Wednesday, 1 July 2020

गुरु परमात्मा परेशु

|| श्री स्वामी समर्थ ||





रात्रीची 8 ची वेळ होती .शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात कीर्तन रंगले होते ...बराच मोठा समुदाय होता.  संपूर्ण वातावरण टाळ मृदुंगाच्या तालावर डोलत होते आणि वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.  अखेरीस महाराजांच्या नामाचा घोष सुरु झाला आणि सर्व जण देहभान विसरून एकरूप झाले आणि तालावर नाचू लागले. माझीही पाऊले फेर धरू लागली...भक्तिरसात तुडुंब बुडालेल्या भक्ताला कश्याचेही भान रहात नाही. कीर्तन संपले आणि गादीशी जाऊन महाराजांचे दर्शन घेतले.  शेगावात मुक्काम होता पण कितीही वेळा दर्शन घेतले तरी समाधान होत नव्हते. पहाटे उठून पुन्हा महाराजांच्या दर्शनाला आले. सहज डोक्यात आले कि आज महाराजांचे दर्शन 51 वेळा घ्यावे...पहाटेच्या वेळी मंदिरात जास्ती वर्दळ नव्हती. त्यामुळे दर्शन करून पुन्हा रांगेत उभे राहायचे असे 44 वेळा दर्शन झाले. आदल्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायाचे वाचन ,प्रदक्षिणा सर्व यथाशक्ती झाले होते. शेगावात प्रदक्षिणांचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आज फक्त दर्शन .

महाराजांचे गणराज कडूभाऊसोबत
 दुपारची 11 ची वेळ जवळ आली तशी महाआरतीची तयारी सुरु झाली . महाराजांचे अश्व आणि गणराज ह्यांनी हजेरी लावली. संपूर्ण मंदिरात सर्व ठिकाणी घंटानाद होऊ लागला. सर्वत्र महाराजांचे अस्तित्व जाणवू लागले...हा घंटानाद अद्भुत असतो. वातावरण आणि भक्त मंत्रमुग्ध झाले ,हा सोहळा अलौकिक असतो तो याची देही याची डोळाच पाहावयाचा आणि अनुभवायचा असतो .महाआरती नंतर महाप्रसाद त्यामुळे वर्दळ वाढली आणि माझे दर्शन 44 पुढे गेले नाही . दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा रांगेत उभी राहिले आणि 5.30 वाजेपर्यंत माझे  50 वेळा दर्शन झाले होते . आता फक्त एकदा दर्शन झाले कि माझा 51 वेळा दर्शनाचा संकल्प पूर्ण होणार होता. आज संध्याकाळच्या गाडीने निघायचे होते आणि आता निघायची वेळ जवळ येऊ लागली होती . मंदिरात गर्दी वाढू लागली होती आणि मला फक्त एकदाच दर्शन हवे होते. गर्दीत घुसून कसेतरी तो ५१ चा आकडा गाठायचा हे मला आणि महाराजांनाहि रुचणारे नव्हते .

माझे डोळे पाण्याने भरले. चेहरा एव्ह्डासा झाला. आपल्याकडून अशी काय चूक झाली कि आपले एक दर्शन अपुरे राहत आहे ह्या विचारांनी मनात काहूर उठले. आता ह्या भल्यामोठ्या रांगेत उभे राहायचे म्हंटले तर गाडी चुकणार ,बरोबरची मंडळी वाट पाहत होती. महाराजांशी मनातल्या मनात भांडण सुरु झाले . अगदी लहानसहान आनंदही तुम्ही मला मिळू देत नाही का , येणारच नाही मी आता इथे , तिथे गादिवर बसून माझी गम्मत पाहत आहात असे एक ना दोन..निराश झाले .पण करू तरी काय. शेगावात महाराजांच्या दर्शनाला वाशिलेबाजीही नाही आणि  तिथे डावे  उजवेही नाही. सर्वांनी एकाच रांगेत उभे राहून दर्शन घ्यायचे हा कडक शिरस्ता आहे तिथे..काहीही सुचत नव्हते. मनात तळमळत होते शेवटी डोळे मिटले आणि महाराजांचे साजिरे रूप डोळ्यासमोर आले. अंतर्मनापासून तळमळीने नमस्कार केला  आणि दर्शन नाही तर अखेरची एक प्रदक्षिणा घालावी म्हणून चालू लागले.

