Thursday, 9 July 2020

Whatsapp University (व्यक्ती आणि वल्ली )

|| श्री स्वामी समर्थ ||







जानेवारी 2009 मध्ये  “ whatsapp ” युग सुरु झाले आणि जगभर त्याचा जोमाने प्रसार झाला. whatsapp साठी अमुक एक android system लागते म्हणून ती असणार्या फोन(handset) ची म्हणजेच स्मार्टफोन ची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विक्री आणि उत्पादन होवू लागले. प्रत्येक जण अगदी सहज वापरू शकेल अशी अत्यंत साधी आणि सुटसुटीत असलेली संकल्पना आहे.

“ whatsapp ” ची अभिप्रेत असलेली संकल्पना म्हणजे “काय कसे काय ?”. अगदी सर्व स्थरातील लोकांनी हि संकल्पना उचलून धरली आणि आज whatsapp आपल्या जीवनाचा अनन्य साधारण भाग झाला आहे. इमेल पेक्षाही fastest fast म्हणायला हरकत नाही . एकमेकांच्या तत्क्षणी संपर्कात येण्यासाठीचे हे एक उत्तम माध्यम आहे. इथे आपण एकमेकांशी आपल्या भाषेत बोलू शकतो ,कुणालाही सहज वापरता येयील अश्या ह्या whatsapp ची नाळ आज आधुनिक जगताशी घट्ट जोडली गेली आहे. जगात आपण कुठेही असलो तरी आपल्या कुटुंबीय , मित्रमैत्रिणींचा संपर्क अगदी एका क्षणात होऊ शकतो. फोटो , वीडीओ पाठवू शकतो. परदेशस्थ असणारे आपले आप्तेष्ट , मुले यांच्याशी ह्यावर संवाद साधता येतो , एकमेकांना पाहूही ,बोलू शकतो ,त्यामुळे बहुचर्चित आणि बहुढंगी असे हे whatsapp ह्यावर लिहावे तितके कमीच आहे. आज corporate जगतात अनेक गोष्टी ह्यामुळे सोप्प्या झाल्या आहेत . थोडक्यात whatsapp मुळे जग जवळ(?) आले आहे.

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीस वरदान ठरलेले whatsapp , ह्यावर अनेक ग्रुप सुद्धा आता तयार झालेले दिसतात . कुटुंबातील एखाद्या समारंभाचे निमंत्रण प्रत्येकाला वेगळे देण्यापेक्षा कुटुंबाच्या whatsapp ग्रुप वर एक मेसेज करून आपले काम सोपे झाले आहे.परदेशी वारीचे फोटो, केलेले शॉपिंग , घरी केलेला पदार्थ इतकच नाही तर रोज केलेला walk , योगासने अगदी कश्याचेही फोटो बिनदिक्कत आपण whatsapp च्या माध्यमातून शेअर करू शकतो. आता ह्या whastapp वरती असंख्य ग्रुप करण्याची सोय असल्याने मग कुटुंबाचा , शाळेतील मित्रमैत्रिणींचा , कॉलेज चा, सोसायटीतील लोकांचा ,शाळा कॉलेज मधील विद्यार्थी , शिक्षक –पालक, भिशीचा , अध्यात्मिक , जपसंख्या मोजणारे , योग क्लास ,walk ग्रुपचा असे एक ना दोन, विविध कारणास्तव असंख्य ग्रुप तयार झाले आहेत.

घरी , रस्त्यात , ट्रेनमध्ये , शॉपिंग मॉल, भाजीमार्केट ,ठिकाण कुठलेही असो प्रत्येक जण whastapp वर व्यस्त असलेला दिसतो. कागदपत्रांची स्कॅन कॉपी पाठवणे ह्या गोष्टींसाठी हे एक उत्तम ,उपयुक्त माध्यम ठरले आहे. प्रत्येक गोष्टीला उणे अधिक बाजू असते, अर्थात whastapp ची सुद्धा त्यातून सुटका नाही .ह्याच्या जितक्या चांगल्या जमेच्या बाजू आहेत तितक्या त्रासदायक सुद्धा आहेत. मुंबईत पावसात पाणी जमले ,ट्रेन बंद पडल्या , कुठे पूल दरड कोसळली , एखाद्या सेलीब्रेटीचा वाढदिवस , राजकारणातील गरमागरम बातम्या , एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिचे देहावसानअश्या असंख्य बातम्या मिळण्याचे ठिकाण म्हणजे whatsapp. इतकेच काय पण भाड्याची जागा मिळण्यास ग्रुप वर पोस्त टाकली तर मदत नक्कीच मिळते ,एखादी व्यक्ती हरवली तर तिचे संपूर्ण वर्णन फोटोसकट शेअर केल्याने ती सापडण्यास मदत झाली अशी कित्येक उदाहरणे सुद्धा आहेत .

