|| श्री स्वामी समर्थ ||
जिथे आनंद तिथे शुक्र . शुक्र हा भौतिक सुखाचा मेरुमणी आहे. माणसाला सुखासीन आयुष्य जगायला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा कारक शुक्र आहे. मग अलिशान वाहन असो कि पर्यटन , उंची वस्त्रे असो कि मौल्यवान दागिने , मधुर वाणी असो कि अत्तर किंवा सुमधुर संगीत...सर्वांवर हक्क शुक्रचाच . शुक्र हा कन्या राशीत नीच फळे देतो तर मीन राशीत उच्च . मीन राशीच त्याने उच्च होण्यासाठी का निवडली असावी हा प्रश्न अभ्यासकांना पडला पाहिजे कारण जितके प्रश्न अधिक तितका अभ्यास सखोल .
मीन हि कुंडलीतील व्यय भावात येणारी राशी , ह्या राशीला मोक्षाची राशी सुद्धा म्हंटले जाते . इथे शरीराची पाऊले येतात. मीन हि अथांग महासागराची रास आहे. सागर सर्वांनाच समाविष्ट करणारा त्यामुळे हि लोक सर्वाना हृदयात सामावून घेणारी , सदाचारी , सहानुभूती , भूतदया असणारी असतात . इथे संवेदनशीलता , प्रेम आहे. ह्याचे बोध चिन्ह पाहिले तर उलट सुलट मासे म्हणजे जणू काही आत्मा आणि परमात्म्याचे मिलन करणारी हि राशी .व्यव भाव हा मोक्ष त्रिकोणातील अखेरचा भाव .
ह्या महासागरात जीवनातील सगळे चढ उतार , सुख दुक्ख सामावलेली आहेत .मीन राशीत आपल्या आयुष्याची यात्रा संपते आणि पुन्हा जेव्हा आपण मेषेत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आत्म्याचा नवीन प्रवास सुरु झालेला असतो . आपला आत्मा म्हणजेच रवी , सूर्य . म्हणूनच मीन राशीतून सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा तो उच्चीची वस्त्रे परीधान करतो.
ह्या भावापर्यंत यायला व्यक्तीला आधीच्या अकरा भावातून प्रवास करावा लागतो तेव्हा कुठे तो मोक्षाला पोहोचतो. आयुष्य सर्वार्थाने म्हणजेच धर्म अर्थ काम ह्या त्रिकोणांचा पुरेपूर अनुभव घेतल्याशिवाय मोक्षाचा खरा आनंद दुर्मिळ आहे.
सूर्य आणि चंद्र हे प्रकाश देणारे आहेत . आपल्याला मार्ग दाखवणारे आहेत . पण प्रकाशासोबत सावली सुद्धा येते त्यामुळे त्याचाही विचार असला पाहिजे . असो .
मी नामस्मरण करतेय पण मन शांत नाही कारण काही ना काही इच्छा अजून अपूर्ण आहे. सर्व इच्छा पूर्ण होतात तेव्हाच मन परमेश्वराच्या चरणाशी खर्या अर्थाने रमते . आयुष्याची अखेरच आपल्याला खरे ज्ञान देत असते. आणि ते देणारा दुसरा तिसरा कुणी नाही तर सगुण भक्तीचा कारक “ शुक्र “ आहे. अनेक संतांच्या पत्रिकातून आपल्याला हा मीनेतील शुक्र भेटतो . शुक्र हा फक्त विलासी ग्रह नाही . असे असेल तर शुक्राचा अभ्यास अपूर्ण आहे असे म्हंटले पाहिजे. मीन रास हि मोक्षाची आहे आणि तिथे गुंतवणूक आहे ती फक्त पैशाचीच नाही तर भावनांची सुद्धा . आपले सर्वस्व परमेश्वराच्या चरणावर वाहताना भक्ताच्या डोळ्यातून ज्या अश्रुधारा वाहतात त्या म्हणजेच “ शुक्र “ . हे संवेदना वाहून नेणारे जल आहे. हा शेवटचा क्षण तेव्हा काहीच आठवत नाही , आठवते ते फक्त त्याचे रूप , निर्गुण आणि निराकार . शेवटच्या प्रवासात जेव्हा सर्व बंधने तुटली जातात , सर्व सोडून जातात तेव्हा त्याचे आपल्याभोवतीचे अस्तित्व जाणवू लागते आणि तोच खरा सर्वार्थाने आनंद देणारा क्षण फक्त “ शुक्र “ आपल्याला देऊ शकतो. जितक्या आनंदाने संपूर्ण आयुष्य जगलो त्याही पेक्षा स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करणारा तो क्षण किती सुखद , परमोच्च आनंदाचा असेल नाही आणि त्या क्षणाचे प्रतिक म्हणूनच ह्या शुक्राने ह्या सागरा सारख्या विशाल मनाच्या मीन राशीत स्वतःला उच्च होण्याचा मान दिला असावा. मीन राशी खोल अथांग सागराची असल्यामुळे इथे गूढत्व , सखोल ज्ञान आहे.
