Tuesday, 4 August 2020

आत्महत्या

|| श्री स्वामी समर्थ ||



माझ्या डोक्यात एखादा विषय आला कि त्यावर लिहायला मी नेहमीच उत्सुक असते .पण आज ह्या विषयावर लिहायचे म्हणजे खरच मनापासून नको वाटत आहे. तरीही लिहिणे आवश्यक वाटतेय कारण गेल्या काही दिवसात अनेकांनी “ आत्महत्या ” करून आपला जीवन प्रवास संपवल्याच्या बातम्या येत आहेत .तेव्हा मनात अनेक प्रश्न निर्माण होतात ,हे सर्व कश्यासाठी ?

जीवन म्हणजे परमेश्वरी देणगी आहे. ८४ लक्ष्य योनीतून गेल्यावर मनुष्य जन्म प्राप्त होतो असे म्हंटले जाते , म्हणजेच तो किती मोलाचा आहे नाही का?  देवाने आपल्याला ह्या पृथ्वीवर रडायला थोडेच पाठवले आहे.

आयुष्य अनमोल आहे आणि जीवन खूप सुंदर सुद्धा आहे.

मी जेव्हा कुणाच्या आत्महत्ये बद्दल ऐकते किंवा वाचते ,तेव्हा असे वाटते कि असे काय बरे कारण झाले असावे कि त्या व्यक्तीला आपले आयुष्यच संपवावेसे वाटले असेल ?

मनुष्य जन्म मिळणे हे भाग्याचेच लक्षण आहे, हि एक आनंद प्राप्तीच आहे. आयुष्य व्यतीत करताना अनेक अडचणी ह्या येणारच पण आपल्या सद्विवेक बुद्धीने, जिद्दीने , हुशारीने, ज्ञानाने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे साधनेने प्रत्येक प्रसंगातून आपण मार्ग काढू शकतो.

जगात अशी कुठलीही गोष्ट नाही ज्यावर मार्ग निघत नाही. इथे कुठलीही गोष्ट शाश्वत सुद्धा नाही . जिथे ऋतूही आपला क्रम बदलतात ,तिथे आपले आयुष्य ते काय ?सर्वच दरवाजे एकदम बंद होत नाहीत एक बंद झाला तर दुसरे अनेक उघडतातहि.

जन्म आणि मृत्यू अपरिहार्य आहे. इथे कुणी आमरणपट्टा घेऊन जन्माला आले नाही .आपली वेळ आली ,आपले इह लोकावरील काम संपले कि आपण इथून  पुढील प्रवासाला   जाणारच आहोत, पण त्याचा अट्टाहास कश्याला? ओढवून कश्याला घ्यायची संकटे ?

जगावेसेच वाटत नाही त्याला नक्कीच काहीतरी कारण असते. मान्य आहे. अशावेळी आपल्याला उपयोगाला येतो तो “ संवाद ”. मनावर विचारांचे ओझे घेऊन जगायचे नाही. आपल्या जवळच्या कुठल्यातरी व्यक्तीशी मन मोकळे करायचे.

आजकाल जग प्रचंड स्पर्धात्मक झाले आहे.
रोज आपल्याला आपले अस्तित्व ,आजकालच्या भाषेत  
“ Prove Yourself ,consitent Performance ” करावे लागते. 


कामाच्या ठिकाणी खूप राजकारण असते . बरेचदा आपल्याला एकटे पाडले जाते,आपली प्रगती ,यश अनेकांच्या डोळ्यात खुपते ,हवीतशी पदोन्नती, पगारवाढ न मिळणे ह्या गोष्टींमुळे आपण निराश होतो आणि आत्मविश्वास घालवून बसतो. पण आपण जर मनापासून काम केले असेल तर कदाचित इथे  नाही पण कधीतरी आपल्या श्रमांचे चीज हे होणारच ह्यावर आपला ठाम विश्वास असला पाहिजे . समाजातील प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक स्थरावर जीवघेणी स्पर्धा तर आहेच ह्यातून आपली सुटका नाही, त्यामुळे ह्यापासून पळून जाण्यापेक्षा ह्याला सामोरे कसे जायचे त्याचा विचार झाला पाहिजे.

जेव्हा नकारात्मक विचारांची गर्दी मनात होईल तेव्हा साधा उपाय म्हणजे पाणी पिणे आणि असाल तिथून उठून बाहेर जाणे . ४ क्षणात वातावरण बदलते. उदबत्तीच्या धुरासारखे असलेले आपले मन लगेच दुसरीकडे वळते .बाहेर कदाचित कुणीतरी भेटते ,दुसरा विषय निघतो आणि आपण मनाला त्रास होणार्या विचारांपासून थोडाकाळ दूर जातो. आपल्या जवळच्या मित्राशी /मैत्रिणीशी बोलणे हे सर्वोत्तम.