शेगाव समाधी मंदिर
महाराजांचे दर्शन घेवून बाहेर येतात त्या ठिकाणी एक अपंग व्यक्ती त्यांच्या पत्नीसोबत दर्शनासाठी उभी होती . त्यांच्या अश्या स्थितीमुळे सेवेकरांनी त्यांना तिथून जाण्यास परवानगी दिली होती. त्यांच्या पत्नी त्यांना हातास धरून खाली नेऊ लागल्या तोच त्यांच्या हातातील कुबड्या खाली माझ्या पायाशीच पडल्या. त्यां म्हणाल्या ह्या कुबड्या धरून येता का सोबत कारण मला हे सर्व नेता येणार नाही . सेवेकार्यानेही काहीही न बोलता त्यांच्या सोबत मला  दर्शनास सोडले. ध्यानीमनी नसतानाही मला दर्शनास जायला मिळाले म्हणून माझा आनंद गगनात मावेना . माझ्या सोबतच्या दांपत्याचे छान दर्शन झाले आणि त्यांच्यामुळे माझेही. डोळे भरून महाराजांकडे पहिले ,त्यांचे सर्व रूप डोळ्यात साठवून ठेवू लागले ,डोळे मिटले तरी त्यांचे हे रुपडे नजरेसमोरून आजदेखील हलत नाही. “मुली मन भरले का ग तुझे” असेच जणू महाराज मला म्हणत असल्याचा भास झाला. महाराज माझ्याकडे पाहून खुदकन हसत होत आणि ते पाहून माझ्याही चेहऱ्यावर हसू फुलले होते .ह्या दांपत्याच्या निम्मित्ताने माझा संकल्प त्यांनी पूर्ण करून घेतला होता .

काही वेळापूर्वी त्यांच्याशी केलेल्या भांडणाबद्दल त्यांची क्षमा मागितली.  माझ्या मनातील खरा भाव त्यांनी जाणला आणि माझा 51 वेळा दर्शन घेण्याचा संकल्प पूर्ण झाला .सेवा करून त्यांनी तो पूर्ण करून घेतला . एखाद्याला मदत करणे हीसुद्धा सेवाच आहे . तेथील सेवेकार्यास “ मला दर्शनाला सोडता का? ” हे माझ्या तोंडून शेवटपर्यंत आले नाही .माझा भाव अगदी सोळा आणे खरा होता आणि तो महाराजांनी ओळखला म्हणूनच मला दर्शनाचा लाभ झाला..माझा आनंद गगनात मावत नव्हता. मन भरून आले तेव्हाही आणि आता ह्या क्षणी लिहितानाही . खरच महाराज मी तुमची शतशः ऋणी आहे असे म्हणून नतमस्तक झाले. बाहेर आल्यावर त्या दांपत्याला हि नमस्कार केला. पुन्हा एक प्रदक्षिणा घातली आणि निघाले. मंदिराचा कळस दिसेपर्यंत मागे वळून वळून पाहत होते .

महाप्रसाद शेगाव
माझ्यासाठी हि घटना निश्चितच साधी नव्हती. ज्या क्षणी मी हताश , निराश झाले होते नेमक्या त्याच क्षणी महाराजांनी मला अनन्यसाधारण प्रचीती दिली होती. आपण अंतर्मनापासून त्यांच्याकडे काही मागितले तर ते पूर्ण होणार नाही असे कदापि घडत नाही, ह्याची पुन्हा एकदा प्रचीती आली. मी अखेरची प्रदक्षिणा घालायला आणि ते दांपत्य समोर येणे हे सर्व घडवणारे महाराजच हे वेगळे सांगायला नको.



