Tuesday, 18 May 2021

सर्वांगसुंदर उपासना

 || श्री स्वामी समर्थ || 


आज करोना मुळे प्रत्येक माणूस दडपणाखाली जगताना दिसत आहे. एका अनामिक भीतीने आपल्या सर्वाना ग्रासून टाकले आहे. आपले आयुष्य पूर्ववत कधी होयील हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. पैशाचा स्त्रोत कमी होत आहे . आपणच वाढवून ठेवलेल्या गरजा पूर्ण करताना आता आपलीच दमछाक होते आहे. सततची भीती , मानसिक दडपण , सैरभैर झालेले मन ह्या सर्वांमुळे चित्त ठिकाणावर नाही. आला दिवस आपला म्हणायची वेळ आली आहे. 

करोना बाजूलाच राहिला . ह्या सर्व दडपणाखाली जगताना आपण मोकळा श्वास घ्यायला विसरलो आहोत आणि त्यातून असंख्य आजार , मानसिक विकृती आपणच जन्माला घालत आहोत.

ह्या सर्वातून बाहेर पडण्याचा आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे
घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना . ह्या मुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होयीलच पण जगायला बळ मिळेल ह्याची खात्री वाटते म्हणून त्यासंबंधीचे विचार आज आपल्यासमोर ह्या लेखाद्वारे मांडण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे. 

ह्या सर्व करत असताना आपल्याला मासिक पाळी मध्ये आली तर तो वार दिवस सोडून द्यायचा आणि पुढचा घ्यायचा.  कुठलेही कल्प विकल्प मनात न ठेवता ह्या केल्या तर  मनाचा सात्विकपणा पुन्हा येयील आणि हरवलेला आनंद चेहऱ्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर  दिसू लागेल हे आवर्जून नमूद करावेसे वाटते . अनुभव घ्या आणि आपले अनुभव कळवा.

उपासना आणि व्रत

१. संध्याकाळी देवासमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा ( निरांजन ).त्यामुळे घरात सकारात्मकता राहते 



२. आपल्या कडून अनेकदा कुलाचार होत नाहीत त्यासाठी  आपल्या कुलस्वामिनीची ओटी  ५ शुक्रवार  किंवा मंगळवार भरावी . पहिल्या 4 ओट्या ह्या घरात आणि ५ वी ओटी देवळात जाऊन भरावी . ५ वी ओटी देवळात  भरताना स्टील चे निरांजन घेवून जावे आणि तिथे तुपाचा दिवा लावावा . ते निरांजन देवळात ठेवायचे आहे .

ओटीचे साहित्य

तांदूळ नारळ  
टोवेल/लहान पंचा  (खण असेल तरी चालेल पण आजकाल त्याचे काय करावे समजत नाही –काळानुसार आपण बदलावे . ) 
हळद कुंकुवाच्या पुड्या .
साखरेची पुडी  
गुळ चणे (फुटाणे – भिजलेले चणे नाहीत )
उदबत्ती धूप  
गजरा वेणी – जे असेल ते आणि फुले 
कुठलेही एक फळ – देवीला डाळिंब खूप आवडते .
दुध साखरेचा नेवेद्य .

घरात ओटी भरताना हे सर्व एका ताटात ठेवून घरातील देव्हार्यातील देवीची ओटी भरायची . तिला आपल्या मनातील इच्छा सांगायची आणि भरायची . ३ वेळा ताट उचलून खाली ठेवायचे आणि नमस्कार करायचा . देवीला हळद कुंकू ,सर्व फुले वाहायची . धूप दीप निरांजन लावून घरात जो काही स्वयपाक केला असेल त्याचा नेवैद्य देवीला दाखवायचा . संध्याकाळी कुणी सवाष्ण घरी आली तर तिला आपल्या व्रताबद्दल अजिबात वाच्यता करायची नाही . तिला फक्त हळद कुंकू लावून फुल गजरा जे असेल ते द्यायचे आणि चणे द्यायचे .

असेच सहज आलात आज शुक्रवार आहे असे म्हणून हळद कुंकू द्यायचे बाकी काही बोलायचे नाही .

