Wednesday, 5 August 2020

राहूच्या जगतात..


|| श्री स्वामी समर्थ ||


राहू म्हंटले कि सगळ्यांची झोप उडते. राहूचे साम्राज्यच तसे आहे. पण एखाद्याचे नाव कानफाट्या पडले कि त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन एकदम सेट होवून जातो अगदी तसेच आहे हे. कुठलाही ग्रह पूर्ण चांगला किंवा वाईट नसतो .अगदी गुरूसारखा शुभग्रह सुद्धा कधीकधी अपेक्षित फलादेश देत नाही .राहू आणि केतू हे छायाग्रह ,पातबिंदू आहेत ज्यांना स्वतःची अशी राशी नाही .ते ज्या भावात असतील त्याचे फळ देतात. राहू आणि केतू पत्रिकेत एकटेच असतील तर बरे .


त्यांच्यासोबत असलेल्या ग्रहाचेही कारकत्व ते बिघडवून टाकतात.त्रिक स्थानात पापग्रह चांगली फळे देतात. राहू जर ३ ६ ११ ह्या स्थानात असेल तर त्यामानाने बरी फळे देतो. दशम स्थानातील राहू चांगली फळे देतो. आयुष्यातील कारस्थाने , वाईट आणि अनाकलनीय घटनांचा कारक म्हणून राहुकडे पहिले जाते .


राहू चंद्राला आणि केतू सूर्याला ग्रहण लावतो . त्यामुळे राहू जर चंद्रासोबत असेल तर तो चंद्राला  ग्रहण लावतो आणि त्याचे कारकत्व बिघडवतो. राहू जर ९ व्या स्थानात तर अध्यात्मिक ,पारमार्थिक प्रगती होते. शततारका , आर्द्रा आणि स्वाती हि राहूची ३ नक्षत्रे आहेत.


राहू म्हणजे मायाजाल , आभास निर्माण करणारा. म्हणजे दुध आहे असे वाटते पण जवळ गेल्यावर समजते ते ताक आहे. राहूच्या १८ वर्षाच्या महादशेत आपण आभासी जगतातच वावरत असतो . कधी फसवणूक होईल ह्याचा नेम नाही. राहूच्या नक्षत्रावर कुठलीही खरेदी शक्यतो करणे टाळावे कारण त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते. पण त्या उलट राहूच्या नक्षत्रावर आपले काम करून घ्यावे जसे ,आपली रजा बॉस कडून मान्य करून घेणे वगैरे. राहू आणि राहूची महादशा हा एक खूपच मोठा विषय आहे.  राहूची महादशा हि १८ वर्षाची असते. आता १८ वर्ष आयुष्यातून अगदी वजाच करायला हवी असा एकंदरीत सूर ज्यांची राहू दशा आहे त्यांचा दिसतो. 


पण प्रत्यक्षात असे काहीच नसते. राहूच्या महादशेत पुढे अनेक ग्रहांच्या अंतर्दशाही असतात आणि त्यात आपल्या पत्रिकेतील स्थितीप्रमाणे काही शुभ ग्रहांच्या अंतर्दशा, विदशा चांगल्या जातात .


राहूची दशाच नाही तर कुठल्याही ग्रहाची दशा हि संपूर्ण चांगली किंवा वाईट जात नाही. राहूच्या दशेत अध्यात्मिक प्रगती , ध्यानधारणा ,परदेशगमन , तीर्थक्षेत्रांच्या यात्रा घडतात. राहूच्या महादशेत रंकाचा राव आणि रावाचा रंक होतो. विश्वास उडावा अशी परिस्थिती आणि माणसेही भेटतात. आपल्या मागे बोलणारी आपल्याला मानसिक दृष्टीने त्रास देणारी माणसे कार्यरत होतात  अर्थात पुढे त्यांची कर्मेच त्यांना भोवतात हे वेगळे सांगायला नको . पण तेव्हा आपल्याला त्रास देण्यात ती यशस्वी ठरतात .आयुष्यातील आत्मविश्वास घालवून बसू अशीसुद्धा ग्रहस्थिती निर्माण होते. पण ह्यातून आपल्याला उपासना तारते .आपले सद्गुरू आपली नय्या पार नेतातच ह्यावर आपली निस्सीम श्रद्धा हवी. ध्यानधारणा आणि उपासना आपल्याला मानसिक बळ देते , उपाय सुचतात आणि गुरुकृपा होते. हातपाय गळून काहीच हाती लागत नाही.
आपला जन्म आपल्या संचित ,प्रराब्धप्रमाणे आहे. 


