Wednesday, 25 October 2023

निस्सीम भक्ती

|| श्री स्वामी समर्थ ||



लहान मुले घरात खेळत असतात , खेळतात खेळता भांडतात , कधी भूक लागते मग आईला हाक मारतात . आई स्वयपाक घरातूनच ओरडते “ थांब जरा आले हातातले काम झाले कि येते “ . पण जेव्हा मुलाला कुठेतरी लागते तेव्हा तो जोरात आईला हाक मारतो आणि तेव्हा मात्र क्षणाचाही विलंब न लावता आई धावत येते. 


आपलेही तसेच आहे. आपण रोज आपल्याला जमेल तशी भगवंताची , आपल्या महाराजांची सेवा करत असतो . पूजा , नामस्मरण , प्रदक्षिणा  , पोथी वाचन माध्यम काहीही असो पण आपली तोडकी मोडकी भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. अनेकवेळा आयुष्यात चढ उतार येतात आणि अश्यावेळी आपण आपल्या महाराजांच्या चरणाशी धाव घेतो. खरतर काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती करू नये. जे हवे आहे ते महाराज न मागताच देणार आहेत तेही भरभरून . गजानन रुपी जमिनीत जेजे पेराल ते ते बहुत करून मिळे तुम्हा हे दासगणुनी लिहिले आहे आणि त्याची प्रत्येक क्षणी प्रचीती भक्तांना येतेच आहे. 


आपल्या भक्तीत सातत्य हवे , निर्मळ मनाने फक्त महाराजांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या नामाचा ध्यास हवा , श्वासात त्यांना विराजमान केले आणि त्यांचे गुणगान गायले तर आयुष्य किती उंचीवर जायील हे सांगणे नको. 


आज हजारो लोक श्री गजानन विजय ग्रंथाचे पठन करत आहेत , नामस्मरण करत आहेत पण तरीही आम्ही इतके करूनही आमची संकटे विघ्ने दूर होत नाहीत असा तक्रारीचा सूर असतो.  ह्याचे कारण म्हणजे वर दिलेले उदा. अंतर्मनापासून महाराजांना साद घातली तर आई जशी सर्व कामे सोडून मुलासाठी धाव घेयील अगदी तसेच महाराज सुद्धा येणार ह्याची खात्री बाळगा. वरवरची भक्ती उपयोगाची नाही. त्यातील आर्त भाव , त्यातील भाव आणि भक्ती त्यांच्या पर्यंत त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे . ती कळकळ त्यांना जाणवली पाहिजे . तारा अथवा मारा हि भावना त्यांना आपल्यापर्यंत आणल्याशिवाय राहणार नाही.  


अध्यात्म सोपे नाही तिथे समर्पण पाहिजे. आई आणि मुलाचे जे नाते तेच आपले आणि आपल्या गुरूंचे आहे . नुसतेच घरात फोटो लावून आणि नेवेद्य करून होणार नाही . देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ...पण निदान तो क्षण तरी तू आणि मी दोघेच असू त्यात तुझी भौतिक सुखे आणि आजूबाजूचे जग नको इतकेच मागणे आहे त्या भगवंताचे आपल्याकडे .पण आपण तो क्षण सुद्धा त्याचे होऊ शकत नाही मग तो तरी आपला कसा होणार सांगा बर . पटतय का?


ज्याच्यासाठी एक क्षण आपण समर्पित करू शकत नाही तो आपल्यासाठी वाटेल त्या वेळी हाकेला धावून येयील अशी वेडी आशा का ठेवावी आपण. मुळात उठ सुठ त्यांना हाक मारू नये. आपले भोग आपणच भोगून संपवायचे आहेत . जन्म मृत्युच्या फेर्यात ते काहीही करणार नाहीत पण आपल्या आतला आवाज ते ऐकल्याशिवाय राहणार नाहीत हेही खरे.

भक्तीत समर्पण पाहिजे. बापूना काळे ला जेव्हा महाराजांनी दर्शन दिले तेव्हा त्यांनी हेच सांगितले कि त्याच्यासारखी भक्ती करा . महाराज त्याच्या सोळा आणे भक्तीनेच तर प्रसन्न झाले. आपण पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतो पण जप करताना कुकरच्या शिट्या किती होतात ह्या कडे लक्ष्य असते . संपूर्ण ब्रम्हांडात महाराज आणि आपण दोघेच आहोत असे समजून ध्यान करा , जेव्हा पोथी वाचाल नाम घ्याल तेव्हा ते समोर बसले आहेत अगदी सगुण रुपात असे मनी ठेवा आणि मग बघा काय सेवा होईल तुमच्याकडून . मानसपूजा हि सर्वश्रेष्ठ आहे त्यात नक्कीच दर्शन देतील ते आपल्याला. 

सेवा भाव सर्व श्रद्धेच्या खोलीवर आहे. जितकी आपल्या श्रद्धेची खोली अधिक समर्पणाची शक्ती अधिक तितके फळ अधिक. मी माझा लेख त्यांच्याचरणी ठेवते आणि नतमस्तक होते पुढे तो कुणी वाचायचे हे तेच ठरवतात ह्यावर माझा विश्वास आहे.  

आपला जन्मच मुळी मोक्षाला जाण्यासाठी आहे पण आपण धर्म अर्थ काम ह्यात अडकून जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यापासून परे राहतो . हजारो लोक रस्त्याने जात होते पण बंकटलाल आणि पितांबरलाच महाराज कसे दिसले. किती दिव्य दृष्टी असेल त्यांची . आपणही कान नाक डोळे उघडे ठेवले तर निसर्ग आपल्या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक क्षणी आपल्याला देत असतो . 

बंकटलाल , बापुना काळे , साळूबाई , पितांबर , गणू जवर्या , खंडू पाटील ह्यासारखे भक्तांचे जीवन महाराजांच्या सेवेमुळे सार्थकी लागले. आपण नको त्या गोष्टींचे अनुकरण करण्यापेक्षा ह्यातील एखाद्या भक्ताचे , त्यांनी केलेल्या भक्तीचे आणि समर्पणाचे , सेवेचे अनुकरण केले तर आपलेही जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही.

सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230 


 

 

No comments:

Post a Comment