मध्ये काही कारणाने खंड पडला तर शुक्रवार(तुमच्या देवीचा जो काही वार असेल ) सोडून द्यायचा आणि पुढील शुक्रवार करायचा . ह्या ओटीतील सर्व गोष्टी दुसर्या दिवशी घरातच वापरायच्या आहेत .

आपल्याकडून देवीची सेवा , कुलाचार घडतो  आणि मनाला अतिशय समाधान लाभते.

३  घरात हळद कुंकू होत नसेल किंवा तशी प्रथा नसेल तर श्रावणात , मार्गशीर्षात , नवरात्रात किंवा वर्षातील कुठल्याही शुक्रवारी  जवळच्या ग्रामदेवतेच्या देवळात सव्वा किलो हळद कुंकू घेऊन जायचे आणि देवीला अर्पण करायचे . तिथे हजारो स्त्रीया ते लावतील . आपले हळदीकुंकू झाले असे समजायचे . त्यातील थोडे घरी आणून ठेवायचे आणि आपणही लावायचे .



३. देव्हार्यातील देवीला कुंकुमार्चन करावे , देवीला कुंकुवाचा अभिषेक करावा व जप करावा.

4 महालक्ष्मी अष्टक रोज  संध्याकाळी दिवेलागणीला म्हणावे .

५ देवीचा जप - ओं श्री महालक्ष्मै  मातायै  नमः

६ रामरक्षा नित्य पठण

७ श्री स्वामी समर्थ –नामस्मरण 

८  साडेसाती किंवा शनी महादशा असेल तर शनी महाराजांचा जप - ओम शं शनैश्चराय नमः जपसंख्या 23000 आहे. 

साडेसातीचा त्रास होत असेल तर एका मातीच्या पणती मध्ये तेल घालावे आणि त्यात आपला चेहरा  १ मिनिट पहावा  .नंतर ते तेल देवळातील समई मध्ये घालावे म्हणजे आपली पिडा जाळून जाईल. ते तेल मारुतीच्या डोक्यावर ओतायचे नाही हे लक्ष्यात ठेवावे . असे ३ शनिवार करावे.

९   विवाह झाल्यावर सत्यनारायण पुजावा आणि मग कुल देवतेचे दर्शन घेवून संसाराला सुरवात करावी  अशी रूढी परंपरा आहे.  श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्य नारायणाची पूजा केली जाते . अनेक वेळा इच्छा असूनही सत्यनारायण आपल्या घरी होत नाही . इतका मोठा घाट घालायचा ,मेहूण जेवायला घालायचे  एक ना दोन अनेक गोष्टींमुळे ते राहून जाते .

आपल्या घरात घरच्या घरी हे सत्यनारायण व्रत आपण करू शकतो . हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगुन शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते .

प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करायचे आहे . घरातील जी व्यक्ती  हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला करायचे आहे. आज एकाने पुढील वेळेला दुसर्याने असे नाही .

विधी – घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग /पाट मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे. त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा . त्यात पैसा फुल घालावे. त्यावर एक ताम्हन ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे. ह्यात तुळशी पत्राचे आसन करून त्यावर  आपल्या देवघरातील श्री कृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी . श्रीकृष्णाला  तुळस ( एक वाहिली तरी चालेल . १०८ ,१००८ आवश्यक नाही ) आणि फुल अर्पण करायचे . नवग्रह पूजा करायची नाही . केळीचे खांब इतर काहीही नको . कुणाला बोलवायचं तर प्रश्नच नाही ,साधी वाच्यातही नाही .

श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून  त्याला गंध , अक्षता फुल आणि तुळस अर्पण करावे. 

आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून विनंती करावी .धूप दीप उदबत्ती ओवाळावी  आणि अंतर्मनाने शरण जावे.  सत्यनारायण व्रत पोथी मिळते (संपूर्ण चातुर्मास ह्यातसुद्धा आहे ) त्यातील  सत्यनारायण कथेचे वाचन करावे . आरती करून  लहान वाटीचा प्रसाद करावा त्यात केळे घालावे आणि नेवैद्य दाखवावा . त्या दिवशी घरात जो काही स्वयपाक केला असेल त्याचा महाप्रसाद दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. 

