Friday, 7 August 2020

घड्याळ्याच्या काट्यावर

|| श्री स्वामी समर्थ ||


अष्टोप्रहर आपल्या सतत नजरेसमोर असणारे घड्याळ. आज जाणून घेवूया त्याबद्दल थोडी माहिती. असा एकही माणूस नाही ज्याला घड्याळ माहित नाही. अगदी सकाळी लवकर उठायचे म्हणून गजर लावण्यापासून आपल्याला घड्याळाची सोबत असते. आज आपली नाळ घड्याळाशी इतकी घट्ट जोडली गेली आहे कि घड्याळासाठी आपण कि आपल्यासाठी घड्याळ हा एक संशोधनाचाच विषय झाला आहे. इतरांशी भेटीगाठी ,रोजची व्यावहारिक जगातील कामे जसे बँकेचे व्यवहार , जिम ला जाणे ,फिरायला जाणे ,सिनेमा नाटक सगळे अगदी घड्याळाच्या काट्यावर असते . दुकाने उघडायच्या आणि बंद होण्याच्या वेळा ,सलून ,मॉल अगदी सगळेच घड्याळ्याच्या काट्यावर अवलंबून आहे .

पूर्वीच्या काळी सूर्याच्या स्थितीवरून वेळ निश्चित होत असे. तर अश्या ह्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटकाचा म्हणजेच घड्याळ्याचा शोध “ गॅलिलिओ ” ने लावला आहे हे सर्वश्रुत आहेच. आजच्या आधुनिक जीवनशैलीत तर घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे. लोकल ट्रेन ,विमानाचे उड्डाण सगळ्याचे धागे घड्याळाशी जोडले गेले आहेत . लग्नाचा मुहूर्त सुद्धा घड्याळावर म्हणजेच वेळेशी निगडीत असतो. लग्नाचा , साखरपुड्याचा , बारश्याचा , कुठल्याही शुभकार्याचा मुहूर्त आपण काढतो. आता मुहूर्त म्हणजे शेवटी वेळच ,म्हणजे घड्याळ आलेच.


आजकाल बाजारात फेरफटका मारलात तर अनेक रंगाची आकर्षक ,स्टायलिश घड्याळे पाहायला मिळतात. आता तर मोबाईल मध्ये घड्याळ असल्याने हातावरच्या मनगटी घड्याळाची क्रेझ कमी होत आहे.
मंडळी घड्याळ आपल्याला बरेच काही शिकवते . घड्याळ काय दर्शवते तर “ वेळ ” आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते . आपण वेळ पाळली नाही तर आपल्यासाठीही गोष्टी वेळेवर घडत नाहीत .काही जण वेळेच्या बाबत एकदम पक्के असतात, त्यांच्या येण्यावर घड्याळ लावावे इतके ते वेळ पाळतात आणि काही अगदी त्याच्या उलट . सगळाच सावळा गोंधळ असतो. १० वाजता येतो सांगतील आणि येतील ११ वाजता आल्यावर ,त्यानंतर चक्क १५ मिनिटे उशीर का झाला त्याच्या सबबी सांगत बसतील .

आजकाल मुंबईसारख्या शहरात घराबाहेर पडले कि अनेक कारणानी इच्छित स्थळी पोहोचायला उशीर होतो म्हणून थोडे आधीच निघालो तर आपणही वेळ पाळण्यात आणि दुसर्याला दिलेला शब्द पाळण्यात यशस्वी होऊ.
वेळ न पाळणाऱ्या व्यक्तींमध्ये वक्तशीरपणा नसतो आणि त्यांच्याही बाबत सर्वच गोष्टी कधीच वेळेवर होताना दिसत नाहीत.



घराचे वास्तुशास्त्र करताना देव्हारा कुठे ठेवायचा हे सर्वप्रथम पाहावे तसेच घरातील घड्याळे कुठे लावायची त्यासंबंधीही विचार झाला पाहिजे . घड्याळासाठी ठराविक अशी दिशा नाही पण घड्याळातील वेळ पाळणे हे मात्र अत्यावश्यक आहे. घराच्या बाहेर दरवाज्यावर तसेच घरातील आतमधल्या दरवाज्यांवर सुद्धा घड्याळ लावू नये .

दिवाणखान्यात , बेडरूम मध्ये, अगदी स्वयंपाक घरातसुद्धा आकर्षक घड्याळे भिंतीवर किंवा अन्य ठिकाणी ठेवलेली आढळतात. हौसेला मोल नाही , अनेक प्रदर्शनातून सुद्धा वेगवेगळी घड्याळे घरातील सजावटीसाठी विकत घेतली जातात . सोने आणि हिऱ्यांचा वापर सुद्धा घड्याळे घडवताना आजकाल केला जातो. घरात प्रत्येक खोलीत एक अशी अनेक घड्याळे असतात . पण ह्या सर्व घड्याळे एकच वेळ दर्शवत आहे हे तपासून पहिले पाहिजे. प्रत्येक घड्याळ थोड्याफार फरकाने वेगळी वेळ दर्शवत असेल ,तर घरातील मंडळींचे विचारही दाही दिशांना असतात. सर्वांचे एकमत होते कठीण .

म्हणून सर्व घड्याळातील वेळ एकच असावी . तसेच काही घड्याळे बिघडलेली असतात पण तरीही ती आपण तशीच ठेवून देतो आणि घरातील “ Clutter ” वाढवतो. हि बंद घड्याळे एकतर दुरुस्त करून घ्यावीत नाहीतर सरळ फेकून द्यावीत हे उत्तम .आजकाल आपण किती चाललो , धावलो ह्याचे मोजमाप करणारी घड्याळे हा फार कुतूहलाचा विषय ठरत आहेत.त्यांची क्रेझ वाढल्यामुळे त्यांच्या किमतीही डोळे पांढरे करणाऱ्या आहेत.

टायटन, HMT, Citizen अश्या अनके कंपन्यांची विविध आकर्षक घड्याळे बाजारात पाहायला मिळतात . सणासुदीला ह्यावर अनेक ऑफर सुद्धा असतात. अनेक परदेशीय घड्याळ बनवणार्या कंपन्यांहि भारतीय बाजारपेठेत हजेरी लावताना दिसतात. घड्याळाच्या आकर्षकतेप्रमाणे त्यांच्या किमतीही लाखो रुपयांपर्यंत असतात .



तर अश्या ह्या घड्याळांचे आपल्या आयुष्यातील स्थान अनमोल आहे. घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते आणि ती वेळ पाळणे किंवा न पाळणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते.

आयुष्यात प्रत्येक गोष्ट हि वेळेत नाही झाली तर आयुष्य निरस होते आणि आयुष्यातील अवीट गोडीच्या क्षणांना आपण पारखे होतो.

आपल्याला आता वेळेचे महत्व समजलेच असेल ,मग काय आजपासून दिलेली वेळ पाळणार ना?
आपण वेळ पाळूया आणि इतरांनाही वेळेचे महत्व समजावून सांगुया.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका .
Antarnad18@gmail.com


#antarnad #wrist watch #alarm #time #HMT #TITAN #Time is money #LIFE #Importance 
#अंतर्नाद #मनगटी घड्याळ #वेळ #गजराचे घड्याळ #वेळ महत्वाची #आयुष्य #घड्याळ्याच्या काट्याशी

No comments:

Post a Comment