||श्री स्वामी समर्थ ||
चरणी ठेवितो माथा |
भाद्रपद शु. चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होत
आहे. गणपती हे हिंदूंचे आराध्य दैवत असून ते सर्वांच्याच मनावर अधिराज्य करते.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे ११ दिवस तनमन धनाने आपण श्रीं गणेशाची विविध
प्रकारे आराधना करतो. गणेशाच्या मूर्तीची मनोभावे प्रतिष्ठापना करून त्याची भक्तिभावाने
पूजा केली जाते. गणपतीला मोदक फार प्रिय असल्याने त्याला मोदकांचा प्रसाद दाखवला
जातो. गणपतीची आरास करण्यासाठी घरातील बच्चे कंपनीला वेळ अपुराच पडतो. एकंदरीतच बाप्पाच्या
येण्याने वातावरण आनंदी होते. पुणे मुंबई सारख्या शहरात गणपतीच्या मोठ्या मूर्ती
आणि डोळे दिपवणारी आरास असलेला विलोभनीय सोहळा पाहायला लाखो भाविकांची हजेरी लागते.
ह्या वर्षी म्हणजे 2020 ह्या गणेशोत्सवावर सावट आहे ते
कोरोनाचे. संपूर्ण जगाला विळखा घालून होत्याचे नव्हते करणाऱ्या ह्या विषाणूने
आपल्याला गेले कित्येक महिने घरात बंदिस्त करून ठेवले आहे. गणेश चतुर्थीचा देखणा
सोहळा अगदी ४ दिवसांवर आला आहे ,पण एकंदरीतच बाह्य परिस्थितीमुळे दर वर्षीच्या उत्चाहावर
थोडे विरजण पडले आहे, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गणपतीच्या आगमनाची चाहूल
लागताच रस्ते विविध प्रकारच्या सजावटीच्या ,पूजेच्या वस्तूंनी गजबजू लागतात. फुल
मार्केट मध्ये पाऊल ठेवायला जागा नसते. मिठायीच्या ,पूजेच्या सामानाच्या दुकानात
वर्दळ वाढू लागते. पण आज तितके रम्य चित्र नाही.
संपूर्ण जगावरील करोनाच्या संकटाने उद्योगधंद्यांची चक्रे
थांबली आहेत. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत lifeline म्हंटली जाणारी रेल्वे सेवा
कोलमडून पडली आहे . अर्थचक्रावर परिणाम झाल्याने कित्येकांच्या नोकर्या गेल्या
आहेत तर कित्येक जण अर्ध्या वेतनावर काम करत आहेत . हातावर पोट असणार्यांचे तर हाल
सहन होण्यापलीकडचे आहेत. कधीही कुणी विचारही केला नसेल अशी परिस्थिती उद्भवल्याने
प्रत्येक जण हवालदिल झाला आहे. अनेकांनी हा धक्का न पचवता आल्याने आत्महत्याही केल्या
आहेत . ह्या विषाणूने अनेकांचा बळी घेतला आणि कुटुंबे उध्वस्त झाली. हळूहळू आपण
ह्या परिस्थितीशी दोन हात करत बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न करत असलो तरी ह्या
सर्वातून बाहेर यायला आपल्याला बराच अवधी लागणार आहे. अश्या ह्या पार्श्वभूमीवर
गणरायांचे आगमन होत आहे. आपण सर्वजण विघ्नहर्ता ह्यातून आपल्या सर्वाना बाहेर
काढेल हा विश्वास मनी बाळगून आहोतच आणि म्हणूनच ह्याही स्थितीत प्रत्येक जण
मोरयाच्या स्वागतास सज्ज होत आहे .
खर सांगू का? आपला प्रत्येक दिवसही पूर्ण चांगला किंवा वाईट
नसतो. आपण रोज पूजा करतो तेव्हा क्षणभर तरी आपल्याला प्रसन्न वाटते, देवघरातील
दिव्यासमोर उभे राहिले कि शांत वाटते ,आत्मविश्वास येतो अगदी तसेच मयूरेश्वराच्या
आगमनाने आपल्यातील जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित होत आहेत ,सगळ काही आता पूर्ववत
होयील हा आशेचा किरण घेवूनच जणू हा सिद्धिविनायक येत आहे.
