Tuesday, 14 July 2020

तुमची उपासना फळ का देत नाही?

|| श्री स्वामी समर्थ ||





माधवाचार्य हे थोर गायत्री उपासक. वृंदावनात त्यांनी सलग तेरा वर्षे गायत्रीचे अनुष्ठान मांडलं. पण तेरा वर्षात अब्जावधीचा जप होऊनही ना त्यांना अध्यात्मिक उन्नती दिसली ना भौतिक लाभ. हतोत्साही होऊन ते काशीस आले आणि इथे तिथे पिसाटाप्रमाणे भटकू लागले.

तीन चार महिने असे गेल्यावर त्यांना एक अवधूत भेटला. परिचय वाढला तसं माधवाचार्यांनी त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली. "आलं लक्षात! गायत्रीऐवजी तुम्ही कालभैरवाची उपासना एक वर्ष केलीत तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की होईल"

अवधुतांचे बोलणे मनावर घेऊन माधवाचार्य साधनेला सुरू झाले. कोणताही दोष येऊ न देता त्यांनी वर्षभर साधना केली. कधी सुरू केली हे ही विसरलेले माधवाचार्य एक दिवशी उपासनेला बसले असताना "मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे?"

असं ऐकू आलं. भास म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि उपासना चालू ठेवली.
"मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?"
पुन्हा भास समजून माधवाचार्यांनी उपासना सुरू ठेवली.

"मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?" आता मात्र हा भास नाही याची खात्री झाल्यावर माधवाचार्यांनी विचारले,
"आपण कोण आहात? जे कोणी आहात ते पुढे येऊन बोलाल? माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे." "ज्याची उपासना तू करत आहेत तोच काळभैरव मी मनुष्यरुपात आलोय.
वरदान माग." 
"मग समोर का नाही येत?"

"माधवा! तेरा वर्षे जे तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास त्याचं तीव्र तेजोवलय तुझ्याभोवती आहे. माझ्या मनुष्यरूपाला ते सहन होणार नाही म्हणून मी तूला सामोरी येऊ शकत नाही."

"जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल तर आपण माझ्या काहीच कामाचे नाहीत. आपण जाऊ शकता." "मी तुझे समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही. मला जाताच येणार नाही."

"तर मग, गेली तेरा वर्षांचं माझं गायत्री अनुष्ठान का फळले नाही? याचं उत्तर द्या"
"माधवा! ते निष्फळ झालं नाही. तुझी जन्मोजन्मीची पापे ते अनुष्ठान नष्ट करत होते. तुला अधिकाधिक निर्दोष करत होते."

"मग आता मी काय करू?" "परत वृंदावनात जा, अनुष्ठान सुरू कर. तुला अजून एक वर्ष करायचंय. हे एक वर्ष तुझं या जन्मातील पाप नष्ट होण्यात जाईल आणि मग तुला गायत्री प्रसन्न होईल."
"तुम्ही किंवा गायत्री कुठे असता?"

"आम्ही इथेच असतो पण वेगळ्या मितीत. हे मंत्र, जप आणि कर्मकांडे तुम्हाला आमच्या मितीत बघण्याची सिद्धी देतात. ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता."
माधवाचार्य वृंदावनात परतले. शांत, स्थिर चित्ताने पुन्हा गायत्रीचे अनुष्ठान आरंभले. एक वर्ष पूर्ण झालं. पहाटे उठून अनुष्ठानाला बसणार तोच.

"मी आलेय माधवा! वरदान माग."
"मातेssss" टाहो फोडून माधवाचार्य मनसोक्त रडले.
"माते! पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हणला तेव्हा खूप लालसा होती. आता मात्र काहीच नको गं. तू पावलीस तेच खूप." "माधवा! मागितलं तर पाहिजेच."

"माते! हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडपर्यंत तू साक्षीला असशील असे वरदान दे."

"तथास्तु!"

पुढे तीन वर्षांत मधवांचार्यांनी 'माधवनियम' नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला. आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे.


लक्षात घ्या जो काही मंत्र, जप, कर्मकांडं तुम्ही श्रद्धेने करता त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो. पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेढे घालून बसलेली असतात. देवतेची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते. जसं जसे तुम्ही उपासना वाढवता तस तसे वेढे कमी होतात, शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की 'तेज' चढलं. ते तेज म्हणजे खरंतर पूर्वकर्माच्या वेढ्यात झाकोळलेलं तुमचं मूळ रूप असतं.

वाचनात आलेला हा संग्रहित लेख आहे.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील  लिंक वरती अभिप्राय द्यायला विसरू नका.

antarnad18@gmail.com


तसेच लेखाच्या उजव्या बाजूस आपला Email  द्यायला तसेच Follow वर Click करायला विसरू नका.