Monday, 21 October 2024

“ आर्थिक सुबत्ता “ हाच पसंतीचा प्राथमिक निकष

 || श्री स्वामी समर्थ ||



विवाह जुळवताना वधू आणि वर ह्या दोघांच्या पत्रिका बघाव्या लागतात ..त्यात गुणमिलन हि पारंपारिक पद्धती डावलून चालत नाही पण फक्त गुणमिलनावर पत्रिकेचा निकष न काढता ग्रह मिलन , दशा , इतर ग्रहस्थिती ह्यांचाही विचार करावाच लागतो.. दशा स्वामीला डावलून पत्रिका मिलन करणे अत्यंत धोक्याचे ठरते .


दोघांच्याही पत्रिकांचा विचार करताना दोघांची विचारसरणी एकमेकांशी जुळणार कि नाही ते पाहण्यासाठी दोघांचे लग्न , लग्नेश तसेच मनाचा कारक चंद्र पाहावा. 


लग्न हे उर्वरित आयुष्यात दोघानाही सुख प्रदान करणारे आहे का ? त्यांना संतती होईल का? वंशवेल वाढेल का ? आर्थिक स्थैर्य मिळेल का ? , संसारातील गोडवा जपला जायील का? संसारातील कुरबुरी , चढउतार , अचानक उद्भवणाऱ्या संकटाना दोघेही एकत्रित पणे सामोरे जातील का? थोडक्यात दोघानाही  मानसिक , वैचारिक क्षमता आहे का? आयुष्यमर्यादा , उधळपट्टी करण्याची वृत्ती आहे कि  संचय करण्याची वृत्ती अनेक पेहलू अभ्यासावे लागतात . थोडक्यात पुढील 25-30 वर्षाचे वैवाहिक सौख्य कसे असणार आहे ह्याचा मागोवा घ्यावा लागतो .वैचारिक , आर्थिक , मानसिक क्षमता त्याचसोबत लैंगिक क्षमताही महत्वाची आहे. 


अनेकदा पत्रिकात मंगळ आहे म्हणून अनेक चांगली स्थळे हातातून निसटून जातात . पृथ्वीवरच्या 90% लोकांमध्ये मांगलिक दोष असू शकतो मग त्यांनी लग्न करायची नाही का? शास्त्रात त्यावर अनेक उप गोष्टी सुचवल्या आहेत . मंगळ क्षीण आहे का , कुज दोषात आहे का? हे सर्व न बघताच फक्त मंगळाची पत्रिका म्हणून नकार घंटा वाजवण्यात अर्थ नाही . मंगळा च्या पत्रिकांचे उगीच स्तोम करू नये .


पत्रिकेतील प्रत्येक ग्रहाचे नवमांश बळ सुद्धा पाहिले पाहिजे.  संतती सौख्य हि विशेष बाब आहेच .

अनेकदा पत्रिका चुकीच्या पद्धतीने पहिली जाते तसे नसते तर मग वर्षभरात घटस्फोट कसे होतात असा विचार मनात येतो. पत्रिकेतील सर्व ग्रहांचा विशेषकरून पाप ग्रह , त्यात सप्तमेश पापग्रह असेल तर अगदी नक्कीच अभ्यास केला पाहिजे .


संसारिक सुखाचा कारक शुक्र सुस्थितीत आहे का? गुरूची बैठक योग्य आहे का? अनेकदा संसारात कलह होतील अशी ग्रहस्थिती असते पण त्यातून सुद्धा पुढे जायचे असेल तर कुटुंब भाव आणि चतुर्थ भाव चांगला हवा . तो नसेल तर संसार टिकवण्याकडे कल नसतो. 


आजकाल विवाह होणे कठीण झाले आहे त्याला अनेक कारणे सुद्धा आहेत . दोघांच्यात शारीरिक , मानसिक आकर्षण , ओढ , प्रेम , एकमेकांसाठी जगण्याची अनेकदा समर्पण त्यागाचीही वृत्ती असली पाहिजे त्यासाठी चंद्र शुक्र मंगळ योग्य दिशा दाखवतील.  दोघांचे लग्न एकमेकांच्या षडाष्टकात असेल तर विचारच जुळणार नाही . सरतेशेवटी दशा महत्वाची आहे. 


विवाह हा फक्त त्या दोघांचा नसून दोन कुटुंबियांचा त्यात समावेश होणार असतो. अनेक नाती गोती बदलणार असतात . प्रत्येक नाते खुल्या दिलाने स्वीकारावे लागते तरच पुढची वाटचाल सुखकर होते . आपण समोरच्याला स्वीकारले तर समोरचा सुद्धा आपल्याला स्वीकारेल ह्याची खात्री ठेवा. प्रत्येक नाते फुलायला बहरायला वेळ लागतो आणि तो द्यावा लागतो त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. आज आपण सुनेच्या भूमिकेत आहोत उद्या सासुच्याही असणार आहोत हा विचार आत्ताच केला पाहिजे नव्हे तो करणे आपल्याच हिताचे ठरेल. प्रत्येक नाते अनेक अपेक्षा घेवून येते त्या सर्वच पूर्ण होतील असे नाही. आपणही इतरांच्या सर्व अपेक्षांच्या कसोटीवर १००% उतरणार नाहीच कि . संसाराचा मार्ग कधी सोपा तर कधी खडतर असतो. तिथेच आपली साधना उपयोगाला येते , सद्गुरू आपल्याला संयमित करतात.


नवरा बायको चे नाते समर्पणाचे सुद्धा आहेच कि. एकमेकांसाठी जगण्यात गोडवा असतो . कधी तुझे आणि कधी माझे हे चालायचेच . लग्नात सुंदर दिसणारी बायको कायम सुंदर दिसणार नाही , आपणही बदलणार आहोतच , देह रंग रूप दिसणे हे शाश्वत नाही ह्याचे भान असले पाहिजे .आपण बदलणार तसे समोरची व्यक्ती सुद्धा .


आज एका मुलीने लग्नाची अट सांगितली कि “ मला सासूसासरे वयाने 55 च्या आत असणारे हवेत ..” काय हेतू असेल हे सांगण्यामागे तिचे तिलाच माहिती .


विवाह संस्था टिकवायची आहे आपल्याला आणि त्यासाठी आपल्या अनेक विचारणा मुरड घालावी लागणार हि खुणगाठ लग्नाला उभे असणार्या सर्व मुलामुलीनी करावी असे सुचवावेसे वाटते .

आज पालक आपल्या मुलांच्या डोक्यावर पडणार्या अक्षतांसाठी आतुर आहेत . शिक्षण घेतले , मोठ्या पगाराच्या नोकर्याही आहेत सर्व आहे. पण आपणच घातलेल्या नको त्या अटींच्या डोंगराखाली आपणच घुसमटत आहोत , वये पुढे जात आहे . कुठे थांबायचे ते ज्याला समजले तो जिंकला , ज्याने तडजोड केली सामंजस्याने विचार केला तर तो पुढे जायील , आता माझ्या मुलाला किंवा मुलीला स्थळेच सांगून येत नाहीत हि अवस्था तुमच्या आईवडिलांना पाहायला लावू नका. तुमची बाळलेणी तुमच्या मुलांच्या अंगावर घालायचे सुख त्यांच्या पदरी पडू दे . 


आपण जोडीदार शोधात आहोत जो आपल्याला माणूस म्हणून वागवेल , आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी खंबीर उभा राहील , आपले मन जपेल आणि विचाराना मान देयील असा हवा. आपण विकत घ्यायला जात नाही जोडीदार लग्नाच्या बाजारात . दुर्दैवाने तसे आहे नाहीतर मुलीनी पगार अमुक अमुक च्या वरती हवा अशी अट घातलीच नसती . कुठून आल्या ह्या अटी ? पगार ह्या एकाच निकषावर विवाह होणार कि काय ? भले शाब्बास . अश्या अटी पूर्ण करणारा नवरा मिळेलही पण तो प्रेम करणारा असेल का? कारण दोघांचेही विश्व भावना प्रेम नसून पैसा हे असेल. पैसा हीच पसंती असे सध्याचे चित्र आहे. 


विचार करा पुन्हा पुन्हा विचार करा . आपण सुख शोधत आहोत , नवरा मुलगा विकत नाही घेत आपण , हि प्रेमाची देवाण घेवाण आहे पैशाचा सौदा नाही .लग्नाचा बाजार मांडू नका , पूर्वीच्या काळी मुली मिळवत सुद्धा नव्हत्या तेव्हा नाही ती केली कुणी पगाराची भाषा . ह्या कोशातून लवकर बाहेर या आणि सहजीवनाचे स्वागत करा इतकेच सांगायचे आहे. नाहीतर पुढे येणाऱ्या स्थितीला तुम्ही स्वतःच जबाबदार असला. वय वाढले कि शरीरातील ताकद , सौंदर्य , उमेद सर्व काही कमी होत जाते . विवाहासाठी पैसा पगार हे निकष कधीपासून झाले ? सुख समोर आहे त्याला आपलेसे करा , त्याच्याकडे पाठ फिरवू नका नाहीतर हा अहंकार तुमच्या पुढील आयुष्यातील एकटेपणाला कारणीभूत असेल . आपल्या मागे आपली मुले एकटी राहणार ह्या चिंतेने तुमचे पालक सुद्धा चिंताग्रस्त आहेत ह्याचा विचार करा .  श्री स्वामी समर्थ  


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  



Wednesday, 16 October 2024

Aura Cleansing

 || श्री स्वामी समर्थ ||


“लहानपणी आपण आणि आता आपली मुले सांगत असत आई आत्ताच्या आत्ता दे “आठवतंय ना? अगदी तशीच स्थिती प्रत्येक गोष्टीत आजकाल आपल्या सर्वांची झाली आहे . आजकाल सगळ्यांना सगळे लगेच हवे असते . संयम संपलाय ... घरी काही पदार्थ करू नका , बाहेर सगळे मिळतंय आणा खा आणि मोकळे व्हा. बदलत्या जगात जुन्या सर्वच गोष्टी हळूहळू विरून जात आहेत तरीही जुने ते सोने...आपले मोदक बघा पारंपारिक पदार्थ आहे . आहे का त्याला मोमो ची सर ? कधी येणारही नाही . मोदक ह्या नावामध्ये  जे सौंदर्य आहे ते मोमो मध्ये कसे येणार ? असो. तर सांगायचे असे कि सगळ्यात शोर्टकट चालत नाहीत . उदा. अध्यात्मात शोर्टकट ला वाव सुद्धा नाही .

परमेश्वराला आपली गरज नाही आपल्याला आहे म्हणून आपण देवदेव करत असतो हे खरे आहे . मला देवाकडून काही नको असे नसते मोठ्या याद्या आहेत आपल्या . असो तर जे मनात आहे ते घेण्यासाठी आपण पूजा अर्चा देव धर्म जपतप करतो पण त्यात जीव ओतला नाही तर गजानन विजय सारखा ग्रंथ म्हणजे गोष्टीचे पुस्तक किंवा कादंबरी होईल. श्री गजानन विजय ग्रंथ महाराजांचे अस्तित्व दाखवणारा ग्रंथ आहे अर्थात तुमची तितकी निष्ठा हवी . दिवाळी अंक सारखा तो वाचलात तर कसे महाराज मदत करतील तुम्हाला ?

हे सर्व सांगण्याचे तसेच कारण आहे. मध्यंतरी एका बाईला काही उपाय सांगत असताना त्या म्हणाल्या हनुमान चालीसा youtube वर ऐकली तर चालेल का? मी म्हंटले का नाही चालेल कि सगळे चालतंय आपल्याला . पण मग असे करा भूक लागली कि वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे फोटो video सुद्धा अगदी तसेच youtube वरती बघा. बघा ते पाहून पोट भरते आहे का . त्या मनोमन काय ते समजल्या . 

पूर्वी होते का youtube? आपल्या लहानपणी शुभम करोति , मनाचे श्लोक , परवाजा , पाढे , अडीचकी दिडकी आपल्याकडून आईबाबा घोकंपट्टी करून पाठ करून हेत असे.  आठवतंय का? थोडक्यात आपल्या मुखातून ते श्लोक म्हणण्याला सुद्धा काहीतरी अर्थ असल्याशिवाय का हे आपण म्हणत असू ? येतंय का लक्ष्यात ? 

आपली वाणी सुस्पष्ट व्हावी , एका जागी बसण्याची सवय व्हावी , एकाग्रता वाढावी आणि आपण म्हणत असलेल्या श्लोकात आपले संपूर्ण लक्ष्य असावे जेणेकरून त्याची गोडी लागेल उच्चार स्पष्ट येतील आणि त्या देवतेची अखंड कृपा आपल्यावर होईल . स्वतः म्हणत असल्यामुळे ताठ बसायची सवय ( तेव्हा शेजारी मोबाईल नव्हते  ते नशिबच आहे त्या पिढीचे ) , श्कोलांचा अर्थ समजून म्हणायची सवय लागायची आणि एकंदरीत मनाचे चित्ताचे शुद्धीकरण होत असे. इतके ढीगभर फायदे होते पण त्याही पेक्षा मोठा फायदा म्हणजे आपला आत्मा आणि मन एकचित्त ,स्थिर होत असे. आजकाल जे जरा काही झाले कि झाले मन अस्थिर असे तेव्हा होत नसे कारण मुळातच आजकाल लोकांना एका जागी दोन मिनिटे सुद्धा बसता येत नाही इतके मन राहुने चंचल केले आहे.  

आता हा राहू कोण ? तर तो तुमचा मोबाईल , थोडक्यात सगळी हि आधुनिक इलेक्ट्रोनिक उपकरणे , त्या सर्वात आपण आजकाल आपले आयुष्य शोधायला लागलो आहोत , त्या शिवाय श्वास सुद्धा नाही बरे आपला अशी आजकाल वेळ आहे. असो . पूर्वीच्या काळी स्त्रिया भाजी निवडताना स्वयपाकघरातील कामे करताना ओव्या म्हणत श्कोल म्हणत त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहत असे , देवाचे नाव घेण्यासाठी वेगळा असा वेळ काढण्याची गरजच निर्माण होत नसे पण आता स्त्रिया स्वयपाक करताना कानात ते यंत्र घालून ऐकत स्वयपाक करतात . असो . तर हे सर्व वेद रुचा स्वतः तोंडाने म्हणणे हे सर्वार्थ प्रगतीचे लक्षण मानले जाते कारण ह्यामुळे आपल्या मनाची आत्म्याची शुद्धीक्रिया म्हणजे आजकालच्या भाषेत आपला “ Aura Clean “ होतो , आपला “ Aura “ सकारात्मक होण्यास मदत होते आणि मग कुठल्याही परीस्थित आपण न डगमगता मन विचलित होवू न देता सामोरे जावू शकतो . थोडक्यात एकाग्रतेने मन सुद्धा खंबीर होते आणि खंबीर मन योग्य स्थितीत योग्य विचार करू शकते . ह्या सर्वासाठी आपल्याला हे श्लोक मग ते श्री सुक्त असो अथवा अथर्व शीर्ष असो . रामरक्षा असो अथवा हनुमान चालीसा असो आपल्याला ते स्वताहून म्हणायचे आहे . आधी ऐका कुणाकडून त्याचा अर्थ समजून घ्या , आजकाल सगळे गुगल वर आहे. अर्थ श्लोक , उच्चार समजून म्हणा , तालासुरात म्हणा जेणेकरून आपल्यालाही ऐकायला आवडेल आणि गोडी लागेल . शब्द स्वर रुचा चुकल्या तरी चालतील , चुकत चुकत येयील पण येयील आणि ह्या प्रयत्नांना यश जेव्हा येयील तेव्हा गगनात आनंद मावणार नाही कारण ज्या देवतेचे करता ती तुमच्यावर प्रसन्न होवून आपल्याला आशीर्वाद देणार हे नक्की.

