|| श्री स्वामी समर्थ ||
ज्योतिष शास्त्र हे अथांग महासागर सारखे आहे. जितके खोलात शिरावे तितकी ज्ञानप्राप्ती अधिक. ज्योतिष शास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. ते घटना कधी घडतील ह्याबद्दल ठोकताळे दर्शवते. आपण आपले उत्तम कर्म करत राहावे आणि कधी गरज पडल्यास ज्योतिषाचे मार्गदर्शन घ्यावे. असे केल्याने काही घटनांचा आधीच वेध घेतला जातो आणि त्याची दाहकता कमी करण्यास मदत होते हे निश्चित .
शेवटी प्रारब्ध भोग चुकले नाहीत ,ते भोगूनच संपवावे लागतात . आपल्या भविष्यात कायकाय दडले आहे जे जाणून घ्यायची उत्सुकता नाही असा माणूस विरळा.त्यामुळे ज्योतिष शास्त्राबद्दल जनमानसात सदैव आकर्षण आहे.
भविष्यकथन म्हणजेच दुसर्याच्या आयुष्यावर बोलणे ,जे खचितच सोप्पे नाही . त्यासाठी ह्या शास्त्राचा तितकाच मुरब्बी जाणकार हवा .शास्त्राचा खरा अभ्यासक, उपासकच उत्तम भविष्यकथन करू शकतो.
गेल्या काही दशकात ज्योतिषशास्त्राचा प्रसार अनेक माध्यमातून वेगाने होत आहे. ज्योतिष हा विषय शिकवणार्या शिक्षणसंस्था कार्यरत आहेत ज्याचा लाभ अनेकांना हे शास्त्र शिकण्यास होतो आहे. ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज , जाणकारांनी ह्या विषयावर आपली पुस्तके प्रकाशित केली आहेत . अनेक नियतकालिके , दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. ज्योतिष संमेलने भरवली जातात त्यायोगे ह्या विषयाची माहिती आणि प्रसार होतो.
ज्योतिष शास्त्राचा अवाकाच मुळी इतका प्रचंड मोठा आहे कि त्याचा अभ्यास करण्यास एक जन्मही अपुरा पडेल. ह्या शास्त्राचा सखोल अभ्यास न करता वर्तवलेले भविष्य चुकीचेच ठरते आणि जातकास योग्य असे मार्गदर्शन मिळत नाही . ह्याचा परिणाम म्हणजे ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्र ह्यावरून सामान्य माणसाचा विश्वास उडत आहे.
ज्योतिष कथन करणाऱ्या व्यक्तीची उपासनेची बैठक अत्यंत भक्कम हवी. ह्या शास्त्रावर संपूर्ण विश्वास, चिंतन मनन ,उपासना असेल तर भविष्य कथनास दैवी मार्गदर्शन लाभते आणि वर्तवलेले भविष्य अचूक ठरते.
ज्योतिष शास्त्राच्या आधारे कुठल्या उंचीपर्यंत भविष्य कथन होवू शकते ? परवा मी कै. श्री श्री भट ,पुणे ह्यांचे एक प्रवचन ऐकले. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे कि ज्योतिषाने शास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास करावा. आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या जन्माच्या आधीच त्यांनी नावे काय असतील आणि त्यांचा जन्म कधी होईल हे भविष्यकथन करता येते इतकी ह्या शास्त्राची उंची आहे अर्थात त्याचा तितकाच सखोल अभ्यासकच हे वर्तवू शकतो .
मुळात जातकाचा म्हणजे प्रश्नकर्त्याचा ह्या शास्त्रावर आणि ज्योतिष्यावर संपूर्ण विश्वास हवा. एखादी समस्या निर्माण झाली तर आणि तरच ज्योतिष मार्गदर्शन घेतले तर त्याला अर्थ आहे. आपला मुलगा शाळेत शिकत असताना त्याची पत्रिका ज्योतिषाला दाखवून त्याच्या विवाह संबंधी प्रश्न विचारणे योग्य ठरेल का? तर नाही. पण अनेक स्थळे पाहून विवाह जमत नसेल अडथळे येत असतील तर अश्या वेळी प्रश्न विचारणे योग्य ठरेल आणि उत्तरही अचूक येयील. काहीजण अनेक ज्योतिषांना प्रश्न विचारून स्वतःचा संभ्रम करून घेतात .पूर्वीच्या काळी राज ज्योतिषी असत. घराण्यातील सर्वांचे भविष्यकथन ते कथन करत असत.
प्रश्नकर्त्याने मनापासून, तळमळीने प्रश्न विचारला तर प्रश्नकुंडलीत विचारलेल्या प्रश्नाच्या भावात चंद्र असतो. म्हणजे घरासंबंधी प्रश्न असेल तर चंद्र ४थ्या भावात पाहायला मिळतो. ज्योतिष कथन करताना विषयाचे गांभीर्य हवे, उगीच मध्येच विषयांतर करून शिळोप्याच्या गप्पा मारू नये. विषयास धरून बोलावे आणि शास्त्राला न्याय आणि सन्मान द्यावा.
समोरच्याला बरे वाटावे म्हणून न सांगता पत्रिकेत जे खरे आहे ते भविष्य ज्योतिषाने कथन करावे .ज्योतिषाची उत्तम उपासना , साधना असेल तर त्यामुळे मिळालेल्या अंतस्फूर्तीनेहि ज्योतिष कथन होते आणि ते खरेही होते. अर्थात त्यासाठी तितकीच उपासना हवी ह्यात दुमत नसावे.
ज्योतिषाने कायम विध्यार्थी दशेतच राहावे. ज्ञानपिपासू राहावे. सातत्याने ज्योतिष शास्त्रातील नवीन घडामोडी , उत्खनन ह्यांचा अभ्यास करत राहावा. सातत्याने पत्रिकांचा अभ्यास करत राहावे म्हणजे ज्ञान अधिक परिपक्व होत जाते.
उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे. ध्यानधारणा ,उपासना ह्याद्वारे अधिकाधिक अंतर्ज्ञान प्राप्त होते त्यामुळे ह्या वर अधिक भर द्यावा. ज्ञान, ध्यान आणि जप हि उपासनेची अंगे आहेत .ज्ञानाशिवाय ध्यान नाही आणि ध्यानावाचून जपाची सार्थकता नाही.
ज्योतिषशास्त्रात अनेक ग्रहयोग आहेत त्यामुळे भविष्यकथन करताना ज्योतिषाच्या ज्ञानाचा खरा कस लागतो. प्रश्नकर्त्यास उत्तराची नेहमीच प्रतीक्षा असते पण ज्योतिषाने भविष्यकथनास पुरेसा वेळ घ्यावा आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करावे .,
काही लोकांचा ह्या शास्त्रावर अजिबात विश्वास नसतो. काहीच हरकत नाही पण विश्वास नाही म्हणून निदान त्याची टिंगल करणे , ह्या शास्त्रास कमी लेखणे हे तरी करू नये. ह्या अगाध शास्त्राचे उपासक आणि समर्थक जगभरात आहेत , सतत संशोधने होत आहेत , नवनवीन नियम सिद्धांत पुढे येत आहेत . इतर अनेक शास्त्रांसारखे हे शास्त्र आहे आणि ते मानवी जीवन सुखी करण्यासासाठी वेळोवेळी “ वाटाड्या ” म्हणून मार्गदर्शन करत असते.
त्याचा कसा आणि कितपत उपयोग करून घ्यायचा ते ज्याचे त्याने ठरवायचे. शेवटी ज्योतिष सांगणारा हि माणूसच आहे. कधी त्याचेही निदान, केलेले तर्क चुकू शकतात . अश्यावेळी ज्योतिषाने आपला अहंकार बाजूला ठेवून आपली चूक कुठे झाली ह्याचा अभ्यास पुन्हा करावा हेच योग्य. शेवटी चुकांमधुंनच आपण शिकतो आणि परिपक्व होत जातो. पत्रिकेत सर्व ग्रहस्थिती व्यवस्थित असूनही एखादी घटना घडत नाही ,असे का होते ? तिथेच ज्योतिषाचा खरा अभ्यास सुरु होतो.
मी माझे ज्योतिषशास्त्राचे धडे श्री.(कै)वसंतकाका गोगटे ह्यांच्याकडे गिरवले. ते नेहमी म्हणत उत्तम ज्योतिषाच्या हातात पत्रीका आली कि संपले मग त्यानेच बोलावे हे उत्तम.ज्योतिषाचा अभ्यास हा एक्सरे मशीन सारखा असला पाहिजे. पत्रिकेच्या माध्यमातून जातकाचे आयुष्य आरपार दिसले पाहिजे.
सर्वात महत्वाचे ते ज्योतिषाचे मानधन. ज्योतिषाने किती मानधन घ्यावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. पण मानधन जरूर घ्यावे आणि प्रश्नकर्त्यानेही ते आनंदाने , मनात आकस न बाळगता त्वरित द्यावे.मानधन देण्यास टाळाटाळ करणे हा ह्या शास्त्राचा आणि ज्योतिष कथन करणार्या ज्योतीषाचाही अपमान
आहे.
आपल्या आयुष्यातील प्रश्नांचा गुंता आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने अचूक सोडवणाऱ्या ज्योतिषाचे मानधन हे दिलेच पाहिजे ह्यात दुमत असण्याचा प्रश्नच येत नाही .ज्ञान फुकट दिले किंवा घेतले तरी ते लाभणार नाही त्यामुळे मानधन जरूर द्यावे.
खरतर भविष्य आपल्याला माहित नाही म्हणून जगण्यात आनंद आहे. ज्योतिष शास्त्राचा उपयोग आयुष्य सुखी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून करावा पण त्यात वाहवत जावू नये.
ज्यांनी गुरु केले आहेत किंवा अध्यात्मात आहेत त्यांनी पत्रिका बघूच नये. ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि अध्यात्मातील लोकांनी पुन्हा मागे वळून पाहू नये. गोगटे काका म्हणत “आपण आपल्या आणि कुटुंबियांच्या पत्रिका पाहू नये ,त्या आपले गुरु पाहतील. आपल्या निष्ठा एकदा गुरुपदी वाहिल्या कि मग ते करतील ते योग्य ह्यावर आपली नितांत श्रद्धा हवी. त्यामुळे अश्यानी ज्योतिषाच्या फंदात पडू नये.
ज्योतिष हे वेळ घालवायचे साधन नाही त्यामुळे त्याकडे उगीचच टाईमपास म्हणूनही पाहू नये.ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खरे झाले तर त्याचे अभिनंदन करावयास अजिबात विसरू नये.
आपल्या स्वतःच्या उपासनेची बैठक इतकी भक्कम करावी कि आपले प्रश्न आपल्याच साधनेद्वारे सुटतील.
ज्योतिष शास्त्रात संयम हवा . आज ज्योतिष शिकलो आणि उद्या लगेच भविष्यकथनास सुरवात असे होत नसते.
एखाद्याच्या आयुष्यावर जबाबदारीने बोलणे ह्याला विषयाचा दांडगा अभ्यास लागतो ,तो आत्मविश्वास असल्याशिवाय ज्योतिष कथन करण्यास प्रारंभ करू नये. ज्योतिषाची हि एक खूप मोठी जबाबदारी आहे.
ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे त्याचा योग्य तो सन्मान करावा हेच खरे.
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नोंदवा .
Antarnad18@gmail.com
#antarnad #astrology #astrologer #respect science #remedies #sixth sence #vision #meditation
#sadhna #spirituality #sadhguru #zodiac chart #prarabdh karma #karma #confidence
#अंतर्नाद #ज्योतिष शास्त्र #ज्योतिषी #मानधन #सन्मान #भविष्यकथन #अंतर्ज्ञान #ध्यानधारणा #उपासना #अध्यात्म #सद्गुरू #पत्रिका #कुंडली मिलन #प्रारब्ध
छान आणि उपयुक्त माहिती.