आजच्या covid काळात अनेक सोसायटीत भाजी विक्रीसाठी whatsapp ग्रुप तयार केले आहेत जे उपयुक्त आहेत .

 अश्या एक ना दोन असंख्य बातम्या whastapp युगात आपल्याला डोळ्यांची पाती लावते न लावते तोच मिळतात.

म्हणूनच कि काय whatsapp चे नामकरण आजकाल  “Whatsapp University” असे झाले असावे.

विषय कुठलाही असो इथे त्याचे अगदी पदवीपर्यंत शिक्षण मिळते . अहो उपहासाने नाही म्हणत खरच आहे ते . इथे राजकारण , क्रीडा , महागाई , शेअर मार्केट सगळ्या विषयांवर चर्चा रंगतात , त्यातून शिकायला मिळते , मते मतांतरे असतात ,पण अनेक पेहलू अभ्यासायला मिळतात . एकंदरीत काय तर अनेक महाभाग , कवी , लेखक ह्या “Whatsapp University” ने जन्माला घातले आहेत.

प्रत्येक गोष्ट प्रमाणात असेल तरच ती चांगली वाटते पण आजकाल त्याचा अतिरेक झाला आहे. सतत येणारे तेच तेच मेसेजेस चा आता वीट येवू लागला आहे .

“ whatsapp ” ह्या शब्दाचा खरा अर्थ कधीच काळाआड गेला आहे आणि आता फक्त त्याचा होणारा विपर्यास ह्याची देही ह्याची डोळा पाहणे चालू आहे. उगीचच रोज उठून प्रत्येकाला good morning , good night चे मेसेज करत आपण आपला आणि इतरांचा वेळ निव्वळ फुकटच घालवत असतो. रोज उठसुठ तेचतेच. आपल्या कुठल्यातरी नातेवाईकाच्या (ज्याला कुणीही ओळखत देखील नाही )लग्नाचे 25 फोटो टाकून आपली हौस भागवायची पण इतरांचे काय ? . अनेक ग्रुप मध्ये खूप खेळीमेळीचे वातावरण मी पहिले आहे. रोज नाही पण एखादा शनिवार रविवार मस्त गप्पा रंगतात . चांगले मित्रमैत्रिणी मिळून मैत्रीचे बंध फुलताना ,अधिक घट्ट होत जातात हा माझा स्वानुभव आहे .

चांगल्या, वाईट प्रसंगात क्षणात एकमेकांच्या संपर्कात येण्यासाठी चे हे खरे माध्यम पण काही काळापासून त्याच्या आपल्या आयुष्यावरील अतिक्रमण आपल्याला खरतर एकमेकांपासून दूर करत आहे कि काय ह्याची आता भीतीच वाटू लागली आहे. त्याचे जितके चांगले परिणाम तितकेच वाईट परिणामही समोर येत आहेत.
कुटुंबात संवाद कमी होतोय. प्रत्येक जण आपापला फोन मध्ये गर्क .काही दिवसांनी घरातील स्त्रीने “ जेवण तयार आहे , जेवायला या ” असा घरातल्या घरात मेसेज सर्वाना पाठवला तर नवल वाटायला नको.
काही अपवाद वगळता आता whastapp ग्रुप वरचे अनेक ग्रुप हि आता खरच डोकेदुखी व्हायला लागली आहे. कुठलाही मेसेज आला कि दुसरीकडे पाठवण्याची सदैव घाई असते जसे काही तो नाही पाठवला तर अक्षम्य गुन्हाच होणार आहे. तेच तेच मेसेज दिवसभरात कित्येक ग्रुप वरून येत राहतात त्यामुळे त्यातील वेगळेपण किंवा उत्सुकता लोप पावते .

आपण ग्रुप जॉईन करताना त्या ग्रुप मध्ये  असणारे विषय आणि तेथील लोकांची मानसिकता म्हणजे टेस्ट आपल्याला समजली तर आणि तरच ग्रुप जॉईन करणे हितावह असते, नाहीतर आपण पाठवलेल्या पोस्ट ला कुणी प्रतिसाद दिला नाही तर मग आपल्याला अगदी “odd man out” सारखे वाटायला लागते.

प्रत्येक ग्रुपला अद्मीन असतात . अद्मीन होणे म्हणजे काटेरी मुगुट घालणे. अद्मीन ला सर्वांची मने सांभाळता सांभाळता किती थकायला होते असेल ह्याचा विचारच न केलेला बरा. इर्षा , इगो ह्या सर्वातून शाब्दिक चकमकी आणि त्यातून मग ग्रुप सोडून जाणे हे नवीन नाही . ह्या सर्वाला इथेच पूर्णविराम मिळत नाही .पुढे मग बाहेर पडलेल्यांचा नवीन ग्रुप मग आधीच्या लोकांना कसे इथे वळवता येयील ह्याची केलेली रस्सीखेच. चार डोकी एकत्र नांदणे कठीण. बरेच वेळा एखाद्या मोठ्या ग्रुप चे अनेक पोट ग्रुप होतात. मग त्यात हेवेदावे , एखाद्यावर सतत टीका , अगदी हाड वैर म्हणा ना. एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला एकटे पाडणे , कुत्सित बोलून शब्दांनी दुखावणे हे प्रकार सर्रास होतात . खरतर आपण तिच्यासारखे नाही हेच दुखः जास्ती असते आणि ते सहन न झाल्यामुळे मग त्या व्यक्तीचा दुस्वास करणे आणि इतरानाही तो करायला भाग पाडणे ह्यात काही जण माहीर असतात . ह्यात एखादा किंवा एखादी खमकी असेल तर फरक पडत नाही पण एखाद्या कमकुवत मनाची म्हणजे इमोशनल व्यक्ती ह्यात तग धरू शकत नाही .अश्यांची फार घुसमट होते आणि त्यांच्या मनावर त्याचा अत्यंत घातक आणि विपरीत परिणाम होतो .अशी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यातील एखाद्या मैत्रिणीला एकटे पडून आपल्याला काय सुख ,आसुरी आनंद मिळतो ? बर्याच रिकामटेकड्या लोकांना हे सर्व उपद्व्याप करण्यास भरपूर वेळ असतो पण आपल्या ह्या ग्रुपिझम मुळे आपण कधीकधी दुसर्याचे किती भावनिक नुकसान करतो हे त्यावेळी त्यांना सांगुनही कळत नाही.अर्थात प्रत्येकाचा दिवस असतो त्यामुळे भविष्यात त्यांची हि कर्मे त्यांना त्यांच्या सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात सुद्धा अनेक समस्या निर्माण करणारी असतात .शेवटी म्हणतात ना करावे तसे भरावे .पण ह्या सर्वात ग्रुप ची मूळ संकल्पना, उद्देश बाजूलाच राहतो आणि नको त्या गोष्टीना पेव फुटते.

म्हणूनच ज्यांना ह्या सर्व व्यक्ती आणि वल्लीमध्ये वावरता येत नसेल त्यांनी ह्या ग्रुप नामक भानगडीपासून चार हात दूर राहावे. सगळ्यात असूनहि आपला रंग वेगळा हे ज्याला जमले तो तरला. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणे गरजेचे नसते. कधीतरीच मेसेज केला तर मानही राहतो. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हि भावना म्हणजेच अहंकार असे मला वाटते आणि हि भावनाच आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करते. सर्वात सामावून जाणे मी मी म्हणणार्या व्यक्तींना कठीण जाते .इतर वेळा कुठलाही मेसेज न करणारे लोक कधीतरी एखाद्या विषयावर इतरांना अक्कल शिकवायला लागतात तेव्हा ग्रुप चा अगदी आखाडा होतो, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. इतर ठिकाणी असते तसे फेवरीझम पण असते बरे का इथे. कधीकधी अद्मीन स्वतःच एखादा नियम करतात आणि स्वतःच तोडतात मग अश्यावेळी कुणी बोलले तर त्यांनी आपली चूक मान्य करणे ह्याला पर्याय राहत नाही किबहुना तेच अपेक्षित असते . आपल्यापेक्षाही इतर अनेक जणांना सुद्धा चांगली समज आहे ,हे आपल्याला उमगले तर सर्वच सोप्पे होवून जायील नाही का? आणि ह्या whatsapp ग्रुप चा खराखुरा आस्वादही घेता येयील.

प्रत्येक गोष्टीत कुठे थांबायचे हे समजले तर त्यातील गोडवा दीर्घकाळ टिकतो . “Whatsapp University”मध्ये खूप शिकण्यासारखे आहे , इथे जोडलेली नाती , मैत्री आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला एकटेपणा जाणवू देणार नाहीत ,फक्त ती मोकळेपणाने जोडता आली पाहिजेत .मान द्यावा आणि घ्यावा हे साधे सोप्पे समीकरण आहे .ह्या whatsapp जगतात कोरडेपणाने वावरलात तर हाती काहीच नाही लागणार ,येयील तो अधिकाधिक एकटेपणा .

सकारात्मक राहून केलेला इथला वावर, आपल्या आयुष्यातील  आनंदाला चार चांद लावील ह्यात शंकाच नाही.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

Antarnad18@gmail.com