|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या हयातीत किंवा आपल्या जन्माच्याही आधी मृत पावलेले आपल्या कुटुंबातील सदस्य ह्यांची आठवण ठेवून पितृपक्षात त्यांच्या तिथीला पान ठेवून त्यांचे आशीर्वाद घेणे फलदायी आहे.
मनुष्याने कश्यातही आळस करावा पण आपल्या पितरांचे श्राद्ध करण्यास करू नये नाहीतर पितृदोष लागतो.
आपण जन्माला आल्यापासून आपले आईवडील तसेच कुटुंबातील इतर व्यक्ती आपले कोडकौतुक करतात, संस्कार करून आपल्याला एक उत्तम माणूस म्हणून घडवण्यात हातभार लावतात . आयुष्यभर आपल्यामागे उभे राहतात. आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहतात , ह्यातील एखाद्याच्याही जाण्याने आपल्या आयुष्यातील सुखाला जणू ओहोटी लागते. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची कितीही काहीही केले तरी परतफेड होवू शकत नाही. शरीराने जरी ते आपल्यात नसले , तरी त्यांनी केलेल्या संस्कारांच्या माध्यमातून ते आपल्या अवतीभवतीच असतात .म्हणूनच निदान पितृपक्षात त्यांच्या तिथीला त्यांच्या आवडीचे पदार्थ करून पान ठेवून आपण त्यांच्या ऋणातून थोडेतरी उतराई होवू शकतो आणि म्हणूनच पितृपक्षात पान ठेवावे.
ज्योतिष शास्त्रात पितृदोषाला महत्व दिले आहे. राहू हा पितृदोषाचा कारक मानला जातो. आपले आईवडील किंवा इतर मोठी माणसे ज्यांनी आपल्याला घडवले, ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्यांच्या प्रेमाच्या छायेत आपण वाढलो ते आपल्याला शाप देतील ह्यावर निदान मी तरी विश्वास ठेवत नाही .पण आपल्या म्हातार्या आईवडिलांचे म्हातारपणी हाल केले ,त्यांच्या औषधपाण्याकडे न पाहता त्यांना मृत्युसम पिडा दिल्या किंवा वडिलोपार्जित संपत्तीत खोटेपणा केला, आपल्या भावंडांचा वाटा छलकपट करून दिला नाही, वडिलोपार्जित इस्टेट बळकावली , खोट्या सह्या करून लुबाडली,आपल्या नावावर केली ,किंवा आईवडील असतानाही त्यांच्याशी गोड बोलून इतर भावंडाना धूर्तपणाने कळू न देता आपल्याच नावावर करायला भाग पाडले , आपल्या आईवडिलांनी त्यांच्या मृत्यपत्रात लिहिलेल्या त्यांच्या इच्छांचे पालन न करणे ,अश्या गोष्टीनी आपल्या हातून पातक घडते . आपल्या भावंडांचा , कुटुंबियांचा आपण केसाने गळा कापला ,त्यांना वडिलोपार्जित इस्टेटीपासून वंचित ठेवले तर मात्र त्यांचे शिव्याशाप ,पितृदोष लागतो आणि तो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मुलांना आणि पुढील पिढ्यांनाहि लागतो. संपत्तीचा वाटा समोरून देवू केला असताना मोठ्या मनाने जर तो आपल्या नातेवाईकांनी नाकारला तर शाप कधीही लागणार नाही .जीवंतपणी भावंडांचे शाप मृत्युसम पीडा देतात . व्यवसायात कश्यातही प्रगती होत नाही . आईवडिलांच्या संपत्तीवर मुलांचा समान हक्क आहे आणि ज्याचा त्याला तो देणे हेच सर्वार्थाने होतावह आहे.संपत्ती हवी असेल तर ती कष्टाने कमवावी तीच लाभेल अन्यथा नाही .
आज घरातील वडील मंडळी घरातील अडगळ झाली आहे आणि म्हणूनच वृद्धाश्रम हि संकल्पना उदयास आली . पुर्विच्या काळी कुठे होते वृद्धाश्रम . घरात आईवडिलांचे जेवणाचे ताटसुद्धा वेगळे ठेवले जाते .ऐकून सुद्धा कसेतरी होते. पण आईवडिलांची संपत्ती मात्र हवी .आपल्या म्हातार्या सासूबद्दल दुनियाभर निंदा करायची पण तिने दिलेली चांदी सोन्याच्या वस्तू दागिने ते मात्र हवेत . इतका स्वाभिमान असेल तर ते तरी कश्याला घ्यायचे. म्हणूनच मग अश्या व्यक्ती गेल्यावर त्यांचे आशीर्वाद फळतील कि शाप ? ह्याचे उत्तर आपणच देवू शकतो. आईवडिलांचे करताना सुद्धा तोंडातून "ब्र " सुद्धा काढू नये. दुनियेला दाखवायला आपण आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही. आपण काय करतो हे १० लोकांना सांगितले तर पुण्या ऐवजी भले मोठ्ठे पापच पदरी पडेल.
घरात सतत कलह, संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता न येणे , रात्रीची शांत झोप नसणे, घरात आर्थिक स्थिरता नसणे ,घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास मोडणे ,संसारसुख नसणे , नोकरी धंद्यावर गदा येणे ,आयुष्य एकंदरीतच अस्थिर असणे, व्यवसायात स्थिरता न येणे ,घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे, अनाठायी पैसा खर्च होणे, व्यसनाधीनता होणे ,संतती सौख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसणे , घरातील सासूसासरे दीर जाऊ आणि इतर लोकांची निंदा नालस्ती ह्या प्रकारामुळे संकटाना आयुष्यभर सामोरे जायला लागते. हि सर्व पितृदोषाची कारणे आहेत . म्हणूनच कुणाचे चांगले करता आले नाही तर कमीतकमी वाईट तरी करू नये. कष्टाने आपली संपत्ती जमवावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप देयील. साधना ,उपासना करावी त्याने मन शांत होते आणि दुसर्याच्या संपत्तीवर डोळा ठेवण्यासारखे विचारही मनास शिवत नाहीत.
