|| श्री स्वामी समर्थ ||
राहू आता राशी बदल करत आहे . राहूला सुद्धा शनी सारखे सर्वांनी व्हिलन करून टाकले आहे . राहू दशा आली आता आपले बारा तेरा वाजणार असे आपण गृहीतच धरतो. ज्योतिष शास्त्राला राहू केतुनी जणू काही ग्लामर प्राप्त करून दिले आहे. राहू केतूचे लेख आज सोशल मिडीयावर वाजत गाजत येताना दिसतात . त्याला कारणही तसेच आहे राहूची जनसामान्यांच्या मनात असलेली अनामिक भीती . ती खरच खरी आहे का? बघुया .
राहू आणि केतू दर 18 महिन्यांनी राशी परिवर्तन करतात . त्यांना स्वतःची राशी नाही त्यामुळे ते राशी स्वामीचे फळ प्रदान करण्यास बांधील आहेत तसेच त्यांच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे सुद्धा फळ देतात. कृष्णमुर्ती मध्ये राहू आणि केतू ह्यांना अनन्य साधारण महत्व दिले आहे. तसेही कुंडलीत असलेला राहू सर्वप्रथम लक्ष्य वेधून घेतोच . पण प्रत्येक वेळी तो वाईट करेल असे निदान करणे म्हणजे आपल्या तोकड्या अर्धवट ज्ञानावर शिक्कामोर्तब आहे.
राहू सुद्धा अध्यात्माचा ग्रह आहे आणि मीन राशीसारख्या मोक्ष दायी राशीत येणारा ग्रह आपल्या सर्वाना स्वतःच्या बद्दल विचार करायला अंतर्मुख होण्यास भाग पाडणार आहे. आपल्या आतमध्ये आपले अस्तीत्व शोधायला लावणार आहे. त्यामुळे योगा , साधना , आत्मचिंतन ह्यात आता मानवजात प्रगती करेल आणि एका उच्चतम अश्या अध्यात्मिक जगताची निर्मिती होईल. आजच्या स्पर्धात्मक जगतातील प्रत्येकाला जो घड्याळ्याच्या काट्यावर आपले जीवन व्यतीत करत आहे, प्रचंड स्पर्धेला तोंड देताना ज्याची दमछाक होत आहे अश्या प्रत्येकाला आज थोड्या शांततेची आवश्यकता आहे ती मीनेतील राहू नक्कीच देणार आहे.
राहुला स्वतःची रास नाही त्यामुळे आता मीन राशीच्या स्वामीप्रमाणे तो फळ देयील म्हणजेच गुरूप्रमाणे फळ देणार आहे.
गुरु हा नैसर्गिक शुभ आणि आत्मिक उन्नती करणारा पारमार्थिक प्रवासाची आस असणारा ग्रह आहे. गुरु ब्राम्हण आहे संन्यस्थ आहे. प्रापंचिक जबाबदार्या पूर्ण करून परमार्थाकडे चला हे आत्म प्रबोधन करणारा आहे .त्यामुळे आता राहूची पाऊले गुरूच्या आदर्श मार्गावर चालणार आहेत .
मीन रास म्हणजे आता समुद्रमंथनाची पुनरावृत्ती होणार . स्वरभानू राक्षस हा समुद्र मंथनाच्या वेळी देवतांच्या वेशात देवतांच्याच मध्ये जाऊन बसला होता . त्यामुळे आता पुढील दीड वर्ष आपण सर्वांनी आपल्याला भेटणारी माणसे हि सज्जन आहेत कि दुर्जन असून सज्जनांच्या मुखवटा धारण केलेली आहेत . आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती देव आहे कि दानवांच्या रूपातील देव ह्याची खात्री करूनच पुढे पाऊल टाकायचे आहे. आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे कि नाही हे पुन्हा पुन्हा तपासून बघणे आवश्यक होणार आहे.
