|| श्री स्वामी समर्थ ||
आज शिक्षक दिन. माझ्या आयुष्यातील सर्व गुरुतुल्य व्यक्तींना ,माझ्या सर्व गुरूना माझा साष्टांग नमस्कार . शाळेत असताना आजच्या दिवशी आम्ही वर्गासमोर उभे राहून शिक्षकांच्या बद्दल भरभरून बोलत असू त्या आठवणी आज जाग्या झाल्या .त्या लहान वयात फारसे समजत नसले तरी शाळेतल्या शिक्षिका म्हणजे आईसमान हि भावना मात्र मनात रुजलेली असायची.
माझ्या आयुष्यात मला ज्योतिष शास्त्र शिकण्याचा योग आला आणि त्यानिम्मित्ताने अनेकांशी परिचय तर अनेकांच्या कडून हि विद्या प्राप्त करण्याचे सौभाग्य लाभले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते.
आज माझ्या ब्लॉग वरील “ मला भावलेली व्यक्तिमत्व “ ह्या सदरात माझ्या गुरुंबद्दल लिहिताना मला खरच खूप भरून आले आहे. त्यांच्याविषयी लिहिण्याची खरतर माझी पात्रता नाही तरी माझ्या त्यांच्याबद्दल असणार्या भावना व्यक्त करण्यासाठी आजच्या सारखा योग्य दिवस असूच शकत नाही . त्यांचे माझे नाते म्हणजे द्रोणाचार्य आणि एकलव्य . नुसती त्यांची व्याख्याने ऐकून सुद्धा मी खूप काही शिकले आहे त्यांच्या आणि माझ्याही नकळत . त्या माझ्या गुरु हि आहेत आणि एक मैत्रीण सुद्धा .आपल्या सर्वांच्या लाडक्या “ डॉ.सौ. शिल्पाताई अग्निहोत्री “ ह्यांच्या सोबत आज आपल्या गप्पा रंगणार आहेत .
एका क्षणात समोरच्या व्यक्तीला “ मी तुझ्यासोबत आहे “ हा दिलासा आपल्या प्रेमळ लाघवी शब्दांनी देणाऱ्या शिल्पाताई खरच असामान्य व्यक्तिमत्व आहे. त्या स्वतःच एक ज्ञानाचे परिपूर्ण विद्यापीठ आहेत . सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि जनमानसात आपलेसे वाटणाऱ्या ह्या व्यक्तीमत्वाचा सर्वात विशेष भाव म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार ,मीपणाचा लवलेश नसणे , हा असल्यामुळे त्या नेहमीच कौतुकास्पद ठरतात .
त्यांचे मृदू आणि आश्वासक बोलणे समोरच्याला क्षणात आपलेसे करते. आपल्यापुढे आज त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडण्याचा माझा हा लहानसा प्रयत्न आहे.
शिल्पाताई ह्या ज्योतिष शास्त्राच्या उत्तम सखोल अभ्यासक आहेत . त्यांनी ह्या शास्त्राचे अध्ययन पुण्यातील भालचंद्र ज्योतिष विद्यालय , श्री.व. दा.भट सर ,श्री.मारटकर सर ,श्री श्रीराम भट सर ,श्री.एम.कटककर सर , श्री. अष्टेकर सर ,सौ. बेलसरे अश्या अनेक गुरुंकडे घेतले आहे. अजूनही असंख्य गुरु आहेत ज्यांच्या विचारांनी त्या प्रेरित आहेत . शिल्पाताई स्वतःला कधीच परिपूर्ण समजत नाहीत . हे शास्त्र शिकण्यास उभा जन्म अपुरा पडेल म्हणून त्या स्वतःला नेहमीच अभ्यासक म्हणवून घेणे अधिक पसंत करतात . उत्तम लेखनशैली तर आहेच पण त्या सोबत वाकचातुर्य , प्रसंगावधान सुद्धा आहे. मुलाखतीत नेमके प्रश्न विचारून समोरच्याच्या व्यक्तिमत्वाचा ठाव कसा घ्यायचा, त्याला कसे बोलते करायचे हा गुण खरच मुलाखत घेणार्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. ह्या सर्व गुणांमुळेच शिल्पाताई असलेल्या व्यासपीठाला नक्कीच एक वेगळा रंग चढतो.
