|| श्री स्वामी समर्थ ||
“ श्रावणमासी हर्ष मानसी ” ह्याचा प्रत्यय देणारा श्रावण महिना खरोखरच नेत्रसुखद , सकारात्मक उर्जेने भरलेला असतो. पावसाळी वातावरण, बहरलेली सृष्टी ,पहाटेच्या निरव शांततेतील पक्षांची किलबिल आणि ओल्या मातीचा सुगंध अध्यात्मिक प्रगतीस अत्यंत पोषक असतो. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावणात अनेक व्रत वैकल्ये , उपासना केल्या जातात . नामस्मरण , अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन सामूहिकरीत्या केले जाते.
साधना /ध्यानधारणा कशी करावी ह्या संबंधी हा लेख स्वानुभवातून आपल्यासाठी प्रस्तुत करत आहे.
साधना करण्यापूर्वी काही दिवस श्वासावर लक्ष्य केंद्रित करण्याचा सराव करावा. एकदम साधनेस सुरवात करू नये. आपल्या शरीरास आणि मनासही एका जागी स्थानबद्ध होण्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे .पद्मासन घालून ध्यानमुद्रा ,गुरुमुद्रा करावी आणि हळूहळू श्वास सोडणे आणि घेणे ह्यावर म्हणजेच श्वासावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करावे.
साधना अनेक प्रकारे केली जाते. ओमकार साधना , त्राटक अश्या अनेक प्रकारे साधना केली जाते. लहान मुलांची एकाग्रता वाढावी आणि मन स्थिर व्हावे तसेच आयुष्यात विचारपूर्वक निर्णय घ्यायची सवय लागावी म्हणून त्यांना लहानपणापासूनच साधना शिकवणे आत्यंतिक गरजेचे आहे. आजकाल शाळा महाविद्यालयातून योग शिक्षणाचे धडे दिले जातात जे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. “आमची मुले एका जागी स्थिर बसत नाहीत ” अशी तक्रार पालक नेहमीच करत असतात . अश्या मुलांसाठी साधना हि संजीवनीच आहे.
साधना कशी , कधी , किती वेळ आणि कुठे करावी ते आता पाहूया. खरतर ह्यावर अनेक ग्रंथ , पुस्तके आहेत पण स्वतःचे अनुभव आपल्या सोबत शेअर करायला मला नक्कीच आवडेल आणि म्हणून हा सर्व खटाटोप.
आज आपली जीवनशैली अत्यंत व्यस्त आहे.प्रत्येक ठिकाणी जीवघेणी स्पर्धा. अनेक प्रकारची माणसे त्यांचे स्वभाव , इर्षा सगळ्यांना तोंड देत आपला इवलासा जीव थकून जातो आणि मग कधीतरी मनाचाही समतोल ढळतो . ह्या स्पर्धात्मक युगात तरायचे असेल तर आपले मन संतुलित असणे गरजेचे आहे आणि तिथेच आपल्याला ध्यानाची साधनेची महती कळते.
आपले शरीर यंत्रवत काम करत असते तसेच आपले मनही . विचारांनी सैरभैर झालेल्या आपल्या मनाला एका जागी शांत बसवणे म्हणजेच साधना किंवा ध्यान.
पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर म्हणजे 3.20 ते 3.40 साधनेसाठी सर्वोत्तम काळ समजला जातो . पण तो जमत नसेल तर निदान पहाटे ५ वाजताची वेळ योग्य आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घरी यायची वेळ निश्चित नसते अश्यावेळी सकाळी जमेल तशी साधना करावी. मुख्य म्हणजे साधना अंतर्मनापासून करावी.साधना उरकून टाकू नये, त्यासाठी आधीच वेळ राखून ठेवावा.