म्हणूनच अध्यात्मात शॉटकट नाहीत . प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते , कलियुग आहे आणि कित्येक जन्माच्या पापांचा हिशोब चुकता करायचा आहे , त्यामुळे एक माळ करून काहीही होणार नाही. एका माळेने सुरवात करा पण पुढे हा जप वाढवत न्या. खाताना विचारतो का? किती बटाटे वडे खावू ? ते जसे अमर्यादित आहे तसेच जे अध्यात्म कराल तेही तसेच असुद्या . 

परमेश्वर द्यायलाच बसला आहे , आपण त्याच्या दृष्टीक्षेपात आलो कि तो आपल्याला देणारच हा विश्वास ठेवा . दृष्टीक्षेपात कसे येणार , मनापासून नामस्मरण केल्यामुळे , पटतंय का ?

बघा जीवनात सगळीकडे शोर्टकट नाहीत , निसर्ग सुद्धा हेच शिकवतो आपल्याला. त्याचे उत्तम उदा म्हणजे , बाळाचा जन्म नऊ महिने नऊ दिवस , तिथे आपले काहीही चालत नाही .ज्याला जितका वेळ लागणार तो लागणार त्यात आपले विज्ञान उपयोगाचे नाही .  निसर्ग आपल्या जीवनाचा जसा भाग आहे तसेच अध्यात्म आणि ज्योतिष सुद्धा हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच . 

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाना खूप शुभेछ्या . चांदोमामा फक्त आमच्याच जीवनात नाही तर संपूर्ण जगात , विश्वास तुझ्या शीतल चांदण्याने  शांतता नांदूदे अशी विश्व प्रार्थना करुया .


श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क 8104639230




Tuesday, 15 October 2024

सांभाळ आपल्या भक्तजना ....

 || श्री स्वामी समर्थ ||


मनुष्याला कुठे थांबायचे ते समजत नसले तरी आपल्या गुरुना आपल्याला कुठे थांबवायचे ते बरोबर समजते . त्याची प्रचीती आपल्याला आयुष्यभर पदोपदी येत असते , पण त्या वेळी आपल्याला ती समजत नाही कारण ती समजेल इतकी अध्यात्मिक उंची आपल्या साधनेने गाठलेली नसते . जसजसे आपण ह्या मार्गात पुढे जात राहू तसे प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटनेचे अवलोकन करण्याची क्षमता आपल्यात येत असते . 

मन का हो तो अच्छा , लेकीन ना हो तो और भी अच्छा...ह्याची प्रचीती येते . अनेकदा आपण आपल्या नातेवाईकांकडे जायला निघतो पण बस रिक्षा काहीच मिळत नाही . आपले जाणे रहित होते कारण त्या दिवशी तिथे न जाणे हेच आपल्या हिताचे असते . एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही कारण कदाचित तिथे मित्र संगत चांगली मिळणार नसते. 

अनेकदा अगदी मनापासून आवडलेल्या स्थळा कडून नकार येतो कारण कदाचित मुलगी सतत online खरेदी करून नवर्याचे दिवाळे काढणारी असते . काही लोक आपल्याशी अचानक बोलायची बंद होतात , कारण आपल्याला समजत नाही पण त्यांचे आपल्या आयुष्यात असणे पुढे जावून आपल्याला किंवा त्यानाही त्रासदायक होणारे असते म्हणून त्यांना आपल्याशी न बोलायची बुद्धी देणारे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष गुरूच असतात . आयुष्यातील घटनांचा क्रम लक्ष्यात घेतला तर प्रश्न समस्या निर्माण होतात पण त्यातून आपण सही सलामत बाहेरही पडतो ते केवळ त्यांच्यामुळेच . 

जे जे काही होते आणि होणार आहे ते सर्व त्यांच्या लीला आहेत म्हणूनच ...संताच्या जे जे असेल मनी तेच येयील घडोनी , भरवसा त्यांच्या चरणी ठेवुनी स्वस्थ राहावे. अनेकदा आपण करत असलेल्या कामातून आपल्याला अलगद बाहेर काढून आपल्याला दुसर्याच कामात व्यस्त करून मार्गस्थ करणारे गुरूच असतात . महाराज आपले कधीही वाईट करत नाहीत आणि आपल्याकडून इतरांचे सुद्धा नुकसान होवून देत नाहीत . 

अनेकदा आपल्याला खूप बोलण्यासारखे असते , पण ते तोंडातून चकार शब्द काढूनच देत नाहीत , आपल्या जीवाची घालमेल होते पण कालांतरानी अश्या काही घटना ते घडवतात कि विस्मयचकित व्हयायला होते . त्यांची इच्छा हि अंतिम इच्छा हे समजून जीवन जगणाऱ्या भक्तांचे कधीही नुकसान होत नाही . त्यांनी आपल्यासाठी जे योजलेले आहे ते सर्वोत्तम असणार ह्यावर आपला संपूर्ण विश्वास आणि गुरूंवर अढळ , नितांत श्रद्धा असली पाहिजे. 

एखादी गोष्ट विलंबाने होते तेव्हा समजून जायचे ह्यात काहीतरी आहे, ह्या विलंबित काळात अनेकांचे अहंकार धुळीला मिळतात , मी मी म्हणणारे दिसेनासे होतात , आपण सर्व काही करू शकतो हा विचार किती बिनबुडाचा आहे पोकळ आहे ह्याची प्रचीती तेच दाखवतात , सहज वाटणाऱ्या गोष्टी कर्म कठीण करून ठेवतात आणि मग तो क्षण येतो जेव्हा आपलेच आपल्याला उमगू लागते आणि शेवटी आपण जेव्हा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो तेव्हा सगळा गुंता ते अलगद सोडवतात आणि प्रश्न मार्गी लावतात .

त्यांचे अस्तित्व आहेच आहे , कुणी ते मानो अथवा न मानो . क्षणोक्षणी मिळणारी त्यांची प्रचीती आपल्याला हतबुद्ध करते , अनेकदा आपल्या बुद्धीला न झेपणाऱ्या घटना प्रत्यक्ष घडतात तेव्हा डोळ्यातून नुसते अश्रू येतात आणि आपण त्यांचे अस्तित्व मान्य करू लागतो . 

ह्या ब्रम्हांडातील एका धुळीच्या कणा इतकेही अस्तित्व नसलेले आपण किती माज करत असतो , संपत्तीचा , ऐश्वर्याचा , शिक्षणाचा कि अजून कश्याचा . अरे ह्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्यांच्या समोर कसला आलाय माज . क्षणात उतरवतात ते आणि आपण आणि आपले अस्तित्व किती खुजे आहे ह्याची जाणीव सुद्धा करून देतात .

आयुष्यातील प्रत्येक घटना अर्थपूर्ण असते , आयुष्यात येणारी माणसे त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या वेळा सर्व काही ठरलेले असते फक्त ते आपल्याला माहित नसते . जे होते आहे ते आणि होणार आहे हे त्यांच्या कृपेने हे मनात पक्के झाले कि मग काश्याचेही काहीही वाटत नाही . कारण अखेरच्या क्षणापर्यंत तेच आपल्याला सांभाळणार असतात .

श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 




Sunday, 13 October 2024

विश्वासपात्र

 || श्री स्वामी समर्थ ||


मंडळी ज्योतिष हे प्रत्येकाने शिकावे निदान आपल्या पत्रिका समजून घ्या अशी आज कळकळीची विनंती करावीशी वाटते , ज्यांना ह्या शास्त्रावर विश्वास नाही त्यांच्यासाठी हि पोस्ट नाही आहे . असो. शास्त्र मानणाऱ्या सर्वानीच हा जळजळीत डोळ्यात अंजन घालणारा अनुभव नक्की वाचवा आणि त्यावरून बोधही घ्यावा .

मध्यंतरी एक पत्रिका पाहिली. आईचा किती विश्वास मुलावर . आईच्या पत्रिकेत दशा स्वामी राहूच्या नक्षत्रात आणि पंचमेश सुद्धा राहूच्या नक्षत्रात . दशा स्वामी स्वतः बाधकेश. अन्य ग्रहस्थिती इथे देता येणार नाही पण मुख्य मुद्दा राहू आणि फसवणूक करणारी संतती हाच आहे . असो जिथे जिथे राहू येतो तिथे साधे सोपे काम नसते. राहू आपल्याही नकळत आपला सापळा रचत असतो .  प्रत्येक आईसाठी आपली मुले हे विश्व असते त्यामुळे आपलीच मुले आपल्याला फसवतील हे स्वप्नात सुद्धा येत नाही पालकांच्या किबहुना त्या दृष्टीने विचार करण्याची त्यांची बुद्धीच नसते आणि इच्छाही .  मुलगा पन्नाशीला आला तरी आईसाठी तो बाबूच असतो आणि अजूनही पाळण्यातच असतो. मुलाने आईच्या लाखो रुपयाची हातसफाई कधी केली कुणालाही समजले नाही. आता ते पैसे गेले परत मिळणे कठीण . पण त्या हि पेक्षा गेला तो विश्वास . 

आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आपण आयुष्य पणाला लावतो , आपल्याला जे मिळाले नाही ते त्यांना मिळावे , कश्याचीही कमतरता त्यांना भासू नये म्हणून दोन दोन नोकर्या करून मुलांची फी भरणारे लोक मी पहिले आहेत . पण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा मुलेच आपली अश्या वागण्यातून परतफेड करतात तेव्हा वाटते , कुठे चुकले आपले? कुठले संस्कार करण्यात कमी पडलो आपण ? आणि ह्या अश्या स्थितीतून बाहेर पडायला वेळ लागतो पण त्याही पेक्षा गेलेला विश्वास पुन्हा मिळत नाही त्याचा धक्का मोठा असतो. सांगणार कुणाला ? तोंड दाबून मुक्याचा मार अशी गत होते .

लक्ष्मी अशीच येत नाही , अथक परिश्रम करावे लागतात , पै पै साठवताना नाकी नौ येतात आणि अश्या घटना आपल्याला निराशेच्या गर्तेत नेतात .त्यांना सांगितले सर्व कागदपत्रे सांभाळ आणि ह्यापुढे  तुमच्या सही शिवाय अन्य कुणीही एकही पैसा काढणार नाही ह्याची खबरदारी घ्या . इथे राहू असल्यामुळे नेट ट्रान्स्फर करून पैसे गेले हे वेगळे सांगायला नको. 

मुलांवर आंधळे प्रेम करू नका. जेवायचे ताट द्या पण बसायचा पाट देवू नका. आपले सर्व हक्क आपल्याकडेच ठेवा . मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत आपण आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात उभे राहण्याइतपत मदत , शिक्षण काय दिले नाही आपण . आता पुढचे त्यांनी बघायचे . आपण हयात आहोत तोवर सर्व आपले मग गेल्यावर त्यांचेच आहेत .आज मुलांना अनेक प्रलोभने सुद्धा आहेत , लाखात पगार आणि शो ऑफ करण्यासाठी अवलंबलेली महागडी जीवन शैली हि त्याची कारणे असावीत . आमच्या मागील पिढ्या जगल्याच कि त्या कुठे गेल्या होत्या उठसुठ पिझ्झा खायला. असो  ह्या सर्वातून निर्माण होणारी अनिश्चितता , निराशा आणि त्यातून म्हातारपणी निर्माण होणारी विकतची आजारपणे. ह्यात दोष आपलाच आहे. आजूबाजूच्या घटना माहित असूनही आपण डोळे उघडत नाही , मायेचा पूर येतो आणि विश्वास ठेवतो . हा विश्वासच पुढे जावून आपल्या उरलेल्या आयुष्याचे तीन तेरा वाजवतो. 

अनेक लोक ह्या शास्त्राला नावे ठेवतात , ठेवू देत , नावे ठेवल्यामुळे शास्त्राचे महत्व कमी अजिबात होणार नाही. पण त्या पेक्षा आपल्या आणि मुलांच्या येणाऱ्या सुना जावई घरातील सर्वांच्या पत्रिका समजून घेतल्यात तर आयुष्यात पुढे येणाऱ्या वळणांवर काय काय वाढून ठेवले आहे ह्याचा अंदाज नक्कीच येयील आणि त्याप्रमाणे वागता सुद्धा येयील. 

राहू हा क्षणाचाही विलंब देत नाही . भल्याभल्यांची झोप उडवतो तीही क्षणात . आपण फसले गेलो आहोत हे व्यक्तीला समजत सुद्धा नाही कारण आपल्या कित्येक पट हुशार राहू आहे. तो आपल्याला बरोबर हेरतो .  आजकाल सर्रास वापरल्या जाणार्या नेट बँकिंग, इंटरनेट टेक्नोलॉजी , gpay , मोबाईल बँकिंग ह्या अत्याधुनिक युगातील सोयी हा राहुचाच पिंजरा आहे त्याचा वापर सांभाळून केला पाहिजे . राहू हि अदृश्य शक्ती आहे जी दिसत नाही म्हणून बँकेच्या एका खात्यातून पैसे दुसर्या खात्यात जातात पण ते आपल्याला दिसत नाही हाच राहू . राहूच्या दशेत समाजात कमी वावर आवश्यक तेच बोला , फालतू बडबड टाळा. लोक आपला वापर करून घेतात आणि फेकून देतात . आपण वापरले गेलो आहोत ह्याचा त्रास पुढे राहू दशा संपेपर्यंत होत राहतो . म्हणून जेव्हड्यास तेव्हडे अगदी सर्वांशी . राहू अदृश्य शक्ती असल्यामुळे आपले कोण आणि परके कोण हे आपल्याला समजत नाही. नक्की कोण आपल्याला फसवत आहे ते तर अजिबात समजत नाही . आपली सगळी अक्कल हुशारी पणाला लावली तरी राहू समोर निभाव लागत नाही . शब्दांच्या कोत्या करणारे , स्वतःला लई हुशार समजणारे सुद्धा राहूच्या विळख्यात अलगद सापडतात इतका राहू सामान्य व्यक्तीच्या अवकलनाच्या पुढे आहे. ज्योतिष अभ्यासकांनी लग्नातील राहूचा विशेष अभ्यास करावा कारण लग्नात आपला मेंदू आहे जो विचार करतो. 