आयुष्यात प्रत्येक क्षण जसा आपला नसतो तसाच तो समोरच्याचाही नसतो. आज त्याचा दिवस तर उद्या आपला दिवस हे होणारच त्यामुळे एखाद्या गोष्टीने निराश होऊन अगदी जीवन संपवणे हे कितपत योग्य आहे ?प्रत्येक वेळी आपला पहिला नंबर कसा येणार ?एखाद्या क्षेत्रात आपली प्रगती नाही झाली तर खचून न जाता आपल्या आवडीचे दुसरे एखादे  क्षेत्र निवडावे  ,कुणी सांगावे त्यात आपली असामान्य प्रगती होयीलहि. आपल्या आवडीचे छंद जोपासणे हेही जीवनात आपल्याला खूप आनंद देते. एकाच गोष्टीचा अट्टाहास करू नये मग ती मिळाली नाही कि कमकुवत मनाची माणसे निराश होत जातात आणि पुढे आत्महत्येस प्रवृत्त होतात .

प्रेमप्रकरणात यश मिळाले नाही म्हणून आत्महत्या करणारे प्रेमी आहेत .पण एखाद्या मुलीने /मुलाने आपल्याला नाही म्हंटले म्हणून तिच्यासाठी आपले जीवन संपवण्यापेक्षा आपल्याला ज्यांनी जीवाचे रान करून लहानाचे मोठे केले , आपल्या आईवडिलांनी आपल्या आजारपणात रात्र रात्र उशाशी बसून टिपे गाळली त्यांच्यासाठी जगणे हे जास्ती संयुक्तिक नाही का? १-२ वर्ष ओळख असलेल्या मुलीसाठी जीव देण्यापेक्षा गेली 25 वर्ष आपल्यावर  प्रेमाचा वर्षाव करत आपल्यासाठी जगणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी जगा. 

एखादा संपूर्ण दिवस सुद्धा आपला नसतो . दिवसभरातील सर्वच घटना काही आपल्या मनासारख्या घडत नाहीत. बरेचदा आयुष्य मोठे Turning घेते. कित्येक वेळा गरिबी नंतर आलेली श्रीमंती माणसाला गर्विष्ठ , घमेंडी बनवते तसेच श्रीमंती नंतर आलेली गरिबी माणसाला असहाय बनवते ,हा धक्का माणूस सहन करू शकत नाही कारण त्याला हे सर्व अपेक्षितच नसते. जुळवून घेणे ,चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहणे म्हणजेच संयम ठेवणे हे आवश्यक आहे  आणि ह्या सर्वांसाठी आहे ती साधना ,ध्यानधारणा.

माझ्याही आयुष्यात अनेक कसोटीचे क्षण आले आणि गेले .पण मी माझे संपूर्ण आयुष्य स्वामी समर्थांवर सोडून दिले आहे. माझा ह्या शक्तीवर प्रचंड विश्वास आहे,मग कुणी काहीही म्हणो. समाज आपल्याला जगू देत नाही पण आपण सर्वांच्या नाकावर टिच्चून जगायचे आहे आणि तेही आनंदने हा धडा आपण गिरवायचा आहे. पटतंय ना? सगळेच जण मनाने खंबीर नसतात ,काही तितकेच हळवेही असतात ,मान्य पण म्हणून जीवन संपवायचे नाही. आत्महत्या करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून जगायला हिम्मत लागते आणि ती सद्गुरुकृपेने आणि साधनेनेच येवू शकते. 

आत्महत्येचे विचार मनात येणे हि मनाची एक अवस्था आहे पण ती कायमस्वरूपी नाही. अध्यात्माने ह्यावर नक्कीच विजय मिळवता येतो .आजकाल योगासने , ध्यानधारणा ह्याचे महत्व जगभरातील सर्वाना समजू लागले आहे. मोठ्या प्रमाणात आज लोक ह्यात ओढले जात आहेत कारण ह्यातून मनशांती मिळतेय हे पटत आहे.