गुरूच्या रुपात राहू तर नाही ? चुकीच्या गोष्टींपासुन दूर राहण्यासाठी सावकाश निर्णय घेणे आवश्यक आहे. मीन हि मोक्षाची राशी आहे आणि इथे भक्ती समर्पण आहे. पण राहू भरकटायला लावणार आहे तेव्हा आपण भक्ती नेमकी कश्याची करत आहोत आणि आहारी कश्याच्या जात आहोत ते महत्वाचे आहे. सागर सर्व काही वाहून नेणारा आहे पण वाहवत जाण्यासाठी भक्ती करायची नाही तर आयुष्यात स्थिरता येण्यासाठी भक्तीचे प्रयोजन असले पाहिजे . कुठल्याच गोष्टीत राहू आपल्याला वाहवत तर नाही ना नेत त्याचे आत्मचिंतन झाले पाहिजे. आपण गुरु चरणांवर समर्पित होत आहोत कि चुकीच्या मार्गाने जात आहोत हे समजण्यासाठी ध्यान धारणा , शांतपणे निर्णय घेणे आवश्यक आहेत . जीवनाचा संपूर्ण प्रवास बदलण्याची ताकद ह्या मीनेतील राहुमध्ये आहे ज्याला आपण परिवर्तन म्हणतो. एका नवीन रूपातील तुमचा प्रवास सुरु करण्याचे काम राहू करणार . मद्य सेवनात मदमस्त होऊन समुद्रातील भोवर्यात अडकायचे कि उच्च कोटीची साधना करून अध्यात्माची कास धरायची ते प्रत्येकाने ठरवायचे .
राहू हर्षलची साथ सोडून स्वतंत्र होणार. शनि आणि हर्षलच्या कर्तरीत येणार. तेव्हा नव्या-जुन्याचा संघर्ष अटळ आहे. पण शनिमहाराज कुंभेत आहेत. ते न्यायाधीशाच्या भूमिकेतून न्याय करणार. तेव्हा राहूच्या प्रभावाखालील बॉलीवूडने आणि राजकारण्यांनीही न्यायाधीशांचा सामना करण्याची तयारी ठेवावी. गुरु सुद्धा राहूच्या कचाट्यातून मुक्त होणार आहे त्यामुळे गुरु आणि शनी उत्तम काम करतील. कुठलेही ग्रह आपले शत्रू नाहीत , एखादी घटना आयुष्यात घडणे हे सर्वस्वी आपल्या केलेल्या कर्मावर अवलंबून आहेत . आपण आपली कर्म शुद्ध ठेवावीत हे उत्तम , उठसुठ ग्रहांवर खापर फोडणे बंद करावे. ग्रह आपल्या कल्याणासाठी आहेत त्यांना दुषणे का लावायची , पटतय का? आज पाकशास्त्र असो अथवा ज्योतिष , विज्ञान . गेल्या काही वर्षात youtube सारखे माध्यम जनमानसात फार वेगाने प्रचलित झाले आणि आज अनेक लोकांच्या कर्तुत्वाला youtube च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली ती कुणामुळे ? अर्थात राहूमुळे . आपल्या विचारांना , कलेला लाखो लोकांपर्यंत नेणारा राहू हा आधुनिक जगतातील दूत आहे आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षात प्रसिद्धी मिळालेल्या अनेकांचे हजारो फोलोअर झपाट्याने वाढत गेले हे यश राहुचेच आहे. प्रगत युगाचा आणि पर्यायाने सोशल मिडीयाचा राहू हा “ कणा “ आहे.
प्रत्येक शुभ ग्रह हा संपूर्ण शुभ नाही आणि पापग्रह हा संपूर्ण पापग्रह नाही. आपली सोच आणि विचार , संशोधन ,अभ्यास आपल्याला ह्या ग्रहांच्या खर्या तत्वांची ओळख करून द्यायला सक्षम आहेत . सोशल मिडीया द्वारे आणि इंटरनेट च्या माध्यमातून आज राहुने जग जवळ आणले आहे. माझा हा लेख तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या राहुला सलाम .
भवसागराच्या राशीतील राहू आपल्याला अध्यात्माची गोडी लावेल आणि मोक्षाची द्वारे खुले करून देण्यास उत्सुक आहे , आपण किती समर्पित आहोत ह्यावर सर्व काही अवलंबून आहे.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment