Tuesday, 14 July 2020

अवघा रंग एक झाला

|| श्री स्वामी समर्थ ||




आपल्याकडे काश्मीर , सिमला ,सिंगापूर ,युरोप साठी आर्थिक सुबत्ता असते पण देवदर्शन ,कुलाचार ,कुलदर्शन ह्यासाठी आपल्याला वेळ नसतो आणि आपले बजेट नेमके तेव्हाच कोलमडते .

तीर्थयात्राना जाण्याबद्दल अनेक तर्कवितर्क असतात . घरातल्या देव्हार्यातहि देव आहेत मग उठून तीर्थयात्रेस कश्याला ? त्यांची पूजा करतोच कि रोज यासारखे अनंत प्रश्न विचारले चर्चिले जातात .ह्या अश्या अनेक प्रश्नांचे निराकरण करण्याचा हा लहानसा प्रयास .

आपण आपल्या प्रापंचिक जीवनातील सुखदुख्खे, कामकाज ,इतर प्रापंचिक अडचणी ह्यात इतके गुरफटलो जातो कि मनात असूनही आपल्याला उपासनेस , साधनेस वेळ देता येत नाही. त्यासाठी लागणारी शांतता आपल्याला आपल्या घरात मिळत नाही बरेचदा . तसेच शेवटच्या प्रवासात इथून बरोबर काहीही नेता येणार नाही हे पुरते माहित असूनही सर्व आसक्ती , भोगामध्ये अडकतो ,त्यापासून परावृत्त होवू शकत नाही, म्हणूनच प्रपंचातून काही काळ दूर राहून ईश्वरी सान्निध्य लाभावे आणि सेवा घडावी ह्या उद्दात्त हेतूने तीर्थाटन करावे .

देवदर्शन पदरी पडते हाही एक धार्मिक दृष्टीकोन आहेच, प्रपंचापासून काही काळ दूर गेल्याने आणि केलेल्या साधनेने ,उपासनेने आपल्याला काही अडचणीतून मार्ग मिळतो .संसारिक आसक्ती कमी होवून षडरिपूनवर मात करता येते. मानसिक शांतंता मिळून अध्यात्मिक सेवा घडते आणि पापक्षालन होते.

आपल्या शरीराच्या आणि मनाच्याही शुद्धीकरणाची प्रक्रिया ह्यातूनच होते म्हणून तीर्थयात्रा महत्वाची. आपल्या प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवनाची सांगड घालून आपले मन हळूहळू विरक्तीकडे वळते.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या संस्कृतीची पाळेमुळे , संस्कार मनात खोलवर रुजले आहेत ,त्याचे जतन करणे आणि आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवणे ह्यासाठी तीर्थाटन आवश्यक आहे .

तीर्थक्षेत्री असलेल्या देवतेच्या मूर्तीवर हजारो वर्षे केल्या गेलेल्या अभिषेक , पूजा, व्रते ह्यामुळे त्या देवतेचा जागृत अविष्कार तेथील प्रत्येक स्पंदनात असतो ,आणि म्हणूनच त्या वातावरणातील ऊर्जेमुळे ,लहरींमुळे प्रसन्न वाटते ,सकारात्मक वाटते ,मन शांत होते आणि परमेश्वरी सान्निध्याची, अस्तित्वाची अनुभूती मिळते .

मनात समर्पणाची भावना निर्माण होते आणि श्रद्धा बळकट होते. क्षणभर का होयीना आपण प्रापंचिक समस्या विसरून परमेश्वरी चिंतनात रममाण होतो ,आपले दुक्ख विसरतो आणि परमेश्वर चरणी लीन होतो .

कायेने , वाचेने आणि मनाने कळत नकळत झालेल्या पापांचे क्षालन होते हा धार्मिक आधारही तीर्थाटनामागे आहे.

तार अश्या ह्या तीर्थाटनाचा लाभ हा केल्याशिवाय कसा कळेल .

तीर्थक्षेत्री जाणे म्हणजे घरातील वडील मंडळींचे काम ,आमचे काय वय आहे का तीर्थयात्रा करण्याचे? हा प्रश्न तरुण मंडळी सर्रास विचारतात . पण खरतर आयुष्यभर आपण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करतो , खूप चढउतार येतात आयुष्यात ,आताचे युग तर किती स्पर्धात्मक आहे . पण हे सर्व करत असताना जसा वेळ मिळेल तसे देवदर्शन घेतले तर ह्या स्पर्धेत टिकून राहायला मानसिक बळ मिळेल ह्यात शंकाच नाही.आयुष्याच्या शेवटी देवदेव न करता सुरवाती पासून केले तर तो देव शेवटच्या काळात तुम्हाला नक्कीच सांभाळेल .मी तर म्हणीन सहकुटुंब यात्रा करावी म्हणजे घरातील सर्व पिढ्यांना त्याचे महत्व समजेल आणि घरातील मुलांवरही त्याचे उत्तम संस्कार होतील. भौतिक सुखेही प्राप्त करावी पण तीर्थाटन विसरू नये . देवदर्शनास वयाची अट नसते .देवदर्शनास जायचे आहे हे लहानपणापासून मानत रुजले पाहिजे . आपल्या कुलदेवीचे दर्शन निदान वर्षातून एकदा किंवा जमेल तसे नक्कीच करावे . आपल्या वृद्ध आई वडिलांचे शेगाव ,शिर्डीचे तिकीट काढून दिले म्हणजे काही मोठा पुरुषार्थ नाही केला किंवा उपकारही नाही पण उलट त्यांच्यासोबत गेलात तर त्यांचा आनंद द्विगुणीत होईल.नक्की विचार करा .

तीर्थक्षेत्री असलेल्या भक्तिरसात न्हावून निघणे हि एक पर्वणीच आहे.

म्हणूनच मग म्हणावेसे वाटते “ अवघा रंग एक झाला.... ”.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.