Sunday, 13 October 2024

विश्वासपात्र

 || श्री स्वामी समर्थ ||


मंडळी ज्योतिष हे प्रत्येकाने शिकावे निदान आपल्या पत्रिका समजून घ्या अशी आज कळकळीची विनंती करावीशी वाटते , ज्यांना ह्या शास्त्रावर विश्वास नाही त्यांच्यासाठी हि पोस्ट नाही आहे . असो. शास्त्र मानणाऱ्या सर्वानीच हा जळजळीत डोळ्यात अंजन घालणारा अनुभव नक्की वाचवा आणि त्यावरून बोधही घ्यावा .

मध्यंतरी एक पत्रिका पाहिली. आईचा किती विश्वास मुलावर . आईच्या पत्रिकेत दशा स्वामी राहूच्या नक्षत्रात आणि पंचमेश सुद्धा राहूच्या नक्षत्रात . दशा स्वामी स्वतः बाधकेश. अन्य ग्रहस्थिती इथे देता येणार नाही पण मुख्य मुद्दा राहू आणि फसवणूक करणारी संतती हाच आहे . असो जिथे जिथे राहू येतो तिथे साधे सोपे काम नसते. राहू आपल्याही नकळत आपला सापळा रचत असतो .  प्रत्येक आईसाठी आपली मुले हे विश्व असते त्यामुळे आपलीच मुले आपल्याला फसवतील हे स्वप्नात सुद्धा येत नाही पालकांच्या किबहुना त्या दृष्टीने विचार करण्याची त्यांची बुद्धीच नसते आणि इच्छाही .  मुलगा पन्नाशीला आला तरी आईसाठी तो बाबूच असतो आणि अजूनही पाळण्यातच असतो. मुलाने आईच्या लाखो रुपयाची हातसफाई कधी केली कुणालाही समजले नाही. आता ते पैसे गेले परत मिळणे कठीण . पण त्या हि पेक्षा गेला तो विश्वास . 

आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आपण आयुष्य पणाला लावतो , आपल्याला जे मिळाले नाही ते त्यांना मिळावे , कश्याचीही कमतरता त्यांना भासू नये म्हणून दोन दोन नोकर्या करून मुलांची फी भरणारे लोक मी पहिले आहेत . पण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा मुलेच आपली अश्या वागण्यातून परतफेड करतात तेव्हा वाटते , कुठे चुकले आपले? कुठले संस्कार करण्यात कमी पडलो आपण ? आणि ह्या अश्या स्थितीतून बाहेर पडायला वेळ लागतो पण त्याही पेक्षा गेलेला विश्वास पुन्हा मिळत नाही त्याचा धक्का मोठा असतो. सांगणार कुणाला ? तोंड दाबून मुक्याचा मार अशी गत होते .

लक्ष्मी अशीच येत नाही , अथक परिश्रम करावे लागतात , पै पै साठवताना नाकी नौ येतात आणि अश्या घटना आपल्याला निराशेच्या गर्तेत नेतात .त्यांना सांगितले सर्व कागदपत्रे सांभाळ आणि ह्यापुढे  तुमच्या सही शिवाय अन्य कुणीही एकही पैसा काढणार नाही ह्याची खबरदारी घ्या . इथे राहू असल्यामुळे नेट ट्रान्स्फर करून पैसे गेले हे वेगळे सांगायला नको. 

मुलांवर आंधळे प्रेम करू नका. जेवायचे ताट द्या पण बसायचा पाट देवू नका. आपले सर्व हक्क आपल्याकडेच ठेवा . मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत आपण आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात उभे राहण्याइतपत मदत , शिक्षण काय दिले नाही आपण . आता पुढचे त्यांनी बघायचे . आपण हयात आहोत तोवर सर्व आपले मग गेल्यावर त्यांचेच आहेत .आज मुलांना अनेक प्रलोभने सुद्धा आहेत , लाखात पगार आणि शो ऑफ करण्यासाठी अवलंबलेली महागडी जीवन शैली हि त्याची कारणे असावीत . आमच्या मागील पिढ्या जगल्याच कि त्या कुठे गेल्या होत्या उठसुठ पिझ्झा खायला. असो  ह्या सर्वातून निर्माण होणारी अनिश्चितता , निराशा आणि त्यातून म्हातारपणी निर्माण होणारी विकतची आजारपणे. ह्यात दोष आपलाच आहे. आजूबाजूच्या घटना माहित असूनही आपण डोळे उघडत नाही , मायेचा पूर येतो आणि विश्वास ठेवतो . हा विश्वासच पुढे जावून आपल्या उरलेल्या आयुष्याचे तीन तेरा वाजवतो. 

अनेक लोक ह्या शास्त्राला नावे ठेवतात , ठेवू देत , नावे ठेवल्यामुळे शास्त्राचे महत्व कमी अजिबात होणार नाही. पण त्या पेक्षा आपल्या आणि मुलांच्या येणाऱ्या सुना जावई घरातील सर्वांच्या पत्रिका समजून घेतल्यात तर आयुष्यात पुढे येणाऱ्या वळणांवर काय काय वाढून ठेवले आहे ह्याचा अंदाज नक्कीच येयील आणि त्याप्रमाणे वागता सुद्धा येयील. 

राहू हा क्षणाचाही विलंब देत नाही . भल्याभल्यांची झोप उडवतो तीही क्षणात . आपण फसले गेलो आहोत हे व्यक्तीला समजत सुद्धा नाही कारण आपल्या कित्येक पट हुशार राहू आहे. तो आपल्याला बरोबर हेरतो .  आजकाल सर्रास वापरल्या जाणार्या नेट बँकिंग, इंटरनेट टेक्नोलॉजी , gpay , मोबाईल बँकिंग ह्या अत्याधुनिक युगातील सोयी हा राहुचाच पिंजरा आहे त्याचा वापर सांभाळून केला पाहिजे . राहू हि अदृश्य शक्ती आहे जी दिसत नाही म्हणून बँकेच्या एका खात्यातून पैसे दुसर्या खात्यात जातात पण ते आपल्याला दिसत नाही हाच राहू . राहूच्या दशेत समाजात कमी वावर आवश्यक तेच बोला , फालतू बडबड टाळा. लोक आपला वापर करून घेतात आणि फेकून देतात . आपण वापरले गेलो आहोत ह्याचा त्रास पुढे राहू दशा संपेपर्यंत होत राहतो . म्हणून जेव्हड्यास तेव्हडे अगदी सर्वांशी . राहू अदृश्य शक्ती असल्यामुळे आपले कोण आणि परके कोण हे आपल्याला समजत नाही. नक्की कोण आपल्याला फसवत आहे ते तर अजिबात समजत नाही . आपली सगळी अक्कल हुशारी पणाला लावली तरी राहू समोर निभाव लागत नाही . शब्दांच्या कोत्या करणारे , स्वतःला लई हुशार समजणारे सुद्धा राहूच्या विळख्यात अलगद सापडतात इतका राहू सामान्य व्यक्तीच्या अवकलनाच्या पुढे आहे. ज्योतिष अभ्यासकांनी लग्नातील राहूचा विशेष अभ्यास करावा कारण लग्नात आपला मेंदू आहे जो विचार करतो. 

कुठलेही आईवडील मुलांना म्हातारपणी आम्हाला फसवं असे बाळकडू पाजत नाहीत पण फसवले जावू नये म्हणून आपल्या संपत्तीची काटेकोर व्यवस्था करताना दिसत नाहीत , इथेच चुकते . शास्त्राच्या माध्यमातून आपण शहाणे व्हावे आणि इतरानाही शहाणे करावे तसेच विश्वास पात्र कोण आहे हे तपासून पुढे जावे  ह्या उदात्त हेतूने आपल्यासमोर मांडलेला हा लेखन प्रपंच .  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




Wednesday, 9 October 2024

Online कार्यशाळा

 || श्री स्वामी समर्थ ||



नमस्कार ,

“ हसत खेळत ज्योतिष शिकूया “ हि कार्यशाळा आता पूर्णतः  Online होते आहे. ह्या कार्यशाळेत आपण ज्योतिषाची परिभाषा , ग्रह , राशी , भाव , महादशा , साडेसाती , पंचांग अश्या विविध भागांना स्पर्श करणार आहोत तसेच ह्या कार्यशाळेत  आपण पत्रिका तयार करायला सुद्धा शिकणार आहोत .