दुसर्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली कि मूर्तीवर अक्षता वाहून “ पुनरागमनायच “ असे ३ वेळा म्हणावे आणि श्री कृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा. 

हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे  त्यामुळे ते सहज करता येयील असे आहे. 

वरील सर्व व्रत आणि उपासना करताना त्यातील मेख / गोम अशी आहे कि आपण करत असलेल्या व्रताची , उपासनेची  कुठेही वाच्यता करायची नाही .कुठेही अवाक्षर सुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होयील हे ध्यानी असुदे. नाहीतर कर्णोपकर्णी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळ पदरात पडणार नाही .

आपल्याला जश्या जमतील तश्या आपल्या इच्छे प्रमाणे कुठल्याही उपासना कराव्यात . एक ना धड 
भाराभर चिंध्या ह्या प्रमाणे मात्र होऊ देऊ नये. जे करू ते मनापासून आणि त्यात सातत्य असेल  तरच त्याचा आनंद आहे. 

येणारा पुढील काळ आणि वर्ष आपल्या सर्वासाठी  सात्विक उपासनेचे असुदे  आणि अखंड विश्वावरून हे करोना महामारीचे संकट दूर होवून आपले सर्वांचे आयुष्य पूर्ववत होवूदे.  सर्वांची सर्वार्थाने प्रगती होवूदे अशी  स्वामीचरणी प्रार्थना करूया.

उपासनेचे  महत्व अनन्यसाधारण आहे . त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य ,  प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते .फक्त त्यात समर्पणाची भावना हवी.  तुमचा आमचा सर्वांचा हा जीवनरूपी प्रवास सुखद ,आनंददायी व्हावा म्हणून उपासनेचे महत्व सांगणारा हा लेखन प्रपंच.   

टीप:  कुठलेही व्रत किंवा उपासना हि फार तामझाम न करता साधेपणाने करावी ,अहंकार विरहित असेल तर कृपा होयील. जशी जमेल तशी करावी . बसायला पाट घ्यावा कि आसन किंवा तत्सम काही असे बालिश प्रश्न विचारू नयेत .ह्या लेखात लहासहान गोष्टी सुद्धा स्पष्ट केल्या आहेत त्या नीट वाचल्या तर  विचारायला  प्रश्नच उरणार नाहीत .

अस्मिता

वाचकांनी आपले अनुभव जरूर कळवावे .

antarnad18.blogspot.com
antarnad18@gmail.com










Monday, 17 May 2021

पंचप्राणाचे अधिष्ठान - शनी

 || श्री स्वामी समर्थ ||



आपल्या मनासारख्या घटना घडल्या नाहीत कि त्यासाठी कुठल्या ना कुठल्या ग्रहाला जबाबदार धरणे हा आपला स्वभावच आहे. आपली पत्रिका म्हणजे गत जन्माचा आरसा आहे. जे जे चांगले ते आपल्यामुळे आणि वाईट ते साडेसाती किंवा शनीमुळे हा गोड गैरसमज आहे. आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार ग्रह आपल्या पत्रिकेत स्थानबद्ध झाले आहेत, त्यांचे स्वागतही झाले पाहिजे आणि त्यांचा सन्मानही केला पाहिजे  .आपल्या कर्मानुसार त्यांनी त्यांचे आपल्या पत्रिकेतील स्थान ग्रहण केले आहे. त्यामुळे माझा शनी इथेच का आणि माझा शुक्र तिथेच का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले आणि चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच मिळतील.

आपण केलेल्या कर्माचा न्याय देणारा एकमेव न्यायाधीश म्हणजे शनी . शनी हा परखड आणि शिस्तबद्ध असणारा शिक्षक आहे. शनी अन्य कुठे नाही तर तो आपल्या आतच आहे. आपण आयुष्यात केलेल्या कर्माचा हिशोब तो ठेवतो आणि तुमच्या कर्माचा काय भोग असणार हेही तोच ठरवतो. म्हणूनच दशम स्थानात म्हणजेच कर्म स्थानात अधिराज्य गाजवणारा शनीच आहे. शनी हा वैराग्याचा कारक आहे आणि वैराग्याशिवाय मोक्ष नाही.