कुठलेही आईवडील मुलांना म्हातारपणी आम्हाला फसवं असे बाळकडू पाजत नाहीत पण फसवले जावू नये म्हणून आपल्या संपत्तीची काटेकोर व्यवस्था करताना दिसत नाहीत , इथेच चुकते . शास्त्राच्या माध्यमातून आपण शहाणे व्हावे आणि इतरानाही शहाणे करावे तसेच विश्वास पात्र कोण आहे हे तपासून पुढे जावे  ह्या उदात्त हेतूने आपल्यासमोर मांडलेला हा लेखन प्रपंच .  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




Wednesday, 9 October 2024

Online कार्यशाळा

 || श्री स्वामी समर्थ ||



नमस्कार ,

“ हसत खेळत ज्योतिष शिकूया “ हि कार्यशाळा आता पूर्णतः  Online होते आहे. ह्या कार्यशाळेत आपण ज्योतिषाची परिभाषा , ग्रह , राशी , भाव , महादशा , साडेसाती , पंचांग अश्या विविध भागांना स्पर्श करणार आहोत तसेच ह्या कार्यशाळेत  आपण पत्रिका तयार करायला सुद्धा शिकणार आहोत .

ह्या कार्यशाळेचे वैशिष्ठ असे आहे कि तुम्हाला ह्या कार्यशाळेच्या सर्व  रेकॉर्डेड लिंक पाठवल्या जातील ज्या तुम्ही कार्यशाळेत प्रवेश घेतल्यापासून महिनाभरात  असंख्य वेळा बघू शकता . ह्यासोबत तुम्हाला ह्या सर्व विषयाच्या Notes ची pdf सुद्धा मिळणार आहे. ज्यांना ज्योतिष अगदी सुरवातीपासून शिकायचे आहे पण अनेकदा अमुक एक वेळ देता येत नसेल त्यांच्यासाठी हि Online कार्यशाळा उपयुक्त ठरेल कारण ह्यात वेळेची दिवसाची बांधिलकी नाही. महिनाभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे सर्व video पुन्हा पुन्हा बघू शकता आणि अभ्यास करू शकता . 

आज अष्टमीला आई महालक्ष्मीला तसेच  गुरु श्री गजानन महाराज , श्री स्वामी समर्थ ह्यांना वंदन करून ह्या Online कार्यशाळेचा “ Online  उपक्रम “  सुरु करताना अत्यानंद होत आहे. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी मला अनेकांनी मदत केली आहे त्या सर्वांचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार .

आजवर माझ्या सर्वच कार्यशाळा आणि लेखांना आपण उत्तम प्रतिसाद देऊन मला प्रोत्चाहन दिलेत तसेच पुढेही देत रहाल   अशी आशा करते . आपले आशीर्वाद आणि त्याचसोबत सूचना स्वागतार्ह आहेत. 

ज्यांना ह्या Online कार्यशाळेत प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी पुढील माहितीसाठी 8104639230 ह्या whatsapp क्रमांकावर संपर्क साधावा .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क :  8104639230


Saturday, 5 October 2024

गोष्ट एका कुटुंबाची

 || श्री स्वामी समर्थ ||

काही दिवसापूर्वी एका व्यक्तीची पत्रिका पाहिली. अत्यंत त्रासातून ते जात होते ते समजत होते , व्यवसायात तोटा , कर्ज त्यामुळे तसाही तब्येतीवर परिणाम झालेलाच होता , जीवनात कसलाच उत्साह राहिला नव्हता आणि पुढे काय करावे हा मोठा प्रश्न होता . थोडक्यात गलितमात्र अशी स्थिती झाली होती . पण त्याही पेक्षा मोठा मानसिक धक्का त्यांना बसला होता तो त्यांच्या कुटुंबातून , घरातील मंडळीत एकमेकात वाढत चालणारा तिढा , त्यामुळे निर्माण झालेला अबोला आणि सगळ्यात मुख्य म्हणजे टुकार गैरसमजामुळे संपुष्टात येवू पाहणारे नातेसंबंध. 


ज्या काका आत्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो , भावंडांच्या सोबत लहानाचे मोठे झालो त्यांच्यात शुल्लक कारणाहून झालेले गैरसमज ह्यांनी रौद्र रूप धारण केले होते . हा गैरसमज आहे आणि तो दूर होवू शकतो पण तो करणार कोण ? आणि कसा ? कारण समोरच्या व्यक्ती विचारांच्या पलीकडे गेलेल्या आणि समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या . आयुष्यभर एकत्र असणार्या व्यक्तींची साधारण पणे आपल्याला थोडीतरी ओळख असतेच किबहुना तेच अपेक्षित आहे पण नाही , कुणीतरी काहीतरी बिनबुडाचे सांगायला आणि डोक्यात तेच खूळ धरून बसायला एकाच गाठ पडली , आता ती कुणी मारली ??????आपल्या लक्ष्यात आलेच असेल एव्हाना .

त्या व्यक्तीच्या वडिलांच्या काका आणि भावंडांच्या त्यांना माहित असलेल्या जन्म तपशिलावरून अभ्यासाला सुरवात केली . ह्या सर्व घटना ज्यातून निव्वळ गैरसमज निर्माण होवून नाते संबंध बिघडवणारा राहू खलनायक म्हणून उभा होता . कुणाच्या पत्रिकेत राह्ची दशा तर कुणाच्या अंतर दशा , कुणाचा दशा स्वामी राहूच्या नक्षत्रात तर कुणाला त्यात भर म्हणून साडेसाती , कुणाचे सोबत अष्टम भाव लागलेले तर कुणाच्या लग्नात कुटुंब भावात राहू . थोडक्यात संपूर्ण कुटुंब राहूच्या विळख्यात सापडलेले होते . आयुष्यभर अगदी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरणारे आणि एकत्र सणवार साजरे करणारे कुटुंब विखुरले होते , मन सैरभैर झाली होती.  राहूचा तांडव सुरु झाला कि तो आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ देत नाही अगदी क्षणभर सुद्धा . आपली खेळी राहुने ह्या कुटुंबात बरोबर खेळली होती . भास आभासाच्या खेळात आपण होतो ते फक्त राहूच्या हातातील मोहरे , काय चूक काय बरोबर हे समजून घेण्याची विचारशक्ती जणू खुंटलेली असते . हृदयाच्या समीप असलेली आपली माणसे क्षणात परकी होवून जातात . अगदी एकमेकांची तोंडे पहावीशी वाटत नाही इतकी असुया , मत्सर , द्वेष कसा काय निर्माण होतो माहित नाही पण होतो हे खरे आहे. नाही माझा भाऊ माझे बाबा असे करणारच नाहीत हा विचार क्षणभर सुद्धा मनाला स्पर्शून जावू नये म्हणजे राहू मनावर किती हाबी होत असेल त्याची कल्पना येते. 


प्रचंड बलवान ताकदवान आणि षड्यंत्र रचणाऱ्या राहुने आपले काम फत्ते केले आहे हे मला सगळ्या पत्रिकांचा अभ्यास केल्यावर जाणवले. काही गोष्टीना काळ आणि वेळ हेच औषध असते , पण राहुने दिलेल्या जखमा पूर्ण बर्या होण्याची शक्यता कमी असते , एकदा तुटले कि पुन्हा सांधणे कठीण जाते आणि पाहिल्यासारखे तर नाहीच नाही , ह्या काळात एकमेकांशी अबोला असतो कारण बोलण्याने गैरसमज दूर होईल म्हणून राहू तशी स्थिती तयारच होवू देत नाही . असो वडिलोपार्जित संपत्ती हासुद्धा अनेकदा ह्या सर्व घटनामागील  प्रमुख विषय असू शकतो . राहू आपल्या पूर्वजांचा कारक आहे आणि कुणाचे काही शाप किंवा तळतळाट आपल्याला भोगायचे असतील तर त्यापासून आपली सुटका नाही . ते आपले संचित म्हणावे लागेल.  आपले सद्गुरू दिशा दाखवतील , नामस्मरणामुळे हे सर्व सहन करण्याची ताकद सुद्धा देतील पण ह्या गोष्टीत दखल मात्र देणार नाहीत कारण काही गोष्टी भोगूनच संपवायच्या असतात . 

राहूची महादशा ज्यांनी भोगली आहे त्यांना विचार त्यांचे अनुभव जवळपास असेच असतील. कुणी विश्वास सुद्धा ठेवत नाहीत , भयाण शांतता , न संपणारा भयाण काळोख आणि एकटेपणा चा अनुभव प्रखरतेने देणारी राहूची दशा हा आयुष्यातील सर्वात मोठा उतारावर नेणारा काळ असतो .

कुटुंबाला विभक्त करणारा राहू , कुटुंबियांना एकत्र येवूच देत नाही , एकमेकांची भेट सुद्धा होत नाही , ह्या आधी वाटणारे प्रेम आपुलकी जणूकाही नष्ट झाल्यासारखेच वातावरण निर्माण होते . उरतो तो फक्त द्वेष आणि मत्सर , एकमेकांच्या शिवाय न करमणारी मंडळी एकमेकांना पाण्यात पाहू लागतात , नाते संबंध बिघडतात , मेसेज फोन येणेजाणे , संवाद लयाला जातो. पूर्वीसारखे कुटुंब हस्ते खेळते होणार नाही ह्याची कल्पना मी त्यांना दिली तेव्हा त्यांना अक्षरशः गहिवरून आले पण मागे वळून बघू नका आता पुढे जात राहा हाच सल्ला मी त्यांना दिला. कारण जितके त्या आठवणीत रुळला तितका मानसिक त्रास अधिक होयील . संपूर्ण राहूच्या दशेत माणसाच्या मनावर आणि अंतर्मनावर राहुचाच पगडा असतो , भयभीत होणे , फोबिया , मानसिकता उध्वस्त होणे , माणुसकीवरचा विश्वास उडणे ह्या गोष्टी घडवणे हि राहूची शस्त्रात्रे आहेत . राहू विचार करायला वेळ देत नाही , गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतात मती गुंग होते पण आपण हतबल होतो . निराशेच्या गर्तेत ठेवणारा हा राहू आपल्याबद्दल इतरांच्या मनात गैरसमज करून देण्यात माहीर आहे . म्हणूनच राहूच्या दशेत व्यक्तीने अधिक बोलूच नये , कारण त्यातूनच शब्दांचे खेळ आणि गैरसमज होतात . भयानक स्वप्ने , आभासी जगतात वावरल्याचा भास , वाईट गोष्टींची छाया , मनावरचे लाख मणाचे ओझे घेवून राहूची दशा पार करावी लागते . राहूची जशी वाईट बाजू आहे तशी चांगली सुद्धा आहे, तीर्थयात्रा , अध्यात्मिक प्रगती , गूढ शास्त्र शिकण्यात प्रगती , रिसर्च , Phd तत्सम उच्च शिक्षण होते . 

दिशाहीन होणे , एक प्रकारचे मनावर असणारे दडपण , अनामिक भीती आणि त्यातून आलेले वैफल्य , प्रत्येक गोष्टीत असणारी साशंकता , आयुष्यातील एकूणच अस्थिरता, देवावरचा उडत चाललेला विश्वास , पैशाच्या अडचणी , व्यवसायाचे वाजलेले बारा , दिवाळखोरी , फसवणूक , आपले म्हणणारे सोडून गेल्यामुळे आलेली निराशा वैफल्य , नात्यात पडलेल्या भेगा , मित्रांमध्ये होणारे गैरसमज आणि तुटलेली नाती हे सर्व डोळ्याने नुसते पाहत राहणे ह्यापलीकडे काहीही करू न शकणारे आपण . आपल्या बद्दल इतरांचे गैरसमज नेमके कश्यामुळे झाले आहेत ? आपली चूक तरी काय हे सुद्धा आपल्याला समजत नाही . 


हे भोग नाहीतर अजून काय . म्हणून सांगावेसे वाटते . आपली आधुनिकता आणि आधुनिक विचार सारणी ह्याचा उपयोग नको तिथे नको. पितृपक्षात आपल्या पितरांचे यथायोग्य सर्व दान धर्म करावे पान भोजन ठेवावे. नको त्या फ्याशन चे किडे डोक्यात वळवळू देवू नका. आपल्या शास्त्र रूढी परंपरा योग्यच आहेत आणि त्यांचा सन्मान करणे आपले परमकर्तव्य आहे . खोट्या आधुनिक विचारांचा बुरखा घालून ह्या परंपरांना बगल देवू नका . शिक्षण आपल्याला विचारी संयमित  करते , अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारे ज्ञान आपल्या हृदयाच्या आणि मेंदुच्याही कक्षा विशाल करत नसेल तर कुठेतरी काहीतरी चुकत आहे असेच म्हंटले पाहिजे. ज्याने आपल्याला जन्माला घातलाय त्यालाच अक्कल शिकवायला निघालो आहोत आपण म्हणून नको ती बुद्धी होते आहे आपल्याला.  असो.  

असो ह्या कुटुंबातील असलेल्या ह्या पितृदोषाने अनेकांना कह्यात घेतले होते तेही एकाच वेळी , राहूची मनावरील पकड  मजबूत होती . आता त्यातून मार्ग काय तर भोग भोगा आणि मुक्त व्हा .काहीही झाले तर आपल्या गुरूंच्या चरणाशी वाहिलेल्या निष्ठा त्याबद्दल शंका न घेता अविरत सेवेत राहणे हाच सर्वोत्तम उपाय .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Wednesday, 2 October 2024

स्थिरता

|| श्री स्वामी समर्थ ||


मनाचा कारक चंद्रमा जो अत्यंत चंचल आहे. एका जागी थांबणे जणू त्याला आवडतच नाही , आकाशात मुक्त विहार करत दुडूदुडू धावत महिनाभरात सर्व राशीतून तो प्रवास करत असतो . मन स्थिर नसेल तर बुद्धीही स्थिर राहणार नाही  आणि बुद्धी अस्थिर झाली तर सर्व कठीणच होईल . 

मन स्थिर नसलेली लोक क्षणात निर्णय बदलत राहतात , हे करू कि ते करू . कुठल्याही एका निर्णयावर स्थिर राहणार नाहीत किबहुना निर्णयक्षम नसतात . अस्थिर मनोवृत्ती बिघडलेल्या चंद्राचे प्रतिबिंब आहे. मग बसल्या जागी सतत पाय हलवत राहणे , सतत काहीतरी हातवारे करणे. एका जागी शांत बसणारच नाहीत .

अश्या मुलांना किंवा व्यक्तींनी ध्यान धारणा करावी , अर्थात ध्यानासाठी  मुळात तयारच होणार नाहीत . पण ध्यान जसजसे करत जातील अगदी एखादा मिनिट बसली सुरवातीला तरी चालेल . पण त्याने त्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल . योगाभ्यास हा मनाच्या एकाग्रतेसाठी रामबाण उपाय आहे .