ह्या कार्यशाळेचे वैशिष्ठ असे आहे कि तुम्हाला ह्या कार्यशाळेच्या सर्व  रेकॉर्डेड लिंक पाठवल्या जातील ज्या तुम्ही कार्यशाळेत प्रवेश घेतल्यापासून महिनाभरात  असंख्य वेळा बघू शकता . ह्यासोबत तुम्हाला ह्या सर्व विषयाच्या Notes ची pdf सुद्धा मिळणार आहे. ज्यांना ज्योतिष अगदी सुरवातीपासून शिकायचे आहे पण अनेकदा अमुक एक वेळ देता येत नसेल त्यांच्यासाठी हि Online कार्यशाळा उपयुक्त ठरेल कारण ह्यात वेळेची दिवसाची बांधिलकी नाही. महिनाभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे सर्व video पुन्हा पुन्हा बघू शकता आणि अभ्यास करू शकता . 

आज अष्टमीला आई महालक्ष्मीला तसेच  गुरु श्री गजानन महाराज , श्री स्वामी समर्थ ह्यांना वंदन करून ह्या Online कार्यशाळेचा “ Online  उपक्रम “  सुरु करताना अत्यानंद होत आहे. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी मला अनेकांनी मदत केली आहे त्या सर्वांचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार .

आजवर माझ्या सर्वच कार्यशाळा आणि लेखांना आपण उत्तम प्रतिसाद देऊन मला प्रोत्चाहन दिलेत तसेच पुढेही देत रहाल   अशी आशा करते . आपले आशीर्वाद आणि त्याचसोबत सूचना स्वागतार्ह आहेत. 

ज्यांना ह्या Online कार्यशाळेत प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी पुढील माहितीसाठी 8104639230 ह्या whatsapp क्रमांकावर संपर्क साधावा .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क :  8104639230


Saturday, 5 October 2024

गोष्ट एका कुटुंबाची

 || श्री स्वामी समर्थ ||

काही दिवसापूर्वी एका व्यक्तीची पत्रिका पाहिली. अत्यंत त्रासातून ते जात होते ते समजत होते , व्यवसायात तोटा , कर्ज त्यामुळे तसाही तब्येतीवर परिणाम झालेलाच होता , जीवनात कसलाच उत्साह राहिला नव्हता आणि पुढे काय करावे हा मोठा प्रश्न होता . थोडक्यात गलितमात्र अशी स्थिती झाली होती . पण त्याही पेक्षा मोठा मानसिक धक्का त्यांना बसला होता तो त्यांच्या कुटुंबातून , घरातील मंडळीत एकमेकात वाढत चालणारा तिढा , त्यामुळे निर्माण झालेला अबोला आणि सगळ्यात मुख्य म्हणजे टुकार गैरसमजामुळे संपुष्टात येवू पाहणारे नातेसंबंध. 


ज्या काका आत्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो , भावंडांच्या सोबत लहानाचे मोठे झालो त्यांच्यात शुल्लक कारणाहून झालेले गैरसमज ह्यांनी रौद्र रूप धारण केले होते . हा गैरसमज आहे आणि तो दूर होवू शकतो पण तो करणार कोण ? आणि कसा ? कारण समोरच्या व्यक्ती विचारांच्या पलीकडे गेलेल्या आणि समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या . आयुष्यभर एकत्र असणार्या व्यक्तींची साधारण पणे आपल्याला थोडीतरी ओळख असतेच किबहुना तेच अपेक्षित आहे पण नाही , कुणीतरी काहीतरी बिनबुडाचे सांगायला आणि डोक्यात तेच खूळ धरून बसायला एकाच गाठ पडली , आता ती कुणी मारली ??????आपल्या लक्ष्यात आलेच असेल एव्हाना .