षष्ठ स्थान हे आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवसाय नोकरीचे आहे. तुम्ही कसे काम करता , कुठल्या मार्गाने पैसा मिळवता हे ह्या स्थानावरून समजते .काम प्रामाणिक पणे काम करता का , कुणावर अन्याय नाही ना करत , लक्ष्मी कशी आणता ? ह्याचे चित्र दशम स्थान दाखवते आणि त्याचा न्याय सुद्धा शनीच करतो .  काम चांगल असेल तर प्रशंसा , कौतुक होते , समाजाकडून प्रतिष्ठा , मान मिळतो आणि हे सर्व दशमाकडून मिळते . कर्म चांगले नसेल तर त्रास होतो रडतखडत आयुष्य पुढे जाते. 

शनी हा धार्मिक आहे, मोक्षाचे अधिष्ठान ठेवणारा आहे. शनी म्हणजे कायदा  , सुव्यवस्था आहे . शनी हा उत्तम शासक ,राजकारणी , बुद्धिमान , न्यायाने राज्य करणारा आहे . शनीला गलथानपणा आवडत नाही. चिकाटी हा त्याचा मुख्य गुण आहे तसेच निश्चयी काटेकोर स्वभाव हा त्याचा धर्म आहे. वृद्ध आहे पण नियमाला कडक आहे. ज्ञानाने समृद्ध आहे. अहंकाराने माजलेल्या प्रत्येकाला शनी त्याची जागा दाखवून देतो. 

लीनता आणि नम्रता हा शनीचा मुख्य गुणधर्म आहे . शनी आपल्या पंचप्राणाचा अधिष्ठाता आहे. योगशास्त्राचा प्रमुख ग्रह आहे. प्राणावर त्याचे एकट्याचे संपूर्ण अधिराज्य आहे. तुम्हाला किती श्वास द्यायचे  आणि तुमच्या प्राणाचे बटन कधी दाबायचे आणि तुम्हाला भोगातून कधी मुक्त करायचे हे ठरवणारा  शनीच असतो. 

आपण आपल्या कामात प्रामाणिक राहिलो , सचोटीने काम केले तर शनी महाराज आपल्याला त्रास देणारच नाहीत उलट आपल्या पाठीवर चांगल्या कामासाठी शाबासकी मिळेल ह्यात शंकाच नाही .

शनी सप्तम स्थानात दिग्बली होतो. रात्रीवर आणि पश्चिम दिशेवर त्याचे साम्राज्य आहे आणि तिथे तो समृद्धी करतो.  शनी स्वराशीत ,उच्च राशीत , मुलत्रिकोण राशीत नवमांशात उच्च आणि वर्गोत्तम होतो  तेव्हा 4 5 7 9 10 11 स्थानात आपले कर्तुत्व गाजवतो ,समृद्ध करतो. केंद्रात शश योगात येतो तेव्हा राजकारणात अचानक उच्चीचे स्थान देतो. पण तिथे कर्म जर नीच केले तर तोच शनी खालच्या पातळीवर नेतो कारण जसे कर्म तसे फळ.

शनी 1 5 9 ह्या स्थानात उत्कर्षाने बुद्धी वाढवतो . केंद्र आणि त्रिकोणात अधिक फळतो .उपचय स्थानात शनी चांगली फळे देतो . असे जातक चिकाटीचे संशोधक असतात , कठोर तपश्चर्या करून थोर तत्वचिंतक होतात .

ज्याची त्याची जागा त्याला दाखवून कसलीही माफी न देणारा शनी हा खरच वंदनीय आहे. शनी द्वितीयात आला तर त्याला त्याच्या कर्माची संपूर्ण शिक्षा भोगल्याशिवाय मरण देणार नाही. शनी हा उत्तम शिक्षक , साधू , शासक , न्यायाधीश आहे आणि त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे. 