राहू पत्रिकेत आपल्या घराण्याचाही दोष दर्शवतो .राहूच्या महादशेत आपल्याला भोगायला लागणारे भोग हे घराण्यातील पूर्वजांच्या शापामुळेही भोगावयास लागतात. राहूच्या दशेत बहुधा मातृपितृ छत्र हरवते. राहू मंगळासोबत किंवा मंगळाच्या कुयोगात असेल तर भातृसौख्याची हानी करतो. राहूच्या दशेत वास्तू घेताना विचारपूर्वक आणि नीट माहिती करून घ्यावी नाहीतर शापित वास्तू मिळण्याची शक्यता असते .राहू प्रचंड पैसाही देतो पण तो टिकत नाही अनेक मार्गांनी तो खर्च होतो. राहूच्या दशेत अनेकवेळा बदनामी पदरी पडते .आपले जवळचे परके होतात .विश्वासार्हता राहत नाही . कुठल्याही गोष्टीत यश दुरापास्त झाल्याने आयुष्यातील उत्चाह , जोश कमीच होतो. राहूच्या महादशेत मनावर एकप्रकारचे सतत दडपण आणि अनामिक भीती जाणवत राहते. पत्रिकेत राहू कुठल्या स्थानात आणि नक्षत्रात आहे ह्यावर दशेचे फळ आहे .
राहूच्या दशेत अनाकलनीय गोष्टी घडतात , अनाकलनीय आजार ज्याचे निदानच होवू शकत नाही तो देणारा राहूच असतो. १२ किंवा ९ व्या स्थानातील राहू परदेशगमनाचे ,विशेषतः मुस्लीम देशात , जाण्याचे योग आणतो .


हा राहू ह्या स्थानात स्थिर राशीत असता ह्या दशेत तिथे कायमस्वरूपी नोकरी मिळण्याचेही योग येतात.राहूच्या दशेत गंडांतर आणि बालंट सुद्धा येतात .अनेक चुकीच्या गोष्टी आणि व्यक्तींच्या मोहपाश्यात आपण अडकू शकतो म्हणूनच संयम आणि उपासना भक्कम हवी.आपल्या भोवती गुरुकवच हवे.


राजमार्गावरून दूर नेवून भरकटत नेणारा राहूच असतो. अपयशामुळे माणूस आधीच खचलेला असतो त्यात वाईट संगतीत अडकल्यामुळे अनेक व्यासानेही लागू शकतात. छलकपट, राजकारण करणे हा राहूचा स्थायीभाव आहे. काहीं माणसे आयुष्यात पुढे येवू शकत नाहीत , आर्थिक अपयश पचवू शकत नाहीत. त्यांच्या डोक्यात हा छलकपट करणारा राहू शिरला कि बघायलाच नको. राहत्या घरात , नातेवाईकात , भावंडात , स्थावर इस्टेटीत सुद्धा कपट करून षड्यंत्रे रचून इस्टेट बळकावतात ,पण नंतर त्यांना आणि त्यांच्या मुलांना ते फार वाईट रीतीने फेडावे लागते लागते.  


ह्या सर्वाचा परिणाम शारीरिक दौर्बल्य येवून अनेक आजारांना सामोरे जावे लागते. राहूची दशा हि भोग भोगायला लावते आणि त्यास खर्च पर्याय नसतो , उपासना ,अध्यात्म आपल्याला ते भोग सहन करण्याची क्षमता नक्कीच प्रदान करते पण तरीही भोग कुणालाच चुकत नाहीत.राहू दशेत प्रवास करत असताना आपल्या जवळील कागदपत्रे हरवण्याचे योग असतात त्यामुळे प्रवासात ती जपावीत. आपल्या बोलण्याचा कुणी कसा अर्थ लावेल हे सांगता येत नाही त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोलावे .राहू फारच बिघडला असेल तर अश्या व्यक्ती खोटे बेमालूमपाने बोलतात. लहानसहान गोष्टीत सुद्धा लपवाछपवी करतात . घरात नातेवाईकात विचित्र वागण्याने , एकाचे दोन करून सांगतात आणि सरतेशेवटी सगळ्यांचा विश्वास मात्र घालवून बसतात. राहूचा प्रभाव असलेल्या लोकांची नजरही सरळ नसते , कावरीबावरी असते ,सतत काहीतरी लापाव्न्याकडे त्यांचा कल असतो हे त्यातून जाणवते .आयुष्याच्या उमेदीच्या काळात राहू दशा आली आणि राहू बिघडला असेल तर आयुष्याचे तीनतेरा वाजतात ,आयुष्य दिशाहीन होते.विवाहबंधनात अडकताना पत्रिका जरूर दाखवावी आणि होत्याचे नव्हते करणाऱ्या राहूची प्लेसमेंट जरूर पहावी.

