Tuesday, 14 July 2020

गुरुकृपा

|| श्री स्वामी समर्थ ||




गुरुकृपा होणारच आणि ती झाल्याशिवाय राहत नाही .पण फक्त त्यासाठी मात्र सेवा करू नये...घरात नवजात बालक जन्मले कि सर्व घर आनंदी होते ...मुलाचे आईवडील आजीआजोबा ,आत्या ,मावशी सगळेच आपापल्या परीने त्याला प्रेमाने वाढवतात ..ते त्याच्यावरील प्रेमानेच ..म्हातारपणी आपली मुले आपला आधार होतील ह्या हेतूने ह्या भूतलावरील कुठलेही पालक आपल्या मुलांना वाढवत नाहीत ..ह्याची किती मुले जाणीव ठेवतात हा अर्थात वेगळा विषय आहे तर सांगायचे असे कि आपण सेवा करत राहावी ..

भौतिक सुखाच्या लालसेने नाही .....आपण सेवेत आलो म्हंटल्यावर पुढे चिंताच नको...गुरुसेवेत यायलाही योग लागतो , त्यासाठी पुर्वसुकृतही लागते आणि एकदा तो योग आला कि आपण अर्धी लढाई तिथेच जिंकतो....पण खरा पुढील 50% मार्गाच मोठा परीक्षेचा असतो .आज शेगाव ,अक्कलकोट , शिर्डी , गोंदवले येथे जावून आपण पोथी आणतो ,अगदी उत्तम मुहूर्त पाहून वाचन सुरु करतो पण पुढे काय ...पी हळद हो गोरी हा नियम अध्यात्मात नाही ..२-४ पारायणे केली कि महाराजांवर उपकार केले अश्याच भावनेत आपण राहतो...माफ करा सर्वच ह्यात मोडत नाहीत पण आजकाल मी प्रगट दिनाला पारायण केले मी हे केले आणि ते केले हे ऐकू येते म्हणून आज उल्लेख करावासा वाटतो..

मी सुद्धा २० वर्षापूर्वी श्री गजानन विजय वाचायला सुरवात केली तेव्हा मी पारायण केले मी हे केले असेच म्हणत असे पण मग सासुबाईनी योग्य मार्ग दाखवला ,त्या म्हणाल्या अग अस्मिता ,मी केले म्हणजे केव्हडा अहंकार हा ,अग तु कोण करणारी ? तेव्हा महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले असे म्हणावे ,मीपणाला आपल्या जवळपास सुद्धा फिरकू देवू नये..आणि मग माझ्या जिभेला पारायण त्यांनी करून घेतले असे म्हणायची सवय झाली...आज पोथी घराघरातून आहे पण ती वाचतात किती आणि त्यात किती श्रद्धा आणि भाव असतो ते एक वाचणार्याला माहित आणि प्रत्यक्ष महाराजांना माहित ...म्हणूनच म्हंटले आहे अध्यात्माचा मार्ग खचितच अवघड,..पोथी वाचायची नाही तर ती जगायची आहे प्रत्यक्षात ..हेच त्यांना आपल्याकडून अपेक्षित असावे पदोपदी परीक्षा असतात .

अगदी रोज नवा पेपर पण आपण कधीतरी पास होणारच आणि एकदा पास झालो कि मग चराचरात असलेल्या ह्या विलक्षण शक्तीचा प्रत्यय येवू लागतो आणि श्रद्धा बळकट होत जाते प्रचीतीविना भक्ती नाही आणि भक्तिविना प्रचीती नाही ...आपल्या लाडक्या भक्तांना महाराजांना प्रचीती द्यावीच लागते ...आणि ते देतातही ..काय देतील ते आपल्या प्रराब्धप्रमाणे असते ...आपल्या अनेक अनेक जन्मांचे पापपुण्याचे गाठोडे घेवून जन्माला आलोय त्यामुळे आपल्या प्रारब्ध भोगत महाराज ढवळाढवळ करत नाहीत पण सर्व सोसण्याचे आणि जीवनरूपी नैय्या यथाशक्ती पार करण्याचे बळ मात्र ते नक्कीच देतात ..

आपल्या सेवेत मग ते काहीही असो ...नामस्मरण ,पोथी वाचन ,मानसपूजा सतत त्यांच्या सेवेत राहिले कि अपोआप जीवनात बदल घडून येतात ..निस्वार्थी सेवेचे फळ नक्कीच समाधान देवून जाणारे असते .. मन सतत सद्गुरुंजवळ विहार करत असते आणि आपली ब्रम्हानंदी टाळी लागावी अशीच अवस्था असते....काहीही मागायचे नाही ..ते उचित नाही ..कारण ज्यांनी आपल्याला जन्माला घातले त्यांना काय सांगायचे ..सर्व योग असतात ..पण आपली गुरुसेवेची आकंठ लागलेली तहान गुरुंपर्यंत जाते आणि आपल्यावर गुरुकृपा बरसात राहते ......

श्री स्वामी समर्थ.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.