निर्णयक्षमता नसल्यामुळे किंवा मनाची चंचल अवस्था मग आयुष्यात अपेक्षित यश मिळवू शकणार नाही आणि मग त्यातून निर्माण होणारे वैफल्य आणि पुढे सर्वच चुकत जाते .  चंद्राला अस्थिर करणारा ग्रह बुध , ह्या दोघांचे प्रतियोग , युती चंचलता वाढवणारी असते . 


शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत आहे आणि आपण घरोघरी महालक्ष्मीचे स्वागत करत आहोत . लक्ष्मी सुद्धा चंचल आहे . तिला स्थिर करण्याचे काम महाविष्णूच करू शकतात . पण आपण तिला आवाहन करून तिचे पूजन करत असताना आपलेही मन अस्थिर चंचल असेल तर आपण तरी शांत चित्ताने पूजन कसे करणार . आपणच चंचल असू तर लक्ष्मी तरी स्थिर कशी होईल ? म्हणूनच पुढील ९ दिवस सर्व चित्त एकवटून एकाग्र होवून महालक्ष्मीच्या चरणाशी आपले मन एकाग्र करुया , माझे मन तुझ्याच चरणाशी  स्थिर कर अशी तिला प्रार्थना करुया , आपले मन , विचार स्थिर झाले तर आयुष्य सुद्धा लयबद्ध होईल आणि लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे स्थिरावेल. 

आज हा विचार आपल्यासमोर मांडताना माझेही मन तिच्याच चरणाशी स्थिरावत आहे.

सर्वाना शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेछ्या . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 

Friday, 27 September 2024

ग्रहण

 || श्री स्वामी समर्थ ||


पत्रिकेतील समस्या आपल्याला समजते पण ती नक्की कश्यामुळे निर्माण झाली आहे हे समजणे महत्वाचे आहे. अनेकदा त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खूप मागे जावे लागते . अनेकदा संततीचे प्रश्न घेवून पालक येतात . मुल ऐकत नाही , खूप त्रास देते किंवा विचित्र वागते , अभ्यास करत नाही , घरात वस्तूंची अगदी राग आला कि आदळ आपट सुद्धा करते , अश्या मुलांना समजून घेता घेता पालक आजारी पडण्याची वेळ येते पण मुले ऐकत नाहीत . 


अश्यावेळी मुल जन्माला आले त्याच्या आधी ९ महिने म्हणजे गर्भधारणा झाली त्यावेळी कुठली कुठली ग्रहणे झाली ते बघितले तर आपले उत्तर मिळते . गर्भधारणा झाली त्यावेळी किंवा त्याच्या आसपास चंद्र सूर्य ग्रहणे असतील तर मातेच्या गर्भावर त्याचा परिणाम होतो , म्हणूनच गर्भवती स्त्रियांनी ग्रहण बघू नये , बाहेर जावू नये असे शास्त्र सांगते . पण आपण उच्च शिक्षित दीड शाहणे लोक ह्याच शास्त्राला नाव ठेवतो . विज्ञान कितीही पुढे जावूदे , शास्त्र त्याच्या जागी आहेच आणि ग्रहांचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम कुणीही थांबवू शकत नाही ते होतच राहणार . सूर्य उगवायचा तो उगवणारच आहे कि . असो.


परवा अशीच एका मुलाची पत्रिका बघताना नेमकी हीच गोष्ट तपासली आणि मला उत्तर मिळाले . गर्भ धारणे पासून पहिल्या महिन्यात शुक्राचा अंमल गर्भावर अधिक असतो . 


हा अभ्यास करणे म्हणजे खोल समुद्रात उडी मारणे आणि जितके मोती वेचता येतील तितके वेचणे . आयुष्य कमी पडेल अभ्यासाला , पण शिकायची इच्छा मात्र दुर्दम्य असली पाहिजे . 


ऑक्टोबर च्या 2 तारखेला हस्त नक्षत्रात सूर्य ग्रहण होत आहे . ग्रहण रात्री ९ वाजून १३ मिनिटापासून पाहते ३ वाजून १७ मिनिटापर्यंत असणार आहे . हि एक खगोलीय घटना आहे . हे ग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव असणार आहेच .  ग्रहण म्हणजे घेणे .ग्रहण हे अध्यात्मिक दृष्टीने चांगले असते. 

चंद्राच्या हस्त नक्षत्रात हे ग्रहण होत आहे . ज्यांची बुध किंवा चंद्राची दशा चालू आहे किंवा दशा स्वामी ह्या नक्षत्रात असेल तर त्यांनी अधिक उपासना करावी . चंद्र सूर्याची ताकद ग्रहण काळात कमी होते .  रोजच्या जीवनात कामात अडथळे अचानक निर्माण होतात . राहू हा तामसिक ग्रह असून सत्तेत उलथा पालथ करण्यास सुद्धा अती सामर्थ्यवान आहे.  राहूच्या मनमानी समोर कुणाचेही चालत नाही. कन्या राशीत चंद्र रवी बुध आणि केतू समोर मिनेतील राहू आहे. 

चंद्र मनाचा तर रवी आत्म्याचा कारक आहे. ह्या दोघांची क्षमता कमी होते ती ग्रहण काळात . सोबत बुद्धीचा कारक बुध आणि केतू जो सगळ्या ग्रहांची ताकद काढून त्यांचा शुष्क करणार आहे . शरीरातील हाडे , दृष्टी आणि पित्ताशय , पचनसंस्था  ह्यावर रवीचा अंमल आहे त्यामुळे ह्यासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. तब्येत सांभाळ आणि आहार विहार सुद्धा सांभाळा. वाचेवर , शब्दांवर नियंत्रण ठेवा. बुध हा संवादाचा कारक आहे म्हणून बोलणे कमी असलेले उत्तम .


ह्या काळात नामस्मरण हा एकमेव उपाय आहे . सूर्य आपली उजवी नाडी म्हणजे पिंगला तर चंद्र डावी इडा वर अंमल करतो , अमावास्येला सुषुम्ना चालू असते म्हणून अध्यात्मिकता वाढवा . सूर्य म्हणजेच रवी हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे. रवी हा राजा आहे आणि त्याला थोडा अहंकार असतोच . त्यालाच आपलयाला जपायचे आहे , अहंकार खिशात ठेवा , वादात पडू नका . नवीन काम सुरु करू नका . ग्रहणात पित्त होते म्हणून गुळ खावा . गुळ गहू  दान करा , कुणाला ? चतुर्थ श्रेणीतील लोकांना करा.  आपला नेहमीचा जप नित्य करत राहा. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





कुठली शाखा निवडू ?

 || श्री स्वामी समर्थ ||




आज अनेक शैक्षणिक शाखा आणि क्षेत्रे मुलांना खुणावत आहेत . पण नेमके कुठे प्रवेश घ्यावा ते समजत नाही तसेच  आजची प्रत्येक कोर्स ची फी सुद्धा तोंडाला फेस आणणारी आहे त्यामुळे निर्णय चुकला तर पैसे फुकट जातातच पण आयुष्यातील सोन्यासारखे वर्ष फुकट जाते आणि खच्ची होतो तो मुलांचा आत्मविश्वास . खरतर तसे काही नसते कारण चुकलेली असते ती निवड. 


मुळात पत्रिकेत पंचम आणि नवम भाव हा शिक्षण दर्शवतो . पंचम भाव हा मुळातच विद्येचा भाव असल्यामुळे त्या भावासंबंधी असणारी दशा असेल तर उत्तम शिक्षण होते . उच्च शिक्षण जसे CA , CS , PhD ,MS करण्यासाठी नवम भाव लक्ष्यात घ्यावाच लागतो . चतुर्थ भाव हा प्राथमिक शिक्षणाचा आहे . अश्यावेळी जर तृतीय भावाची दशा लागली तर मुले अभ्यास करताना दिसत नाहीत . घराच्या बाहेर बाहेर राहतात , मित्रांच्या संगतीत भटकत राहतात , एका जागी अभ्यासाला बसणे कठीण असते . अश्यावेळी पालक सुद्धा त्रस्त , चिंतेत पडतात . आईवडील एका मुलाला आयुष्यात उभे करायला काय कष्ट करतात ते आपल्यालाच माहिती आहे. बुद्धीची देवता गणपती म्हणून रोज मुलांनी गणपती स्तोत्र म्हंटले पाहिजे .


साधारण पणे मुळात आपल्या अपत्याचे शिक्षण होणार कि नाही त्याला ज्ञान प्राप्ती होणार कि नाही ह्यासाठी पत्रिकेत बुध आणि गुरु हे दोन मुख्य ग्रह बलवान सुस्थितीत असावे लागतात . बुध आकलन आणि गुरु ज्ञान , तसेच पंचम भाव आणि पंचमेश हे सुद्धा बिघडलेले नसावेत . 


अनेकदा शिक्षण चालू असताना अष्टम किंवा व्यय भाव कार्यान्वित होतो तसेच राहूची दशा लागली तर मन मन भरकटत जाते अश्यावेळी जर इंटरनेट किंवा telecommunication , multimedia , digital , photography ह्यासारख्या राहुच्याच क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडला तर अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळते . 


तृतीय भाव हा जाहिरात आणि प्रसिद्धीचा आहे त्यामुळे आता प्रसिद्धी कोण देते बातम्या कोण देते ? वर्तमानपत्रे . मग जर्नालिझम चा कोर्स केला तर ह्या क्षेत्रात उत्तम काम होते . अष्टम भाव हा मृत्यूसम पीडा देणारा आहे मग अष्टम भावाची दशा असेल तर विमा एजंट त्यासंबंधित अभ्यासक्रम करावा . 


एखाद्या कलेत प्राविण्य मिळवायचे असेल तर पुन्हा पंचम भाव आणि पंचमेश तसेच शुक्र मंगल ( खेळासाठी ) उत्तम हवेत .

नोकरीसाठी सहावा भाव महत्वाचा आहे. कारण सहावा भाव म्हणजे आपले रोजचे जीवन आणि तिथे आपले पोट आहे. मंडळी पोटाला भूक लागली कि माणूस आपले कर्म करण्यासाठी घराबाहेर पडतो , कष्ट करून धन अर्जित करतो  आणि आपला उदरनिर्वाह चालवतो . म्हणूनच षष्ठ भाव नोकरीसाठी नेहमी महत्वाचा ठरतो . व्यवसाय करायचा असेल तर रवी धन भाव आणि दशम भाव पाहावा. मंगल सुद्धा महत्वाचा . नोकरी व्यवसाय काहीही करा बुद्धीचा कारक बुध ह्याला विसरून कसे चालेल .


रवी गुरु चंद्र मंगळ आणि दशमाचा संबंध पंचम षष्ठ अष्टम व्यायाशी असेल तर वैद्यकीय क्षेत्र चांगले ठरेल. मंगळ चांगला असेल तर इंजिनियरिंग क्षेत्र , शनी असेल तर रिअल एस्तेट एजंट , शुक्र आणि पंचम असेल तर बुटी पार्लर , एखादी कला , पंचामावरून मुले संतती पहिली जाते म्हणून घरातून शिकवण्या घेवू शकता . षष्ठ भावाची दशा घरातून खाद्य पदार्थांची विक्री करायला उत्तम असते . त्यासाठी चंद्र शुक्र आणि षष्ठ भावाचा कारक सुद्धा पहावा. थोडेसे हे शास्त्र अवगत केले तर सोपे आहे सर्व . 

पोळी भाजी , नाश्त्याचे पदार्थ करून घरोघरी पोहोचवणारे लोक पहिले तर त्यांचा बुध शुक्र चंद्र ( समाजात वावरायचे आहे ) आणि षष्ठ भाव उत्तम असणार .

आयुष्य नेहमी प्रगतीकारक असावे आणि त्यासाठी आपल्या आकलन शक्तीचा सर्वांगीण उपयोग करता आला पाहिजे . 

आमच्या वेळी असे नव्हते हे सगळ्यांना माहित आहे तेव्हा आताची शिक्षण पद्धती वेगळी आहे हे आपण स्वीकारले पाहिजे. आजकाल मुले पास होतात आणि पालक नापास अशीही स्थिती बघायला मिळते . मुलांच्या कलेला वाव मिळाला पाहिजे . कला जोपासतील तर त्यांचे मन सुद्धा साथ देयील . नुसती लाखो रुपये फी भरून आपले कर्तव्य संपत नाही तर मुलांना घरात अभ्यास करायला वातावरण सुद्धा चांगले ठेवावे लागते . आपले प्रश्न विशेष करून आर्थिक त्यांच्यासमोर न बोलणे उत्तम . आपण मुलांचे पालकत्व आपल्याच आनंदासाठी स्वीकारले आहे तेव्हा त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवणे म्हणजे उपकार नाहीत तर आपल्याच जीवनाची इति पूर्तता आहे. त्यांच्यावर  थोडा विश्वास ठेवा ,त्यांच्याशी संवाद साधा मग बघा .

पटतंय का? 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Tuesday, 24 September 2024

यशापयश

 || श्री स्वामी समर्थ ||


माणसाच्या आयुष्यातील यश आणि अपयश ऊन पावसासारखे असते . अनेकदा यशाची खात्री असताना जेव्हा अपयश येते तेव्हा ते पचवता येत नाही . कारण आपण सगळ नेहमी गृहीत धरतो . सगळ्यांनी आपल्याच मनासारखे वागले पाहिजे असे आपल्याला वाटत असते . प्रत्येक गोष्टीत आपल्याच मनाचा विचार झाला पाहिजे , जे हवे ते अगदी नियतीने सुद्धा उपलब्ध करून दिले पाहिजे अशी आपली अपेक्षा नाही अट्टाहास असतो . नेमके इथेच गणित बिघडते .

एकदा यशाच्या पायर्या चढायला लागलो कि पुढे त्या पायर्या फक्त आणि फक्त यशाकडेच नेणार हा आपला भ्रम असतो आणि तो भोपळा फुटतो तेव्हा आपण हतबल असतो. यश अपयश ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्या दोन्हीची चव आयुष्यात चाखायची तयारी ठेवावी लागते . प्रत्येक आईला वाटत असते माझा मुलगा शाळेत पहिल्या पाचात तरी यावा . ह्या आणि अश्या अनेक अपेक्षा आपण आपल्यावर आणि समोरच्यावर आपल्याही नकळत पणे लादत असतो .


आयुष्यात अपयश हे खूप लवकर यावे ह्या मताची मी आहे कारण तेव्हाच आपल्याला यशाची किंमत कळते आणि आपण ते मिळवण्यासाठी अधिक मेहनत करतो . सतत यश मिळत गेले तर मग आलेले अपयश आपल्याला सहज पचवता येत नाही .