मोक्षत्रिकोणात शनी उत्तम फळतो .वैराग्य साधेपणा अध्यात्म ह्यांचा आनंदयात्री असलेला हा शनी अष्टमात आला तर दीर्घायुष्य देतो. व्यय स्थानातील शनी अध्यात्मिक उंची देतो . 

पत्रिकेत ग्रह आपल्या पूर्व कर्मानुसार आले आहेत त्यांचा संदेश ऐकायला शिकले पाहिजे .हे सर्व ग्रह एकमेकांच्या साथीनेच आपली पत्रिका संतुलित करत असतात , देवाने सर्वाना सगळे दिले असते तर त्याची किंमतच राहिली नसती नाही का?  त्यामुळे आळस झटका आणि कामाला लागा . कुठलेही काम कमी समजू नका आणि कुणालाही कमी लेखू नका.

असा हा शनी २३ मे ते ११ ऑक्टोबर, २०२१ ह्या काळात वक्री होत आहे. शनी जेव्हा वक्री असतो तेव्हा त्याच्या कारक गोष्टीना चालना देत नाही . अश्यावेळी मनुष्याला कुठलाही निर्णय घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि असुरक्षित वाटते . त्याची परिणीती म्हणजे मनुष्य चुकीच्या मार्गाने जातो आणि त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात . आपल्या पत्रिकेत शनी ज्या स्थानात वक्री होत आहे त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टीमध्ये विलंब ,त्रास होतो . षष्ठात वक्री झाला तर आजारपण अनेक दिवस राहते. अष्टमात असेल तर मनस्ताप , डोक्याला विकतची दुखणी होतात , व्यय स्थानात बंधन योग देतो. 

शनी वक्री असताना प्रत्येक कामात अडथळे येतात . बांधकाम क्षेत्रात प्रगती खुंटते, अडचणी येतात  . अधिक कष्ट करायला लागतात . शनीची साडेसाती आणि महादशा असलेल्यांनी सतर्क राहणे आणि उपासना करणे उत्तम .

तर भल्या भल्यांची झोप उडवणारे शनी महाराज २३ मे रोजी वक्री होत आहेत. ह्या काळात आपण जास्तीतजास्त उपासना करून त्यांच्या कृपाप्रसादास पात्र होवुया .

खालील उपासना नक्कीच लाभदायक होतील.

१.प्रत्येक शनिवारी शनी महात्म वाचणे.

२.शनीचा मंत्र “ ओं शं शनैश्चराय नमः ” ह्या मंत्राचा जप –जपसंख्या 23000. हा जप संकल्प करून म्हणायचा आहे. 

३.हनुमान चालीसा नित्य पठण.

४.मारुती स्तोत्र नित्य पठण.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे लीनता आणि नम्रता . जो जो अहंकार करेल त्याला शनी दंड देतो आणि  पळता भुई थोडी करतो. त्यामुळे अहंकाराला तिलांजली देवून लव्हाळ्या सारखे जगणे नक्कीच लाभदायक ठरेल.  समर्पणाची भावना मनात ठेवून नामस्मरण केले तर शनी सारखा दाता नाही.

अस्मिता

antarnad18.blogspot.com





 



Thursday, 13 May 2021

मे महिन्यातील " KP / विवाह " कार्यशाळा

||  श्री स्वामी समर्थ || 





मे महिन्यातील " KP / विवाह " ह्या कार्यशाळा हसत खेळत झाली . पत्रिका मिलन करताना ग्रहमिलन आणि गुण मिलन म्हणजे काय  ह्याचा  सखोल अभ्यास  केला  ह्याचा मनापासून  आनंद आहे. तुम्हा सर्वाची पुढील आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होवूदे आणि ह्या शास्त्राची तुम्हा सर्वांकडून सेवा होवूदे हीच सदिच्छा .