सर्वच ग्रहयोग इथे लिहिता येणार नाहीत .मनाचा इतका हळवेपणा किंवा कमकुवत पणा म्हणू हव तर असण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पत्रिकेत बिघडलेला चंद्र . चंद्रमा मनसो जातः हे सर्वश्रुत आहेच . पत्रिकेत त्रिक स्थानात असलेला चंद्र ,किंवा त्यासोबत असलेले केतू शनी राहू हे ग्रह चंद्र बिघडण्याचे मुख्य कारण आहे. अश्या व्यक्तींचा मानसिक समतोल ठीक नसतो . सतत नकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाचा अभाव अश्या लोकांत प्रामुख्याने दिसून येतो. अश्या व्यक्ती भरती आणि ओहोटीच्या वेळी तसेच अमावास्या , पौर्णिमेला आपले मानसिक संतुलन घालवून बसतात . 

असे ग्रहयोग असलेल्या लोकांना कुणाशी बोलावेसे वाटतच नाही. त्यांना आयुष्यातील मानसिक ताण ,संकटे असह्य होतात. घरातील तरुण मुले अचानक आत्महत्या करतात तेव्हा घरातल्यांशी त्यांचे सूर जुळलेले नाहीत हे त्रिवार सत्य आहे. पण जाणारा मागे अनेक प्रश्न ठेवून जातो ,जे मागे उरतात त्या कुटुंबियांचे काय ? त्यांच्यासाठी तर हा धक्का पचवत जगत राहणे हि आत्महत्येपेक्षाही मोठी शिक्षा असते .ह्या सर्वांचा विचार करून समाज अधिकाधिक जागृत झाला पाहिजे. अश्या कमकुवत मनाच्या लोकांना मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. आपल्या भोवताली किंवा ओळखीत अश्या व्यक्ती आपल्याला आढळल्या तर त्यांना मानसिक आधार देवून त्यांना जगण्याची उमेद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपल्या समुपदेशाने एक आयुष्य वाचले तर ती एक ईश्वरी सेवाच आहे.

कुटुंब कश्याला म्हणतो आपण ? नुसती एका छताखाली ४ माणसे राहिली म्हणजे कुटुंब होत नसते . त्यांच्यात प्रेमाचा ओलावा हवा, एकमेकांशी संवाद हवा , एकमेकांच्या हालचाली, बोलणे वागण्यातून जरा फरक दिसला तरी तो इतरांच्या लक्ष्यात आला पाहिजे इतके सूर जुळले पाहिजेत .अश्या घरात जिथे मनाचा संवाद असतो, न बोलताही सर्व काही समजू शकते तिथे आनंद ,सौख्य नांदते आणि तिथे कुणाच्याही मनात आत्महत्येचे बीज रोवले जात नाही. 

आपल्या सीमेवर पहा पहाडी छाती घेऊन ऊनपावसात ,कडाक्याच्या थंडीत आपले जवान आपल्या देशासाठी प्राण पणाला लावत आहेत ,कित्येक महिने-वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर आहेत . कितीवेळा त्यांच्याही जीवावर बेतते पण हे धीराने उभे राहतात .

देवाने हि सुंदर सृष्टी निर्माण केली आहे पण ती पाहण्यासाठी त्याचा आनंद उपभोगण्यासाठी कित्येकांना दृष्टी नाही , कर्णबधीर आहेत , बोलूही शकत नाहीत त्यांनी काय करायचे मग ? आपल्याला सर्व अवयव धड आहेत मग रडताय कसले. रडायचे नाही तर लढायचे . आपणच आपले जीवन बदलू शकतो आपल्या निर्धाराने ,चांगल्या विचाराने आणि अर्थात संयमाने .काही गोष्टी खरच आपल्या हातात नसतात पण म्हणून आत्महत्या हा त्यावर पर्याय असूच शकत नाही.

जीवन हे देवाची देणगी आहे आणि ते सार्थकी लावणे हीच आपली कसोटी आहे .जीवन संपवणे हा तर पळपुटेपणा झाला, पण संकटांवर मात करून जीवन सुसह्य करणे हीच खरी परीक्षा आहे. देवाने अश्या कितीही परीक्षा पदोपदी घेतल्या तरी आपण पास होणारच हा विश्वास डगमगू द्यायचा नाही. सगळ्यांना सर्व मिळत नाही पण जे आहे ते हि नसते तर हा विचार आपण केला पाहिजे.

