Wednesday, 22 July 2020

अनुबंध स्वयंपाकघराचे

||श्री स्वामी समर्थ ||  


समस्त स्त्रीवर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील “ स्वयपाकघर ”. आपली नाळ स्वयंपाकघराशी जोडलेली असते .आपला बायकांचा सगळ्यात जास्ती वेळ स्वयंपाकघरात जातो. येथील प्रत्येक गोष्टीत आपला जीव अडकलेला असतो. येथील वस्तू कितीही जुन्या झाल्या तरी त्याची रवानगी अडगळीच्या खोलीत किंवा माळ्यावर होते पण त्या टाकून देणे आपल्यासाठी केवळ अशक्य.

पूर्वी घरे मोठी होती आणि एकत्र कुटुंबे होती त्यामुळे स्वयपाकघरात अनेक पिढ्यातील स्त्रीवर्गाचा वावर असे आणि त्यांचे संसार असत . घरातील प्रत्येक पिढीतील सुना त्यांच्या माहेरूनही काहीना काही भांडी ,घेवून येतातच घरातील स्त्रियाही जितक्या एकोप्याने नांदत नसतील इतक्या स्वयपाकघरातील वस्तू पिढ्यानपिढ्या नांदत. प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली आणि त्या त्या जागी त्या अगदी मानाने राहत असत. जसे मोठी भांडी , हंडे , कळश्या ,पाटे ,जाती ,विळी, रोळी, खलबत्ता ई.

आधुनुकीकरणामुळे विभक्त कुटुंबे जन्माला आली आणि घरातील सामानसुमानही विभागले गेले. स्वयपाक घराचेही विभाजन झाले. बदलत्या काळाबरोबर मनात नसतानाही काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात त्यातलीच हि अपरिहार्य गोष्ट.


पूर्वीच्या काळी कुटुंबे एकत्र नांदत , पहिली पंगत घरातील पुरुष मंडळी आणि लहान मुलांची असे. त्यानंतर स्त्रीवर्ग आणि शेवटी गडीमाणसे. परसात केळी असत त्यामुळे केळीच्या पानावर जेवण वाढले जायचे. लेकीसुना सर्व वाढायला लागायच्या. वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे....म्हणून सुरवात व्हायची. पानात काहीही ठेवायचे नाही हा शिरस्ता असायचा. आग्रहाने वाढणेही व्हायचे आणि चवीने खाणेही .सणासुदीला ह्या पंक्तीना वेगळेच स्वरूप यायचे . केळीची पाने , त्याभोवती रांगोळी , उदबत्यांचा घमघमाट आणि  जिलब्या , मोदक , लाडू , खीरपुरी , पुरणपोळीचा खास बेत असायचा. मोठ्या सुनेच्या हातची खास डाळिंबी उसळ, काकुच्या हातची चवदार कढी, कुणाच्या हातची गरम भाकरी , चटणी अशी प्रत्येकाची खासियत असायची. स्वयपाकघरात कामे विभागली जायची आणि पंगत ठरलेल्या वेळीच व्हायची. त्यावेळी सोवळे खूप असायचे .प्रथम देवांना नेवैद्य मग पंक्तीभोजन होत असे.. प्रातःसमयी अंघोळी करून चूल आणि भोवतालची जमीन सारवणे हा नेम असे. पूर्वीच्या काळी आजकालच्या सारख्या मिक्सर , ओव्हन . अश्या आधुनिक सोयी नसत. जात्यावर धान्य दळणे , पाट्यावर चटण्या , मोठाल्या खलात मसाले कुटणे  ह्या कष्टाच्या कामामुळे स्त्रियांना आपोआपच खूप व्यायाम मिळत असे.  स्वयंपाकघर मोठे असे आणि तिथे घरातील स्त्रियांची आणि कधीतरी घरातील गडी माणसांची मागील दारातून जाये असे. मागील परसातील अळू वगैरे लावलेल्या भाज्या , पुजेची फुले काढून दे, चुलीसाठी लाकडे , झाडावरील नारळ उतरवून सोलून दे अशी सर्व कामे अगदी यंत्रवत होत असत .घरातील स्त्रीला घरातील भांड्याकुंड्यांची व्यवस्थित मोजदात असे. शेजारून काही पदार्थ आला तर त्यात काहीतरी पदार्थ घालूनच ते परत दिले जाई.


