Tuesday, 14 July 2020

अमृताहुनी गोड नाम तुझे .....

|| श्री स्वामी समर्थ ||




सप्टेंबर १९९९ मध्ये सासूबाई कै. उषाताई ह्यांनी श्री गजानन विजय पोथी हाती सुपूर्द केली आणि तेव्हापासून माझा अध्यात्मिक प्रवास सुरु झाला .महाराजांनीच त्यांच्या रुपात येवून मला आशीर्वाद दिला असेच मी समजते. शेगाव च्या असंख्य वार्या करूनहि मन तृप्त होत नाही हेच खरे . प्रत्येक वेळी निघताना महाराजांना सांगतेच ..तुम्ही इथे बसला आहात आणि मला इथून जायचे नाही तरी पाठवत आहात ...

सतत महाराजांशी संवाद ,गप्पा हा माझा नित्यक्रम आहे. मनातले सर्वकाही सांगावे असा तो माझा सखाच आहे जणू. पुढे कालांतराने अचानक स्वामिसेवेत रमले तेव्हा श्री (कै) वसंत काका गोगटे ह्यांनी सांगितले अग गजानन लीलाच आहेत ह्या . तु स्वामींचे नाव घेतलेस तर गजानन महाराजांना राग येण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्यांनीच तुला त्यांच्याकडे पाठवलेय असे समज..महाराजांनी मला आयुष्यात उभे केलेय ह्याचा क्षणभरही विसर मला पडलेला नाही. मी स्वतःला फार भाग्यवान समजते कारण आज श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्या दोन्ही गुरूंची अखंड सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि वेळोवेळी मिळालेल्या प्रचीतीमुळे माझी त्यांच्यावरील श्रद्धा बळकट होत गेली , मन शांत होत गेले. प्रपंचात रमलेले मन अनेक आसक्तिनी भरलेले असतेच ...

संसार म्हणजे सार जे कधी आटत नाही तसेच आपल्या संसारातील इच्छा आकांक्षा कधीच संपणार नाहीत .सतत काही ना काही हवेच असते आपल्याला .पण जशी जशी सेवा घडत जाते ..कालांतराने थोडी थोडी विरक्ती येते .आता काही नको असे वाटायला लागलेय ...तस किती आणि काय मिळवायचे असते आपल्याला आणि ते कश्यासाठी .इथेच तर सोडून जाणार आपण शेवटी ...शेवटचा प्रवास महाराजांचे बोट धरूनच तर होणार . आपल्या सर्व भक्तांची हीच तर अंतिम इच्छा असते..आज मागे वळून पाहताना जाणवते कि ,.किती देत आले आहेत ते आपल्याला ,कुठून कुठून बाहेर काढून मार्गस्थ करत आले आहेत .मन आणि डोळेही भरून येतात आपल्याही नकळत ....सगळ्याची हाव आहे आपल्याला ..सतत काहीतरी मिळवण्याची धडपड ..पण आता संचय करायचाय तो भक्तीचा .

आपण शेवटी सेवेकरी आहोत आणि आजन्म सेवा करणे हेच आपले काम हीच आपली उपासना...मी जेव्हा जेव्हा शेगाव ला जाते तेव्हा पहाटे ४ वाजता मठात जावून बसते ..अक्षरशः महाराजांचा प्रत्यक्ष वावर मला तिथे जाणवला आहे. हि अतिशयोक्ती नाही अगदी सत्य आहे. गेल्याच महिन्यात शेगाव चे यायचे तिकीट नव्हते म्हणून जाणे रद्द झाले पण मन शांत होते .पूर्वीसारखे वाईट अजिबात वाटले नाही त्यांचे बोलावणे आल्याशिवाय जाता येत नाही असले विचारही माझ्या मानत आता येत नाहीत कारण मी जिथे तिथे ते असल्याची क्षणोक्षणी प्रचीती , त्यांचे अस्तित्व मी सर्वकाळ अनुभवत आहे ..महाराज सतत जवळ तर आहेत ..पुढे शेगाव ला जाण्याचे असंख्य योग येतीलच कि.

