|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या मनातील भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचे “ शब्द “ हे एक प्रभावी माध्यम आहे. उत्तम शब्द संग्रहातून एका प्रभावी लेखाची निर्मिती होत असते. लेखन हे खरोखरच एक कौशल्य आहे . मोजक्याच शब्दात भला मोठा आशय व्यक्त करणे हे एक स्कील आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. लेखन हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. शब्दांची योग्य मांडणी , योग्य वेळी परिच्छेद ,अवघड शब्द न घेता सहज सुलभ ओघवती भाषा समोरच्याला चटकन समजते. लेखात रोजच्या जीवनातील उदाहरणे असावीत , फार क्लिष्ट आणि अलंकारित भाषा कंटाळवाणी असते. आजकाल लोकांना वेळ कमी असतो त्यामुळे पटकन प्रवासात , चहा घेताना किंवा अगदी बस ची वाट पाहत असताना सुद्धा एखादा लेख पटकन वाचून होईल अश्याप्रकारे त्याची रचना असेल तर लोकांना वाचायला नक्कीच आवडेल. थोडक्यात लेखाचा मुख्य विषय मांडताना तो व्यवस्थित मांडलाही पाहिजे पण लेखाची लांबी रुंदी लक्ष्यात घेवून.
अनेक लोक माईक हातात आला कि सोडतच नाहीत शेवटी लोक टाळ्या वाजवायला लागतात तसेच लेखणी हातात आली आहे म्हणून काय आणि किती लिहायचे ह्याचे भान हवे. लेख मोठा असेल तर “ क्रमशः .. “ असलेला बरा. मुळात ज्या विषयावर आपल्याला लेखन करायचे आहे त्या विषयाची उत्तम जाण असली पाहिजे . लेखातून आपल्याला काय संदेश द्यायचा आहे आणि त्याच्याशी आपण स्वतः सहमत आहोत ना ह्याची खात्री असली पाहिजे . हा लेख कुठल्या वयोगटातील लोकांसाठी आहे हेही माहित हवे. थोडक्यात आपल्या लेखाचा वाचक वर्ग कोण असणार आहे ? लेखांवरती येणाऱ्या सर्व प्रतिक्रिया मग त्या काहीही असोत , मोठ्या मनाने स्वीकारता आल्या पाहिजेत . फक्त आपल्यालाच अक्कल आहे असे नाही तर लोक आज चोखंदळ आहेत , उत्तम लेखक कोण निर्माण करतात तर उत्तम वाचक त्यामुळे वाचकांच्या मतांचा योग्य आदर सन्मान करून त्यांच्या सूचनांचा विचार सुद्धा झाला पाहिजे. सोशल मिडियावर अनेकदा कुणी काही व्यर्थ , अर्थहीन किंवा त्रास द्यायला सुद्धा कॉमेंट करू शकतात त्यामुळे काय घ्यायचे आणि काय सोडायचे , कुठे दुर्लक्ष करायचे तेही माहिती हवे अर्थात अनुभवाने ह्या सर्वच गोष्टी येतात .
सर्वात महत्वाचे आहे ते लेखाचे “ शीर्षक “ . आजकालच्या भाषेत सांगायचे तर ते “Catchy “ म्हणजेच आकर्षक असले पाहिजे त्यातून लेखाचा विषय समजला पाहिजे . शीर्षक वाचून लेख वाचायची उत्सुकता निर्माण होईल इतके ते मर्म भेदक असले पाहिजे . लेखकाच्या शीर्षकातच लेखाचे गुपित आणि विषय दडलेला आणि लेखाचे यश असते.
लेखन हे एक प्रभावी माध्यम आहे. समाजाची विचारधारा संपूर्णपणे बदलण्याची ताकद ह्या लेखणीत आहे त्यामुळे सर्वप्रथम ह्या लेखणीला तसेच आपल्या सद्गुरुना वंदन करूनच लिहावे . मनात विषयाची समज पक्की हवी . मूळ मुद्दे हवे तर लिहून काढावे आणि त्यानुसार परिच्छेद करून लिहावे. विषय कुठेही भरकटत जाणार नाही ह्याचे भान असावे. आपले म्हणणे वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारे असेल तरच त्याची पोचपावती आपल्याला मिळेल. अनेकांचे अनेक विचार असू शकतात , म्हंटले आहे ना व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे आपले विचार दुसर्याच्या गळी मारू नये किबहुना तसा अट्टाहास अजिबात नसावा , प्रत्येकच दृष्टीकोण अर्थात वेगळा असणारच आहे . लेखन हे फक्त “ Likes “ मिळवण्यासाठी नसावे तर समाजाला वाचकांना त्यातून काहीतरी मिळाले पाहिजे . काहीतरी देणारे , बुद्धीला खाद्य आणि विचार मंथन , जनजागृती करणारे लेखन असावे .