व्यय म्हणजेच मोक्षाच्या भावापर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला अकरा भावांचा प्रवास करायला लागतो तेव्हा परमेश्वर प्राप्ती होते आणि त्याच्या अस्तित्वाची अनुभूती मिळते . अगदी तसेच शुक्राला सुद्धा अकरा राशीतून प्रवास केल्यावरच मोक्ष्याच्या राशीत उच्च होता येते . सर्व सुखांचे आगर म्हणजे भगवंताचे चरण आहेत आणि आजवर अनुभवलेले सुख परमेश्वर सानिध्याच्या पुढे किती कवडीमोलाचे आहे हे मोक्षाच्या राशीतील हा आध्यात्मिक सगुण भक्तीच्या आनंदाचा आस्वाद घेतल्या शिवाय समजणार नाही. भौतिक सुखात गुरफटलेला हा आत्मा शेवटी भगवंताच्या चरणीच विलीन होतो तोच खरा “ शुक्र “ . सगुणभक्ती हि अनुभवायची असते , ज्याला आत्मिक मानसिक ओढ आहे त्यालाच ते चरण दिसतील आणि त्या चरणांना आपल्या डोळ्यातील अश्रूंनी भिजवून टाकताना जो परमानंद मिळतो तो जन्मोजन्मी टिकणारा असतो . मिनेतील शुक्र परमेश्वराच्या सान्निध्याची ओढ लावतो . जन्मल्यापासून आपण शुक्र जगात आहोत पण अखेरच्या काळातील मोक्षाच्या उबरठ्यावर नेणारा शुक्र आपल्या खर्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. भक्ती आणि सेवा हेच खरे जीवन आहे हे पटवून देणारा शुक्र इथेच भेटतो . समाधानाच्या उच्च शिखरावर नेणारा आणि आपल्या शेवटच्या प्रवासात त्याचा हात आपल्या हातात देणारा हा शुक्रच आहे. शुक्राचे हे असीम अध्यात्मिक महत्व ज्याने जाणले त्याला मोक्षाचे द्वार खुले झालेच म्हणून समजा. .
रेवतीच्या चतुर्थ चरणात 27 अंशावर उच्चत्व प्राप्त करणारा हा शुक्र असामान्य आत्मिक सुखाची परम अनुभूती देणार आहे. हे सुख सहज नाही म्हणूनच 108 नक्षत्र चरणांचा प्रवास त्याला करावा लागला तेव्हा कुठे रेवतीचे चतुर्थ चरण त्याला दिसले. त्याच्या चरणाशी लीन होण्यासाठीच आपला जन्म आहे आणि त्याची सेवा म्हणजेच आपले आयुष्य आहे हेच तर जणू ह्या शुक्राला सांगायचे नसेल ना , म्हणूनच शुक्राने उच्च होण्यासाठी रेवती सारखे देवगणी नक्षत्र निवडले असावे . मीन रास म्हणजे वैकुंठ आहे आणि शुक्र स्वतः महालक्ष्मी चे प्रतिक आहे. शुक्र म्हणजे लक्ष्मी , अष्टलक्ष्मी . आयुष्यात उच्च शिखरावर जायचे असेल तर महालक्ष्मी आणि महा विष्णू ची उपासना फळ देयील.
आजवर मिळवलेले सर्व काही शाश्वत नाही पण परमेश्वराच्या चरणाशी मिळालेला असीम आनंद खरोखरच शाश्वत आहे म्हणूनच तर तो सतचित आनंद आहे.
क्षणभर विचार करा चंद्रभागेच्या काठाशी टाळ मृदुंगाच्या गजरात प्रत्यक्ष पांडुरंग जेव्हा देहभान विसरून गेलेल्या आपल्या वारकरया सोबत ज्ञानबा तुकाराम म्हणत टाळ धरतो त्याचे वर्णन कश्यात करणार आपण ? हे सर्व आपल्या आकलनाच्या बाहेर आहे , ह्या सर्वाचे शब्दात वर्णन होऊच शकत नाही, हे फक्त अनुभवायचे असते . अगदी ह्याच प्रमाणे आपल्या आयुष्याची अखेर होताना त्याचा हात धरूनच त्याच्याच चरणाशी विलीन होतानाचा आनंद परमोच्च सुखाचा अविष्कार नाहीतर काय आहे . त्याची तुलना आयुष्यभर मिळवलेल्या कुठल्याच सुखाशी होऊ शकत नाही.
मला लेखनाचा आनंद हा शुक्रच बहाल करत असावा. लिहिताना कुणीतरी आपल्याकडून लिहून घेत आहे असा भास मला अनेकदा होत असतो आणि माझ्याकडून तोच हे शब्दभांडार जणू खुले करत असावा . सांगायचे तात्पर्य असे कि ज्या सुखाच्या मागे आपण आयुष्यभर असतो ते शाश्वात सुख नसतेच . खर्या अर्थाने सुख हे आयुष्याच्या अंतिम क्षणी अनुभवायला मिळते ते मीन राशीत . कारण महाराजांच्या चरणाशी असणारा हा आनंद दुर्मिळ आहे आणि जेव्हा उमगते कि आयुष्यभर आपण ज्याला आनंद सुख म्हणत होतो तो सुखाचा निव्वळ भ्रम होता. खरे सुख तर भगवंताच्या चरणाशी आहे आणि हे चरण म्हणजेच पाउले जी मीन राशी दर्शवते . आपल्या महाराजंच्या चरणाशी विलीन होणे हे भाग्याचे लक्षण आहे.
सर्व अहंकार सोडून त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा हे सांगणारा हा व्यय भाव आहे म्हणूनच इथे शरीराची पाउले आहेत .
नतमस्तक झाल्याशिवाय , आत्मसमर्पण केल्याशिवाय मोक्ष नाही.
आज विजया दशमी ह्या साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या अत्यंत पवित्र दिवशी आपण ह्या सगुण भक्तीचा आनंद लुटुया आणि हा शाश्वत आनंद टिकवण्याचा मनोमन निर्धार करुया , त्याच्या चरणी आपले संपूर्ण आयुष्य विलीन करुया कारण शेवटी तो त्याच्या अस्तित्वाची ग्वाही तुम्हाला तुमच्या अखेरच्या प्रवासात देतोच देतो.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment