Tuesday, 4 August 2020

अविस्मरणीय प्रचीती

|| श्री स्वामी समर्थ ||


माझ्या पुढे मागे सगळीकडे उभा तूच स्वामीराया |
किती काळजी वाहशील ,सर्वच तुझ्या ह्या लीलया |

आज सकाळी मी दादरला एका महत्वाच्या कामासाठी जाणार होते. चार दिवसापूर्वीच आज जायचे हे पक्के झाले होते आणि त्यासाठी माझी तयारी चालू होती. गाडी हायवे वरून जाणार होती आणि तशीच मी दुपारपर्यंत परतही येणार होते. काल रात्रीपासून पावसाने जोर धरला होता. आज चंद्राचे श्रवण नक्षत्र होते त्यात काळ पौर्णिमाही होती. रात्रभर पाऊस खूप झाला होता.

पहाटे ३ वाजल्यापासून मी जागीच होते. आज पाऊस कोसळतोय आणि तो जाण्याचे नाव घेणार नाही हे जाणले आणि आपल्याला कदाचित जाता येणार नाही म्हणून मनात खट्टू झाले. सगळा योग जुळून आला होता पण म्हणतात ना स्वामींच्या इच्छे शिवाय झाडाचे पान सुद्धा हलायचे नाही .

मनात जायचे हे इतके ठाम होते कि माझ्या जाण्याला ह्या पावसाने लावलेली नकारघंटा मला सहन होत नव्हती. मन चलबिचल होत होते आणि सगळा मूड गेलाच होता. सगळा स्वयंपाक केला आणि पुन्हा बाहेर पहिले तर पाऊस जरा कमी झाला होता . मनात म्हंटले चला आता काही वेळाने पाणी ओसरल्यावर निघूया .

आमच्या घराजवळचा परिसर जलमय झाला होता. तेव्हड्यात विचार आला TV लावून पाहूया म्हणजे बाहेर काय स्थिती आहे ते समजेल. TV लावला आणि कांदिवलीला दरड कोसळल्याची बातमी आली. माझ्या हृदयात धस्स झाले. माझी गाडी तिथूनच जाणार होतो . सगळे अवसान गळून पडले , हातपाय कापू लागले आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपले जाणे का रहित झाले हे आता मनोमन मला समजले आणि स्वामींच्या समोर डोके ठेवून नतमस्तक झाले.

स्वामी हे त्रिकालज्ञानी आहेत. आपल्याला दोन क्षणांनी काय होणार हेही माहित नसते पण ते सर्व जाणतात आणि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अखंड पाठीशी असतात.

तारक मंत्रातील ओळी आठवल्या “ कितीदा दिला बोल त्यांनीच हात , नको डगमगू स्वामी देतील साथ ”. डोळ्यातून अश्रू थांबेनात इतकी सद्गदित झाले. सर्व काही शब्दांच्या पलीकडे गेले होते .खरच हे सर्व लिहितानाही माझे हात कापत आहेत . नको तो प्रसंग ओढवला असता पण स्वामिनी तारले. महाराजांच्या कडे पहिले तेव्हा जाणवले ,फोटोतून महाराज प्रेमाने सांगत होते “आजचा दिवस आपला नव्हता जणू ”. देवासमोर साखर ठेवली. तुम्ही म्हणाल ह्यात काय ? हा निव्वळ योगायोग. माझ्यासाठी आज जीवावर बेतणार होते कदाचित ,पण मला

घरातच थांबून ठेवण्याची जबाबदारी स्वामिनी खुबीने निभावली हे मी अंतर्मनाने जाणले . आयुष्यात आजवर त्यांनीच सांभाळले आहे आणि पुढेही तेच सांभाळतील. आपण राहिलो तर सर्व आहे नाही का?


असाच राहूदे माझ्यावर तुझा हस्तक |
तुझ्या समोर प्रत्येक क्षणी मी नतमस्तक ||


अस्मिता 

Antarnad18@gmail.com


#antarnad # spirituality #shri swami samarth # surrender #trust #spiritual path #faith
#अंतर्नाद # प्रचीती # स्वामी समर्थ #गुरु माऊली # नतमस्तक #भक्ती #त्रिकालज्ञानी #अध्यात्म #शरणागत

आत्महत्या

|| श्री स्वामी समर्थ ||



माझ्या डोक्यात एखादा विषय आला कि त्यावर लिहायला मी नेहमीच उत्सुक असते .पण आज ह्या विषयावर लिहायचे म्हणजे खरच मनापासून नको वाटत आहे. तरीही लिहिणे आवश्यक वाटतेय कारण गेल्या काही दिवसात अनेकांनी “ आत्महत्या ” करून आपला जीवन प्रवास संपवल्याच्या बातम्या येत आहेत .तेव्हा मनात अनेक प्रश्न निर्माण होतात ,हे सर्व कश्यासाठी ?

जीवन म्हणजे परमेश्वरी देणगी आहे. ८४ लक्ष्य योनीतून गेल्यावर मनुष्य जन्म प्राप्त होतो असे म्हंटले जाते , म्हणजेच तो किती मोलाचा आहे नाही का?  देवाने आपल्याला ह्या पृथ्वीवर रडायला थोडेच पाठवले आहे.

आयुष्य अनमोल आहे आणि जीवन खूप सुंदर सुद्धा आहे.

मी जेव्हा कुणाच्या आत्महत्ये बद्दल ऐकते किंवा वाचते ,तेव्हा असे वाटते कि असे काय बरे कारण झाले असावे कि त्या व्यक्तीला आपले आयुष्यच संपवावेसे वाटले असेल ?

मनुष्य जन्म मिळणे हे भाग्याचेच लक्षण आहे, हि एक आनंद प्राप्तीच आहे. आयुष्य व्यतीत करताना अनेक अडचणी ह्या येणारच पण आपल्या सद्विवेक बुद्धीने, जिद्दीने , हुशारीने, ज्ञानाने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे साधनेने प्रत्येक प्रसंगातून आपण मार्ग काढू शकतो.

जगात अशी कुठलीही गोष्ट नाही ज्यावर मार्ग निघत नाही. इथे कुठलीही गोष्ट शाश्वत सुद्धा नाही . जिथे ऋतूही आपला क्रम बदलतात ,तिथे आपले आयुष्य ते काय ?सर्वच दरवाजे एकदम बंद होत नाहीत एक बंद झाला तर दुसरे अनेक उघडतातहि.

जन्म आणि मृत्यू अपरिहार्य आहे. इथे कुणी आमरणपट्टा घेऊन जन्माला आले नाही .आपली वेळ आली ,आपले इह लोकावरील काम संपले कि आपण इथून  पुढील प्रवासाला   जाणारच आहोत, पण त्याचा अट्टाहास कश्याला? ओढवून कश्याला घ्यायची संकटे ?

जगावेसेच वाटत नाही त्याला नक्कीच काहीतरी कारण असते. मान्य आहे. अशावेळी आपल्याला उपयोगाला येतो तो “ संवाद ”. मनावर विचारांचे ओझे घेऊन जगायचे नाही. आपल्या जवळच्या कुठल्यातरी व्यक्तीशी मन मोकळे करायचे.

आजकाल जग प्रचंड स्पर्धात्मक झाले आहे.
रोज आपल्याला आपले अस्तित्व ,आजकालच्या भाषेत  
“ Prove Yourself ,consitent Performance ” करावे लागते. 


कामाच्या ठिकाणी खूप राजकारण असते . बरेचदा आपल्याला एकटे पाडले जाते,आपली प्रगती ,यश अनेकांच्या डोळ्यात खुपते ,हवीतशी पदोन्नती, पगारवाढ न मिळणे ह्या गोष्टींमुळे आपण निराश होतो आणि आत्मविश्वास घालवून बसतो. पण आपण जर मनापासून काम केले असेल तर कदाचित इथे  नाही पण कधीतरी आपल्या श्रमांचे चीज हे होणारच ह्यावर आपला ठाम विश्वास असला पाहिजे . समाजातील प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक स्थरावर जीवघेणी स्पर्धा तर आहेच ह्यातून आपली सुटका नाही, त्यामुळे ह्यापासून पळून जाण्यापेक्षा ह्याला सामोरे कसे जायचे त्याचा विचार झाला पाहिजे.

जेव्हा नकारात्मक विचारांची गर्दी मनात होईल तेव्हा साधा उपाय म्हणजे पाणी पिणे आणि असाल तिथून उठून बाहेर जाणे . ४ क्षणात वातावरण बदलते. उदबत्तीच्या धुरासारखे असलेले आपले मन लगेच दुसरीकडे वळते .बाहेर कदाचित कुणीतरी भेटते ,दुसरा विषय निघतो आणि आपण मनाला त्रास होणार्या विचारांपासून थोडाकाळ दूर जातो. आपल्या जवळच्या मित्राशी /मैत्रिणीशी बोलणे हे सर्वोत्तम.