आज आपल्याला हा उत्सव साजरा करताना ,सरकारने आपल्या सुरक्षिततेसाठी
घातलेल्या अनेक बंधनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. प्रामुख्याने जिथे सार्वजनिक
गणपतीची प्रतिष्ठापना होत आहे तिथे तर काटेकोर पणे नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या
२ क्षणांच्या आनंदासाठी नियमांचे उल्लंघन केले ,परिस्थितीचे तारतम्य बाळगले नाही
तर पुढील स्थिती आत्ताच्या पेक्षा भयंकर होवू शकते ह्याचे भान असायलाच हवे .गणपतीची आरास आपण दरवर्षीच करतो पण ह्यावर्षी
अगदी साध्या सोप्प्या पद्धतीने घरातच आरास करुया .गणरायाला फुलेही हवीत मान्य आहे,
पण त्यासाठी सर्व नियम तोडून आपण फुल मार्केट ,पूजेच्या दुकानात गर्दी केली तर ती
प्रत्यक्ष बाप्पालाही आवडणार नाही.
आपल्यावरील करोनाचे संकट पूर्णतः निश्चितच टळलेले नाही
त्यामुळे हा ११ दिवसाचा सोहळा साजरा करताना कुठल्याही गोष्टीचे भान सोडून चालणार
नाही. आज मुंबईसारख्या शहरात ट्रेन बंद आहेत त्यामुळे रस्त्यावरील ट्राफिक
प्रमाणाबाहेर वाढला आहे. अश्या स्थितीत आपल्या नातेवाईक ,मित्रमंडळींकडे जाण्याचा
अट्टाहास आपण थोडाकाळ बाजूला ठेवला पाहिजे. घराबाहेर कमीतकमी पडून गर्दी टाळणे हे
सर्वांच्याच हिताचे आहे. बाहेरील परिस्थिती संवेदनाशील असली तरी आपण
सर्वच ती सुज्ञपणे हाताळू ह्यात दुमत नाही.
आपण शरीराने कुठेही गेलो नाही तरी घरात बसून गणपतीची सेवा
श्री गणेश स्तोत्र ,अथर्वशीर्षाचे पारायण ,गणपतीचा जप अश्या सर्व माध्यमातून करू
शकतो .शेवटी श्रद्धा महत्वाची. जास्तीतजास्त गणेश उपासना आपल्या वास्तूत केली तर
ती आपल्या वास्तूलाही लाभेल.
आपल्या घरातील देव्हार्यात असलेल्या श्रीगणेश मूर्तीची पूजा
, अभिषेक ,महानेवेद्य करून गणपती उपासना केली तर ती अधिक फलदायी ठरेल. ह्या वर्षी
कदाचित खूप मोठी वाजतगाजत मिरवणूक निघणार नाही , ढोलताशांच्या आवाजात बाळगोपाळांचा
जल्लोष होणार नाही पण आपण ठेवलेला संयम, शिस्त ,करोनाविरुद्धचा लढा , आपल्या
असंख्य पोलिसांनी दिलेली प्राणांची आहुती , आपल्या डॉक्टर ,नर्सेस आणि सर्वच
मेडिकल क्षेत्रातील लोकांनी “करोना ” नामक यशस्वीरीत्या पेललेले शिवधनुष्य गणरायाला
मनापासून आवडेल. माणसाने माणसातील माणुसकी जीवन ठेवल्याचा हा केव्हडा मोठा दाखला आहे
आणि तो पाहून आपल्या असंख्य भक्तांवर गणराज आपली कृपादृष्टी टाकेल आणि करोना सोबतच्या
लढ्यात आपल्यासोबत उभा ठाकेल हे नक्की.
आजची हि स्थिती कायम थोडीच राहणार आहे ? हेही दिवस जातील .
पुढे कित्येक गणेशोत्सव येतील आणि ह्यावर्षीची सर्व उणीव आपण पुढील वर्षी भरून काढू.