त्या व्यक्तीच्या वडिलांच्या काका आणि भावंडांच्या त्यांना माहित असलेल्या जन्म तपशिलावरून अभ्यासाला सुरवात केली . ह्या सर्व घटना ज्यातून निव्वळ गैरसमज निर्माण होवून नाते संबंध बिघडवणारा राहू खलनायक म्हणून उभा होता . कुणाच्या पत्रिकेत राह्ची दशा तर कुणाच्या अंतर दशा , कुणाचा दशा स्वामी राहूच्या नक्षत्रात तर कुणाला त्यात भर म्हणून साडेसाती , कुणाचे सोबत अष्टम भाव लागलेले तर कुणाच्या लग्नात कुटुंब भावात राहू . थोडक्यात संपूर्ण कुटुंब राहूच्या विळख्यात सापडलेले होते . आयुष्यभर अगदी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरणारे आणि एकत्र सणवार साजरे करणारे कुटुंब विखुरले होते , मन सैरभैर झाली होती.  राहूचा तांडव सुरु झाला कि तो आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ देत नाही अगदी क्षणभर सुद्धा . आपली खेळी राहुने ह्या कुटुंबात बरोबर खेळली होती . भास आभासाच्या खेळात आपण होतो ते फक्त राहूच्या हातातील मोहरे , काय चूक काय बरोबर हे समजून घेण्याची विचारशक्ती जणू खुंटलेली असते . हृदयाच्या समीप असलेली आपली माणसे क्षणात परकी होवून जातात . अगदी एकमेकांची तोंडे पहावीशी वाटत नाही इतकी असुया , मत्सर , द्वेष कसा काय निर्माण होतो माहित नाही पण होतो हे खरे आहे. नाही माझा भाऊ माझे बाबा असे करणारच नाहीत हा विचार क्षणभर सुद्धा मनाला स्पर्शून जावू नये म्हणजे राहू मनावर किती हाबी होत असेल त्याची कल्पना येते. 


प्रचंड बलवान ताकदवान आणि षड्यंत्र रचणाऱ्या राहुने आपले काम फत्ते केले आहे हे मला सगळ्या पत्रिकांचा अभ्यास केल्यावर जाणवले. काही गोष्टीना काळ आणि वेळ हेच औषध असते , पण राहुने दिलेल्या जखमा पूर्ण बर्या होण्याची शक्यता कमी असते , एकदा तुटले कि पुन्हा सांधणे कठीण जाते आणि पाहिल्यासारखे तर नाहीच नाही , ह्या काळात एकमेकांशी अबोला असतो कारण बोलण्याने गैरसमज दूर होईल म्हणून राहू तशी स्थिती तयारच होवू देत नाही . असो वडिलोपार्जित संपत्ती हासुद्धा अनेकदा ह्या सर्व घटनामागील  प्रमुख विषय असू शकतो . राहू आपल्या पूर्वजांचा कारक आहे आणि कुणाचे काही शाप किंवा तळतळाट आपल्याला भोगायचे असतील तर त्यापासून आपली सुटका नाही . ते आपले संचित म्हणावे लागेल.  आपले सद्गुरू दिशा दाखवतील , नामस्मरणामुळे हे सर्व सहन करण्याची ताकद सुद्धा देतील पण ह्या गोष्टीत दखल मात्र देणार नाहीत कारण काही गोष्टी भोगूनच संपवायच्या असतात . 

राहूची महादशा ज्यांनी भोगली आहे त्यांना विचार त्यांचे अनुभव जवळपास असेच असतील. कुणी विश्वास सुद्धा ठेवत नाहीत , भयाण शांतता , न संपणारा भयाण काळोख आणि एकटेपणा चा अनुभव प्रखरतेने देणारी राहूची दशा हा आयुष्यातील सर्वात मोठा उतारावर नेणारा काळ असतो .