आयुष्यात प्रत्येक क्षण जसा आपला नसतो तसाच तो समोरच्याचाही नसतो. आज त्याचा दिवस तर उद्या आपला दिवस हे होणारच त्यामुळे एखाद्या गोष्टीने निराश होऊन अगदी जीवन संपवणे हे कितपत योग्य आहे ?प्रत्येक वेळी आपला पहिला नंबर कसा येणार ?एखाद्या क्षेत्रात आपली प्रगती नाही झाली तर खचून न जाता आपल्या आवडीचे दुसरे एखादे  क्षेत्र निवडावे  ,कुणी सांगावे त्यात आपली असामान्य प्रगती होयीलहि. आपल्या आवडीचे छंद जोपासणे हेही जीवनात आपल्याला खूप आनंद देते. एकाच गोष्टीचा अट्टाहास करू नये मग ती मिळाली नाही कि कमकुवत मनाची माणसे निराश होत जातात आणि पुढे आत्महत्येस प्रवृत्त होतात .

प्रेमप्रकरणात यश मिळाले नाही म्हणून आत्महत्या करणारे प्रेमी आहेत .पण एखाद्या मुलीने /मुलाने आपल्याला नाही म्हंटले म्हणून तिच्यासाठी आपले जीवन संपवण्यापेक्षा आपल्याला ज्यांनी जीवाचे रान करून लहानाचे मोठे केले , आपल्या आईवडिलांनी आपल्या आजारपणात रात्र रात्र उशाशी बसून टिपे गाळली त्यांच्यासाठी जगणे हे जास्ती संयुक्तिक नाही का? १-२ वर्ष ओळख असलेल्या मुलीसाठी जीव देण्यापेक्षा गेली 25 वर्ष आपल्यावर  प्रेमाचा वर्षाव करत आपल्यासाठी जगणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी जगा. 

एखादा संपूर्ण दिवस सुद्धा आपला नसतो . दिवसभरातील सर्वच घटना काही आपल्या मनासारख्या घडत नाहीत. बरेचदा आयुष्य मोठे Turning घेते. कित्येक वेळा गरिबी नंतर आलेली श्रीमंती माणसाला गर्विष्ठ , घमेंडी बनवते तसेच श्रीमंती नंतर आलेली गरिबी माणसाला असहाय बनवते ,हा धक्का माणूस सहन करू शकत नाही कारण त्याला हे सर्व अपेक्षितच नसते. जुळवून घेणे ,चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहणे म्हणजेच संयम ठेवणे हे आवश्यक आहे  आणि ह्या सर्वांसाठी आहे ती साधना ,ध्यानधारणा.

माझ्याही आयुष्यात अनेक कसोटीचे क्षण आले आणि गेले .पण मी माझे संपूर्ण आयुष्य स्वामी समर्थांवर सोडून दिले आहे. माझा ह्या शक्तीवर प्रचंड विश्वास आहे,मग कुणी काहीही म्हणो. समाज आपल्याला जगू देत नाही पण आपण सर्वांच्या नाकावर टिच्चून जगायचे आहे आणि तेही आनंदने हा धडा आपण गिरवायचा आहे. पटतंय ना? सगळेच जण मनाने खंबीर नसतात ,काही तितकेच हळवेही असतात ,मान्य पण म्हणून जीवन संपवायचे नाही. आत्महत्या करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून जगायला हिम्मत लागते आणि ती सद्गुरुकृपेने आणि साधनेनेच येवू शकते. 

आत्महत्येचे विचार मनात येणे हि मनाची एक अवस्था आहे पण ती कायमस्वरूपी नाही. अध्यात्माने ह्यावर नक्कीच विजय मिळवता येतो .आजकाल योगासने , ध्यानधारणा ह्याचे महत्व जगभरातील सर्वाना समजू लागले आहे. मोठ्या प्रमाणात आज लोक ह्यात ओढले जात आहेत कारण ह्यातून मनशांती मिळतेय हे पटत आहे.

सर्वच ग्रहयोग इथे लिहिता येणार नाहीत .मनाचा इतका हळवेपणा किंवा कमकुवत पणा म्हणू हव तर असण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पत्रिकेत बिघडलेला चंद्र . चंद्रमा मनसो जातः हे सर्वश्रुत आहेच . पत्रिकेत त्रिक स्थानात असलेला चंद्र ,किंवा त्यासोबत असलेले केतू शनी राहू हे ग्रह चंद्र बिघडण्याचे मुख्य कारण आहे. अश्या व्यक्तींचा मानसिक समतोल ठीक नसतो . सतत नकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाचा अभाव अश्या लोकांत प्रामुख्याने दिसून येतो. अश्या व्यक्ती भरती आणि ओहोटीच्या वेळी तसेच अमावास्या , पौर्णिमेला आपले मानसिक संतुलन घालवून बसतात . 

असे ग्रहयोग असलेल्या लोकांना कुणाशी बोलावेसे वाटतच नाही. त्यांना आयुष्यातील मानसिक ताण ,संकटे असह्य होतात. घरातील तरुण मुले अचानक आत्महत्या करतात तेव्हा घरातल्यांशी त्यांचे सूर जुळलेले नाहीत हे त्रिवार सत्य आहे. पण जाणारा मागे अनेक प्रश्न ठेवून जातो ,जे मागे उरतात त्या कुटुंबियांचे काय ? त्यांच्यासाठी तर हा धक्का पचवत जगत राहणे हि आत्महत्येपेक्षाही मोठी शिक्षा असते .ह्या सर्वांचा विचार करून समाज अधिकाधिक जागृत झाला पाहिजे. अश्या कमकुवत मनाच्या लोकांना मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. आपल्या भोवताली किंवा ओळखीत अश्या व्यक्ती आपल्याला आढळल्या तर त्यांना मानसिक आधार देवून त्यांना जगण्याची उमेद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपल्या समुपदेशाने एक आयुष्य वाचले तर ती एक ईश्वरी सेवाच आहे.

कुटुंब कश्याला म्हणतो आपण ? नुसती एका छताखाली ४ माणसे राहिली म्हणजे कुटुंब होत नसते . त्यांच्यात प्रेमाचा ओलावा हवा, एकमेकांशी संवाद हवा , एकमेकांच्या हालचाली, बोलणे वागण्यातून जरा फरक दिसला तरी तो इतरांच्या लक्ष्यात आला पाहिजे इतके सूर जुळले पाहिजेत .अश्या घरात जिथे मनाचा संवाद असतो, न बोलताही सर्व काही समजू शकते तिथे आनंद ,सौख्य नांदते आणि तिथे कुणाच्याही मनात आत्महत्येचे बीज रोवले जात नाही. 

आपल्या सीमेवर पहा पहाडी छाती घेऊन ऊनपावसात ,कडाक्याच्या थंडीत आपले जवान आपल्या देशासाठी प्राण पणाला लावत आहेत ,कित्येक महिने-वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर आहेत . कितीवेळा त्यांच्याही जीवावर बेतते पण हे धीराने उभे राहतात .

देवाने हि सुंदर सृष्टी निर्माण केली आहे पण ती पाहण्यासाठी त्याचा आनंद उपभोगण्यासाठी कित्येकांना दृष्टी नाही , कर्णबधीर आहेत , बोलूही शकत नाहीत त्यांनी काय करायचे मग ? आपल्याला सर्व अवयव धड आहेत मग रडताय कसले. रडायचे नाही तर लढायचे . आपणच आपले जीवन बदलू शकतो आपल्या निर्धाराने ,चांगल्या विचाराने आणि अर्थात संयमाने .काही गोष्टी खरच आपल्या हातात नसतात पण म्हणून आत्महत्या हा त्यावर पर्याय असूच शकत नाही.

जीवन हे देवाची देणगी आहे आणि ते सार्थकी लावणे हीच आपली कसोटी आहे .जीवन संपवणे हा तर पळपुटेपणा झाला, पण संकटांवर मात करून जीवन सुसह्य करणे हीच खरी परीक्षा आहे. देवाने अश्या कितीही परीक्षा पदोपदी घेतल्या तरी आपण पास होणारच हा विश्वास डगमगू द्यायचा नाही. सगळ्यांना सर्व मिळत नाही पण जे आहे ते हि नसते तर हा विचार आपण केला पाहिजे.

आजकाल अगदी वयात आलेली मुले आत्महत्येस प्रवृत्त होताना आपण पाहतो ,वाचतो . ह्यास आपणही कुठेतरी जबाबदार आहोत का? मुलांवर सतत अभ्यासाचे प्रेशर टाकणे , घरातील इतर मुलांशी किंवा अन्य मुलांशी त्यांची सतत बरोबरी करणे , त्यांना कमी लेखणे ,”तु काही कामाचाच नाहीस ”, तु जगायला नालायक आहेस ”, “ आम्ही तुला पोसतो आहोत ”, “एक पैसा कमवायची अक्कल नाही ” ह्या आणि अश्या कित्त्येक विधानांनी मुलांच्या मनावर खोलवर आघात होत असतात आणि पुढे ती कुटुंबाला मनाने दुरावतात , व्यसनाधीन होतात किंवा आत्महत्येस प्रवृत्त होतात . अहो आपल्याला तरी मिळाले होते का ९० टक्के मग मुलांकडून ह्या अपेक्षा काश्यासाठी ? आपण आहोत का सर्वगुणसंपन्न ,मग आपल्या मुलांकडून दुनियाभरच्या अपेक्षा का? कश्यासाठी ???? त्यांना नाहीनाही ते बोलून त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी का आपण त्यांना  जन्माला घातले आहे  ? प्रत्येकाचे आयुष्य , स्थिती , बुद्धी,क्षमता वेगळी आहे . प्रत्येकाला आपापल्या परीने जगायचे स्वातंत्र दिले पाहिजे. आपल्या अपेक्षांची ओझी वाहणारी गाढवे करू नका त्यांना ,नाहीतर एकदिवस ती त्या ओझ्याने पुरती दबतील आणि जगण्याचा आत्मविश्वास घालवून बसतील.

आज शेतकर्यांचेही तेच आहे, नापीक जमिनीतूनही सोने पिकवण्याची ताकद असलेले शेतकरी आर्थिक ओझे पेलू न शकल्याने आत्महत्या करत आहेत .आपणही सर्व कुठेतरी ह्यास जबाबदार आहोतच कि. कुठल्याही प्रश्नाला उत्तर नाही असे नाही .

Virus आहे तिथे Anti virus सुद्धा आहेच कि. जीवन हि परमेश्वराने दिलेली नितांत सुंदर भेट आहे, तिचा योग्य तो मान ठेवला पाहिजे .

आपल्या जवळच्या ओळखीच्या व्यक्ती ,नातेवाईक ह्यांच्याशी आपले मैत्रीचे , विश्वासाचे बंध घट्ट करूया जेणेकरून कुठल्याही संकटात एकमेकांना एकमेकांचा आधार राहील, एकमेकांशी संवाद साधता येयील , कुणालाही एकटे वाटणार नाही आणि  आत्महत्येसारख्या कृत्याचा विचारसुद्धा कुणाच्याही मनात येणार नाही .

म्हणूनच कितीही संकटे आली , मनाविरुद्ध घटनांची शृंखला असली तरी “ हेही दिवस जातील ” हि खुणगाठ मनात धरून ,जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करत आयुष्याचा सोहळा करता आला पाहिजे.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर आपला अभिप्राय जरूर पाठवा.
Antarnad18@gmail.com


#antarnad #sucide #psychiatric disorder #moon #high tide #low tide #saturn #depression
#अंतर्नाद #आत्महत्या #समुपदेशन #चंद्र #शनी #राहू #मनोधैर्य #मानसिक आजार #संतुलन #मनोविकार

Sunday, 2 August 2020

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन


|| श्री स्वामी समर्थ ||


श्रावणातील पौर्णिमा हि “ नारळी पौर्णिमा ” म्हणून सर्वत्र साजरी होते. समुद्र हे उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने समुद्रकिनारी राहणारे आपले कोळी बांधव हा सण खास मोठ्या उत्साहात साजरा करतात. पावसाळ्यात उसळलेला आणि बेभान झालेला समुद्र आपले रौद्ररूप दाखवतो, त्यामुळे कोळी बांधव समुद्रात आपली नाव घालताना थोडे कचरतात .समुद्र शांत व्हावा आणि त्यांच्या बोटी सुखरूप किनारी लागाव्यात म्हणून समुद्रात श्रद्धेने नारळ अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करणे हि प्रथा आहे. ह्यानंतर पावसाचा जोर कमी होवून शांत झालेल्या समुद्रात कोळी बांधव आपली होडी मासेमारीसाठी उतरवतात. ह्या दिवशी घरोघरी करंज्या , नारळाच्या वड्या , नारळी भात असे नारळाचे गोड पदार्थ करून देवाला नेवैद्हाय दाखवून सण साजरा होतो.




रक्षाबंधन हा भाऊबहिणीतील नाजूक आणि विश्वासाचे बंधन उलगडणारा सण. आपल्या लाडक्या भावाला ओवाळून त्याच्याकडून हक्काने ओवाळणी घेण्यासाठी बहिणी अगदी नटूनथटून तयार होतात आणि डोळ्यात प्राण आणून आपल्या भावाची वाट पहात असतात. आयुष्यात काहीही झले, कितीही मोठे संकट आले तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी खंबीर उभा राहणार हा विश्वास दृढ करणारा हा सण.


अंतर्नाद च्या सर्व वाचकांना “ रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या ” मनापासून शुभेछ्या.

अस्मिता


लेख आवडल्यास कॉमेंट सेक्शन किंवा खालील लिंकवर Click करून अभिप्राय द्या.

antarnad18@gmail.com


ज्योतिष्याची आचारसंहिता

|| श्री स्वामी समर्थ ||




ज्योतिष शास्त्र हे अथांग महासागर सारखे आहे. जितके खोलात शिरावे तितकी ज्ञानप्राप्ती अधिक. ज्योतिष शास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. ते घटना कधी घडतील ह्याबद्दल ठोकताळे दर्शवते. आपण आपले उत्तम कर्म करत राहावे आणि कधी गरज पडल्यास ज्योतिषाचे मार्गदर्शन घ्यावे. असे केल्याने काही घटनांचा आधीच वेध घेतला जातो आणि त्याची दाहकता कमी करण्यास मदत होते हे निश्चित .

शेवटी प्रारब्ध भोग चुकले नाहीत ,ते भोगूनच संपवावे लागतात . आपल्या भविष्यात कायकाय दडले आहे जे जाणून घ्यायची उत्सुकता नाही असा माणूस विरळा.त्यामुळे ज्योतिष शास्त्राबद्दल जनमानसात सदैव आकर्षण आहे.


भविष्यकथन म्हणजेच दुसर्याच्या आयुष्यावर बोलणे ,जे खचितच सोप्पे नाही . त्यासाठी ह्या शास्त्राचा तितकाच मुरब्बी जाणकार हवा .शास्त्राचा खरा अभ्यासक, उपासकच उत्तम भविष्यकथन  करू शकतो.

गेल्या काही दशकात ज्योतिषशास्त्राचा प्रसार अनेक माध्यमातून वेगाने होत आहे. ज्योतिष हा विषय शिकवणार्या  शिक्षणसंस्था कार्यरत आहेत ज्याचा लाभ अनेकांना हे शास्त्र शिकण्यास होतो आहे. ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज , जाणकारांनी ह्या विषयावर आपली पुस्तके प्रकाशित केली आहेत . अनेक नियतकालिके , दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. ज्योतिष संमेलने भरवली जातात त्यायोगे ह्या विषयाची माहिती आणि प्रसार होतो.

ज्योतिष शास्त्राचा अवाकाच मुळी इतका प्रचंड मोठा आहे कि त्याचा अभ्यास करण्यास एक जन्मही अपुरा पडेल. ह्या शास्त्राचा सखोल अभ्यास न करता वर्तवलेले भविष्य चुकीचेच ठरते आणि जातकास योग्य असे मार्गदर्शन मिळत नाही . ह्याचा परिणाम म्हणजे ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्र ह्यावरून सामान्य माणसाचा विश्वास उडत आहे. 

ज्योतिष कथन करणाऱ्या व्यक्तीची उपासनेची बैठक अत्यंत भक्कम हवी. ह्या शास्त्रावर संपूर्ण विश्वास, चिंतन मनन ,उपासना असेल तर भविष्य कथनास दैवी मार्गदर्शन लाभते आणि वर्तवलेले भविष्य अचूक ठरते.

ज्योतिष शास्त्राच्या आधारे कुठल्या उंचीपर्यंत  भविष्य कथन होवू शकते ? परवा मी कै. श्री श्री भट ,पुणे ह्यांचे एक प्रवचन ऐकले. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे कि ज्योतिषाने शास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास करावा. आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या जन्माच्या आधीच त्यांनी नावे काय असतील आणि त्यांचा जन्म कधी होईल हे भविष्यकथन करता येते इतकी ह्या शास्त्राची उंची आहे अर्थात त्याचा तितकाच सखोल अभ्यासकच हे वर्तवू शकतो .

मुळात जातकाचा म्हणजे प्रश्नकर्त्याचा ह्या शास्त्रावर आणि ज्योतिष्यावर संपूर्ण विश्वास हवा. एखादी समस्या निर्माण झाली तर आणि तरच ज्योतिष मार्गदर्शन घेतले तर त्याला अर्थ आहे. आपला मुलगा शाळेत शिकत असताना त्याची पत्रिका ज्योतिषाला दाखवून त्याच्या विवाह संबंधी प्रश्न विचारणे योग्य ठरेल का? तर नाही. पण अनेक स्थळे पाहून विवाह जमत नसेल अडथळे येत असतील तर अश्या वेळी प्रश्न विचारणे योग्य ठरेल आणि उत्तरही अचूक येयील. काहीजण अनेक ज्योतिषांना प्रश्न विचारून स्वतःचा संभ्रम करून घेतात .पूर्वीच्या काळी राज ज्योतिषी असत. घराण्यातील सर्वांचे भविष्यकथन ते कथन करत असत.

प्रश्नकर्त्याने मनापासून, तळमळीने प्रश्न विचारला तर  प्रश्नकुंडलीत  विचारलेल्या प्रश्नाच्या भावात चंद्र असतो. म्हणजे घरासंबंधी प्रश्न असेल तर चंद्र ४थ्या भावात पाहायला मिळतो. ज्योतिष कथन करताना विषयाचे गांभीर्य हवे, उगीच मध्येच विषयांतर करून शिळोप्याच्या गप्पा मारू नये. विषयास धरून बोलावे आणि शास्त्राला न्याय आणि सन्मान द्यावा.

समोरच्याला बरे वाटावे म्हणून न सांगता पत्रिकेत जे खरे आहे ते भविष्य ज्योतिषाने कथन करावे .ज्योतिषाची उत्तम उपासना , साधना असेल तर त्यामुळे मिळालेल्या अंतस्फूर्तीनेहि ज्योतिष कथन होते आणि ते खरेही होते. अर्थात त्यासाठी तितकीच उपासना हवी ह्यात दुमत नसावे.

ज्योतिषाने कायम विध्यार्थी दशेतच राहावे. ज्ञानपिपासू राहावे. सातत्याने ज्योतिष शास्त्रातील नवीन घडामोडी , उत्खनन  ह्यांचा अभ्यास करत राहावा. सातत्याने पत्रिकांचा अभ्यास करत राहावे म्हणजे ज्ञान अधिक परिपक्व होत जाते.

उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे. ध्यानधारणा ,उपासना ह्याद्वारे अधिकाधिक अंतर्ज्ञान प्राप्त होते त्यामुळे ह्या वर अधिक भर द्यावा. ज्ञान, ध्यान आणि जप हि उपासनेची अंगे आहेत .ज्ञानाशिवाय ध्यान नाही आणि ध्यानावाचून जपाची सार्थकता नाही.

ज्योतिषशास्त्रात अनेक ग्रहयोग आहेत त्यामुळे भविष्यकथन करताना ज्योतिषाच्या ज्ञानाचा  खरा कस लागतो. प्रश्नकर्त्यास उत्तराची नेहमीच प्रतीक्षा असते पण ज्योतिषाने भविष्यकथनास पुरेसा वेळ घ्यावा आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करावे .,


काही लोकांचा ह्या शास्त्रावर अजिबात विश्वास नसतो. काहीच हरकत नाही पण विश्वास नाही म्हणून निदान त्याची टिंगल करणे , ह्या शास्त्रास कमी लेखणे हे तरी करू नये.  ह्या अगाध शास्त्राचे उपासक आणि समर्थक जगभरात आहेत , सतत संशोधने होत आहेत , नवनवीन नियम सिद्धांत पुढे येत आहेत . इतर अनेक शास्त्रांसारखे हे शास्त्र आहे आणि ते मानवी जीवन सुखी करण्यासासाठी वेळोवेळी “ वाटाड्या ” म्हणून मार्गदर्शन करत असते.