पण ह्यावर्षी गरज आहे ती संयमाची , गणरायावरील आपल्या असीम भक्तीची. गणेशावरील
भक्तीचा ह्या वर्षी अगदी कस लागणार आहे. त्यामुळे कुठेही दर्शनासाठी ,खरेदीसाठी
गर्दी करू नका ,सगळ्यांना सर्व मिळणार आहे पण नियमांचे उल्लंघन कदापि नको . हा
सोहळा ह्याही परिस्थितीत तितक्याच दिमाखात , विलोभनीय साजरा करणे हे आपल्या
सर्वांसमोर खरेखुरे आव्हान आहे आणि तीच गणरायाची खरीखुरी पूजाहि आहे.
गणेशभक्तांसाठी गणरायाचे आगमन , प्रतिष्ठापना ,सजावट , षोडशोपचार
पूजा ,नेवैद्य ,आरती ह्या हृदयाच्या समीप असणार्या गोष्टी आहेत .त्या होणारच ,फक्त
ह्या वर्षी त्या आपल्या वास्तू पुरत्या मर्यादित राहणार आहेत इतकच . आपण ह्याचे
कुठल्याही स्थितीत उल्लंघन केले तर आपल्याला बुद्धी देणाऱ्या ह्या विघ्नहर्त्या
,बुद्धीच्या देवतेस म्हणजेच गणपती बाप्पासही ते आवडणार नाही.
परिस्थिती काहीही असो पण आपल्याला लंबोदरा विषयी वाटणारे
प्रेम, श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. आपली श्रद्धा , मनापासून केलेली पूजा आणि
भक्तीमुळेच बाप्पा प्रसन्न होवून आपल्याला आशीर्वाद देवून ,ह्या करोना महामारीचा
समूळ नाश करील हा विश्वास प्रत्येक भक्ताने मनात अभेद्य ठेवला पाहिजे.
हिंदू संस्कृतीत सणावारांची रेलचेल आहे आणि प्रत्येक सण नेहमीच
काहीतरी शिकवण देवून जात असतो . असाच हा अमंगलाचा नाश करून सर्वत्र मंगल करणारा ,आपल्या
भक्तांच्या हाकेला धावून जाणारा विघ्नहर्ता आपल्याला आशेचा किरण दाखवेल ह्यात
शंकाच नाही. नुसत्या त्याच्या आगमनाची चाहूल सुद्धा आपल्याला पुनर्जीवित करत आहे. ह्याही
परीस्थितीत आपण ह्या महागणपतीचे जमेल तसे श्रद्धेने ,प्रेमाने स्वागत करत आहोत.
आपला हा भक्तीचा सोहळा पाहून बाप्पा त्याचा वरदहस्त आपल्यावर ठेवणारच.
चला तर मग गणेशाच्या आगमनास सारेजण सज्ज होऊया , उभ्या ११
दिवसाच्या ह्या सोहळ्यात मनापासून त्याच्या सेवेत रुजू होऊया आणि एका नवीन युगाची
सुरवात करुया. समाज आणि पुढील पिढ्यांसमोर एक चांगला गणेशभक्त कसा असतो ह्याचा एक
उत्तम आदर्श ठेवूया .
“अंतर्नाद ” च्या सर्व वाचकांना श्री गणेशचतुर्थी च्या मनापासून शुभेछ्या . विघ्नहर्ता सर्व विघ्ने दूर करून सर्वाना सुबुद्धी , आरोग्य ,यश देवुदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना .गणराज आपल्या भोळ्या भक्तीचा भुकेला आहे. भक्तांच्या हाकेला धवून येणारा आहे, तो आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण करेल हा विश्वास ठेवा.
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.
Antarnad18@gmail.com
#antarnad #shri ganesh chaturthi #modak #ashtvinayak #vighnharta #aarti
#celebration #lord ganesha #ganesh festival
#अंतर्नाद #श्री गणेश चतुर्थी #मोदक #आरास #अष्टविनायक
#विघ्नहर्ता #आरती #पूजा #हिंदूंचा सण
No comments:
Post a Comment