कुटुंबाला विभक्त करणारा राहू , कुटुंबियांना एकत्र येवूच देत नाही , एकमेकांची भेट सुद्धा होत नाही , ह्या आधी वाटणारे प्रेम आपुलकी जणूकाही नष्ट झाल्यासारखेच वातावरण निर्माण होते . उरतो तो फक्त द्वेष आणि मत्सर , एकमेकांच्या शिवाय न करमणारी मंडळी एकमेकांना पाण्यात पाहू लागतात , नाते संबंध बिघडतात , मेसेज फोन येणेजाणे , संवाद लयाला जातो. पूर्वीसारखे कुटुंब हस्ते खेळते होणार नाही ह्याची कल्पना मी त्यांना दिली तेव्हा त्यांना अक्षरशः गहिवरून आले पण मागे वळून बघू नका आता पुढे जात राहा हाच सल्ला मी त्यांना दिला. कारण जितके त्या आठवणीत रुळला तितका मानसिक त्रास अधिक होयील . संपूर्ण राहूच्या दशेत माणसाच्या मनावर आणि अंतर्मनावर राहुचाच पगडा असतो , भयभीत होणे , फोबिया , मानसिकता उध्वस्त होणे , माणुसकीवरचा विश्वास उडणे ह्या गोष्टी घडवणे हि राहूची शस्त्रात्रे आहेत . राहू विचार करायला वेळ देत नाही , गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतात मती गुंग होते पण आपण हतबल होतो . निराशेच्या गर्तेत ठेवणारा हा राहू आपल्याबद्दल इतरांच्या मनात गैरसमज करून देण्यात माहीर आहे . म्हणूनच राहूच्या दशेत व्यक्तीने अधिक बोलूच नये , कारण त्यातूनच शब्दांचे खेळ आणि गैरसमज होतात . भयानक स्वप्ने , आभासी जगतात वावरल्याचा भास , वाईट गोष्टींची छाया , मनावरचे लाख मणाचे ओझे घेवून राहूची दशा पार करावी लागते . राहूची जशी वाईट बाजू आहे तशी चांगली सुद्धा आहे, तीर्थयात्रा , अध्यात्मिक प्रगती , गूढ शास्त्र शिकण्यात प्रगती , रिसर्च , Phd तत्सम उच्च शिक्षण होते . 

दिशाहीन होणे , एक प्रकारचे मनावर असणारे दडपण , अनामिक भीती आणि त्यातून आलेले वैफल्य , प्रत्येक गोष्टीत असणारी साशंकता , आयुष्यातील एकूणच अस्थिरता, देवावरचा उडत चाललेला विश्वास , पैशाच्या अडचणी , व्यवसायाचे वाजलेले बारा , दिवाळखोरी , फसवणूक , आपले म्हणणारे सोडून गेल्यामुळे आलेली निराशा वैफल्य , नात्यात पडलेल्या भेगा , मित्रांमध्ये होणारे गैरसमज आणि तुटलेली नाती हे सर्व डोळ्याने नुसते पाहत राहणे ह्यापलीकडे काहीही करू न शकणारे आपण . आपल्या बद्दल इतरांचे गैरसमज नेमके कश्यामुळे झाले आहेत ? आपली चूक तरी काय हे सुद्धा आपल्याला समजत नाही . 


हे भोग नाहीतर अजून काय . म्हणून सांगावेसे वाटते . आपली आधुनिकता आणि आधुनिक विचार सारणी ह्याचा उपयोग नको तिथे नको. पितृपक्षात आपल्या पितरांचे यथायोग्य सर्व दान धर्म करावे पान भोजन ठेवावे. नको त्या फ्याशन चे किडे डोक्यात वळवळू देवू नका. आपल्या शास्त्र रूढी परंपरा योग्यच आहेत आणि त्यांचा सन्मान करणे आपले परमकर्तव्य आहे . खोट्या आधुनिक विचारांचा बुरखा घालून ह्या परंपरांना बगल देवू नका . शिक्षण आपल्याला विचारी संयमित  करते , अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारे ज्ञान आपल्या हृदयाच्या आणि मेंदुच्याही कक्षा विशाल करत नसेल तर कुठेतरी काहीतरी चुकत आहे असेच म्हंटले पाहिजे. ज्याने आपल्याला जन्माला घातलाय त्यालाच अक्कल शिकवायला निघालो आहोत आपण म्हणून नको ती बुद्धी होते आहे आपल्याला.  असो.  