राहू दशेत राहूचा जप ,शिवउपासना , कुलदेवतेची उपासना फलद्रूप ठरते. राहू दशेत घरात लघुरुद्र केल्यास अंशतः फरक पडू शकतो.


राहूच्या दशेत केलेली आर्थिक उधळपट्टी गळ्याशी येते .थोडे संयमाने राहून विचारपूर्वक निर्णय घेतल्यास आणि अनीतीच्या मार्गाचा अवलंब न केल्यास त्रास कमी होतो. आयुष्यात कुठलीही स्थिती येऊदे चांगली अथवा वाईट आपण आपले सत्कर्म ,नीतीने वागणे सोडू नये असे मला वाटते . आयुष्यात काहीच शाश्वत नसते . राहूची दशा हि संपणार आहे ,तेही आपल्याला खूप काही शिकवून ,त्यामुळे हि १८ वर्षे घाबरत आणि दडपणाखाली जगण्यापेक्षा नीतीने आणि राजमार्गाने आयुष्य व्यतीत केले तर सारेच सोपे आणि सुसह्य होवून जायील ह्यात शंकाच नाही.


आयुष्य हे कार्डीओग्राम सारखे आहे. आपल्या आयुष्यात आता काहीच चांगले होणार नाही ह्या विचारांनी पार नाऊमेद झालेल्या व्यक्ती राहू दशा संपल्यावर गुरु दशेत पुन्हा उभ्या राहतात .


जीवनात संघर्ष हा अटळ आहे. कुणाला आधी कुणाला नंतर पण आहे आणि त्यातून मार्ग काढत जाणे इतकेच आपल्या हाती आहे. आपल्या हातून सर्व निसटून गेले आहे अश्या भावनेने आपण आपल्या आयुष्यातील संकटावर मात करू शकत नाही. आपला संयम , तारतम्य ,सकारात्मकता आपल्याला राहूच्या दशेतूनही तारून नेऊ शकते हे विसरू नका.

एकंदरीत काय तर आपले आयुष्य हे अनेक चढ उतार दर्शवते.  राहू दशेनंतर, गुरुदशा आणि मग पुन्हा शनी अश्या दशांची पेरणी आपल्या आयुष्यात देवाने काहीतरी विचार करूनच केली असावी हे नक्की. कुठल्याही स्थितीत गर्भगळीत व्हायचे नाही आणि हर्षवायुही होवू द्यायचा नाही हे तत्व अंगिकारले पाहिजे.


राहू दशा सुरु होण्यापूर्वी एखाद्या उत्तम ज्योतिषाकडून आपल्या पत्रिकेतील राहू तपासून घ्या. आपली रोजची नित्य कर्मे आणि साधना करत रहा. राहूदशेचे भय मनातून काढून टाका. निर्धास्त राहा आणि स्वस्थ जागा.

आज राममंदिराचा शिलान्यासाचा सोहळा  राहूच्या “ शततारका ” ह्या नक्षत्रावर होत आहे.


ग्रह आपापली कामे चोख बजावतात ,आपणही आपापली कामे करत रहावीत .
राहूसंबंधी अजूनही खूप लिहिण्यासारखे आहे ,तूर्तास इतकेच. 


अस्मिता


 लेख आवडल्यास खालील लिंक वर अभिप्राय जरूर नोंदवा.

Antarnad18@gmail.com


#antarnad #shadow planet #rahu #illusion #shiv #spiritual #amavasya rahu kal
#अंतर्नाद # पातबिंदू #आभास #शिव उपासना #साधना #अमावास्या #राहू काळ 

15 comments:

  1. छान माहिती..घरी लघुरुद्र कसे करायचे..मुलाचे नावाने karyche आहे..संकल्प घेऊन कऱ्यचे असते का?...plz माहिती द्या.