गाडीत सर्वाना हा अनुभव सांगतानाही हरखून गेले होते. महाराजांचे पावलोपावली असे अनुभव गेले अनेक वर्षे मला येत आहेत आणि भविष्यातही ह्या लेकीच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील ह्यात दुमत नाही. आपण काय कसे आणि किती आर्ततेने मागतो तेही महत्वाचे.  कुणाचे नुकसान करून महाराज आपल्याला कधीच काही देत नाहीत किबहुना तसे भक्तांनीही मागू नये आणि महाराजानाही धर्मसंकटात टाकू नये.मला काय हवे त्यापेक्षा माझ्यासाठी काय योग्य आहे ते जाणतात आणि त्याचप्रमाणे ते देतातही ह्यावर आपली नितांत श्रद्धा असायला हवी.महाराजांच्या सेवेत राहणे आणि तेही निस्पृहतेने हेच आपल्या सारख्या भक्तांचे काम आहे. खरे पाहता आपण काही मागायची गरजच नसते, कारण आपल्याला त्यांनीच तर घडवले आहे आणि आपल्या मनातील भाव ते ओळखतातच . आपण सेवा करत राहावी, संकटेही येतात ,आपल्या प्रारब्धाप्रमाणे पण त्यातून मार्गही निघतो. महाराजांचे नाम घेत राहावे इतकेच मला समजते.

माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी मला त्यांनी मार्ग दाखवला आहे. खर सांगू का २४ तास महाराजांशी बोलायची मला सवयच लागून गेली आहे. अगदी बाहेर जातानाही मी त्यांना सांगून जाते आणि आल्यावरही . आज कुठली भाजी आणली आहे काय महाग होते, किती गर्दी होती हे सर्व अगदी इत्यंभूत पणे त्यांना सांगते . सकाळचा चहा त्यांच्यासमोर ठेवून मगच तो घेते आणि दिवसास सुरवात करते. प्रत्येकाने त्यांची कशी सेवा करावी हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे पण मनापासून कुठलीही अपेक्षा न ठेवता मनोभावे सेवा करावी हे महत्वाचे आहे.

आई जशी आपल्या लेकरावर कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते अगदी तसेच महाराजांवर मायेचा वर्षाव करत सेवेत राहावे. कुणी काहीही म्हणो त्यांचे अस्तित्व आहे आणि ते अपरिमित आहे.

माझ्या घरात तारक मंत्र म्हणून मगच जेवणे हा शिरस्ता आहे.त्यात कधीही बदल होत नाही. आपल्या पुढील पिढ्यांना संतचरित्र समजणे , अध्यात्माची , ध्यानाची नामस्मरणाची गोडी निर्माण होणे ह्या गोष्टींची जबाबदारी आपली आहे.

 माझ्या आयुष्यात मला श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ हे दोन गुरु लाभले ह्याचा मला खूप आनंद आहे. आता ते माझे मित्रच झाले आहेत त्यामुळे त्यांच्याशी गुजगोष्टी करण्यात माझा दिवसभराचा खूप वेळ जातो

थोडक्यात काय तर महाराजांसोबत  आपली “ मन कि बात ” सुरु असते आणि ती अखेरच्या श्वासापर्यंत अखंड चालूच राहणार.

आपले आयुष्य अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारे  स्वामी आणि गजानन महाराज ह्यांचे अस्तित्व चराचरात आहे. ह्या सर्व शक्ती आपल्या आकलनाच्याहि खूप पलीकडे आहेत . आपण आपला प्रपंच करत शुद्ध आचरण ठेवावे आणि त्यांच्या सेवेत राहावे. बाकी काहीही करायची आणि मागायची गरजच नाही.

“ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” हे वचन महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले आहे. “अशक्यही शक्य करतील स्वामी ” हि ग्वाही महाराजांनी आपल्या समस्त भक्त गणास दिली आहे. म्हणून उठसुठ आपण काहीही मागू असा त्याचा अर्थ नाही तर त्यांना ते योग्य वाटले तर आणि तरच ते अशक्य गोष्टी शक्य करतील  असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे.  मुळातच अध्यात्म आणि आपल्या गुरूंची सेवा फलद्रूप होते जेव्हा ती कुठल्याही भौतिक सुखाच्या लालसेच्या परे असते  . गुरुसेवा मेवा देणार नाही पण समाधान आणि शांत झोप नक्कीच देयील. प्रापंचिक जिवनात अडचणी येणारच पण जातायेता महाराजांना एखाद्या गोष्टीसाठी बेठीस धरणे  कितपत योग्य आहे,हेही लक्ष्यात घेतले पाहिजे . आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी , श्रद्धा सबुरी ठेवावी , महाराज मार्ग दाखवणार हा विश्वास मनी धरावा ,असे केल्यास प्रत्येक कार्य सिद्धीस जाणारच ह्यात शंका नाही. प्रचीतीविना भक्ती नाही त्यामुळे महाराज आपल्याला प्रचीती देतातच.


आज गुरुपोर्णिमेच्या निम्मित्ताने शेगावचा हा प्रसंग आपल्यासमोर कथन केला. आपल्या सर्व भक्तांकडे अश्या प्रचीतींची , अनुभवांची शिदोरी भरलेली असते आणि तेच आपले जीवन जगायचे “ टॉनिक ” असते.

आज मागे वळून पाहताना वाटते महाराजांनी किती आणि काय दिले आहे ते अंबारीच्या चान्ज्ञासार्खेच आहे , ज्याची मोजदात होवूच शकत नाही. भौतिक सुखे आणि महाराज हे समीकरण कधीच होवू शकत नाही. आपल्याला कधी काय आणि कसे द्यायचे ते त्यांना माहित आहे . आपण काहीही मागू हो पण आपल्याला काय  झेपेल , हे फक्त त्यांनाच ठावूक आहे. माझे अखंड आयुष्य ज्यांनी घडवले त्या माझ्या दोन्ही गुरुंसमोर मी आज नतमस्तक आहे. काही मागायचे शिल्लक ठेवले नाही  इतके भरभरून सुख समाधान त्यांनी माझ्या ओंजळीत घातले आहे. आपण सेवेकरी आहोत महाराज नाही ह्याचा क्षणभरही विसर भक्तांनी पडू देवू नये नाहीतर महाराज सोटा हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या गुरूंच्या नामाचा प्रसार हे आपले प्रथम कर्तव्य आहे.

‘अनन्याश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते ।
 तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्’


अनन्यभावाने शरण येवून जो माझी भक्ती करेल त्याचा योगक्षेम मी चालविन असे अभिवचन स्वामिनी आपल्या भक्तांना दिले आहे. 

भक्तांनी अखंड नामस्मरण करत राहवे, आपला प्रपंच करताना परमार्थ करावा हि शिकवण गुरुनी आपल्या भक्तास दिली आहे. श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्यांनी आज देह ठेवून कित्येक वर्षे लोटली पण आजही लाखो भक्तांना ते प्रचीती देत आहेत .

आज गुरुपोर्णिमा .भक्तांसाठी आजचा दिवस एखाद्या सणापेक्षाहि महत्वाचा.आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस . जन्म झाल्यापासून आई , घरातील इतर वडील मंडळी , शिक्षक , आपले अध्यात्मिक गुरु , योगशिक्षक हे सर्वच आपल्यासाठी गुरुस्थानी आहेत . त्यांनी आपल्याला दिलेली ज्ञानाची शिदोरी आणि दाखवलेला सन्मार्गाचा मार्ग ह्यावरून मार्गक्रमण करत आपले आयुष्य व्यतीत होते ते खर्या अर्थाने समाधान देवून जाते. आपल्याला हा “गुरु परंपरेचा ” वारसा पुढच्या पिढ्यानाही सुपूर्द करायचा आहे. आयुष्यात जितक्या लवकर आपण ह्या गुरुसंप्रदयात, अध्यात्मिक मार्गात येवू तितके आयुष्य सुकर होत जायील ह्यात शंकाच नाही. आयुष्यात उत्तम गुरु भेटणे ह्यासाठीही पूर्वसुकृत असावे लागते आणि एकदा आपल्याला गुरु लाभले कि अध्यात्माची अवीट गोडी चाखायला मिळते . निराशा , मरगळ ह्या गोष्टी आपल्या वाट्याला कधीच येत नाहीत. सकारात्मकता , विश्वास वाढीस लागतो , नामस्मरणाने आजार दूर पळतात. षडरिपूवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तर अश्या ह्या गुरु पौर्णिमेचे अपरंपार महत्व आहे आणि त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.


श्री.(कै.) यशवंत शिंदे काका
गुरुतुल्य श्री.(कै.)यशवंत गणपतराव शिंदे ह्यांना हा लेख अर्पण करत आहे. यशवंत काका आमचे स्नेही आणि गुरुतुल्य व्यक्तिमत्व. अत्यंत साधे सोपे जीवन व्यथित करणारे. त्यांच्या जीवनात त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक पदे भूषविली . उच्च पदावर जाऊनही त्यांच्यातील साधेपणा आणि माणुसकी  निर्व्याज्य राहिली. कुटुंबवत्सल ,निखळ असे व्यक्तिमत्व ,प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास ,आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकासाठी कसा करता येयील ह्या उदात्त विचारांनी त्यांनी स्वतःला शिक्षण क्षेत्रात झोकून दिले. कुठल्याही गौरवाची , पारितोषिकाची अभिलाषा न धरता निस्पृहपणे जीवन व्यथित करणाऱ्या यशवंत काकांनी शिक्षण क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला. अनेक उच्च पदे भूषविली आणि त्यांच्या कार्यासाठी अनेक वेळा त्यांचा सत्कारही झाला. हे सर्व करत असताना त्यांनी अध्यात्माची कास सोडली नाही. आपल्या निष्ठा गजाननपदी वाहिल्या आणि त्यांच्या निरंतर सेवेत राहून आपले जीवन महाराजांच्या चरणी अर्पण केले.

 श्री गजानन विजय ग्रंथ आपले सर्वस्व मानून गुरुसेवा केली. काहीही मागितले नाही , आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले पण आपल्या चांगल्या सत्शील विचारांनी आणि महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी आपल्या आयुष्याची नय्या पार केली. श्री. गजानन विजय ग्रंथाचे आपले सर्वस्व मानून पुजन केले . त्यांचा हा अध्यात्मिक आणि गुरुसेवेचा वारसा आज त्यांचे चिरंजीव श्री. सुधीर यशवंतराव शिंदे दर श्रावणात ह्या ग्रंथाचे वाचन करून पुढे चालवत आहेत. महाराजांचा वरदहस्त शिंदे कुटुंबियांना लाभला आहे तसाच तुम्हा आम्हा सर्वाना लाभो. श्री सुधीर ह्यांनी आपल्या वडिलांचा हा ग्रंथ वाचनाचा वारसा पुढे चालवून तरुण पिढीसमोर ,गुरुपरंपरा आणि आपल्या वडिलांप्रती असलेली भावना कशी जपावी, ह्याचे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे ,असे म्हंटले तर वावगे होणार नाही.

पालखी सोहळा
मंडळी , आपल्या गुरुप्रती आपल्या सद्भावना व्यक्त करण्याचा हा सोन्यासारखा दिवस. पदोपदी आपली काळजी वाहणाऱ्या आपल्या गुरुना आज गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली आहे . त्यांनी चालून दिलेल्या मार्गावर चालणे, सद्भावनेने वागणे, प्रपंच करताना परमार्थ करणे, गुरूसेवेचा वारसा पुढील पिढीस सुपूर्द करणे, त्यांच्या कार्याची धुरा वाहणे, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावरील विश्वास अढळ ठेवणे , आपल्या अखेरच्या स्वसापर्यंत त्यांचे चिंतन , नामस्मरण करत त्यांच्या नामाचा प्रसार करणे हीच आपली खरी गुरुदक्षिणा आहे. ह्या लेखनाचा खरा उद्देश तोच तर आहे.

आपले अनुभव कथन करून ते वाचून असंख्य भक्त तयार करणे हा मुख्य उद्देश आहे म्हणून हा लेखनप्रपंच. आपले अनुभव सांगताना आपणही अध्यात्मात, साधनेत अधिकाधिक परिपक्व होत जातो. श्रद्धा बळकट होते ,अनुभवकथन केल्याचे आत्मिक समाधान लाभते आणि हे अनुभव वाचून अनेकांच्या मनात गुरुसेवेचे बीज रोवले जाते , गुरुप्रती आत्मीयता निर्माण होवून तेही गुरुपंथाला लागतात.

माझ्या आयुष्यातील गुरुस्थानी असणार्या प्रत्येकाला माझा साष्टांग दंडवत आणि सर्व वाचक वर्गास ह्या लेखाच्या माध्यमातून गुरुपोर्णिमेच्या खूप शुभेछ्या.


लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.


Antarnad18@gmail.com

अस्मिता

कितीदा दिला बोल त्यांनीच हात,नको डगमगू स्वामी देतील साथ |