|| श्री स्वामी समर्थ ||
अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह भक्त
प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय.
लाखो भक्तांचा श्वास असणारे संत शिरोमणी श्री. गजानन महाराजांनी भाद्रपद शुक्ल पंचमीला सन १९१० ,गुरुवारी ऋषी पंचमीच्या दिवशी आपला देह ठेवला आणि लाखो भक्त जणू पोरके झाले. आपण देह ठेवणार हा दिवस महाराजांनी निश्चित केला होता आणि तसे त्यांनी आपल्या भक्तांना सुचीतहि केले होते. महाराजांची प्राणज्योत मालवली आणि शेगाव भकास झाले . वातावरणात एकप्रकारची उदासीनता आली. शेगावातील आबालवृद्धांनी मठाकडे घाव घेतली . भक्तांच्या आक्रोशाने आसमंत भरून गेला. तेव्हा आजच्या सारखी फोनची सोय नव्हती. महाराजांनी आपल्या दिव्या दृष्टीने लाखो भक्तांच्या स्वप्नात जावून आपण देह ठेवल्याचे सांगितले आणि भक्तांनी शेगावची वाट धरली..आपल्या गुरूंचे अभिलाषी असणार्या भक्तांना अखेरचे दर्शन घेता यावे म्हणून महाराजांच्या टाळूवर लोणी ठेवले ,ते वितळू लागले म्हणजेच अजून शरीरात थोडी धुगधुगी होती. भक्तांनी दर्शन घेतल्यावर शेवटी भुयाराचे द्वार लावण्यात आले. भक्तांवर दुक्खाचा डोंगर कोसळला. महाराजांची प्राणज्योत मालवली आणि शेगाव भकास दिसू लागले.
ह्यापुढे महाराजांचे दर्शन होणार नाही हि कल्पनाही मनास पटणारी नव्हती. वस्त्राप्रमाणे शरीर बदलावे लागते असे महाराज म्हणत. आज महाराज आपल्यात शरीराने नसले तरी क्षणोक्षणी आपल्या भक्तांना प्रचीती देवून आपले अस्तित्व त्यांनी दाखवून दिले आहे.
आज महाराजांचा महानिर्वाण दिन आहे.महाराजांनी आपल्या भक्तांना आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी “श्री गजानन विजय ” ह्या ग्रंथाच्या माध्यमातून दिली आहे. ह्या ग्रंथातील प्रत्येक अध्याय हा एक शिकवण आहे. महाराज उष्ट्या पत्रावळीवरील अन्न वेचून खाताना बंकटलाल आणि पितांबर ह्यास दिसले. फेकून दिलेल्या अन्नावरही एकजण जेवू शकतो ह्याची जाणीव आपल्याला प्रथम अध्यायात महाराजांनी दिली आहे. पण आपण त्याचे पालन करतो का? नाही . आपल्या घरात रोज काहीतरी अन्न फुकट जाते आणि फेकून दिले जाते . गजानन विजय हा ग्रंथ आपल्या आयुष्यासाठी अत्यंत पूरक आहे . आपण त्याची असंख्य पारायणे करतो ,नेवैद्य करतो पण त्यातील दिलेल्या शिकवणीचे पालन करतो का ?स्वतःच्याच मनाला प्रश्न विचार ..उत्तर मिळेल .
महाराजांची सेवा हि फक्त ग्रंथाची पारायणे करणे नसून त्यातील उपदेशांचे प्रत्यक्ष जीवनात पालन करणे हि होय. महाराजांचे अस्तित्व चराचरात आहे. इतरत्र कुठेही त्यांना शोधायची गरज नाही कारण ते आपल्या श्वासात आहेत . महाराजांचे स्थान आपल्या हृदयात आहे.त्यांचे आपल्या प्रत्येक कृतीवर ,आपण बोलत असलेल्या प्रत्येक शब्दावर आणि विचारांवर लक्ष आहे हे विसरायचे नाही . प्रत्येक कृती करताना हि त्यांना आवडेल का हा विचार करून केली तर आपल्याकडून चूकच होणार नाही. आपण प्रपंचात आहोत त्यामुळे अगदी आखीवरेखीव जीवन जगू शकत नाही . सर्व षडरीपु आपल्यात ठासून भरलेले आहेत पण तरीही महाराजांच्या धाकाने चुका निशितच कमी होतील. आपले विचार ,कृती ह्यावर संयम येयील.
मुळातच माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हि साधी सोप्पी शिकवण संतानी आपल्याला दिली आहे .त्यानुसार वागले तार संतसेवा होईलच पण जीवनही सार्थकी लागेल. महाराजांना आपल्याकडून प्रेमाशिवाय काहीही नको. देव खर्या भक्तीभावाचा भुकेला असतो.आपल्यातील भाव तो नक्कीच ओळखतो . आपल्या संकट समयी आपले महाराज नक्कीच धावून येतात आणि मार्ग दाखवतात ,संकट हरण करतात अशी उदाहरणे पावलोपावली आहेत. “ मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर ठेवू नका ” हे सांगून महाराजांनी भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा दाखलाच दिला आहे. श्री गजानन विजय पारायणाचे भक्तांना असंख्य अनुभव आहेत. हा अद्भुत तितकाच रसाळ ग्रंथ महाराजांच्या लीलांनी भरलेला आहे.
भक्तांनी अपेक्षाविरहित फक्त सेवा करावी . आपल्याला कधी काय द्यायचे ते त्यांना माहित आहे.योग्य वेळ आली कि सर्व होणार फक्त आपला विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही. महाराज खूप परीक्षाही पाहतात पण “ भक्तीत अंतर ठेवू नका ” ह्या उक्तीला धरून फक्त सेवा करत राहावी.
महाराज सर्वज्ञ आहेत ,त्रिकालज्ञानी आहेत आपला त्यांच्यावर टाकून शांत राहावे इतकेच.महाराज आपण दिलेल्या हारतुर्यांचे मोजमाप करत नाहीत. आपला अंतरीचा भाव जाणतात आणि आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात.
आपले रोजचे जीवन आणि श्री गजानन विजय ग्रंथ ह्यांचे अतूट नाते आहे, हे ज्यास उमगेल त्याचे जीवन सार्थकी लागेल.आनंदाचे डोही आनंद तरंग अश्याच अवस्थेत तो कामा असेल . भक्तीचा आनंद वेगळाच असतो तो शब्दांकित करता येत नाही तो फक्त ज्याचा त्याने अनुभवायचा असतो.
आपला प्रपंच सांभाळून महाराजांच्या सेवेत आपल्याला झोकून द्यावे आणि त्यांच्या आशीर्वादास पात्र व्हावे.जप किती करता ,पारायणे किती करता ह्यापेक्षा ती किती भक्तीने करता हे महत्वाचे आहे. कुणी माना अथवा मानु नका ,महाराजांचे अस्तित्व आहे आणि ते अबाधित आहे. महाराजांची सेवा करणे हे पूर्वसंचिताशिवाय अशक्य आहे. ज्यास हा आनंद मिळाला तो त्याने लुटावा .महाराजांच्या समोर नतमस्तक व्हावे. अनेकांच्याकडे पोथी आहे पण त्यातील एक शब्दही न वाचणे हे त्यांचे प्राक्तन आहे. ह्या सर्वस गुरुकृपा लागते आणि ज्यास हि प्राप्त झाली तो ह्या भक्तिरसात अखंड बुडतो. ज्याला ह्या भक्तीचे वेड लागले त्याला निसंशय कधीच कमी पडणार नाही. प्रपंच वेशीवर टांगून केलेली सेवा मान्यच होणार नाही कारण कुठल्याही संतानी प्रपंच सोडून परमार्थ करा असे कधीच सांगितले नाही उलट प्रपंच करता करता परमार्थ करा हेच त्यांना अभिप्रेत आहे. उठसुठ लहानसहान गोष्टींसाठी महाराजांना वेठीस धरणे हे भक्तांसाठी योग्य नाही .एखादी जटील समस्या आली तार आपण हाक मारायच्या आतच महाराज धावून येणार हा विश्वास अभेद्य ठेवावा.
आज माझ्या ब्लॉगवर 100 लेख लिहून पूर्ण झाले. अर्थात ह्या सर्वाचे श्रेय माझे गुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्यांनाच, कारण लेखणी जरी माझ्या हाती असली तरी लिहायची बुद्धी देणारे , लिहून घेणारे सर्वेसर्वा तेच तर आहेत .म्हणूनच प्रत्येक लेख लिहून झाला कि मी तो त्यांच्याच चरणी ठेवते आणि पुढील लेखाकडे वळते .
ह्यापुढील माझ्या ब्लॉग ची वाटचाल त्यांच्याच कृपेने होयील ह्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.
Antarnad18@gmail.com
#अंतर्नाद #श्री गजानन महाराज #शेगाव #समाधी #महानिर्वाण #100 लेख #समर्पण #अध्यात्म
#प्रचीती #भक्ती #गजानन विजय ग्रंथ
नेहमीप्रमाणे खूप सुंदर लिहीला आहेस लेख. गजानन महाराजांचे आपल्यावर त्यांच्या मायेचे कृपा छत्र आहे याची पदोपदी प्रचीती येते.
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteसुंदर लेख.छान लिहिले आहेस.
ReplyDeleteगजानन महाराज की जय, खूप छान लेख. १०० लेख झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. असेच लिहीत रहा, वाचून आंम्हाला चांगल्या कामाची प्रेरणा मिळते.
ReplyDeleteअतिशय सुरेख! लेखातील शब्द्नशब्द खरा आहे. "महाराजांची सेवा करायला मिळणं हे पूर्वसंचित असते आणि पोथी असूनही शब्दही वाचायला न मिळणे हे प्राक्तन आहे" हे अगदी पदोपदी अनुभवास येते. आपल्या लेखणीला आणि विचारांना महाराजांच्या विचारांचा स्पर्श आहे. खूप सुंदर.
ReplyDelete