    ReplyDelete
  2. ।।श्री स्वामी समर्थ।।

    ReplyDelete
  3. Very nice article ������

    ReplyDelete
  4. अभ्यासपूर्वक माहिती ....धन्वाद सर !

    ReplyDelete
  5. This not all true .As Rahu Mahadasha will give success to individuals when Rahu in Mithun kanyya Rashi in 3 Rd 6th and 9th place

    ReplyDelete
  6. आदरणीय मॅडम,
    मी स्वतः राहू महादशेचा अनुभव घेतोय मागील १७ वर्षापासून, आपण लिहीलेलं तंतोतंत लागू पडत आहे, विशेषतः आभासी जग, आई-वडीलांचे छञ हरवणे, प्रयत्न करूनही अपयश, फसवणूक, कामाच्या बदल्यात मोबदला फार कमी मिळणे,गुरूभक्ती व श्रद्धा यामुळे संकटातून तरून निघणे,आर्थिक अडचण,सामाजिक प्रतिष्ठा कमी होणे,विरोधकांचे माघारी कारस्थाने, नातेवाईकांचे काळानुरूप बदललेले वागणे, सतत छोट्या मोठ्या शारिरीक व्याधी,सतत अस्थैर्य, दिशाहीन प्रवास,व्यवसायात नुकसान,आर्थिक फसवणूक,नौकरीत मनाजोगते फळ न मिळणे,वयाच्या ४५ वर्षापर्यंत आयुष्य स्थिरस्थावर नसणे, राजकीय अप्रतिष्ठा तसेच अधंकारमय भवितव्य आदी...कृृृृृपया मार्गदर्शन करणे
    (माझी जन्मदिनांक २३-०६-१९७६,बुधवार;जन्मवेळ-२२.२० ठिकाण-नांदेड

    ReplyDelete
  7. खूप सुंदर आणि व्यवस्थित विवेचन केलं आहेस... माझ्या मनात सुद्धा राहू काळ आला म्हणजे काय होतं ?? अशा अनेक शंका होत्या..हा लेख संग्रही ठेवेनच.खूप खूप धन्यवाद..

    ReplyDelete
  8. अनेक समज गैरसमज असतात याविषयी...पण खूप सुंदर विवेचन केलेत आपण!

    ReplyDelete
  9. आपल्या विवेचनातील प्रत्येक शब्द न शब्द मी राहुच्या महादशेत अनुभवला आहे. सद्गुरु कृपेने तरलो. तरी जखमेचे व्रण मात्र कायम राहिलेत.....!!अस्तु
    अस्मिता ताई अपणास व आपल्या सद्गुरु चरणी सादर वंदन...!असेच माहितिपूर्ण विवेचन करत राहावे ही विनंती!!💐💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  10. 18 वर्षांची राहुची महादशा संपल्याच्या तारखेनंतर किती दिवसापर्यंत त्याचा प्रभाव संबंधितांवर राहतो?

    ReplyDelete
  11. राहू या ग्रहाबद्दल व कारकत्वासंबधी चांगली माहीती दिली आहे . तसेच. दररोज राहूचा काळ अंदाजे दिड तास असतो असे पंचांगात दिले आहे . याबाबतीत थोडी विस्तृत माहीती मिळाली तर बरे होईल .मी व माझे अनेक मित्र राहूचा काळ हा महत्वाची कामे ,व्यवहार ,यासाठी टाळतो.

    ReplyDelete
  12. राहू या ग्रहाबद्दल व कारकत्वासंबधी चांगली माहीती दिली आहे . तसेच. दररोज राहूचा काळ अंदाजे दिड तास असतो असे पंचांगात दिले आहे . याबाबतीत थोडी विस्तृत माहीती मिळाली तर बरे होईल .मी व माझे अनेक मित्र राहूचा काळ हा महत्वाची कामे ,व्यवहार ,यासाठी टाळतो.

    ReplyDelete
  13. राहू बद्दल तसेच राहूच्या महादशा बद्दल अतिशय छान माहिती दिली आहे. मला स्वतःला यामध्ये सांगितलेले बरेच अनुभव आले आहेत.

    ReplyDelete
  14. Please resend your writing on ketu

    ReplyDelete