अस्मिता
antarnad18@gmail.com




अक्षय आनंद

 ||श्री स्वामी समर्थ ||




वैशाख शु.३ म्हणजेच अक्षय तृतीया हा वऱ्हाड प्रांतातील  मोठा सण . संतानी समाज सुधारण्यासाठी मनुष्यरूपी देह धारण करून असंख्य लीला केल्या आणि जीवन कसे जगावे ह्याचा जणू धडा गिरवायला शिकवला. असेच सिध्दकोटीला पोहोचलेले महापुरुष संत शिरोमणी श्री गजानन महाराज ह्यांनी विदर्भातील शेगाव येथे वास्तव्य करून ती भूमी खर्या अर्थाने पावन केली . श्री दासगणू महाराजांनी  “श्री गजानन विजय हा प्रासादिक ग्रंथ”  हि मोलाची शिदोरी भक्तांच्या हाती सुपूर्द केली. ह्या ग्रंथाच्या नित्य पारायणाने महाराजांची सेवा करून आपला जन्म सार्थकी लावा हेच जणू  त्यांना सुचवायचे असावे . 

श्री गजानन विजय ग्रंथात महाराजांनी केलेल्या असंख्य लीलांचे यथार्थ वर्णन आहे. श्री गजानन विजय ह्या ग्रंथातील अध्याय क्र. 4 मधील जानकीराम सोनाराची गोष्ट सर्वश्रुत आहेच. महाराज हे अवलिया महापुरुष होते . त्यांना  चिलीम पेटवण्यासाठी कुणाचीही गरज नव्हती पण तरीही त्यांनी आपल्या चिमुकल्या भक्तांना जानकीरामाकडे विस्तव आणण्यासाठी धाडले पण त्याने विस्तव द्यायचे नाकारले आणि ह्या श्रेष्ठ संताचा अपमान होयील असे शब्द त्याच्या मुखातून गेले. 

महाराजांनी त्यांचा परमभक्त बंकटलाल ह्यास  चिलीम पेटविण्यासाठी त्यावर नुसती काडी धरण्याचा आदेश दिला आणि चिलीम पेटली हीच त्यांची खरी लीला. जानकीरामाचे चिंचवणे नासले त्यात किडे पडले तेव्हा त्याचे डोळे खाडकन उघडले आणि तो महाराजांना  शरण गेला. अश्या असंख्य लीला करून महाराजांनी आपल्याला जीवनाचे सार समजावून सांगितले आहे.

माणूस अहंकाराने उत्मत्त झाला कि त्याचा विनाश जवळ आलाच म्हणून समजायचा . आज २१ व्या शतकात  अध्यात्माची खरी गरज तरुणपिढीला आहे. आज आपण अत्यंत तणावपूर्ण आयुष्य जगत आहोत . आपणच आपल्या गरजा वाढवल्या  आहेत आणि त्या पूर्ण करताना आता आपली पुरती दमछाक होते आहे. पण हे करत असताना काही क्षण गुरुपदी विश्रांती घेत नामस्मरण केले तर जीवन सुकर ,सुसह्य होयील .

ह्या मार्गावर सहज काहीच नाही पण जे आहे ते निर्भेळ आनंद देणारे आहे. महाराज परीक्षाही घेतात पण एकदा त्यांच्या परीक्षेत पास झालो कि मग जीवन खर्या अर्थाने समृद्ध होते .

आपण आपला अहंकार सोडत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती नाही हे नक्की . आपल्याला सेवा करायला नको आपल्याला महाराज व्हायचे असते .जप केला , एखादे पारायण केले तर महाराजांवर जणू उपकारच केले अश्या अविर्भावात आपण असतो .आपल्या प्रत्येक वाक्याची सुरवात “ मी ” पासून असते .पण असे झाले तर आपला विठोबा घाटोळ होतो हे ध्यानी असले पाहिजे.

म्हणूनच ह्या “ मी “ म्हणजेच अहंकाराला तिलांजली देवून श्वासागणिक महाराजांचे नामस्मरण करणे हेच सद्गुरुना अभिप्रेत आहे . ज्या क्षणी अहंकार दूर झाला तर त्याच सद्गुरुप्राप्ती नक्कीच होईल . कुठल्याही संकटाची तमा न बाळगता “  संतांच्या जे असेल  मनी तेते येयील घडोनी भरवसा त्यांच्या चरणी ठेवून स्वस्थ राहावे.” ह्या उक्तीवर अखंड श्रद्धा असली पाहिजे .

आनंदाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात . लहान मुले निर्मळ मनाची असतात ,जगाचे खरे रूप त्यांनी बघितलेले नसते त्यामुळे त्यांना हवा असेलेला खाऊ , एखादे खेळणे हा त्यांच्यासाठी स्वर्गीय आनंद असतो.  रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणात लहान सहान आनंद दडलेले आहेत पण आपण फार मोठ्या गोष्टींच्या उगीचच मागे लागून ह्या सहजसुंदर  आनंद देणाऱ्या क्षणांना पारखे होतो. हे आनंद ज्यांना अनुभवता येतात त्यांना जीवन सर्वांगसुंदर वाटते आणि ज्यांना ह्याचा आस्वाद घेणे जमत नाही त्यांना तेच जीवन निरस वाटते .

भौतिक सुखाच्या मागे धावणारा धावतच राहतो ,ठरवून सुद्धा मग त्याला थांबता येत नाही . महाराजांनी सांगितले आहे किती जमवशील आणि कश्यासाठी ? हे म्हणजे अग्नीत तुपाची धार . कुठल्याही गोष्टीचे जितके स्तोम वाढवू तितके कमीच आहे. 

जीवनातील आनंद हा शोधता आला पाहिजे आणि मिळाला तर उपभोगता आला पाहिजे. ज्यांना प्रपंच करताना परमार्थाची गोडी लागली त्यांनी ह्या आनंदाची अवीट गोडी नक्कीच चाखली आहे.

आनंद हा देता आणि घेताही आला पाहिजे. जो देतो त्यालाच मिळते म्हणून द्यायलाही शिकले पाहिजे. मुंबई मध्ये पूरग्रस्त परिथिती झाली ,कधी कुठलीही तत्सम घटना घडली तर असंख्य मदतीचे हात धावून येतात .हि मदत  अपेक्षा विरहीत असते पण त्यातून कश्यातच मोजता येणार नाही अशी आनंद प्राप्ती होते.  पारमार्थिक जीवनात उच्च कोटीचा असीम आनंद आहे. सद्गुरूंच्या चरणाशी आपण आहोत हि कल्पना सुद्धा आनंद देणारी आहे. त्यांचे आपल्या जीवनातील अस्तित्व , त्यांचे आपल्या सोबतचे असणे हे आनंददायी आहे .

अध्यात्माच्या वाटेवर अक्षय आनंद आहे आणि तो लुटण्याची मजा ज्याने अनुभवली आहे त्याला जीवनात आत्यंतिक समाधान लाभले आहे. संतानी समाजसुधारणे साठी मोठे योगदान दिले आपण निदान खारीचा वाटा तरी उचलुया .निदान एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद येयील ह्यासाठी प्रयत्न करुया.

महाराजांना काहीच नको आहे त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील खरा भाव.  ह्या अध्यात्मरूपी नौकेत एकदा बसलो कि जीवन आनंदात पार झालेच म्हणून समजा .मग आनंदाचे डोही आनंद तरंग अशी जणू आपल्या मनाची अवस्था होते .ह्या जीवनात काहीच शाश्वत नाही त्यामुळे कश्यातही गुंतून न राहता आनंदाचे क्षण वेचत जगणे हे केव्हाही चांगलेच . 

म्हणूनच म्हंटले आहे कि अध्यात्म हि जगण्याची कला आहे. आज अक्षय तृतीया . अक्षय म्हणजे अखंड . चला तर मग आज ह्या शुभदिनी महाराजांच्या सेवेत रुजू होवून गुरु सेवेचा अक्षय आनंद लुटुया . सद्गुरुसेवा हाच मोक्षाचा अंतिम मार्ग आहे. 

आपल्या सर्वांच्या जीवनातील आनंद “ अक्षय “ राहूदे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना .

अस्मिता

antarnad18.blogspot.com




.