ReplyDeleteज्योतिषाला, नवअभ्यासकाला आचारसंहितेबाबत उत्तम व अनिवार्य मार्ग सांगून शास्त्राची महती, शास्त्राची महानता किती आहे हे समजून आले.
ReplyDeleteउपासनेचा आश्रय किती महत्त्वाचा आहे, ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन, गुरोपासनेचे महत्त्व, किती आहे हे खूप सोप्या व समर्पक शब्दात विदित केलं आहे. आपल्या दीपाप्रमाणे मार्गदर्शनातून ज्योतिषांचा अध्यात्मअंतर्नाद नक्कीच विकसित व्हायला मदत होणार आहे.
अप्रतिम लेख..! कायम संग्रही ठेवावा असाच...!
ज्योतिषाला, नवअभ्यासकाला आचारसंहितेबाबत उत्तम व अनिवार्य मार्ग सांगून शास्त्राची महती, शास्त्राची महानता किती आहे हे समजून आले.
ReplyDeleteउपासनेचा आश्रय किती महत्त्वाचा आहे, ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन, गुरोपासनेचे महत्त्व, किती आहे हे खूप सोप्या व समर्पक शब्दात विदित केलं आहे. आपल्या दीपाप्रमाणे मार्गदर्शनातून ज्योतिषांचा अध्यात्मअंतर्नाद नक्कीच विकसित व्हायला मदत होणार आहे.
अप्रतिम लेख..! कायम संग्रही ठेवावा असाच...!
खूप सुंदर विवेचन.... मला ज्योतिष शास्त्राविषयी फार माहिती नाही किंबहुना मी त्याच्या संदर्भात फारसे वाचलेले देखील नाही पण म्हणून माझा त्यावर विश्वास नाही असे मात्र नाही . विशेष म्हणजे माझ्या लेकीच्या लग्नाच्या वेळी आणि लेकाच्या शिक्षणासंदर्भात मला खूप चांगले मार्गदर्शन मिळाले...पण तुझ्या लेखात सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या पाठीशी गुरू बळ आहे त्यांनी आपल्या पत्रिकेचा विचार करु नये आणि या गोष्टीवर मला प्रचंड विश्वास आहे. माझे गुरू माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी त्यांच्या संमती शिवाय घडणे शक्यच नाही... गुरू माउली मला तारून न्यायला समर्थ आहेत....हा माझा गाढ विश्वास आहे.. त्यामुळे मी पुष्कळशी नियंत्रित अशी असते... अर्थात सर्वोच्च भक्ती साठी भरपूर साधनेची गरज आहे अजून...तुझा लेख नेहमीच मला विचार करायला लावतो आणि त्यामुळे मन आणि बुद्धी ताजेतवाने होतात.... खूप खूप खूप धन्यवाद !!
ReplyDeleteखूप मार्गदर्शक लेख!
ReplyDeleteअगदी खरंय.खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती.
ReplyDeleteखूपच छान व योग्य सांगितलेत...
ReplyDeleteखूप छान लिखाण !🙏
ReplyDeleteही खरी आचारसंहिता
ReplyDelete🙏 अप्रतिम
ReplyDeleteवा,अप्रतिम आणि अत्यावश्यक लिखाण....👌👌
ReplyDeleteउत्तम लेख.. You might like to read my astrology blog as well..
ReplyDeletehttp://nileshastrology.blogspot.com/2017/08/blog-post_19.html?m=1
धन्यवाद ! तुमचे दोन लेख वाचले.तुमचे असे अनेक लेख वाचायला मिळो आणि आम्हाला उत्तम ज्ञानमृत प्राप्त होवो.आणि आम्हाला या मार्गदर्शनाने योग्य ते यश संपादन जरा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
ReplyDeleteKhup chan. Dhanyawad
ReplyDeleteKhup chann. Dhanyawad.
ReplyDelete