तेव्हा Gas च्या शेगड्या नसत. स्वयपाक चुलीवर होत असे आणि त्या चुलीवरच्या स्वयपाकाची चव खास असायची. अंघोळीच्या पाण्यासाठीही बंब असत .विरजण लावलेले ताक घुसळायला मोठे हंडे आणि फडताळाचे कपाट म्हणजे स्वयंपाकघराची खासियत असे. तांब्या पितळ्याची भांडी स्वयपाकघरात असत .आजकाल आपल्याला त्याचे महत्व समजू लागले आहे.  त्याकाळी फ्रीज नव्हते त्यामुळे दुध दुभत्याचे पदार्थ ह्या फडताळात सुरक्षित असायचे. पोतीपोती धान्य येवून धान्याच्या खोलीत पडायचे . धान्य ,भाज्या निवडणे , वर्षाची बेगमीची कामे ,मसाले कुटणे , जात्यावर दळण दळणे अशी कामे करताना घरातील स्त्रिया ओव्या , श्लोक म्हणत असत त्यामुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढून नको त्या चर्चांना तिलांजली मिळत असे.
घरात अनेक पिढ्या एकत्र नांदत असल्याने अनेक वयोगटाची माणसे असत तरीही एकोपा होता . पूर्वीचा काळच वेगळा होता.
काळाबरोबर संकल्पना बदलल्या , शहरीकरण झाले आणि एकत्र कुटुंबे संपूर्ण नाही पण बर्याच प्रमाणत नामशेष झाली . स्वयंपाक घराचा चेहरा मोहरा बदलला. चुलींची जागा अत्याधुनिक cooking range ने घेतली, पाटे-वरवंटे ,खलबत्ते जावून मिक्सर आले तसेच दळणाची जातीही नामशेष झाली.



स्वयंपाकघर कात टाकून नव्याने सजले .कांदे बटाटे ,लसून ठेवण्यासाठी रंगीबेरंगी छान टोपल्या आल्या तर भांड्यांची रवानगी ट्रोली मध्ये झाली. स्वयपाक घरांच्या भिंती आकर्षक रंग लेऊन दिमाखात उभ्या राहिल्या . सगळ कसे चकाचक झाले. आधुनिकी करणाची छाप प्रत्येक कानाकोपर्यात दिसू लागली. स्त्रीवर्गाचे काम सोप्पे झाले , स्वयंपाक घरे आटोपशीर झाली .
स्वयंपाक घरातील गृहिणीचा वावर हा सर्वाधिक असल्याने तिथे मोकळेपणा आणि सुटसुटीत पणा पाहिजे. प्रत्येक स्वयपाकघरात त्या घरातील गृहिणीचे राज्य असते म्हंटले तर वावगे ठरू नये. तेथील अगदी चहासाखरेचे डबे ठेवण्याची ठिकाणेही ठरलेली असतात. आधुनिक स्वयंपाकघरांना  फ्रीज, ओवन,कुकिंग रेंज,मिक्सर ह्यासारख्या अत्याधुनिक गोष्टींचा साज चढला. ह्या सर्वांमुळे आज स्त्रीवर्गाचे कष्ट आणि वेळ वाचत आहे. जाती , पाटा ,उखळ ,ह्या गोष्टी आता नामशेष झाल्या .पूर्वीसारखे कष्ट ,उठबस कमी झाली आणि त्यामुळे पूर्वीच्या स्त्रियांचा दळणकांडण करताना नैसर्गिक आपोआपच व्यायाम व्हायचा तो आता होत नाही.

नवीन काळात पंक्तीभोजन , भारतीय बैठक घालून यथेछ्य ताव मारणे ह्या गोष्टी आता लोप पावत गेल्या. भारतीय बैठकीची जागा आता टेबलखुर्चीने घेतली. पूर्वी जेवताना म्हटले जाणारे “ वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे.”हे श्लोक आताच्या पिढ्यांना (काही अपवाद वगळता) माहीतसुद्धा नसतील. आता TV बघत जेवणे हेच बर्याचदा पाहायला मिळते. शहरात कार्यालयातून घरी येण्याच्या वेळाही बदलत्या असल्याने सहभोजन सुद्धा नावापुरतेच राहिले.पूर्वी घरचे जेवण ह्याला पर्याय नसे पण आता हॉटेल मध्ये जाऊन जेवले नाही तर आपण “out dated किंवा orthodox” ह्या कॅटेगरीत जाऊन बसतो. चुलीवरची बासुंदी ,भाजी भाकरी हे आता फक्त आठवणीत राहिले. पूर्वीच्या काळी स्त्रिया प्रथम चुलीची पूजा करून चूल पेटवत .अश्या कित्येक गोष्टी आता फक्त गावातच काही ठिकाणी पाहायला मिळतात .


पूर्वी स्त्रिया नोकरी करत नसत त्यामुळे हि सर्व कामे त्यांना दिवसभर पुरत ,पण आता स्त्रीचा बरासचा वेळ बाहेर जात असल्याने मनात असूनही अनेक गोष्टी शक्य होत नाहीत.
खरे सांगायचे तर “ स्वयंपाक घर ” आता “ Modular किचन ” झाले आहे . स्वयंपाकघराची संकल्पना जरी काळानुसार बदलली असली तरी स्त्रियांच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. 50 -100 वर्षापूर्वीची स्त्रीही स्वयपाकघरात राबत होती आणि आजचीही तेच करते. स्वयंपाक घर हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. घरातील मंडळींच्या मनात शिरण्याचा मार्ग हा पोटातून असतो असे म्हंटले जाते ते उगीच नाही. घरातील स्त्री आनंदी असेल आणि तिने आनंदाने जीव ओतून स्वयंपाकघराची आणि स्वयंपाकाचीही धुरा व्यवस्थित सांभाळली तर घरात सकारात्मक , संतुलित उर्जा प्रवाहित होते, जी घराचे वेगळेपण , सौख्य जपते .अश्या  घराला कधीही कमी पडत नाही. दिवसभर दमून आलेल्या घरातील मंडळी दोन घास खाऊन तृप्त होतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हि घरातील स्त्रीसाठी मोठी पावतीच असते.

स्वयपाकघर जुन्या पद्धतीचे असो अथवा नव्या ,गृह्लक्ष्मीचा तेथील वावर तिथे प्रेमाचे शिंपण करते. स्वयपाकघरातील अगदी लहानसहान गोष्टींशी स्त्रीचे अनुबंध असतात , येथील प्रत्येक गोष्टीत ती अनेक नाती पाहत असते आणि त्यांच्या आठवणीत रमतहि असते .अमुकअमुक गोष्ट माझ्या आईने , काकूने दिली हे सांगताना तिचे डोळे कधी पाणावतात ,तिचे तिलाही उमगत नाही. कितीही आधुनिकीकरण झाले तरी स्वयंपाक घरात वावरणारी स्त्री आजही तितक्याच प्रेमाने सर्वांची उठबस करतेय  .घरातल्या सर्वाना ,आल्या गेलेल्यांना प्रेमाने खाऊ घालणारी गृह्लक्ष्मीच ह्या स्वयंपाक घराला मूर्त स्वरूप देते.

तर असे हे अनेक नाती जपणारे ,”अन्न हे पूर्णब्रम्ह ” म्हणत खाद्य संस्कृतीचा वारसा जपणारे आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या आपल्या पूर्वजांच्या आठवणी ,वारसा ह्जयाना उजाळा देणारे असे हे आपले “ शाही स्वयंपाकघर ” आजही तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

अस्मिता 

antarnad18@gmail.com

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

#antarnad #Modular kitchen Decor #women #diet Food #positive vibes  #relations #traditions
#अंतर्नाद #स्वयंपाकघर #घरगुती पदार्थ #स्त्री #सुगरण #स्वयंपाकघराची दिशा #सकारात्मक उर्जा
#बंध #नातीगोती #अन्न हे पूर्णब्रम्ह #परंपरा 



No comments:

Post a Comment