केलेल्या मेहनतीला सुद्धा न्याय मिळवून देणारी असते ती आपल्या जन्माची ग्रहस्थिती . अनेकदा आपले अपमान होतात , कष्ट करून धन मिळत नाही , आनंद उपभोगता येत नाही , कुठेतरी काहीतरी राहून गेल्याची उणीव सतत भासत राहते . आणि मग हेच माझे जीवन असणार का असे मनात येणे हे स्वाभाविक आहे. आपले प्रारब्ध आहे ते .

ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज ह्यांच्यासारख्या थोर संतांचे शिक्षण प्रख्यात विद्यालयात झाले नव्हते पण आज त्यांच्या ओव्या आणि दोह्या वर लोक PhD करत आहेत . दिवसातील आठ तास काम करणाऱ्या एकाला महिना १० हजार मिळतात तर दुसरा एखादा त्याच आठ तासात २ लाख सुद्धा कमावतो . आपल्याला जे मिळत आहे ते त्यांच्या कृपेने  आणि त्यात समाधान मानले तर यशापयाशाच्याही खूप पुढे जावू आपण .


आपल्या जे मिळत नाही ते दुसर्याला मिळाले कि त्यातून मग मत्सर , इर्षा , द्वेष ह्या भावना उदयाला येतात पण त्या अर्थहीन असतात . ह्या भावना यशा पर्यंत नेणार नाहीच पण मिळालेले यश सुद्धा टिकू देणार नाहीत . 

आपले मन सतत काश्याच्यातरी मागे धावत असते , अजून पैसा , मोठे घर गाडी , सगळे अजून अजून हवे असते . नेमके कश्याच्या मागे धावत असतो हे आपल्याला सुद्धा समजत नाही . कुठे थांबायचे हेच समजत नसते कारण यशाची धुंदी आणि अपयश पचवायची भीती .

ह्या जीवघेण्या स्पर्धेत मग मत्सर , हेवेदावे येतात आणि अनेक नात्यांना समाधी मिळते . यशाच्या उत्तुंग शिखरावर तो आनंद साजरा करायला मग आपण एकटेच असतो . ह्यासाठी कुठे थांबायचे ते समजले पाहिजे . आता मीही इथेच पूर्णविराम देते .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230






Friday, 20 September 2024

धूम मचाये धूम ( मंगळ वक्री 7 डिसेंबर ते 23 फेब्रुवारी )

 || श्री स्वामी समर्थ ||


ह्या वर्षा अखेरीच्या अत्यंत महत्वाच्या ग्रहस्थिती बद्दल थोडा विचार करुया .ऑगस्ट २६ ला मंगळ ग्रहाने मिथुन ह्या आपल्या शत्रूराशीत प्रवेश केलाय . विचारवंतांच्या राशीतील अक्शन प्लानेट काय  काय करणार आहे ह्याकडे संपूर्ण ज्योतिष जगताचे लक्ष आहे .  मंगळाला आपण सेनापती म्हंटले आहे , समोरच्या शत्रूचा निप्पात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणे ह्यात तरबेज पणा,  धडाडी , जिद्द ,मुत्सद्देपणा , साहस , पराक्रम  ह्यासोबत अनेकदा अविचार, उतावीळपणा ह्यामुळे मंगळ अमंगळ करतो . कुठल्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी वाईट . मंगळ सुस्थितीत असेल तर अश्या व्यक्तीची कार्यक्षमता उत्तम असते बुध हा जितका विचारी तितकाच मंगल अविचारी आणि म्हणून बुधाच्या ह्या राशीत त्याला कसेनुसे होते . बुधाची मिथुन राशी हि राजकुमाराची म्हणजेच एका बालकाची राशी आहे ,कन्या राशीसारखी परीपक्वता ह्यात नाही . बालक हट्टी असतेच त्यात मंगलाची भर म्हणजे बोलणेच खुंटले. पत्रिकेत मिथुन राशीत मंगळ दिसला तर  ती व्यक्ती प्रमाणाबाहेर हट्टी असणारच . मिथुन राशीतील आणि मिथुन नवमांशा तील मंगल अजिबात चांगली फळे देत नाही .  

मंगळ हा पुरुष ग्रह असून तामसी आहे . पापग्रह आहे . मंगळाला भौम म्हणजेच भूमिपुत्र म्हंटलेले आहे . त्यामुळे जमीन जुमला , भावंडे , शेजारी सावत्र आई चे आयुष्यातील अस्तित्वावर बोलतो . मंगळ अत्यंत उतावीळ आहे त्याच्याकडे धीर नाही तर प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अत्यंत अधीर आहे. डोके बाजूला ठेवायचे आणि निर्णय घ्यायचे किंवा बोलायचे ह्यात मंगळ अग्रगण्य असल्यामुळे अनेकदा भांडणे वादविवादाची स्थिती निर्माण होते . सध्या तेच आहे कारण मंगळ बुधाच्या राशीत नाखूष आहे . 

मेदनिय ज्योतिषाचा विचार करता वादळे , मोठे भूकंप आणि त्यात झालेली जीवितहानी , मंगळाच्या हाती शस्त्र असल्यामुळे युद्ध जन्य स्थिती , अतिरेकी कारवाया , मंगळ रक्ताचा कारक त्यामुळे हिंसाचाराचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणारा रक्तपात . ग्रह वक्री झाला कि बलवान होतो आणि त्याची फळे सुद्धा तितकीच त्रासदायक असतात . मंगळ अंदाजे दोन महिन्याच्या काळापर्यंत वक्री अवस्थेत असतो . ह्या काळातील वैयक्तिक स्थरावरील तसेच जागतिक , सामाजिक स्थरावरील स्थिती अभ्यासण्या जोगी असते आणि अभ्यासकांनी ह्या सर्व नोंदी करून ठेवाव्यात .


पृथ्वीपासून कोटी मैल दूर असणारा मंगळ हा पृथ्वीच्या कक्षेजवळ असणारा पण बहिर्वर्ती ग्रह आहे . मिथुन राशीतून मंगळ कर्क राशीत २१ ऑक्टोबर ला प्रवेश करणार आहे . तिथे त्याला नीचत्व प्राप्त होईल . कर्क राशीतच मंगळ ११ अंशावर डिसेंबर 7 रोजी पुष्य नक्षत्रात आणि तुळ नवमांशात वक्री होणार आहे . पुढे वक्री अवस्थेतच २२ जानेवारीला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारी रोजी मार्गस्थ होईल. थोडक्यात ७ डिसेंबर ते २३ फेब्रुवारी ह्या काळात मंगळ वक्री असणार आहे . २१ ऑक्टोबर ला मंगळ कर्क राशीत नीच होत आहे आणि लगेच २५ ऑक्टोबर पासून मंगळाची गती २२ कला होते आहे . कर्क राशीतून मंगळ कुंभ राशीतील शनीवर दृष्टी टाकेल तसेच रवी बुध वृश्चिक राशीत आले कि शनीच्या दृष्टीत असतील . वातावरण असे असल्यावर नामस्मरण वाढवा इतकेच म्हणावे लागेल. शनी मंगळ षडाष्टकात आणि मंगल स्तंभी , वक्री अपघातांचे प्रमाण वाढेल , शस्त्रापासून  भय , आगी लागतील आणि शस्त्रक्रीयांचेही प्रमाण वाढेल . 


मंगळ म्हणजे थोडक्यात Aggression  , उतावीळ पणे घेतलेले निर्णय , जोश होश.  मंगल म्हणजे घातपात  , डोक्यात राग घालून घेणे आणि त्या रागाच्या भारत अविचारी कृत्ये करणे . मंगळ हा अग्नी तत्वाचा तामसी  ग्रह आहे. पेटून उठणारा , अन्याय विरुद्ध दोन हात करताना प्रचंड राग डोक्यात घालून घेणारा . लहान मुल कसे मनाविरुद्ध काही झाले कि जमिनीवर डोके आपटून घेते तसेच . रागाचा उद्रेक हा मंगळ करणार . सामाजिक व्यवस्थेत पोलीस यंत्रणेला सुसज्ज राहावे लागेल. आगी लागणे , भांडणे , प्रचंड मानसिक त्रास , रक्ताच्या संबंधित विकार , बिपी वाढणे , रक्तदोष , शरीरातील ज्वर वाढणे .वेरीकोज वेन्स , डोळ्यांचे आजार , मानसिक ताण त्यामुळे होणारी डोकेदुखी वाढेल . प्रचंड वादविवाद होतील आणि त्यामुळे रागाचा ईर्षेचा उद्रेक होईल . आगी लागतील , स्वयपाकघरात सुद्धा काम करताना सांभाळावे लागेल. जनसामान्यांत प्रक्षोभ , संताप होयील. 

मंगळ वक्री स्तंभी असताना जे परिणाम होतात ते दूरगामी होतात त्यामुळे ह्या काळात वाद टाळा . आपल्या शब्द संपदेचे नको तिथे प्रदर्शन करून नको ती संकटे ओढवून घेवू नका . आपल्याला शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हा उच्च शिक्षण घेतलेले आपले सगेसोयरे , आप्तेष्ट मित्र किंवा इतर कुणीही असोत ह्यांची अक्कल काढू नका म्हणजे मानहानी तरी टळेल . ह्याचे कारण चर्चा करून सामंजस्याने एखादा प्रश्न सोडवावा हा मुळात मंगळाचा स्वभाव नाही . मोठा आवाज करून शिवराळ भाषेत बोलणारा हा सेनापती आहे . काय आहे ते सर्व मलाच समजते आहे इतर सर्व बिनडोक असल्या भ्रमात राहिलात तर आयुष्याच्या सारीपाटावरून कायमचे दूर फेकले जाल . 

मग करायचे काय ? पुढील ६ महिने गप्प बसायचे हीच मोठी साधना आहे , बघा जमतंय का? ह्याचा शब्दशः अर्थ नाही हे मी वेगळे सांगायला नको. भरपूर पाणी प्या . ज्यांना बिपी चा त्रास आहे त्यांनी आगाऊ पणा करून नको तिथे वक्तव्य करायला मुळात जावूच नये आणि मग बिपी वाढले तर बोंबलू नका. स्वतःला आणि कुटुंबाला जपा . सत्तापालट होताना होणारा हिंसाचार , एक घाव दोन तुकडे कुणाच्याच फायद्याचे नसतात .  अत्यंत चक्रम डोक्याची मुले जी घरात कुणाचेही ऐकत नाहीत विशेष करून मिथुन राशीतील मंगळ असेल त्यांच्याकडे जातीने लक्ष ठेवा . 


नैसर्गिक कुंडलीत मिथुन राशी हि तृतीय स्थानात येते आणि ती संवादाची राशी आहे तसेच तिथून डावा कान , कागदपत्रे बघितली जातात . बोलताना , लिहिताना आणि कुठे सही करताना विचारपूर्वक कृती केली पाहिजे . सतत कानात हेड फोन घालून बसू नका . तृतीय भाव हा प्रवास दर्शवतो आणि मंगळ वेग. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल . उगीच अति वेगाने वाहन चालवणे आणि रस्त्यात भांडणे करणे टाळा.

राहू शनी दशा असलेल्या लोकांनी मुळात समाजात कमी वावरावे .काही लोकांचा राजकारण हा श्वास आहे त्यांना २४ तास दुनियादारी करायची असते त्यांना विशेष सतर्कतेचा इशारा आहे. एखादे प्रकरण अंगावर शेकेल आणि कुणीतरी पोलिसात जायील इथवर वेळ आणू नका. व्यक्तिगत कुंडलीत वक्री मंगळाची फळे भोगावीच लागतील ह्यात शंका नाही .  ह्या शास्त्रावर विश्वास नसलेल्या लोकांना आता मंगळ शास्त्र काय चीज आहे ते दाखवेल . पत्रिकेत मंगळ कुठल्या भावांचा कारक आहे , नवमांश बळ ,  षडबल किती आहे. त्यावरील पापग्रहांच्या दृष्टी , दशा आणि लग्न किती बलवान आहे ह्यावर ह्याचे परिणाम आहेत आणि जे होतील ते दूरगामी हे नक्की.  

अनेकदा स्वतःच्या आत डोकावून पहायची वेळ येते ..ती आत्ताच आलेली आहे . शनी वक्री , मंगल वक्री , ऑक्टोबर पासून गुरुही वक्री . मंगळ शनी रिअल एस्तेट एक पावूलही पुढे जाणार नाही . अडथळ्यांची शर्यत आहे . मग काय आपण श्वास घ्यायचा नाही कि काय ? घ्यायचा पण त्यांचे बोट धरून .... साधनेला लागा जे करत आहेत त्यांनी वाढवा ....

कुठल्या शब्दाने कुठले संकट ओढवेल सांगता येणार नाही ....सूज्ञास सांगणे न लगे .

उपाय :

१.  दर मंगळवारी मारुतीला जाऊन त्याच्या पायावर चिमुटभर शेंदूर अर्पण करणे .

२. हनुमान चालीसा नित्य पठण 

३ वारेमाप कष्ट 

४ आवश्यकता नाही तिथे गप्प बस ...सगळी अक्कल तुम्हालाच नाही . जगाची काळजी घ्यायला संत बसले आहेत तुम्ही तुमची काळजी घेतली तरी खूप झाले. . 

५ मंगळ भाऊबंदकी करवेल , आगी लागतील . मनातील मत्सराची ज्योत जितकी मोठी तितकी लक्ष्मी मिळवणे दुरापास्त होयील . शेवटी पैशाची सोंगे आणता येत नाहीत . 

६. मौनं सर्वार्थ साधनं  जे ज्याला समजले तो जिंकला. आपले expert मत प्रत्येक वेळी दिलेच पाहिजे असे नाही . 


सारांश असा कि ग्रहस्थिती बदलत राहणार आहे पण ह्या काळात आपल्या कडून कुणी दुखावले गेले तर पुन्हा जवळीक साधता येयीलच असे नाही . आपल्या स्वभावाला अनेकदा आयुष्यात मुरड घालावी लागते , नाती संबंध जपावे लागतात .

हा आपल्या परीक्षेचा काळ आहे म्हणूनच जो उपासनेची कास धरेल तो ह्यातून पार होणारच .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230







Wednesday, 11 September 2024

गोलार्ध

 || श्री स्वामी समर्थ ||


आपण शाळेत शिकलो आहोत कि विषुवृत्त हे पृथ्वीचे दोन समान भाग करते त्यातील प्रत्येक भागाला आपण “ गोलार्ध “ म्हणतो . अगदी त्याच प्रमाणे जर पत्रिकेचे दोन भाग केले तर प्रत्येक भाग हा ६ भावांचा असेल ज्याला आपण “ गोलार्ध म्हणू.