श्री दासगणू महाराजांनी लिहिलेला रसाळ अजरामर ग्रंथ “ श्री गजानन विजय ”म्हणजे आपल्या सर्व भक्तांसाठी सुखाची ओंजळ आहे त्यातून किती आणि काय घ्यायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे . दासगणू महाराजांनी ह्या पवित्र ग्रंथात आपले जीवन कसे जगावे ह्याचे बाळकडूच दिले आहे असे समजले तर वावगे ठरू नये...
अध्यात्म हि जगण्याची कला आहे अगदी प्रत्येक क्षणी ...महाराज आपली सारखी आणि अखंड परीक्षा घेत असतात आणि घेत राहणार ...सतत पेपरला बसवतील, पण आपण कधीतरी पास होणार म्हणजे होणारच ..कुठल्याही अपेक्षेने ,प्रापंचिक सुखाच्या लालसेने केलेली सेवा फलद्रूप निश्चितच होणार नाही ह्यात दुमत नसावे. आपल्या प्रत्येक कृतीवर ,शब्दावर ,आचरणावर त्यांचे लक्ष नव्हे तर करडी नजर आहे ह्याची मनी खुणगाठ बांधली कि मग सगळेच सोपे होवून जाते ...चुका कमी होत जातात ...माफ करण्याची वृत्ती वाढते ,गोष्टी सोडून द्यायला शिकतो आपण ,मन मोठे आणि शांतही होते...एखाद्या गोष्टीसाठी अट्टाहास धरणे कमी होत जाते ...प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छेने होते आहे आणि होणार ह्यावर एकदा दृढ विश्वास बसला कि आपण सुखाच्या लाटेवर स्वार होवून आनंदी जीवन जगू लागतो.

“श्री गजानन विजय ” ह्या ग्रंथाचे वाचन करणे जितके कठीण ,त्याहीपेक्षा त्यातील महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणणे त्याहूनही कठीण. त्या आपल्याला जमेपर्यंत आपली अखेरच्या प्रवासाची  वेळ येणार कारण शेवटी आपला मनुष्य जन्म ...षडरीपुंपासून  मुक्त होणे तितके सोपे खचितच नाही ..म्हणून तर म्हंटले आहे अध्यात्म हि जगण्याची कला आहे . मानसपूजा , पारायण , नामस्मरण ह्या सर्वातून महाराज आपल्याला भेटत राहतात आणि कालांतराने आपण आणि महाराज वेगळे असे काही उरतच नाही .तो परमोच्च सुखाचा आणि आनंदाचा क्षण असतो .त्यांच्यासमोर उभे राहिले कि नुसते डोळ्यातून अश्रू वाहू लागतात .इतके एकरूप होणे हा शाश्वत आनंदच असतो भक्तासाठी .श्री गजानन विजय हा ग्रंथ म्हणजे आपल्याला दासगणू महाराजांनी दिलेली आनंदाची शिदोरी आहे. आपल्याला एक उत्तम साधक आणि भक्त व्हायचे आहे आणि तेच महाराजांना हि अपेक्षित आहे. प्रपंचात अनेक चढ उतार येणारच . पण आपल्या गुरूंवर असलेली श्रद्धा आपली नैया पार करतेच ..महाराजांचे अनेक भक्त होते आणि प्रत्येक जण आपापल्या  जागी श्रेष्ठच होते.

आपल्यालाही उत्तम भक्त होताना काही गोष्टीं लक्ष्यात ठेवणे अत्यावश्यक आहे. महाराजांची सेवा करताना आपल्याला स्वतःला महाराज नाही व्हायचे. आपण घेतलेले सेवेचे व्रत अखेरच्या श्वासापर्यंत चालू ठेवणे हे आपले कर्तव्य आहे . अध्यात्मात अनेक परीक्षाही असतातच . आपल्याला एका टप्प्यावर चार लोक नमस्कार करू लागतात तो आपला परीक्षेचा क्षण समजावा . कुणाकडूनही आपण नमस्कार करून घेणे हे उचित नाहीच. आपण सेवेकरी आहोत आणि नमस्कार फक्त आणि फक्त महाराजांनाच करायचा आहे हे त्या त्या वेळी स्पष्टपणे नाही सांगितले तर आपला विठोबा घाटोळ होईल हे ध्यानी असुदे. बंकटलाल , पितांबर ह्यांच्यासारखी भक्ती विरळाच .पण मला मात्र ह्या भक्तांच्या मांदियाळीतील एक भक्त अगदी मनापासून आवडतो आणि तो म्हणजे गणू जवर्या . आपल्या गुरुप्रती असलेल्या निस्सीम भक्तीचे हे विलक्षण उदाहरण आहे  .महाराजही त्याची भक्ती जाणून होते नी म्हणूनच शेवटच्या क्षणी कपारीवर धोंडा बसवण्यास धावून आले. आपल्याला गणू व्हायचे आहे ...पराकोटीची श्रद्धा आणि सर्वस्व त्यांच्या चरणी वाहून गुरुसेवेत रममाण व्हायचे आहे .ते  आपल्याला मार्ग दाखवणार ह्यात कुठलाही संदेह नाही.

महाराजांचा प्रगट दिन सोहळा सर्वत्र साजरा होईल . आपणही त्या दिवशी नामस्मरण , पारायण , प्रदक्षिणा , किमान श्री गजानन विजय पोथीतील एक अध्याय ,२ ओळी तरी वाचून आपल्या सेवेचा खारीचा वाटा उचलावा.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्याचा विसर पडू न देता अखंड सेवेचा वसा घ्यावा. ह्या ग्रंथाचे जो नित्य वाचन करील त्याकडे अनुपम भाग्य येयील हि ग्वाही प्रत्यक्ष दासगणू महाराजांनी ह्या ग्रंथात दिली आहे. भक्तिविना प्रचीती नाही आणि प्रचीतीविना भक्ती हेच खरे .प्रत्यक्ष अनुभव घेवून पहा.

रोज आपण किती वाचतो ,पाहतो पण तरीही त्यातले किती प्रत्यक्ष आचरणात आणतो, हा अभ्यासाचाच विषय आहे . हेवेदावे ,मत्सर ,असूया ,एकमेकांना कमी लेखणे ह्यातून कधी बाहेर येणार आपण ? उपासनेची मुळे जितकी खोलवर रुजतील तितके लवकर परावृत्त होवू ह्या सर्वांपासून. आपल्या रोजच्या दिनक्रमात महाराजांना पाहणे , त्यांचे अस्तित्व अनुभवणे आणि त्यांनी घालून दिलेल्या नीतीच्या मार्गावर चालणे हीच खरी गुरुसेवा .
“ माझा फोटो ठेवून बाजार मांडू नका ” हे महाराजांनी सांगितलेच आहे ....आज भक्त तयार होण्यापेक्षा बाबा , महाराजाच अधिक तयार होत आहेत हे वास्तव आहे .

माझ्या श्वासावर अधिराज्य असणार्या माझ्या महाराजांना माझा शिरसाष्टांग नमस्कार. आजवर माझ्याकडून जी काही तोडकी मोडकी भक्ती आणि सेवा त्यांनी करून घेतली आहे त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. माझे जीवन खरच कृतार्थ झाले आहे ..आणि परमोच्च भक्तीचा आनंद लुटत माझ्या आयुष्याचा खर्या अर्थाने सोहळा झाला आहे.

महाराजांच्या नावाचा प्रचार करणे आणि प्रत्येकाला ह्या भक्तिमार्गात आणणे हे व्रत घेतल्याने हा लेखन प्रपंच .

अपराध माझे गुरुवरा , आज सारे क्षमा करा |
वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी |
गजानना गजानना,सांभाळ आपल्या भक्तजना |
गजानना गजानना,शेगावीच्या गजानना ||

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.