ज्या क्षणी आपण स्वतःला परिपूर्ण समजतो तिथेच ज्ञान खुंटते हे अगदी खरे आहे. शिल्पाताईना विविध विषय शिकण्याची आवड असल्यामुळे त्या ह्या शास्त्राकडे आकर्षित झाल्या आणि ह्या शास्त्राच्या माध्यमातून लोकांना आपल्याला काहीतरी चांगले देता येयील , त्यांना त्यांच्या दुक्खातून बाहेर काढता येयील असा विश्वास सुद्धा त्यांना वाटला.
ह्या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी नवोदितांना काय मार्गदर्शन कराल ह्यावर त्या म्हणाल्या ,अग हे शास्त्र म्हणजे अथांग महासागर आहे, जितके खोल जाल तितके मोती हाती येतील. त्यामुळे नवोदितांनी हे शास्त्र शिकताना संयम ठेवला पाहिजे .
शास्त्राची तोंडओळख झाली कि त्यानंतर स्वतःचे संशोधन सर्वात महत्वाचे आहे. ह्या शास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी अनेक परीक्षा दिल्या आणि त्यात मिळालेल्या अद्वितीय अश्या यशाने त्यांना शिकण्याचा हुरूप आला. पूर्वी त्या अनेक कला शिकवत असत पण पुढे त्यांनी ह्याच क्षेत्रात करिअर करायची हा विचार पक्का केला.
शिल्पाताईंशी बोलताना त्यांचा संयम ,भाषेवरील पकड , सवांद शैली ,समोरच्याला अत्यंत मान देणे ह्या गोष्टी सहज लक्ष्यात येत होत्या. शास्त्री परीक्षेत महाराष्ट्रात त्यांनी तिसरा आणि पुण्यात दुसरा क्रमांक मिळवला . “ व्हर्टिगो “ ह्या विषयावरील सादर केलेल्या प्रबंधात त्यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला.. विवाह आणि अंकशास्त्र ह्या विषयावर सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे.
शिल्पाताईंशी गप्पा म्हणजे एक बौद्धिक मेजवानीच असते. वेळ कसा जातो ते समजत नाही. त्यांचा प्रत्येक शब्द काहीतरी देऊन जातोच. मेडिकल astrology आणि करिअर ,संतती ह्या विषयावरील त्यांचे संशोधन अजूनही चालूच आहे. “ शोध अनुवंशिकतेचा ” ह्या त्यांच्या पुस्तकात त्यांनी ज्योतिष शास्त्राच्या अनुषंगाने अनुवंशिकता ह्या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय.
त्यांचे पुढचे पाऊल म्हणजे 2011 साली त्यांनी शास्त्राच्या प्रसारासाठी स्थापन केलेली “ आदिशक्ती ज्योतीर्विद्यालय “ हि संस्था.
ह्या संस्थेत कुंडली शास्त्राचा ,पंडित , विशारद तसेच शास्त्री परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम घेतला जातो.
कुंडलीचा फलादेश सांगणे हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. हस्तशास्त्र , वास्तुशास्त्र ह्याचेही शिक्षण इथे दिले जाते. शिल्पाताई म्हणाल्या मला फारसे टेक्निकल ज्ञान ,अनुभव नाही पण माझा विद्यार्थी “ सौरभ नाफडे “ ह्याने मला Online साठी लागणारा सर्व सेटप करून दिला त्यामुळे मला सोपे झाले.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी संस्थेतर्फे निशुल्क व्याख्यान घेतले जाते ज्यात ह्या क्षेत्रातील अनेक मान्यवर हेजेरी लावतात .
शिल्पाताईंची हि संस्था ज्ञानगंगेची धुरा समर्थपणे पेलत आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी Youtube च्या माध्यमातून एखादा विषय घेऊन त्यावर व्याख्याने द्यायलाही सुरवात केली आहे. हे शास्त्र प्रगत आहे, रोज ह्यात नवनवीन बदल घडताना दिसतात ,संशोधन होत असते . म्हणूनच काळासोबत चालणे , वाचन वाढवणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले आणि ह्या सर्वासाठी संस्था अनेकविध उपक्रम राबवत आहे.
ह्या शास्त्राच्या अभ्यासाचा त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. ह्या शास्त्राने त्यांना खूप काही दिले आहे. जीवन कसे जगायचे त्याचे महत्व समजले, मानसिक समाधान दिले , अध्यात्माची अनेक दालने उघडून दिली आणि त्यातील बैठक पक्की झाली. जातकाच्या प्रश्नांची उकल केल्यावर लाभलेले समाधान कुठेच मिळणार नाही आणि त्याचे मोलही करता येणार नाही हे त्यांनी आवर्जून सांगितले.
शिल्पा ताई स्वतःसाठी जगणे कधीच विसरून गेल्या आहेत इतक्या त्या “ ज्योतिषमय “ झाल्या आहेत . त्यांचे कमी काळातील केलेले कार्य उत्तुंग आहे. इतके हे शास्त्र संपन्न , प्रगल्भ आहे पण तरीही त्याला दुषणे ठेवली जातात हे सत्य डोळ्याआड करून चालणार नाही .म्हणूनच न राहवून एक प्रश्न विचारावासा वाटला कि समाजाला खरच ह्या शास्त्राची गरज आहे का? त्यावर शिल्पा ताई म्हणाल्या ,जेव्हा सर्व प्रयत्न संपतात , सर्वत्र अंधकार दिसू लागतो तेव्हा जातक ज्योतिषाकडे मोठ्या आशेने येतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात जनसामान्यांचे प्रश्न शिक्षण , परदेशगमन , नोकरी , विवाह , घर आणि पुढील आयुष्य ह्याभोवतीच फेर धरून असतात .पत्रिकेच्या माध्यमातून व्यक्तीला वरील सर्व प्रश्नांसाठी नक्कीच मार्गदर्शन मिळू शकते. विद्यार्थ्यांना करिअर ची निवड करण्यासाठी तर अनेकांना आपले आयुष्य वाचवण्यापर्यंत हे शास्त्र उपयोगी पडते आणि म्हणूनच समाजाने ह्या शास्त्राची हेटाळणी न करता त्याचा योग्य तो सन्मान केला पाहिजे.
आजकाल “ विवाह “ हि समाजाला भेडसावणारी ज्वलंत समस्या आहे. ह्यातही शास्त्राच्या माध्यमातून दोघाने समुपदेशन करून अनेकांचे घटस्फोट वाचलेले आहेत .
ह्या सगळ्याचा गांभीर्याने विचार करता आज तरुण पिढीने ह्या शास्त्राकडे अभ्यासू नजरेने पाहून ते आत्मसात केले पाहिजे असे मी म्हणताच त्या म्हणाल्या अग आश्चर्याची गोष्ट अशी कि आज तरुण पिढीचा ओढा हे शास्त्र शिकण्याकडे नक्कीच आहे. ह्या शास्त्राचा संशोधनात्मक अभ्यास केला तर जीवन सुसह्य होते . नुसत्या वल्गना करणार्यांनी ह्या शास्त्राची जरूर प्रचीती घ्यावी आणि मगच मत ठरवावे.
अवकाशात अनेक मैल दूर असणारे हे तारे जेव्हा मानवी जीवनावर परिणाम करताना दिसतात तिथेच ह्या शास्त्राचे मोठेपण सिद्ध होते. कुणी टीका केली म्हणून ह्या शास्त्राचे महत्व तसूभरही कमी होणार नाही . ज्योतिष काहीवेळ बाजूला ठेऊया पण हिंदू धर्मातील अनेक परंपरा अगदी रोजच्या जीवनाशी निगडीत असणारे पंचांग कसे पाहायचे तेही अनेकांना माहित नसते . ह्या सर्वाचा अभ्यास जीवनाला पूरक असाच आहे. हे शास्त्र शिकणार्या प्रत्येकाला त्याचा ध्यास घ्यावा लागतो . ते नसानसात मुरले तर त्याची महती समजते आणि गोडी वाढते .अभ्यासू वृत्ती , संशोधन करण्याची वृत्ती आणि संयम लागतो.
ज्योतिष हि एक तपस्याच आहे. जळी स्थळी ज्योतिष दिसले पाहिजे इतके त्यात मुरावे लागते . ह्या शास्त्राचा मानवी मनाशी आत्म्याशी जीवनाशी जवळचा संबंध आहे.शिल्पा ताई नेहमी म्हणतात उत्तम ज्योतिषी होण्याआधी आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होणे अत्यावश्यक आहे.
ज्योतिषाचा अभ्यास हा दांडगा असायला लागतो कारण जातक सर्वार्थाने आपल्या निर्णयावर बरेचदा अवलंबून असतो .म्हणूनच ज्योतिषाला आपले कर्म , मानसिकता , उपासना चांगली ठेवावी लागते. कारण जो दुसर्याला उपासना सांगतो त्याची स्वतःची उपासना भक्कम असलीच पाहिजे नाही का.
गप्पांमध्ये अनेक विषय येत होते . शिल्पा ताईंच्या नजरेतून मी ह्या शास्त्राचे नाविन्य अनुभवत होते. सर्व आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे . सर्वच क्षेत्रात असणारी जीवघेणी स्पर्धा ह्याही क्षेत्रात आहेच .आपला विवेक जागृत असेल तर कुठे काय शिकायचे ते समजते . उत्तम शिक्षक गुरु लाभणे ह्यालाही पूर्वसुकृत लागते भाग्य लागते.
अनेकविध पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या शिल्पाताई प्रत्येक क्षणी ज्योतिष जगत आहेत ह्याची ग्वाही आणि प्रचीती त्यांच्या सोबत झालेल्या गप्पातून मला मिळत गेली. ज्योतिष भूषण ,ज्योतिषाचार्य ,सुखकर्ता ज्योतिष पुरस्कार ,राष्ट्रगौरव, महिला ज्योतिष पुरस्कार ,अखिल ब्राम्हण महासभा तेजस्विनी पुरस्कार ,ज्योतिष ज्ञानचा उत्कृष्ठ लेखक पुरस्कार तसेच ज्योतिष शास्त्रातील अनेक गौरव आणि पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत . अनेक कार्यक्रमातून व्याख्याने ,सूत्रसंचालन सुद्धा त्यांनी केले आहे. घरासमोरील विशेष रांगोळी ,आरोग्यमुद्रा ,तुमची रास तुमचे करिअर ,वार्षिक राशी भविष्य तसेच अनेक दिवाळी अंकातून लेखनाद्वारे शास्त्राचा प्रसार करत असतात .
सतत नाविन्याचा ध्यास असणे , स्वतःचे असे वेगळे संशोधन करून विषय समजून घेणे , साधना , मनन चिंतनाची जोड आपल्याला विषयाच्या गाभ्यापर्यंत घेवून जाते.
ज्योतिष शास्त्राने मला काय दिले हे महत्वाचे आहेच पण आज आपण ह्या शास्त्राला काय देऊ शकतो ह्याचा विचारही केला पाहिजे. अभ्यासकांनी स्वतःला सिद्ध करण्याची धडपड न करता स्वतःला झोकून देऊन शास्त्राची अनुभूती घेतली पाहिजे.