सूर्य हा पूर्व क्षितिजावर सकाळी ६ च्या दरम्यान उगवतो . स्थानाप्रमाणे काही वेळ पुढे मागे होते . म्हणजे प्रथम स्थानावर रविचे राज्य आहे . पूर्वी क्षितिजावर रवीचा उदय होताना असलेली राशी आपली लग्न राशी असते आणि ज्यांचा जन्म सकाळी अंदाजे ६ ते ८ मध्ये झालेला आहे त्यांच्या पत्रिकेत रवी प्रथम म्हणजेच लग्न भावात असतो . पुढे सकाळी ८ ते १० ह्या वेळेत जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत रवी व्यय भावात स्थित असेल . तसेच १० ते १२ लाभ भावात येयील . अश्या प्रकारे संध्याकाळचे ६ ते ८ हे सप्तम भावात येतील आणि ह्या काळात जन्म झालेल्या बालकाच्या पत्रिकेत रवी सप्तम भावात येयील. म्हणून लग्न भावापासून सप्तम भावापर्यंत उदित गोलार्ध ( काही ग्रंथात ह्या भावाचा अर्धा भाग धरलेला आहे अंशां प्रमाणे ) आणि सप्तम भाव ( अर्धा ) ते धन भावापर्यंत  अनुदित गोलार्ध असतो. 

प्रत्येक गोलार्धातील ग्रह आयुष्यावर विशिष्ठ परिणाम करताना दिसतात. उदित गोलार्धातील ग्रह आत्मविश्वास किंवा उत्तम मनोबल , सकारात्मक विचारसरणी देतील , संकटातून मार्ग काढतील , जिद्द उमेद आणि आयुष्यातील प्रत्येक वळणावर संधी देतील . अनुदित गोलार्ध व्यक्तीला मनाप्रमाणे संधी न मिळाल्याने थोडी पिछे हाट देते तसेच थोडी निराशा , औदासिंन्य देयील. कुणाच्याही विचारांनी हाबी होणार्या ह्या व्यक्ती असतात .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

अतूट नाते

 || श्री स्वामी समर्थ ||




महाराजांचे आपल्या भक्तांशी हृदयस्पर्शी असे नाते असते. सगळ्याच्या पलीकडे असणारे हे अभेद्य असते. शेवटच्या क्षणी ते अशी काही खेळी खेळतात आणि आपल्याला संकटातून पार करतात . न मिळणारे कर्ज , विवाह , मनासारखे घर कुठलीच इच्छा अपूर्ण राहत नाही . स्वामी माझा आणि मी स्वामींचा हे उगीच नाही. ह्या नात्याला नाव नाही ते फक्त अनुभवायचे. काहीही झाले तरी महाराज आहेत हा विश्वास आपल्याला जगवत असतो . महाराजांच्या नुसत्या विचारांनी सुद्धा मनाच्या तारा झंकारु लागतात , जगण्याच्या आशा पल्लवित होतात  , त्यांच्या प्रार्थना , पदे नुसती कानावर पडली तरी मन त्यावर ठेका धरू लागते .  त्यांच्यात मी आणि माझ्यात ते हा दिव्य अनुभव मी कित्येक वेळा घेतला आहे. निराशेचे ढग त्यांच्या अस्तित्वाने उडून जातात . अब जो भी होगा अच्छा हि होगा हा विश्वास मनाला उभारी देतो आणि पुन्हा आपण आपल्या संसारात प्रपंचात रममाण होतो. 


एक वेळ अशी येते जेव्हा त्यांचे असणे आणि नसणे दोन्हीही एकच होते कारण त्यांचे अस्तित्व आपण प्रत्येक क्षणी अनुभवायला लागतो. निर्गुण रूपाचे सगुण रूप कसे आणि कधी रुपांतर होते ते समजत नाही .  हा अनमोल दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या भक्तीची परीसीमा होय . आजवरच्या सेवेची हि पोचपावती समजायला हरकत नाही . महाराजांच्या दर्शनाने मन तृप्त होणे , त्यांच्या शिवाय कुठलाच विचार मनाला स्पर्शून न जाणे , प्रचंड आत्मविश्वासाने कामाला लागणे आणि घेतलेल्या कामाचे सोने करणे हे त्यांचे आपल्या समीप असल्याचे प्रमाण आहे. 

महाराजांची सेवा करायला भाग्य लागते , पूर्व संचित लागते , कुठून तरी सुरवात होणे आवश्यक आणि ती एकदा झाली कि मग आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच आपली आणि आपल्या मनाची अवस्था होते .

भौतिक सुखांची लालसा न सुटणारी आहे पण महाराजांच्या नामातील जादू आपल्याला मोक्षाकडे नेणारी आहे. मनाची शांतात , प्रसन्नता आणि अतीव समाधान फक्त नामातच आहे आणि म्हणूनच अखंड नामाचे महत्व तितकेच आहे . महाराज जादू करणार नाहीत पण आपले दुक्ख हलके करण्याचा मार्ग दाखवतील. परमार्थात रमलेला माणूस शांत जीवनाचा अनुभव नक्कीच घेतो . 

आपण सामान्य माणसे आहोत आणि कधीतरी मन उदास होणार , कधीतरी शंकांचे काहूर मनात उठणार सर्व काही होणार पण तरीही त्यांच्या नामात ह्या सर्वावर हळुवार फुंकर घालण्याचे सामर्थ्य आहे. महाराज हा आपल्या जीवनाचा मोठा आधार आहे. अनेकदा मी व्यथित झाले तर मी नामस्मरण करते आणि माझे मन त्यातून अलगद बाहेर येते . नित्याचे नामस्मरण मुळातच आपल्याला व्यथांमध्ये अडकुनच देत नाही .  


ज्योतिष आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . आकाशातील ग्रहतारे आपल्या पूर्व सुकृता प्रमाणे फळे प्रदान करतात पण , आपल्या आयुष्याचे अध्यात्मिक कवच आपले जगणे सुखकर करते . आयुष्याची सकारात्मक बाजू बघायला शिकवते . अनेकदा धर्मसंकट समोर येते पण योग्य वेळी योग्य तेच घडवून आपले आयुष्य ते नेहमीच मार्गस्थ करतात . 

सदैव भरकटत राहणारे आपले मन जेव्हा साधनेच्या रुपात गुरूंच्या चरणाशी स्थिर होते तेव्हा सगळ्यातून  लक्ष्य बाहेर येवून फक्त आणि फक्त त्यांचेच चरण दिसू लागतात आणि त्यांचे आपले नाते घट्ट झाल्याची पोचपावती मिळते .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 


Saturday, 7 September 2024

पुण्यस्मरण

 || श्री स्वामी समर्थ ||



महाराजांबद्दल काही लिहायचे म्हंटले कि ऊर भरून येतो , लेखणीतून शब्द झरझर बाहेर पण येतात , कसे ते माहित नाही. महाराज म्हणजे आनंदाचा ठेवा . नुसते महाराज म्हंटले कि शेगाव समोर उभे राहते . गेल्या कित्येक वर्षात जग बदलले तसे शेगाव सुद्धा पण महाराजांवरचे आपले प्रेम भक्ती कित्येक पटीन वाढली . शेगाव ला जावून महाराजांची भेट घेणे हा नुसता विचार सुद्धा आनंददायी आहे. तर प्रत्यक्ष भेटीत काय होयील ? 


ज्योतिष शास्त्राचे ग म भ न मी गुरुवर्य  श्री गोगटे काकांकडे शिकले आणि काका तर निस्सीम गजानन भक्त . ते नेहमी म्हणत अस्मिता हे चांद तारे आहेतच आणि तेही आपल्या पूर्व सुकृताचे फळ देण्यास बांधील आहेत पण त्यांच्याही वरती संतांची सत्ता आहे आणि ती अगाध आहे. संतांचे बोट धरलेला भक्त प्रत्यक्ष परमेश्वरालाही प्रिय आहे त्यामुळे संतसेवा कधीही अनाठायी जात नाही . संतांची सेवा करायला सुद्धा पूर्व सुकृत असावे लागते , उभा जन्म सेवेत घालवला तरी कमी पडेल . संतांच्या सहवास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभलेला प्रत्येक भक्त सुखीच राहतो हि निर्विवाद सत्य आहे.  दासगणू महाराजांनी “ श्री गजानन विजय “ ग्रंथ लिहिला. त्यातील एकेक शब्द म्हणजे भक्ती रसाची जणू परिसीमा आहे . 


ऋषी पंचमी हा महाराजांचा महानिर्वाण दिन . पण आजही ते आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही भक्तांना क्षणोक्षणी मिळते आहे. फक्त मनापासून भक्ती आणि श्रद्धा असली पाहिजे . त्यांच्यावर निखळ विश्वास असेल तरच काहीतरी शक्य आहे. ग्रंथात महाराजांनी ज्या भक्तांसाठी केलेल्या लीला वाचल्या तर लक्ष्यात येयील त्यातील प्रत्येक भक्ताने महाराजांवर आपला जीव ओवाळून टाकला होता , समर्पण काय असते ते त्या भक्तांनी दाखवून दिले. उगीच नाही बळीरामाच्या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटली . 

महाराज कुठेही गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत तसे वचनबद्ध आहेत ते आपल्या भक्तांशी . ज्यांनी बारा वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला एका क्षणात पाणी आणले , तुंब्यात फक्त निर्मळ जल आले , गंगाभारतीचा आजार गेला , चंदू मुकिन कडचे महिनाभरापूर्वी केलेले कानवले अगदी तसेच्या तसे राहिले हे चमत्कार त्यांनी आपल्याला काहीतरी शिकवण देण्यासाठी केले. विहिराला पाणी आल्याचे पाहून भास्कर पाटीलाने सर्वस्व त्यांच्या चरणाशी अर्पण करून त्याचा दास होणे पत्करले . मुक्या प्राण्यांवर जिथे त्यांची कृपा झाली तिथे आपल्यावर होणार नाही का? 


गजानन विजय प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काहीतरी देत राहतो . त्यातील प्रत्येक शब्दात आयुष्याचा अर्थ दडलेला आहे . त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती यायला आपल्या भक्तीची खोली सुद्धा तितकीच असावी लागते . दंभ , अहंकार दूर ठेवावा लागतो . महाराज आणि भक्तांमध्ये असलेली हि अहंकाराची भिंत गळून पडते तेव्हाच त्यांची शिकवण समजायला लागते .प्रचीतीविना भक्ती नाही आणि भक्ती शिवाय प्रचीती नाहीच नाही . 

जेव्हा सगळे संपते तिथे त्यांचा खेळ सुरु होतो . भक्तांना ते सदैव सांभाळत असतात . आपण किती केले त्यापेक्षा कसे केले हे महत्वाचे आहे . तिथे मेवा खावून सेवा करणारे विठोबा घाटोळ नको आहेत तर कृष्णाजी पाटील सारखे निस्सीम भक्त हवे आहेत . दासगणू महाराजांनी लिहिलेला प्रत्येक शब्द अनुभवांची खाण आहे. आज महाराज असते तर हे जग कसे असते हा विचार माझ्या मनात नेहमी येतो आणि त्याच्या आसपास मला अशी काही प्रचीती मिळते कि मी मनोमन काय ते समजते . महाराज हि दिव्य शक्ती आहे , अवलोकनाच्या बाहेरची आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते ..


दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती ..

गजानना गजानना सांभाळ आपल्या भक्तजना ...

समर्थ सद्गुरू श्री  गजानन महाराज कि जय ....


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Thursday, 5 September 2024

तुज मागतो मी आता

 || श्री स्वामी समर्थ ||

भाद्रपद मनावर दस्तक देतो आणि वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे , कधी एकदा डोळेभरून त्याला पाहतो असे प्रत्येकाला झालेले असते .  ह्या विघ्नहर्त्याच्या आगमनाची ओढ चराचर सृष्टीला लागलेली असते .  आपले गणपती बाप्पा माझ्या बालपणीच्या स्मृती नेहमीच जागृत करतात . आम्ही लहान असताना तर अगदी घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना होत असे. आम्ही बाळगोपाळ मंडळीही खूप होतो पण जिथे आवडीचे प्रसाद तिथे आमचा मोर्च्या आवडीने जायचा . आरत्या पाठ नसायच्या मग त्यावरून ओरडा आणि धपाटे सुद्धा मिळायचे.

आज रस्त्यावरून फेरफटका मारताना मूर्तिकार गणपतीच्या सुंदर मूर्तीं साकारताना दिसत आहेत . ज्यांना हि कला अवगत आहे त्यांच्यावर ह्या सिद्धिविनायकाची केव्हडी कृपा असेल हा विचार मनाला नकळत स्पर्शून जातो.

दर वर्षी आपल्याला बाप्पा भेटायला येतात . कोकणात आपल्या घरी जाण्यासाठी ट्रेन , बस जे मिळेल त्यांनी जाण्यासाठी भाविक उत्सुक असतात . कोकणातील आणि शहरातील गणेश उत्सवाचे  चित्र अर्थात थोडे वेगळे असतेच . गणेश चतुर्थीच्या निम्मित्ताने शाळांना सुट्टी असते त्यामुळे मुलेही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत हातभार लावतात . प्रत्येक जण देहभान विसरून गणेशमय झाल्याने हा उत्सव नसून त्याला सोहळ्याचे स्वरूप येते .

गणपतीची प्रतिष्ठापना , त्याची षोडशोपचारे केलेली पूजा आणि नेवैद्य घरातील वातावरणाला चारचांद लावतात. तनमन अर्पण करून त्याची मनोभावे पूजा केली तर तो आपल्याला चांगली बुद्धी देतो असे आजी लहानपणी गोष्टी सांगताना म्हणायची . बाप्पाला हात जोडले कि मगच अभ्यास येतो आणि मार्क चांगले मिळतात हे सांगताना कुठेतरी श्री गणेश हे आपले दैवत आहे आणि त्याचे पूजन आयुष्य बदलून टाकते हेच बाळकडू पाजले जात असे.

आधुनिक काळात ह्या उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे . टिळकांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे आणि एकजूट वाढावी म्हणून गणेशोत्सव सुरु केला पण त्याचा मूळ उद्देश आज लोप पावलाय हि वस्तुस्थिती आहे. आजचा गणेशोत्सव म्हणजे मोठमोठे मांडव , कर्कश्य वाजणारे संगीत , हिडीस नाचगाणी , पैशाचा अपव्यय , मानहानी , मोठेपणा आणि बरच काही आहे.