साधना करताना आपल्या कुलस्वामिनी , इष्ट गुरू ह्यांना नमस्कार करून पद्मासनात बसावे. गायत्री मंत्र म्हणून सुरवात करावी . त्यानंतर ओमकाराचा जप करावा . त्यामध्ये तोंडाने “आ” चा उच्चार लांबवावा ,मग ओठाचा चंबू करावा आपोआपच “ ओ” चा उच्चार होयील आणि मग ओठ मिटून तोच आवाज “म” मध्ये परिवर्तीत होयील. ह्यामध्ये आ ओ म ह्या हे तिन्ही ध्वनी ची लय एकाच असावी. थोडक्यात आपल्याला ओम म्हणायचं आहे पण तो “ आ ओ म ” असा फोडून म्हणायचा आहे. ह्या ओमकारामुळे आपल्या शरीरातील ७ चक्रेही कार्यरत होतात आणि शरीरात नाभीपासून गळ्यापर्यंत एक कंप जाणवू लागतो.
किमान ७ ते ११ वेळा तरी जा ओमकार झाला पाहिजे. पश्च्यात डोळे मिटून शांत बसायचे आहे. दीर्घ श्वास घेवून संपूर्ण सोडून द्यायचा असे ३ वेळा करून आणि पद्मासनात गुरुमुद्रा करून ह्याच अवस्थेत बसायचे आहे. श्वासावर लक्ष्य केंदित असावे. डोळे बंद करून शांतपणे आपल्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न करायचा आहे .
सुरवातीला डोळे जड होणे ,दोन भुवयांच्या मध्ये दुखणे होवू शकते . ह्या आसनात मन शांत ठेवायचे आहे ,कपाळावर आठ्या नकोत. मनात अनेक विचार येत राहतील ते येवुदेत, येतील आणि जातील.आपण त्यांना थांबवू नयेत किबहुना त्यांना थांबवता येणे आपल्या हाती नाहीच. कालांतराने ह्या साधनेचा जसजसा परिणाम होईल मनातील विचारांचे काहूर कमीकमी होवू लागतील आणि कालांतराने ते पूर्ण थांबेल पण हि खूपच पुढची स्टेप आहे. साधनेची परमोच्च अवस्था म्हणजेच समाधी.
साधना करत असताना आपल्या दैनंदिन जीवनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करावा. आपण एखाद्या शांत ठिकाणी नदी किंवा समुद्राच्या ठिकाणी बसलो आहोत ,पक्ष्यांची किलबिल, समुद्राची गाज ऐकू येत आहे ,मन शांत आहे , कसलीच आसक्ती नाही . आपणच आपल्याशी संवाद करत आहोत असे विचार करावेत. आपल्या अस्तित्वाचा शोध आपण घेत आहोत . मी इथे का आहे , माझ्या असण्याला काय अर्थ आहे ? ह्या सर्वचा शोध साधनेत होऊ लागतो. काही जणांना समोर पांढरा प्रकाश दिसतो तर काहीना काहीच नाही.काही दिसेल ह्यासाठी साधना नाही तर मनाची निस्सीम शांतात अनुभवण्यासाठी साधना आहे.
आपण गप्पा मारायला , TV बघायला ,whatsapp university साठी तासंतास बसू शकतो पण साधनेसाठी आपण २ क्षणही बसू शकत नाही ह्यातच साधनेचे महत्व समजते. आपल्या मनाला आणि शरीरालाही साधनेची सवय लावायची आहे. एकदा सवय झाली कि साधना हळूहळू वाढवायची आहे . मग अर्धा तास , १ तास २ तास, ६ तासापर्यंत किबहुना त्याहीपेक्षा कितीतरी जास्त असा वेळ वाढवत न्यायचा आहे.
साधनेचे असंख्य फायदे आहेत. राग शांत होतो , मनात येणारे कल्पविकल्प कमी होतात,अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते . सर्वात मुख्य म्हणजे आपली कर्म कमी होतात . साधना करताना आपण ना बोलणार ना ऐकणार त्यामुळे आपला संवाद कमी होणार , आपल्या मुखातून आपण कुणाला काहीच बोलणार नाही. आपली जीव्हाच आपली कर्म वाढवत असते त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा जितका वेळ साधना तितका वेळ आपण प्रपंचा पासून मुक्त ,कर्मांपासून मुक्त.
आपण बाह्य जगात वावरतो पण आपल्या आतमध्ये त्याहीपेक्षा सुंदर जग आहे ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. साधना ह्या नितांत सुंदर जगाचे महाद्वार उघडणारी अद्भुत शक्तीच आहे.
साधनेचे अनुभव अविस्मरणीय असतात आणि त्याचा आनंद चिरकाल टिकणारा असतो . कात टाकल्याप्रमाणे आपणच आपल्याला नव्याने भेटत जातो आणि मग एकदा साधनेची गोडी लागली कि तासंतास आपण साधनेत रमतो. आपल्या आयुष्यातील बराच वेळ आपण अर्थहीन गोष्टीत घालवत असतो , TV, What Sapp, gossips एक ना दोन. पण ह्या गोष्टींचा अखेर काहीच उपयोग होत नाही.
साधना मात्र फळते ह्यात वाद नाही. मुख्य म्हणजे मनाचे संतुलन राहते .साधनेची बैठक भक्कम असेल तर अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुकर होतो. ज्योतिष कथन करण्यास सुद्धा साधना आवश्यक आहे. आपल्या शरीरात असलेल्या ७ चक्रांवर सुद्धा साधना, ध्यान करता येते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर , अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सह्स्त्रार हि चक्रे एनडोक्राईन ग्रंथीना जोडून काम करत असतात . प्रत्येक चक्र आणि त्याचा रंग डोळ्यासमोर ठेवून त्यावर लक्ष्य केंद्रित करून साधना करता येते , अश्याप्रकारे ते चक्र जागृत होण्यास मदत होते .
साधना सुरु झाली कि व्यक्तीत अमुलाग्र बदल होतात ,परंतु त्यासाठी संयम हवा, कुठल्याही गोष्टी क्षणात होणार नाहीत .आजकाल instant चा जमाना आहे पण साधनेत संयम हवाच तसेच सातत्य हवे. आपल्यातील बदल आपणच अनुभवायचे आहेत. साधना एका विशिष्ठ जागी केली तर उत्तम पण आज मुंबई पुण्यासारख्या शहरात प्रत्येक ठिकाणी जागेची समस्या असल्याने साधनेची जागा बदलली तरी चालेल . पण करताना ती मन ओतून करावी तरच फलद्रूप होते.
साधना करत असताना मध्ये बोलू नये किंवा कधी मी उठतेय हि भावना मनात असू नये. साधना आपल्या आंतरिक समाधानासाठी आपण करतो त्याचे फायदे आपल्यालाच आहेत ,नाही का?
मला साधना जमेल का?हा प्रश्न नेहमी विचारला जातो, त्याचे उत्तर अर्थातच “ हो ” असेच आहे.
दोन्ही हाताची गुरुमुद्रा करावी म्हणजे अंगठा आणि त्याशेजारील बोटांची अग्रे जुळवून हात आपल्या मांडीवर ठेवावेत.
साधनेमुळे आयुष्य बदलते,मन शांत ,एकाग्र होते. प्रत्येक गोष्ट आपण अधिक विचारपूर्वक करू लागतो. बोलण्यावर नियंत्रण राहते तसेच शरीर रोगमुक्त होण्यास मदत होते. सकारात्मकता वाढीस लागते आणि आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते.आयुष्यात अशक्य असे काहीच नाही.
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्नांची जोड आपल्याला साधनाच काय समाधी अवस्थे पर्यंत नेवू शकते.
मला साधना करायची आहे हा विचार ज्या क्षणी मनात येतो तोच शुभ मुहूर्त असतो . मला हे जमेल का? माझ्याच्याने हे होईल का? असल्या अर्थहीन प्रश्नात स्वतःला अडकवून ठेवू नका.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून साधनेला सुरवात करुया आणि एक निरोगी , चिंतामुक्त आयुष्य जगण्यास प्रारंभ करुया.
अस्मिता
#sadhana #Dhyan #Shravan #upasana #namasmaran #SadhanaKashiKaravi #SadhanecheFayde
#साधन #ध्यान #श्रावण #उपासना #नामस्मरण #साधना-कशी-करावी #साधनेचे-फायदे #ध्यानकाकरावे
लेख आवडल्यास खालील लिंक वरती Click वर अभिप्राय जरूर द्या आणि आपले साधनेचे अनुभव सुद्धा शेअर करा.
Antarnad18@gmail.com
लेखाशेजारी आपला Email द्या आणि Follow वर Click करायला विसरू नका.