आपल्या कुटुंबियांचे मन जपणे , त्यांना हवेनको ते पाहणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. घरातील वडील व्यक्ती हयात असताना त्यांचे हाल करणे,त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याच राहत्या घरातून हाकलून देवून त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणे हि पुढील मोठ्या संकटाना आणि पितृदोषांस पोषक अशीच कारणे आहेत. हे सर्व करताना एकदिवस आपल्यालाही वृद्धावस्था येणार आहे हे मात्र विसरू नये. मुले लगेच अनुकरण करतात. आपण जे आपल्या आईवडिलांसोबत केले तेच आपलीही मुले आपल्यासोबत करणार नाही कश्यावरून. म्हणूनच आईवडिलांची सेवा करून ,तसेच त्यांच्या पश्च्यात त्यांचे योग्य ते क्रियाविधि करून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावे आणि आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श घालून द्यावा. अश्याने आपलेही प्रारब्ध चांगले होते.
आज शहरात राहणारा नोकरवर्ग घरातून लवकर निघतो त्यांना इच्छा असूनही पान ठेवता येत नाही असा एकंदरीत सूर दिसतो. पण निदान थोडा भात त्यावर दही (मीठ घालायचे नाही) असे रोज ठेवावे आणि सर्वपित्री अमावास्येला मात्र संपूर्ण जेवणाचे पान ,आपल्या पूर्वजांच्या आवडीचा स्वयंपाक करावा . मी गेले कित्येक वर्ष पितृपक्षात रोज घरात सकाळी जे काही अन्न शिजवले असेल ते ठेवते. मनास शांतता लाभते. आपणही करून पहा.
आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्यायचे कि आपल्या दुष्कार्मातून त्यांचे तळतळाट घ्यायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे .फक्त एक लक्ष्यात असुदे कि अखेर आपल्याला परमेश्वरा समोर उभे राहायचे आहे तेव्हा आपला सगळा लेखाजोखा समोर असणार आहे, तेव्हा कृती करताना विचारपूर्वक करावी.
व्यक्ती हयात असताना तिला वाईट वागणूक देवून तिचे क्लेश ओढवून घ्यायचे आणि ती गेल्यानंतर तिच्यासाठी पान ठेवायचे हे केल्याने त्या व्यक्तीचे किती आशीर्वाद मिळतील माहित नाही . त्यापेक्षा हाडामासाच्या माणसाची हयात असतानाच सेवा केली तर ते निश्चित फलदायी ठरेल हे सांगायला कुणाचीच गरज नाही. शेवटी आपली कर्म बोलतात ..चांगली वाईट कशीही असोत.
गेलेल्या व्यक्तीचे त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षातील तिथीला श्राद्ध कर्म करणे हे क्रमप्राप्त आहे. पण ज्यांना ह्यातील काहीच जमत नसेल त्यांनी दानधर्म करावा आणि आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून श्री दत्त गुरुंचा जप करावा. बरेचदा आपल्याला एखाद्या नातेवायिक किंवा स्नेह्याची संपत्ती किंवा वास्तू भेट म्हणून मिळते . त्यांचेही त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षात श्राद्ध करणे क्रमप्राप्त आहे .
मृत्यू पश्चात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण १३ दिवस दुखवटा ( सुतक ) पाळतो तसेच १० वे - १३ वे सर्व क्रियाविधि करतो . त्यातील मुख्य विधी म्हणजे १० व्या दिवशीचा पिंड दानाचा . ह्या दिवशी आपण पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करतो. ह्या दिवशी पिंड ठेवल्यावर जेव्हा कावळा पिंडास शिवतो तो दिवस खरा . कावळा पिंडास शिवला म्हणजे गेलेल्या व्यक्तीची काहीही इच्छा राहिली नाही ती शांतपणे पुढील प्रवासास गेली असाच अर्थ आहे. ह्यावितिरिक्त अगदी पितृपक्षात सुद्धा जेव्हा कावळा आपण ठेवलेल्या पानास शिवतो त्याबद्दल आपण म्हणूया कि कावळाच काय इतर पक्षीही येतात ,त्यांना भूक लागते ते अन्न ग्रहण करतात इतकाच त्याचा अर्थ आहे. खरा कावळ्याने आपल्या ठेवलेल्या पिंडास शिवणे हे १० व्या दिवशीच होते आणि तेच फक्त महत्वाचे आहे.
शेवटी पितर आपल्याला आकाशातून सोने दागिने नाही देणार ते फक्त आशीर्वादच देतील. पण त्यांच्या आशीर्वादानेच आपले आयुष्य सुकर होयील हे नक्की.
पितृपक्ष येतोय ,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीस धरून ,पितरांची क्षमा मागुया आणि पितृपक्षात त्यांच्या सेवेत राहून ऋणमुक्त होऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सर्वार्थाने उजळून टाकूया, कृतकृत्य होऊया.
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.
antarnad18@gmail.com
#antarnad #pitrupaksh #mahalay #hindusanskruti #generations #prayers #blessings
#अंतर्नाद #पितृपक्ष #महालय #श्राद्ध #हिंदूसंस्कृती #पिढीरूढीपरंपरा #ऋणमुक्त #आशीर्वाद #पिंडदान