सिद्धीविनायकाचा महिमा खरच आपल्याला समजलाय का? प्रत्येक शुभ कार्याची सुरवात आपण श्री गणेशा पासून करतो अगदी प्रत्येक वेळी “ श्री गणेश “ लिहून आरंभ करतो . गणेशाची आराधना आपले आयुष्य समृद्ध करते , आपल्याला चांगली बुद्धी देवून कुशाग्र बनवते आणि म्हणूनच लहान मुलांवर आपण गणपती स्तोत्र , गणेश वंदना , अथर्व शीर्ष म्हणण्याचे धडे गिरवायला सांगून हिंदू संस्कृतीचे जतन करतो . पण हे सर्व करत असताना त्याचा अर्थ समजून घेतो का? मुले घरात अथर्व शीर्ष म्हणतील आणि बाहेर जावून मिरवणुकीत नाचतील , मग काय समजले आपल्याला ह्या उत्सवाचे मोल आणि मर्म ? काळ बदलला आहे हो ह्या गोंडस संज्ञेखाली आपण काहीही चालवून घेत आहोत . इतके मोठे कर्कश लाउड स्पीकर , वेळप्रसंगी सरकारने घातलेले नियम मोडून सुद्धा चालू असतात . कुणी आजारी आहे , लहान मुले आहेत त्यानाही त्रास होतो आहे ह्याचे भान कुठे आहे ? ११ दिवस आपल्या मंडपात गुपचूप हे सर्व सहन करणाऱ्या मोरेश्वराला कधीतरी आपण विचारले का? बाबारे तुला हे सर्व आवडतंय का? तुला त्रास होतोय का? तुझ्या कानठळ्या बसतात का? अहो तो हे सर्व बघून मनात म्हणत असेल सर्व भक्तांना भेटायला आलोय खरा त्यांच्यासोबत जरा दोन शब्द निवांत बसून शिळोप्याच्या गप्पा मारीन पण कसले काय आता जाताना बहिरा नाही झालो  म्हणजे मिळवले.

टिळकांचा उद्देश सोडा आता तर ह्या उत्सवाचे हिडीस स्वरूप पाहून हा निव्वळ धंदा झालाय असेच वाटू लागले आहे. श्री गणेशावर प्रेम सर्वांचे सारखेच आहे मग सगळ्यांनी एकाच रांगेत दर्शन घ्या कि , गणेशाला काय आवडते , प्रार्थना , सुकून , भक्ती पण आजच्या उत्सवात खरच दिसते का ती आपल्याला? खरतर गणपती स्तोत्र शाळेच्या प्रार्थने बरोबर म्हंटले गेले पाहिजे निदान महाराष्ट्रात तरी . इतिहास भूगोल ह्यासोबत आपल्या संस्कृती ,आपल्या हिंदू देवदेवतांची माहिती आणि त्यांचा इतिहास , त्यांचे आपल्या हिंदू संस्कृतीत असणारे असामान्य महत्व ह्याची माहिती देणारे विशेष सत्र अगदी पहिली पासून सुरु केले पाहिजे .

मोरेश्वराचा हा उत्सव म्हणजे फक्त नाचगाणी , प्रसाद , मोठेपणा , पैशाचा अपव्यय नाही तर त्याहीपलीकडे खूप आहे हे लक्ष्यात ठेवले पाहिजे . त्याचे आपल्या आयुष्यातील आणि हृदयातील स्थान समजून घेतले पाहिजे . प्रत्येक मुलाला गणपती स्तोत्र , अथर्वशीर्ष यायला हवे , गणपती बुद्धीची  देवता आहे . आपली बुद्धी आज कुठे खर्च होत  आहे ? फाटक्या तोडक्या कपड्यात देहप्रदर्शन करण्यात ? . चोवीस तास मोबाईल मध्ये डोके खुपसून बसायचे, घरातील सकस अन्न सोडून बाहेर पिझ्झा बर्गर खात पाश्चिमात्य संस्कृतीचा पुरस्कार केल्यासारखे वावरायचे हे आवडेल आपल्या गणरायाला . गेल्या वर्षी आलो होतो त्याही पेक्षा ह्या वर्षी अजूनच भयंकर स्थिती आहे आणि हे सर्व मी उघड्या डोळ्याने पाहत आहे असाच तर विचार बाप्पा आपल्या मनात करत नसेल ना? तो तुम्हाला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतोय पण ह्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजात त्याचे शब्द आकाशातच विरून जात आहेत , ते आपल्यापर्यंत पोहोचताच नाहीत हे आपले दुर्दैव आहे.

बाप्पाचा उत्सव आहे मग त्याला काय आवडते ? त्याला काय हवे आहे ? आपल्याला काय सांगण्यासाठी तो ११ दिवसा आपल्यात आलाय ? त्याला कधी विचारायचे कष्ट घेतले का आपण  ? ह्या ११ दिवसात कधी त्याच्यासोबत त्याचा हात धरून मनातले बोललो ? संवाद साधला ? त्याच्या कडे निदान क्षणभर तरी मनापसून पाहिले ?नाही .  

सगळ्याचा बाजार मांडलाय आपण त्यात देवानाही सोडले नाही . सगळीकडे असे असतेच असे नाही . काही संस्कृतीत मंडळे आपली संस्कृती , परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात , कुठे मोदक करण्याच्या स्पर्धा तर कुठे अथर्वशीर्षाचे एकत्रित कार्यक्रम सुद्धा होतात , कुठे शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप होते . फक्त त्याचे प्रमाण हवे तितके नाही , जे वाढले पाहिजे . पाश्चिमात्य संस्कृती अजिबात वाईट नाही त्यांच्याकडून घेण्यासारखी असंख्य गोष्टी आहेत जसे त्यांची शिस्त , स्वछ्यता , कष्ट पण आपण ते घेत नाही . घेतो तर काय पिझ्झा , बर्गर . मोदक म्हणायला लाज वाटते पण मोमोज म्हणायला अगदी proud feel होते .

इतक्यावर थांबत नाही , ज्याची आराधना गेले ११ दिवस केली त्याची पाठवणी करताना शुद्धीत नसतो आपण . गणेशाचे विसर्जन हा सुद्धा मानाचा असतो , शास्त्रसुद्ध प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन होणे आवश्यक असते नव्हे तो गजाननाचा हक्क आहे पण आपण त्याच्या मूर्तीवर विसर्जनासाठी चक्क पाय देवून नाचतो त्याला पायाखाली तुडवतो .हृदय चिरून टाकणारी हि दृश पाहता गेल्या अकरा दिवस केलेली भक्ती अश्रूंच्या रुपात डोळ्यातून वाहून जाते . पुढील वर्षी न येण्याचा निर्णय त्याने घेतला तर तो आपल्याला कितीला पडेल विचार करा ?

सृष्टीच्या निर्मात्याचे लक्ष आहे आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक कर्मावर . त्याचे येणे आपल्याला ज्ञान , बुद्धी , समाधान देणारे आहे . आज आपले जीवन अनेक त्रासातून जात आहे पण ह्या गणेशोत्सवाच्या निम्मित्ताने ११ दिवस आपण आपले दुक्ख विसरतो , आपल्या आप्तेष्टांना भेटतो , त्याच्या सेवेत राहतो पण ती सेवा करताना खरा शुद्ध भाव अपेक्षित आहे , ह्या हिडीस , किळसवाण्या प्रकारांची खरच गरज आहे का?

खरे सांगा किती जणांना गणेशाची सगळी नावे पाठ आहेत ?  नुसते म्हणायचे म्हणून स्तोत्र म्हंटली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही . इतके उत्सव आले आणि गेले पुढेही होत राहतील पण ह्यात आपण किती बदललो , मला काय मिळाले ? मी विचारांनी किती प्रगल्भ झालो ? मी समाजाला काय दिले आणि माझ्या लाडक्या बाप्पाच्या चरणाशी मी काय अर्पण केले ? हे प्रश्न स्वतःलाच विचार बघा उत्तरे मिळतात का?

आम्हाला तो दर वर्षी बुद्धीच देतो पण कसली ? लहान मुले पळवून विकण्याची ? स्त्रिया आज खरच सुरक्षित आहेत ? स्त्रियांवरचे अतिप्रसंग रोज घडतात , वृद्धाश्रमांचे प्रमाण आज वाढले आहे , तिथे चक्क वेटिंग असते , व्यसनाधीनता , आजार ह्यांचेही प्रमाण वाढत आहे . विवाह संस्था आणि एकंदरीत सामाजिक स्थिती कोलमडत चालली आहे. हे सर्व बघून बाप्पा सुद्धा मनात खिन्न होत असावा . आपल्याला तो देत असणार्या सुबुद्धीचा उपयोग करून आपले आणि सर्वांचे आयुष्य मार्गस्थ करण्याची जबाबदारी आपल्यातील प्रत्येकाची आहे. चला तर मग सुरवात करूया स्वतःपासून .

भारतीय संस्कृती चा आपल्याला नक्कीच अभिमान आहे आणि सप्त खंडात  त्याचा जयघोष सुद्धा आहे .  आपल्या देवदेवतांचा जीवन जगण्यासाठी आधार आहे. हा वारसा आपल्याला पुढील पिढीकडे देताना , आपल्या संस्कृतीत असलेल्या सर्व गोष्टींचा अर्थ त्यांना समजला तर ते अधिक मनापासून करतील. हे ११ दिवस केलेली उपासना पूर्ण वर्ष आपल्याला सांभाळणार आहे .

आज धकाधकीच्या जीवनात मनुष्याला नोकर्या , घर इतके प्रश्न समोर उभे आहेत , त्यातून मार्ग काढण्यासाठी मिळणारी शक्ती आणि बुद्धी आपल्याला बाप्पाच देणार आहे.

येणारा गणेश उत्सव सर्वाना सकारात्मकतेचा , सद्बुद्धी प्रदान करणारा , एका उत्तम आयुष्याकडे वाटचाल करणारा , प्रापंचिक अडचणीतू मार्ग दाखवणारा आणि भक्तिमार्गा  कडे नेणारा ठरावा .  आधुनिकतेच्या नावाखाली बदललेले उत्सवांचे स्वरूप आपल्या विचारांचेच प्रतिबिंब आहे , जे बदलणे गरजेचे आहे तुमच्या आमच्या आणि संपूर्ण मानवजातीसाठी .

तुझ्याच प्रेरणेने हे लेखन केले आहे, काही कमी अधिक असल्यास पोटात घे आणि सर्वाना समाधान , सद्बुद्धी आणि आनंद दे.

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tuesday, 3 September 2024

सोळा आणे खरी भक्ती

|| श्री स्वामी समर्थ ||


आज सकाळी फुले आणायला गेले होते . एका मुलाकडे त्याच्या टोपलीत मस्त चाफा होता . फुले घेतल्यावर सहज त्याला विचारले कि हि सगळी फुले उद्यापर्यंत  टिकणार नाहीत मग आज सगळी विकली गेली नाही तर काय करता ? त्यावर त्याचे चमकणारे डोळे बोलू लागले. “ ताई , मी जेव्हा फुले विकत घेतो तेव्हाच मनात विचार करतो कि हि सर्व फुले कुठल्या तरी देवाच्या चरणावर वाहिली जाणार आहेत आणि त्याच विचारांनी फुले विकायला बसतो. संध्याकाळ पर्यंत विकली जातात फुले  “ आई शपथ्थ किती विश्वास आहे ह्याच्या मनात , देवावर संपूर्ण श्रद्धा . हे सांगताना त्याच्या डोळ्यात विलक्षण चमक आणि रोमारोमात , देहबोलीत सकारात्मकता होती . काय जबरदस्त विश्वास त्या मुलाकडे होता तो पाहून मी स्तंभित झाले. प्रचंड विश्वास आणि भक्तीची परिसीमा आहे हि . नाहीतर आपण ,इतक्या सुखात , ऐशो आरामात राहतो पण लहान सहान गोष्टीत चिंता करतो , डिप्रेशन सारखे मोठ मोठे शब्द वापरून आपल्या अगदी चिमुकल्या संकटाना सुद्धा मोठे रूप देतो , अगदी राईचा पर्वत करतो. आपली करावी तितकी कीव कमीच आहे. 


आज हा चिमुकला मला विठू रायाच भासला .  सगळे अध्यात्म एका शब्दात शिकवून गेला. महाराजांच्या सेवेत आणि त्यांना समजण्यात लेका सगळ्यांना मागे टाकलेस तू असे म्हंटले तर वावगे होणार नाही कारण त्याला देव समजलाय . संध्याकाळपर्यंत एकही फुल उरणार नाही ,अगदी त्याच प्रमाणे महाराजांच्या सेवेत राहिल्याने माझ्या दुक्ख संकटांची होळी होणारच हा विश्वास आपल्या का नाही मनात येत ? येणार हे वाचून आजपासून माझ्या सकट सगळ्यांच्या मनात येणार आणि त्या विश्वासानेच मी ह्या चार ओळी लिहिते आहे. 


हातावर पोट घेवून जगणारा हा चिमुकला मला “ जगायचे कसे ??? “ हेच शिकवून गेला . त्याला माझा सलाम आहे.

गणपती बाप्पा मोरया....

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


सुखी सहजीवनाची ग्रहस्थिती

 || श्री स्वामी समर्थ ||


विवाह कधी होईल ,जोडीदार कसा असेल ह्या सर्व प्रश्नांपेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझे वैवाहिक सौख्य कसे असेल हा आहे . विवाहाच्या वेळेची स्थिती सर्वार्थाने तीच कशी राहील ? ती बदलत राहणार . आयुष्यात अनेक वळणे येणार आणि त्यातूनच एकमेकांना सावरत पुढे जात राहणार . बर्याच लोकांना उत्तम वैवाहिक सौख्य लाभते तर काहीना ह्यातून दुक्ख आणि निराशा पदरी येते. तडजोड करत विवाह टिकवणार्या लोकांची संख्या हि अधिक आहे. वैवाहिक सौख्य बघताना खालील गोष्टींचा विचार करुया.

विवाह हा अनेक कारणांनी केला जातो . अनेकदा सगळे करतात म्हणून , घरच्यांनी आग्रह केला म्हणून , मला स्वतःलाही जोडीदार हवा , सहजीवन हवे संसाराची आवड आहे म्हणून , अनेकदा घरात आईवडील वयस्कर आहेत त्यानाही बघायला कुणी नाही . पत्नी निवर्तली मग मुलांना कोण पाहणार म्हणूनही विवाह केला जातो . वरील सर्व कारणे ह्या ना त्या प्रकारे पटणारी आहेत . 

ज्योतिषीय ग्रहस्थितीचा विचार केला तर शुभ ग्रहांचा धन भाव आणि सप्तम भाव तसेच पंचम लाभ ह्या भावांवर असलेला प्रभाव सुखी जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत करेल हे नक्की. सप्तम भाव हा प्रामुख्याने आपल्या जोडीदाराचा आणि दोघात असलेल्या मानसिक अनुबंधाचा आहे तिथे शनी मंगल राहू केतू उपयोगाचे नाहीत . तिथे चंद्र शुक्रासारखे सौम्य आणि ज्ल्तात्वाचे रसिक ग्रहच हवेत तरच संसाराची वेल बहरेल. 

अभ्यासकांनी खालील ग्रहस्थितीचा पत्रिका मिलनासाठी अवश्य अभ्यास करावा .


सप्तमस्थान – पापकर्तरी योगात आहे का ,कुठल्या ग्रहांच्या दृष्ट्या आहेत .

सप्तम स्थानातील ग्रह –ते कुठल्या ग्रहांच्या युतीत आहेत आणि कुणाच्या नक्षत्रात आहेत .सप्तमेश कुठे आहे आणि कुणाच्या दृष्टीत युतीत आहे. 

