा विचारात घेतो. द्वितीय विवाह हा 2 भावावरून पाहावा लागतो म्हणजेच धनेश कारण ते प्रथम विवाहाचे अष्टम स्थान आहे. धनेश कुठल्या भावात आहे आणि त्याची स्थिती काय आहे. सध्या चालू असणारी दशा तसेच शुक्राची स्थिती आणि अर्थात पुढील येणार्या दशा सुद्धा . सर्वात महत्वाचा अर्थात लग्नेश आणि चंद्र . स्त्रीच्या पत्रिकेत रवी हा पतीचा कारक तसेच पुरुषांच्या पत्रिकेत चंद्र हा स्त्रीचा कारक आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत पोहोचवतात .
अनेकदा प्रथम विवाह हा सुखकारक होत नाही पण द्वितीय विवाह आयुष्याची गाडी रुळावर आणणारा ठरतो . प्रथम विवाहापेक्षा द्वितीय विवाहात आपल्या अपेक्षा बर्याच अंशी कमी होऊन तडजोड करण्याची मानसिकता आपोआप तयार होत असते कारण हा विवाह आता काहीही करून टिकवायचा असतो . आपली मनमानी प्रत्येक वेळी करून नातीच टिकत नसतील तर मग कितीही विवाह केले तरी त्याची परिणीती आनंदात सौख्यात होणार नाही.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे अनेकदा एकटेपणामुळे घर खायला उठते . आयुष्याच्या संध्याकाळी तर जोडीदाराची आवश्यकता खर्या अर्थाने भासते . आजकाल जेष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा द्वितीय विवाह होताना दिसतात आणि ती आनंददायी बाब आहे . अनेकदा जोडीदार नसतो आणि मुले परदेशी असतात किंवा दूर असतात . अश्यावेळी एकटे राहणे व्यावहारिक मानसिक सर्वच दृष्टीने कठीण जाते . विवाह केला तर सर्वप्रथम एकटेपणा जातो आणि सोबत मिळते . मानसिकता सुधारते त्यामुळे तो जरूर करावा. आज बदलत्या समाज व्यवस्थेत ती सर्वांची गरज आहे पण तो करताना सर्वार्थाने तडजोड करण्याची तयारी ठेवली तर तो आयुष्याचे नवीन आणि सुखद वळण सुरु करेल ह्यात दुमत नाही. आयुष्य पुन्हा नव्याने जगावेसे वाटेल कारण आयुष्याने दिलेली हि एक संधी आहे त्याचे सोने करणे आपल्याच हाती आहे. पुनर्विवाह हा फक्त आपल्याला आधार मिळावा म्हणून नाही तर दुसर्यालाही आधाराची तितकीच गरज आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे ह्या भावनेतून केला तर सौख्य प्राप्त होईल.
प्रत्येक व्यक्ती हि स्वतंत्र आहे , प्रत्येकाचे विचार आणि दृष्टीकोण आणि आयुष्य जगण्याची समीकरणे आणि पुनर्विवाह करण्याची कारणे वेगवेगळी आहेत . आपले निर्णय मग ते कुटुंबातील मंडळीना किंवा समाजाला पटो अथवा न पटो ,तो घेण्याचे संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र सुद्धा प्रत्येकाला आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे त्याप्रमाणे आपल्या आतला आवाज प्रत्येकाने ऐकून निर्णय घ्यावा तो सहसा चुकणार नाही . आपला एकटेपणा घालवायला कुणीही येणार नाही त्यावर उपाय आपल्यालाच करायचा आहे . आजची जीवनशैली बघता संसाराचा सारीपाट पुन्हा मांडणे हि बाब सर्वार्थाने विशेष राहिलेली नाही , उलट आजकालची विवाह मंडळे सुद्धा आपला जोडीदार पुन्हा शोधण्यासाठी मदतीचा हात देताना दिसतात . फक्त पुनर्विवाहाचा सारीपाट मांडताना तो प्रथमच मांडत आहोत अश्या तळमळीने तसेच त्यातील संभाव्य धोके , कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि पूर्वी केलेल्या चुका लक्ष्यात घेवून मांडला तर यशदायी नक्कीच होईल .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230