त्याचा कसा आणि कितपत उपयोग करून घ्यायचा ते ज्याचे त्याने ठरवायचे. शेवटी ज्योतिष सांगणारा हि माणूसच आहे. कधी त्याचेही निदान, केलेले तर्क चुकू शकतात . अश्यावेळी ज्योतिषाने आपला अहंकार बाजूला ठेवून आपली चूक कुठे झाली ह्याचा अभ्यास पुन्हा करावा हेच योग्य. शेवटी चुकांमधुंनच आपण शिकतो आणि परिपक्व होत जातो. पत्रिकेत सर्व ग्रहस्थिती व्यवस्थित असूनही एखादी घटना घडत नाही ,असे का होते ? तिथेच ज्योतिषाचा खरा अभ्यास सुरु होतो.

मी माझे ज्योतिषशास्त्राचे धडे श्री.(कै)वसंतकाका गोगटे ह्यांच्याकडे गिरवले. ते नेहमी म्हणत उत्तम ज्योतिषाच्या हातात पत्रीका आली कि संपले मग त्यानेच बोलावे हे उत्तम.ज्योतिषाचा अभ्यास हा एक्सरे मशीन सारखा असला पाहिजे. पत्रिकेच्या माध्यमातून जातकाचे आयुष्य आरपार दिसले पाहिजे.

सर्वात महत्वाचे ते ज्योतिषाचे मानधन. ज्योतिषाने किती मानधन घ्यावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. पण मानधन जरूर घ्यावे आणि प्रश्नकर्त्यानेही ते आनंदाने , मनात आकस न बाळगता त्वरित द्यावे.मानधन देण्यास टाळाटाळ करणे हा ह्या शास्त्राचा आणि ज्योतिष कथन करणार्या ज्योतीषाचाही  अपमान
आहे. 

आपल्या आयुष्यातील प्रश्नांचा गुंता आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने अचूक सोडवणाऱ्या ज्योतिषाचे मानधन हे दिलेच पाहिजे ह्यात दुमत असण्याचा प्रश्नच येत नाही .ज्ञान फुकट दिले किंवा घेतले तरी ते लाभणार नाही त्यामुळे मानधन जरूर द्यावे.

खरतर भविष्य आपल्याला माहित नाही म्हणून जगण्यात आनंद आहे. ज्योतिष शास्त्राचा  उपयोग आयुष्य सुखी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून करावा पण त्यात वाहवत जावू नये.

ज्यांनी  गुरु केले आहेत किंवा अध्यात्मात आहेत त्यांनी पत्रिका बघूच नये. ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि अध्यात्मातील लोकांनी पुन्हा मागे वळून पाहू नये. गोगटे काका  म्हणत “आपण आपल्या आणि कुटुंबियांच्या पत्रिका पाहू नये ,त्या आपले गुरु पाहतील. आपल्या निष्ठा एकदा गुरुपदी वाहिल्या कि मग ते करतील ते योग्य ह्यावर आपली नितांत श्रद्धा हवी. त्यामुळे अश्यानी ज्योतिषाच्या फंदात पडू नये. 

ज्योतिष हे वेळ घालवायचे साधन नाही त्यामुळे त्याकडे उगीचच टाईमपास म्हणूनही पाहू नये.ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खरे झाले तर त्याचे अभिनंदन करावयास अजिबात विसरू नये.

आपल्या स्वतःच्या उपासनेची बैठक इतकी भक्कम करावी कि आपले प्रश्न आपल्याच साधनेद्वारे सुटतील.

ज्योतिष शास्त्रात संयम हवा . आज ज्योतिष शिकलो आणि उद्या लगेच भविष्यकथनास सुरवात असे होत नसते.

एखाद्याच्या आयुष्यावर जबाबदारीने बोलणे ह्याला विषयाचा दांडगा अभ्यास लागतो ,तो आत्मविश्वास असल्याशिवाय ज्योतिष कथन करण्यास प्रारंभ करू नये.  ज्योतिषाची हि एक खूप मोठी जबाबदारी आहे.

ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे त्याचा योग्य तो सन्मान करावा हेच खरे.


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नोंदवा .


Antarnad18@gmail.com


#antarnad #astrology #astrologer #respect science #remedies #sixth sence #vision #meditation 
#sadhna #spirituality #sadhguru #zodiac chart #prarabdh karma #karma #confidence 
#अंतर्नाद #ज्योतिष शास्त्र #ज्योतिषी #मानधन #सन्मान #भविष्यकथन #अंतर्ज्ञान #ध्यानधारणा #उपासना #अध्यात्म #सद्गुरू #पत्रिका #कुंडली मिलन #प्रारब्ध