आजकाल अगदी वयात आलेली मुले आत्महत्येस प्रवृत्त होताना आपण पाहतो ,वाचतो . ह्यास आपणही कुठेतरी जबाबदार आहोत का? मुलांवर सतत अभ्यासाचे प्रेशर टाकणे , घरातील इतर मुलांशी किंवा अन्य मुलांशी त्यांची सतत बरोबरी करणे , त्यांना कमी लेखणे ,”तु काही कामाचाच नाहीस ”, तु जगायला नालायक आहेस ”, “ आम्ही तुला पोसतो आहोत ”, “एक पैसा कमवायची अक्कल नाही ” ह्या आणि अश्या कित्त्येक विधानांनी मुलांच्या मनावर खोलवर आघात होत असतात आणि पुढे ती कुटुंबाला मनाने दुरावतात , व्यसनाधीन होतात किंवा आत्महत्येस प्रवृत्त होतात . अहो आपल्याला तरी मिळाले होते का ९० टक्के मग मुलांकडून ह्या अपेक्षा काश्यासाठी ? आपण आहोत का सर्वगुणसंपन्न ,मग आपल्या मुलांकडून दुनियाभरच्या अपेक्षा का? कश्यासाठी ???? त्यांना नाहीनाही ते बोलून त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी का आपण त्यांना  जन्माला घातले आहे  ? प्रत्येकाचे आयुष्य , स्थिती , बुद्धी,क्षमता वेगळी आहे . प्रत्येकाला आपापल्या परीने जगायचे स्वातंत्र दिले पाहिजे. आपल्या अपेक्षांची ओझी वाहणारी गाढवे करू नका त्यांना ,नाहीतर एकदिवस ती त्या ओझ्याने पुरती दबतील आणि जगण्याचा आत्मविश्वास घालवून बसतील.

आज शेतकर्यांचेही तेच आहे, नापीक जमिनीतूनही सोने पिकवण्याची ताकद असलेले शेतकरी आर्थिक ओझे पेलू न शकल्याने आत्महत्या करत आहेत .आपणही सर्व कुठेतरी ह्यास जबाबदार आहोतच कि. कुठल्याही प्रश्नाला उत्तर नाही असे नाही .

Virus आहे तिथे Anti virus सुद्धा आहेच कि. जीवन हि परमेश्वराने दिलेली नितांत सुंदर भेट आहे, तिचा योग्य तो मान ठेवला पाहिजे .

आपल्या जवळच्या ओळखीच्या व्यक्ती ,नातेवाईक ह्यांच्याशी आपले मैत्रीचे , विश्वासाचे बंध घट्ट करूया जेणेकरून कुठल्याही संकटात एकमेकांना एकमेकांचा आधार राहील, एकमेकांशी संवाद साधता येयील , कुणालाही एकटे वाटणार नाही आणि  आत्महत्येसारख्या कृत्याचा विचारसुद्धा कुणाच्याही मनात येणार नाही .

म्हणूनच कितीही संकटे आली , मनाविरुद्ध घटनांची शृंखला असली तरी “ हेही दिवस जातील ” हि खुणगाठ मनात धरून ,जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करत आयुष्याचा सोहळा करता आला पाहिजे.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर आपला अभिप्राय जरूर पाठवा.
Antarnad18@gmail.com


#antarnad #sucide #psychiatric disorder #moon #high tide #low tide #saturn #depression
#अंतर्नाद #आत्महत्या #समुपदेशन #चंद्र #शनी #राहू #मनोधैर्य #मानसिक आजार #संतुलन #मनोविकार

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. खूप उत्तम प्रकारे विषय मांडला आहे.

    ReplyDelete
  3. अस्मिता, तुझे लिखाण मला नेहमीच आवडते. प्रत्येक विषय तू छान समजावून सांगते. ह्याही लेखात अगदी योग्य विचार मांडले आहेत.

    ReplyDelete
  4. फारच छान लिहिला आहे लेख.

    ReplyDelete
  5. फार सुंदर लेख झाला आहे . मी सुद्धा याच विषयावर करता काम करते. मी आपल्याला फोन केला तर चालेल का ?

    ReplyDelete
  6. अतिशय सुरेख.. मुद्देसूद मांडणी.. सर्वसमावेशक व मनोवेधक लेख बंधणी.. आपण सर्वजण या phase मधून जात असतो...खूप निराशा वाटते.. सर्व गोष्टींवर आपणच कारण नसताना प्रश्नचि्ह लावतो. अगदी आत्महत्येचे विचार नाही आले तरी खूप काळ या निराशेत जातो आणि हे खरचं पटत की अशी जीवाभावाची काही मानस हवीत आयुष्यात ज्यांच्याशी मनात जे जसं येतं तसं च्या तसं filter न करता बोलता येईल.. आणि समोरच्यातील दोष पाहण्यापेक्षा .. चुका हेरण्यापेक्षा तीला आत्ता मी समजून घ्यायची.. support करायची गरज आहे..या विचाातूनच आणि कृतीतून स्वतः ला मनशक्ती मिळेल ती वेगळीच...

    ReplyDelete
  7. Good, expressive writing.. Keep it up

    ReplyDelete