विवाहाचा कारक ग्रह शुक्र सगळ्यात महत्वाचा आहे . त्याची स्थिती लग्न कुंडली आणि नवमांश कुंडलीत अत्यंत महत्वाची आहे.

लग्न भाव आणि लग्नेशाची स्थिती अभ्यासा. लग्नेश आणि सप्तमेशाचे काय योग आहेत ते तपासा. 

सप्तम स्थानातील ग्रहांचे सप्तमेशाशी ,शुक्राशी आणि इतर ग्रहांशी होणारे योग.

पत्रिकेतील रवी चंद्र मंगल आणि शुक्र त्यांचे परस्परांशी योग आणि सप्तमेशाशी योग महत्वाचे आहेत .

सप्तम स्थानासोबर लग्नस्थान कारण ते सप्तमाचे सप्तम आहे, धनस्थान जे कुटुंब स्थान आहे. षष्ठ स्थान हे सप्तमाचे व्ययस्थान आहे आणि व्यय स्थान जे सप्तम स्थानाचे षष्ठ स्थान आहे.

थोडक्यात १ २ ६ ७ ८ आणि १२ ह्या स्थानांचा विचार आवश्यक आहे. २ ६ ८ १२ ह्या स्थानांमध्ये जर पापग्रह असतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळत नाही . 

स्त्रियांच्या पत्रिकेत रवी मंगळ तसेच पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र शुक्र ह्यांचा अभ्यास केला पाहिजे . नवमांश पत्रिकेत ग्रहांचे बळ बघा त्याशिवाय निष्कर्ष काढू नका .

पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती जसे पितृदोष ,कालसर्पदोष , वैधृती योग, विष्टीकरण.

सप्तमस्थान हे शुभ कर्तरी योगात असेल तर उत्तम . सप्तम स्थान जितके शुभ तितके संसार सुख आणि सहजीवन उत्तम .

सप्तम स्थानात चंद्र ,शुक्र हे  स्त्रीग्रह बलवान राशीत किंवा शुभ नक्षत्रात असतील.

सप्तमेश शुभ स्थितीत असेल ,लग्नात ,चतुर्थात ,पंचमात , सप्तमात , नवमात ,दशमात किंवा लाभात , स्व किंवा उच्च नवमांशात ,शुभ नक्षत्रात , मित्र ग्रहांच्या युतीत , दृष्टीत असेल तसेच सप्तमेश मार्गी असेल  तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते . अश्या स्थितीत सप्तमेश हा बलवान होतो . 


सप्तमेशावर ,सप्तम स्थानावर ,शुक्रावर गुरूची दृष्टी असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते. 

लग्नेश आणि सप्तमेशाचा जर नवपंचम योग , लाभ योग ,राशि परीवर्तन योग असेल आणि लग्नेश बलवान असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते.

सप्तमेश , लग्नेश ,शुक्र ह्यांच्यासोबत शनी राहू मंगळ ह्यांचे शुभ योग होत असतील तर वैवाहिक सौख्यात अडचणी येत नाहीत.

२ ४ ६ ८ १२ ह्या स्थानात जर शुभ ग्रह असतील किंवा पाप ग्रह फारसे नसतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते .

विवाह वेदीवर चढताना आपला हा विवाह हे आयुष्यातील सर्वोत्तम सुख आहे आणि काहीही झाले तरी मी ते टिकवणार हा दृढ निश्चय मनाशी करून विवाह केला तर समस्या येतील आणि जातील,  मार्ग मिळेल आणि संसाराची घडी सुद्धा निट बसेल. आयुष्यात सहजीवन महत्वाचे आहे . दोघेजण नुसते भाजी कोथिंबीर घ्यायला एकत्र गेले तर त्यात आनंद आहे कारण एकच “ ती दोघे एकत्र आहेत “ . सहवास सगळ्यात महत्वाचा आहे. बोलायला भांडायला सुद्धा आपलेच माणूस लागते . फार ताणून धरू नका. चिकित्सक वृत्ती शेवटी आपल्यालाच एकटे ठेवते . सर्व गुण संपन्न इथे कुणीही  नाही. प्रत्येक आईवडिलांनी एकदा आपल्या पाल्याला त्याचा चेहरा आरशात बघायला सांगावा त्यांची उत्तरे त्यांनाच आपसूक मिळतील.

सहजीवनाचा आनंद सर्वात मोठा आहे आणि त्यासाठी थोडी तडजोड करण्याची वृत्तीही असावी , नाहीतर हे सर्व इथेच राहील वास्तवात कधीच उतरणार नाही. सर्वाना आपापल्या पसंतीचा जोडीदार मिळूदे आणि सर्वांचे सहजीवन स्वामींच्या कृपेने बहरत , फुलत राहूदे हीच सदिछ्या .

सौ. अस्मिता दिक्षित

संपर्क : 8104639230






Monday, 2 September 2024

“ Click “ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय ?

 || श्री स्वामी समर्थ ||

आज लग्न हा यक्षप्रश्न झालेला आहे. आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता कधी पडतील ह्याची अक्षरशः चातकासारखी वाट पालक बघताना दिसत आहेत . सुस्वरूप आहे , निर्व्यसनी आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मग घोडे अडतंय तरी कुठे ह्यामुळे पालक सुद्धा त्रस्त झालेले आहेत . “ काय ठरले का मुलाचे / मुलीचे लग्न ? “ हा प्रश्न मनापासून असो अथवा खवचट पणे विचारला गेलेला असो , तो विचारणे आता बंद झाले पाहिजे . काय आहे तुमच्या भावना कितीही चांगल्या असतील पण घेणारा आता ह्या प्रश्नांनी सुद्धा त्रासला आहे. विवाह ठरला कि तुम्हाला नक्की बोलावणार मग कश्याला विचारायचे? ह्यावर विचार नक्की करा .

अनेकदा मुलगा / मुलगी मला click म्हणजे पसंत पडत नाही म्हणून स्थळ नाकारले जाते. आजकाल तर फोन उचलत नाहीत , नकाराची साधी कारण सांगत नाहीत अशी अनेकविध कारणे सुद्धा ऐकायला मिळतात . त्याला मुलगी आवडायला हवी असे जेव्हा पालक म्हणतात त्याच वेळी लक्ष्यात येते कि स्थळाच्या पसंतीत पालकांचा सहभाग किंवा त्यांचे मत हे किती अंशी असणार आहे. आज विवाहाची वये पाहता हि पिढी संपूर्णतः अविवाहित राहणार कि काय अशी भीती वाटू लागलेली आहे. असो. 

आपल्याला “ click” झालेली मुलगी म्हणजे नेमके काय ? तिचे दिसणे , हसणे अर्थात बाह्य रूप . ती जरा सर्वसाधरण आहे कि modern लूक ची आहे ? थोडक्यात तिची देहबोली आणि रंगरूप . जो चेहरा रोज आयुष्यभर पाहायचा तो आपल्या पसंतीचा हवा हे नक्की पण फक्त दिसणे , हसणे , कपडे आणि so called modern look हाच पसंतीचा जर निकष असेल तर मात्र आपला निर्णय चुकू शकतो कारण आपण व्यक्तीचे गुण पहिलेच नाहीत फक्त बाह्यरुपावर निर्णय घेवू पाहत आहोत . रंग रूप शाश्वत नाही. पसंत पडलेले स्थळ अगदीच प्रथम दर्शनी नाहीच आवडले कि मुलगी खूप जाडी आहे आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही तर तिथेच थांबा . पण इतर वेळी मुलीला / मुलाला भेटा. एकमेकांचे विचार जाणून घ्या . समोरच्या व्यक्तीचे अनेक चांगले पेहलू जे संसार करण्यासाठी उपयुक्त ठरतील ते त्या भेटीत उलगडतील आणि एक चांगले स्थळ आपण नाकारले नाही याची खंत वाटणार नाही . 


प्रत्येक्ष भेट महत्वाची आहे. लहान सहान गोष्टीत सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी समजतात . आजकालची मुले मुली तितकी समंजस नक्कीच आहेत . पण त्यात आता थोडे पालकांनी त्यांचे मत सुद्धा मांडले पाहिजे , आपल्या मुलांचे हित त्यानाही समजते . दर दोन दिवसांनी मुले स्थळे नाकारत आहेत तर ती का? हाही अभ्यासाचा विषय बनला आहे आज पालकांसाठी .

आर्थिक म्हणजे मिळकत हा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण तो नेहमी तसाच राहणार नाही वाढतच जाणार आहे. पण त्याच सोबत आपले वय सुद्धा वाढणार आहे हेही विसरता उपयोगी नाही . आपल्याला आयुष्यात हौसमौज करण्याची , फिरण्याची , मजा करण्याची सगळे उमेदीची वर्ष निघून जात आहेत त्याचाही विचार केला पाहिजे . आपापले so called attitude बाजूला ठेवले तर अनेक विवाह असेच जुळून येतील .विचार करा पालक आणि पाल्यांनी सुद्धा. 


ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून गुणमिलन , ग्रहमिलन केले तर संसारिक आयुष्याची दिशा नेमकी काय ती ठरवता येयील. हे शास्त्र तुमच्या सदैव मदतीला आहे. पुढील चांगल्या वाईट गोष्टींचे सुतवाक्य करणारे हे शास्त्र तुम्हाला मार्गदर्शक ठरेल ह्यात वादच नाही .

आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी जसे बाळाचे नामकरण , मुंज , विवाह अश्या मंगल कार्यासाठी तसेच  घराचे वास्तु शांतीचे मुहूर्त ह्यासाठी आपण ज्योतिषाची मदत घेतो . पूर्वापार चालत आलेले गुणमिलन हे करतो पण आज काळाची गरज ओळखून ग्रहमिलन हे सुद्धा करायला पाहिजे . पूर्वी मुलगी नोकरी करते का ? हा प्रश्नच नव्हता कारण तेव्हा स्त्रिया चूल आणि मुल ह्यातच गुंतलेल्या होत्या , किबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित होते . आजचे प्रगत युग आहे , वैचारिक स्वातंत्र  आहे .तरीही आजही आपल्या समाजाची पाळेमुळे हि रूढी आणि परंपरा मान्य करणारी असल्यामुळे बहुतेक विवाह हे पत्रिका बघूनच जुळवले जातात . शेवटी सर्व गोष्टी जुळून येणे म्हणजेच मनोमिलन होय .

गुण मिलनाचे निकष लावताना डोळसपणे लावले पाहिजेत कारण हे गुणमिलन आणि त्याचे नियम हे प्राचीन काळापासून आहेत जेव्हाची समाज व्यवस्था आणि काळ हा वेगळा होता . एक नाड दोष ह्यावरून स्थळे नाकारली जातात पण एक नाड असेल आणि नक्षत्राचे चरण वेगळे असेल तर तो दोष मानला जात नाही तसेच एक नाड असेल तर शास्त्रात त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या तपासून न बघता स्थळ नाकारू नये .

सर्वात मुख्य म्हणजे दोघांच्या सद्य स्थितीतील महादशा काय सांगत आहेत आणि पुढे येणाऱ्या सुद्धा बघितल्या पाहिजेत कारण शेवटी दशा महत्वाच्या आहेत त्याच प्रमाणे विवाह योग निर्माण करणारे गोचरीचे योग , त्यांना डावलून कसे चालेल. अनेक योग येतात आणि जातात पण जेव्हा अति प्रखर योग येतो तेव्हा विवाह ठरतो आणि होतो सुद्धा.

वैवाहिक सुख , एकंदरीत आयुष्यातील अर्थार्जन , संतती होणार का? आणि स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या बाबी तपासण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास उपयोगी पडतो . थोडक्यात सहजीवन कसे असेल ह्याचा वैयक्तिक अभ्यास करून मग ग्रह मिलन करावे . त्यात आपल्याला दोघाचेही विचार करण्याची वृत्ती आणि क्षमता समजते . मानसिक दुर्बलता किंवा सक्षमता हेही समजते तसेच एखाद्या समस्येशी दोन हात करण्याची वृत्ती , संसाराकडे असलेली ओढ दिसून येते म्हणून गुण मिलन अति अति महत्वाचे आहे . उद्या मुले झाली कि त्यांची आजारपणे आहेत त्यांचे संस्कार आहेत , शिक्षण आहे हे दोघांनीही पहिले पाहिजेत . स्त्रीने जन्म दिला म्हणून ती तिची एकटीची जबाबदारी नाही तर दोघानाही समान वाटा सगळ्या प्रश्नात असायला हवा तो असणार आहे का ? प्रत्येक वेळेस मला काम आहे हे उत्तर चालणार नाही कारण काम तिलाही असते किबहुना काकणभर जास्तीच असते . ह्या सर्वाची मानसिकता दोघांच्या भेटीत समजेल पण पत्रीकेतील ग्रह  बोलतील तेव्हा अनेक गोष्टी अधिक सुस्पष्ट होतील.

एखादा मुलगा जर खूप करिअर करणारा असेल व्यवसायात बुडून गेलेला असेल तर तो बायकोच्या मागे पिंगा घालणार नाही  आणि तिची नेमकी तीच अपेक्षा असेल म्हणजे नवर्याने गजरा आणावा वगैरे मानसिक दृष्टीने तिला तसे वाटते पण ते तर त्याच्याकडून पूर्ण होत नसेल तर मग दोघांच्यात एक मानसिक दरी निर्माण होते आणि काही काळाने ती मोठी होत जाते. अर्थात गजरा आणणे हेच प्रेमाचे द्योतक नाही पण मानसिक दृष्टीने पहिले तर अनेकदा स्त्रिया तेच तेच धरूनही ठेवतात . त्यामुळे दोघांच्यात प्रत्येक गोष्टीत असणारा समंजस पणा कित्येकदा संसारात पदोपदी असायला लागतो कारण संसार शेवटी त्या दोघांचाच असतो . स्वतःच्याकडून पत्नीकडून असलेल्या अपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील प्राधन्य असणार्या गोष्टी करिअर पैसा सर्व गोष्टी मोकळेपणाने उघड बोलल्या गेल्या पाहिजेत .

म्हणूनच आजकाल “ click  “ झालेले स्थळ हे सर्वार्थाने “  click “ होण्यासाठी वरती नमूद केलेले सर्व परामर्श तपासले पाहिजेत आणि त्यात बहुतांशी अपेक्षा ( सगळ्या पूर्ण होणार नाहीत कारण आपणही परिपूर्ण नाही ) पूर्ण झाल्या तर स्थळ खर्या अर्थाने “ click “ होईल. 

मुळात विवाह करण्याची मानसिकता तयार व्हावी लागते कारण हि एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे . विवाह उत्सुक सर्वाना खूप शुभेछ्या आणि त्यांचे विवाह लवकर जुळून यावेत ह्यासाठी महाराजांकडे अंतर्मनापासून प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230