असो ह्या कुटुंबातील असलेल्या ह्या पितृदोषाने अनेकांना कह्यात घेतले होते तेही एकाच वेळी , राहूची मनावरील पकड  मजबूत होती . आता त्यातून मार्ग काय तर भोग भोगा आणि मुक्त व्हा .काहीही झाले तर आपल्या गुरूंच्या चरणाशी वाहिलेल्या निष्ठा त्याबद्दल शंका न घेता अविरत सेवेत राहणे हाच सर्वोत्तम उपाय .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Wednesday, 2 October 2024

स्थिरता

|| श्री स्वामी समर्थ ||


मनाचा कारक चंद्रमा जो अत्यंत चंचल आहे. एका जागी थांबणे जणू त्याला आवडतच नाही , आकाशात मुक्त विहार करत दुडूदुडू धावत महिनाभरात सर्व राशीतून तो प्रवास करत असतो . मन स्थिर नसेल तर बुद्धीही स्थिर राहणार नाही  आणि बुद्धी अस्थिर झाली तर सर्व कठीणच होईल . 

मन स्थिर नसलेली लोक क्षणात निर्णय बदलत राहतात , हे करू कि ते करू . कुठल्याही एका निर्णयावर स्थिर राहणार नाहीत किबहुना निर्णयक्षम नसतात . अस्थिर मनोवृत्ती बिघडलेल्या चंद्राचे प्रतिबिंब आहे. मग बसल्या जागी सतत पाय हलवत राहणे , सतत काहीतरी हातवारे करणे. एका जागी शांत बसणारच नाहीत .

अश्या मुलांना किंवा व्यक्तींनी ध्यान धारणा करावी , अर्थात ध्यानासाठी  मुळात तयारच होणार नाहीत . पण ध्यान जसजसे करत जातील अगदी एखादा मिनिट बसली सुरवातीला तरी चालेल . पण त्याने त्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल . योगाभ्यास हा मनाच्या एकाग्रतेसाठी रामबाण उपाय आहे .


निर्णयक्षमता नसल्यामुळे किंवा मनाची चंचल अवस्था मग आयुष्यात अपेक्षित यश मिळवू शकणार नाही आणि मग त्यातून निर्माण होणारे वैफल्य आणि पुढे सर्वच चुकत जाते .  चंद्राला अस्थिर करणारा ग्रह बुध , ह्या दोघांचे प्रतियोग , युती चंचलता वाढवणारी असते . 


शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत आहे आणि आपण घरोघरी महालक्ष्मीचे स्वागत करत आहोत . लक्ष्मी सुद्धा चंचल आहे . तिला स्थिर करण्याचे काम महाविष्णूच करू शकतात . पण आपण तिला आवाहन करून तिचे पूजन करत असताना आपलेही मन अस्थिर चंचल असेल तर आपण तरी शांत चित्ताने पूजन कसे करणार . आपणच चंचल असू तर लक्ष्मी तरी स्थिर कशी होईल ? म्हणूनच पुढील ९ दिवस सर्व चित्त एकवटून एकाग्र होवून महालक्ष्मीच्या चरणाशी आपले मन एकाग्र करुया , माझे मन तुझ्याच चरणाशी  स्थिर कर अशी तिला प्रार्थना करुया , आपले मन , विचार स्थिर झाले तर आयुष्य सुद्धा लयबद्ध होईल आणि लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे स्थिरावेल. 

आज हा विचार आपल्यासमोर मांडताना माझेही मन तिच्याच चरणाशी स्थिरावत आहे.

सर्वाना शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेछ्या . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230