आजवर मी केलेलं लेखन मला अतीव समाधान देऊन गेले आहे. माणसाने तेच काम करावे ज्यात त्याला आनंद मिळतो आणि समाधान. अध्यात्मिक लेख लिहिताना मला अनेकदा ईश्वरी अनुभूती सुद्धा आली आणि तीच माझ्या लेखनाला प्रेरणा ठरली असावी . लेखन हे सकारत्मक असले पाहिजे, विचार मंथन करायला लावणारे असले पाहिजे . दुसर्याला आणि स्वतःलाही जगायला लावणारे असले पाहिजे . जगण्याची उमेद निर्माण करणारे आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणारे असावे. उत्तम लेख म्हणजे ज्ञानमय ज्योत आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात स्वतःचे आत्मचिंतन आणि स्वतःतील
“ मी “ शोधता आला तर लेखन प्रपंच फळास आला असे समजायला हरकत नाही .
ज्योतिषीय दृष्टीकोनातून लेखन कौशल्य अभ्यासताना मी माऊलींच्या पत्रिकेचा अभ्यास करीन . ज्ञानेश्वर माऊली ह्यांनी लिहिलेली ओं नमोजी आज्ञा , मोगरा फुलाला , अजी सोनियाचा दिनू हि काव्ये अजरामर झालेली आहेत . लेखनाचा मुख्य ग्रह बुध आणि ज्ञानाशिवाय लेखणी उजळणार नाही त्यामुळे ज्ञानाचा सागर गुरु. बुध ला योग्य रीतीने वळवायचे काम गुरूकडे आहे. लेखन हाताने लिहिले जातात म्हणून हात , बाहु महत्वाचे . बुध आणि गुरु सोबत नेप हा लेखनासाठी अंतस्फुर्ती देणारा ग्रह तसेच मनाचा कारक चंद्र सुद्धा तितकाच महत्वाचा . ज्ञानेश्वर माऊलींचे बुद्धीसामार्थ्य अचाट आणि विस्मय चकित करणारे होते . इतक्या लहान वयातील त्यांची समज वाखाणण्याजोगी होती. वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानाने भरलेला अमृतासारखा ग्रंथ त्यांनी रचला जो आज पुढील कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. कुंडलीच्या लाभ ते तृतीय भावापर्यंत त्यांच्या कुंडलीत गुरु चंद्र शुक्र राहू बुध ह्यासारख्या बलाढ्य ग्रहांचे अधिष्ठान आहे खांद्याचा वरचा भागात हे सर्व ग्रह आहेत . खांद्याचा वरील भाग म्हणजे जिथे मेदू आहे म्हणजेच बुद्धी मन विचारप्रणाली . बुद्धीचा कारक गुरु लाभेश लाभात , लग्नात उच्चीचा चंद्र जो तृतीयेश सुद्धा आहे ,चंद्र स्थिर राशीत , बुध गुरु नवपंचम , शुक्र बुधाच्या राशीत , चंद्र बुध लाभ , लग्नेश शुक्रवार व्ययेश मंगळाची दृष्टी , कीर्ती सातासमुद्रापलीकडे गेली , तृतीय स्थान आणि चंद्र शुक्र गुरु ह्यामुळे जनमानसात प्रसिद्धी मिळाली . त्यांच्या लिखाणात तरलता आणि अपार सौंदर्य होते.
लेखन हि एक कला आहे आणि अनेकदा ती उपजत असायला लागते हा माझा अभ्यास सांगतो . ठरवून काहीही लिहिता येत नाही पण अभ्यास पूर्ण लेखन लेखनाचा दर्जा उंचावते . ओघवती आणि सहज सोपी भाषा वाचकांशी जवळचे नाते जोडते. सरतेशेवटी सर्वात मुख्य म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद . स्वतःची साधना , उपासना , वाचन , संशोधन , विचार मंथन , अंतर्स्फुर्ती , योग्य वेळी योग्य विषयाची निवड करून केलेल्या लेखांची निर्मिती आत्यंतिक समाधान देते आणि वाचकांना अंतर्मुख होण्यास कारणीभूत ठरते.
लेखन कौशल्य हा गुरूंचा आशीर्वाद . लेखन करणे हे खचितच सोपे नाही त्यालाही कष्ट आहेत , आपला जीव ओतावा लागतो . लेखन हि गुरुकृपा आहे त्याचा योग्य मान ठेवावा , इतरांचे लेख चोरून साहित्य चोरी करून आपण सद्गुरूंच्या रोषास कारणीभूत होणार ह्याचे भान ठेवावे कारण आजकाल साहित्य चोरी हा प्रकार सर्रास आढळतो . तसेही लेख चोरून लेखकाची प्रतिभा तर नाही चोरता येणार हेही तितकेच खरे आहे. विचार व्हावा .
आज ह्या लेखाच्या निम्मित्ताने सर्व वाचकांना माझा सादर प्रणाम , आपल्या वेळोवेळी मिळालेल्या अभिप्रायांमुळे लिहिण्यास प्रोत्साहन मिळाले त्यामुळे मी आपली सर्वांची मनापासून ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सूचना अनमोल आहेत आणि आपले आशीर्वाद सुद्धा ते असेच पाठीशी असुदेत .श्री स्वामी समर्थ .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment