Monday, 10 August 2020

गंध श्रावणाचा

||  श्री स्वामी समर्थ ||


इंद्रधनुष्याचे विलोभनीय रंग


निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. निसर्गाचे आपल्याशी अतूट नाते आहे. वसंत, ग्रीष्मात झाडांना नवीन पालवी फुटते आणि वृक्ष डेरेदार होतात कारण ह्याच काळात सूर्यकिरण प्रखर होतात आणि अश्या वेळी हे बहरलेले वृक्ष आपल्याला सावली देतात .तसेच शिशिरात थंडीचा मौसम असल्याने सूर्यकिरणे आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी  कात टाकल्याप्रमाणे झाडांची पाने गळतात. विधात्याने सर्व कसे अचूक केले आहे कुठेही चूक नाही. तर अश्या ह्या श्रावण  मासात निसर्ग मुक्त हस्ताने सौंदर्य उधळत येतो आणि सर्व प्राणीमात्रात नवचैतन्य निर्माण करतो.
उंचावरून होणारा पाण्याचा शिडकावा


श्रावणातील हिरवाई विलक्षण असते ,वसुंधरा नव्या नवरीसारखी अनेकविध रंगात न्हावून तृप्त होते , वृक्षही  बहरून जातात, पक्षांचा किलबिलाट ,हिरवागार गालिचा पांघरलेल्या पर्वतरांगा, त्यात फुललेली विविध रंगांची फुले आणि त्यावर नाचणारी फुलपाखरे ,नुसत्या कल्पनेनेही कवीला काव्य सुचावे. श्रावणातील हा मनमोहक निसर्ग , कोसळणाऱ्या श्रावण सरी , मधूनच चाललेला ऊनपावसाचा लपंडाव ,वातावरणात भरलेला हवाहवासा वाटणारा मातीचा सुगंध , त्यात भर म्हणून मधूनच आपल्या भेटीला येणारे इंद्रधनुष्य.. अहाहा. दर्याखोर्यातून पाऊलवाटातून खळखळणारे पाणी , ओलसर धुके , आपला आब कायम राखून मोठ्या दिमाखात उंचावरून कोसळणारे धबधबे असे  किती आणि काय डोळ्यात साठवायचे.  शहरात नाही पण कोकणातील श्रावणाचे रूप तर खूपच विलोभनीय असते.

विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या कि त्यात डुबकी मारणारी मुले ,पाटाच्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी शाळकरी मुले , हिरव्यागार शेतात झाडांना झोका बांधून त्यावर झोके घेताना त्यांच्याही नकळत आपल्या पुढील आयुष्याची स्वप्ने मनात रंगवणाऱ्या मुली ह्या सर्व आनंदास शहरातील लोक खरच पारखी होतात . साधना , नामस्मरणासाठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठी हे वातावरण अत्यंत पोषक.  चातुर्मासातील श्रावण हा खरच मेरुमणी आहे कारण ह्या महिन्यात सणांची नुसती रेलचेल असते पुढे गणपती आणि मग पितृपक्ष ,नवरात्र असल्याने खर्या अर्थाने व्रत वैकल्ये श्रावणातच केली जातात. बहरलेला निसर्ग ,श्रावणसरींचा शिडकावा आणि त्यात अनेक सण घेवून श्रावण दारी उभा ठाकतो. एकंदरीतच काय तर श्रावणातील निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेताना आणि व्रतवैकल्ये करताना आपण पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगू लागतो ,उंचावरून वाहणाऱ्या धबधब्यातील पाण्याचे तुषार अंगावर घेताना तनमन रोमांचित होते आणि मनात जगण्याची उमेदही .

पाण्यात बोटी सोडण्याचा निखळ आनंद
वर्षभर आपल्याकडून काही कारणाने देवाधर्माचे करायचे राहून गेले असेल तर त्याची पूर्तता ह्या महिन्यात संकल्प करून करता येते. श्रावणात सणांची शृंखला सुरु होते . श्रावण सोमवारी शंकराला अर्पण करणारी शिवामूठ ,मंगलागौरी पूजन ,नागपंचमी, बृहस्पती पूजन ,जिवती पूजन,श्रावणी शनिवार ,नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन कृष्णजन्म-गोपाळकाला ,पोळा ,पिठोरी अमावास्या ह्या सर्व सणांना आख्यायिका ,अधिष्ठान लाभले आहे. श्रावणमासास “ सृजनशील ” म्हंटले आहे कारण श्रावण संपला तरी तो आपले  आणि निसर्गाचे अतूट नाते निर्माण करून जातो ,निसर्गही आपल्या सानिध्यात डोलू लागतो आणि अनंत हाताने आपल्याला भरभरून देत राहणाऱ्या ह्या निसर्गाचे संगोपन आपल्यालाच करायचे आहे हा कानमंत्रही देवून जातो .उठसुठ आपण झाडे कापतो , जंगलतोड करतो आणि उभ्या सृष्टीचा ,वातावरणाचा समतोल घालवून बसतो. 


ह्या सृष्टीच्या पंखाखालीच आपले जीवन आनंदी ,सुरक्षित ,सुसह्य होणार आहे हे सांगण्यासाठीच तर विधात्याने श्रावणाची रचना केली असावी . अश्या ह्या परिपूर्ण ,भावपूर्ण आनंदी श्रावणात आपणही व्रत वैकल्ये ,साधना करून मिळवूया ईश्वरीकृपा आणि चिरकाल राहणारा आनंद. 

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.
antarnad18@gmail.com


#antarnad #shravan #chanting #nature #spiritual #navratra #pitrupaksh #meditation
#अंतर्नाद #श्रावण #नामस्मरण #जप #निसर्गचक्र #अध्यात्म #नवरात्र #सण #पितृपक्ष #ध्यानधारणा 


No comments:

Post a Comment