खरच ज्योतिष हे रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणी आपण जगतच असतो. म्हणूनच म्हंटले आहे “ Life Is a Cardiogram “ आयुष्य म्हणजे ऊनपावसाचा ,सुख दुक्खाचा खेळ आहे . पण त्यातून ह्या शास्त्राच्या माध्यमातून अंगावर आलेली एखादी सुखद झुळूक सुद्धा जीवनाला कलाटणी देते आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सुपूर्द केलेल्या ह्या अनमोल शास्त्राचा सन्मान करणे आपण शिकले पाहिजे . हा ठेवा आपल्या पुढील पिढ्यानाही सुपूर्द करता आला पाहिजे. प्रत्येकाला आपली पत्रिका काही प्रमाणात माहिती असलीच पाहिजे.
शिल्पाताई म्हणजे ज्ञानाचा कोश आहेत. अजूनही मनात असंख्य प्रश्न रुंजी घालत होते पण कुठेतरी थांबायला पाहिजे हे मला समजत होते . शेवटी “ कधी थांबणार ? ह्या प्रश्नाऐवजी का थांबलात ? हा प्रश्न जास्ती चांगला नाही का.
शिल्पा ताईंची सहज सुंदर भाषाशैली , अध्यात्मिक बैठक , विषयाची जाण आणि तो समजावून सांगायची हातोटी केवळ अवर्णनीय आहे. त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून त्यांनी मला खूप वेळ दिला , कुठल्याही पुस्तकातून मिळणार नाही असे ज्ञानाचा ठेवा मला आज मिळाले ज्याचे कधीच मूल्यमापन करता येणार नाही .
इतक्या वेळ झालेल्या गप्पात मला अहंकाराचा लवलेश सुद्धा जाणवला नाही आणि ह्याच गोष्टीमुळे त्या सर्वांचे मन जिंकून घेतात .माणसाने घेण्यापेक्षा देण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे कारण त्यातून मिळणारा आनंद हा चिरकाल टिकणारा असतो हाच संदेश त्यांच्या वक्तव्यातून मला वारंवार मिळत गेला.
अश्या ह्या गुरु आणि एक मैत्रीण म्हणून लाभलेल्या गुरुतुल्य शिल्पा ताईचे माझ्या आयुष्यात आणि मनातही खास असे स्थान आहे. मला त्यांचा प्रचंड अभिमान तर आहेच पण त्यांच्या विचारांनी मी प्रेरित आहे .त्यांचे प्रत्येक व्याख्यान हे चिंतन मनन करायला लावते आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
आजच्या शिक्षक दिनी शिल्पाताईंच्या चरणी त्रिवार वंदन . शिल्पा ताईंना त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक संकल्पना राबवायच्या आहेत . त्यांना उत्तम आयुआरोग्य लाभो आणि त्यांचे जीवन सतत प्रगती पथावर राहूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .आज शिल्पाताईंचे हे सर्वांगीण यश “ याची डोळा ” पाहताना त्यांचे सर्व गुरुजन सुद्धा कृतकृत्य झाले असतील.
शिल्पा ताई म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे.क्षणात आपलेसे करून टाकण्याचा स्वभाव , कुठेही मोठेपणा नाही. सोज्वळ सकारात्मक व्यक्तिमत्व आणि चेहऱ्यावर न संपणारा आनंद , ज्ञानाचे तेज इतके असूनही आपण कुणीतरी वेगळे ह्या भावनेला थाराही नाही .असे हे संपन्न व्यक्तिमत्व असणार्या शिल्पा ताई आज ह्या शास्त्राच्या सेवेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत .
त्यांच्या साधेपणात त्यांचे मोठेपण दडलेले आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते
“ दिव्यत्वाची जेथ प्रचीती , तेथे कर माझे जुळती “.
अस्मिता
#अंतर्नाद#शिल्पाअग्निहोत्री#सखोलअभ्यास#पारंपारिकज्योतिष#अंकगणित#वास्तुशास्त्र