|| श्री स्वामी समर्थ ||
शकून आणि अपशकून ह्याबद्दलच्या संकल्पना मानवी मनात पिढ्यानपिढ्या घर करून आहेत . अपशकून झाला असे समजणे हे दुबळ्या मनाचे द्योतक आहेत का? भारतीय संस्कृती विज्ञान निष्ठ असली तरी भावनाप्रधान .रूढी परंपरा जपणारी आणि ईश्वरी अधिष्ठान मानणारी आहे . आज “अपशकून” ह्या मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या संकल्पनेबद्दल जाणून घेवूया आणि चर्चाही करुया. आजकालच्या आधुनिक युगात मुंबई पुण्यासारख्या शहरात ह्याचे प्रमाण खूप कमी आढळते ,पण ग्रामीण भागातून कदाचित ह्या संकल्पना अजूनही मानल्या जातात असे दिसून येते .
नवविवाहित सून घरी आली आणि घरातील कुणाचा नजीकच्या काळात मृत्यू झाला ,किंवा तत्सम घटना घडली ,कुणाचे मुल दगावले किंवा कुणाच्या धंद्यात खोट आली , नोकरी गेली तर त्याचे खापर सून वाईट पायाची आहे असे म्हणून तिच्यावर फोडले जाते. पण लग्न तर तुम्ही मुहूर्त पाहून केले ,आधी तर आमच्या मुलाला अशी बहुगुणी बायको मिळाली म्हणून तुम्हीच मुलीला डोक्यावर घेवून मिरवले होते .मग आता १-२ घटनांमुळे , ज्याचा वास्तविक तिच्याशी तिळमात्रही संबंध नाही , तिला का दोषी मानले जाते ? घटनांचे आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला हवे तसे अर्थ लावायचे का? अजून तिच्या हातावरील मेहेंदीचा रंग हि नाही उतरला तर तिचा सासुरवास सुरु होतो.
रस्त्यात मांजर आडवी गेली तर ७ पावले मागे जा अपशकून झाला आता कामात अडथळे येणार . त्यात काळी मांजर असेल तर अजूनच वाईट .अगदी खरे सांगते मी रस्त्यातून जाताना कधी मांजर आडवी गेली तर मी काही ७ पावले मागे जात नाही पण एक क्षण अरे बापरे मांजर आडवी गेली असा विचार मनात येतो ह्याची प्रांजळपणाने कबुली देते .पण बरेचदा मांजर आडवी गेली तरी मी ज्या कामास जात आहे ते झाले आहे हेही खरे .मांजर आडवी गेली कि काहीतरी वाईट अपशकून झाला हे इतके मनात खोलवर रुजले आहे कि कितीही आधुनिकपणाचा आव आणला तरी मनात विचार येतोच .
जाताना डोक्यावर कावळ्याने विष्ठा टाकली , घरातून बाहेर पडताना विधवा बाई समोर आली तर अपशकून होतो म्हणे. रात्री कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला ,पाल दिसली कि अपशकून, बाहेर जाताना “कुठे निघालात “ असे कुणी विचारले कि आपल्या कपाळाला आठ्या पडतात .कावळे आकाशात घिरट्या घालू लागले ,मांजर रडू लागले तर मन धास्तावते ,मनाची चलबिचल होते . डोळ्याची पापणी फडफडली कि अपशकून ,अंगावर पाल पडली ,तिन्हीसांजा लहान मुल रडले ,प्रार्थना म्हणताना किंवा ओवाळताना निरांजन विझले ,देवाजवळची समई विझली ,घड्याळ बंद पडले ,घुबड दिसले(गावात शक्य आहे.मुंबईत हल्ली चिमणी दिसली तरी पुरे ),ह्या आणि अश्या कित्येक घटना म्हणजे अपशकून मानतो आपण .
त्याउलट एखादे काम होणार असेल आणि त्या दिवशी घरी कुठल्यातरी देवाचा प्रसाद आला तर तो आपण शकून समजतो . आपल्याला हवे तसे आणि हवे तेव्हा अनेक घटनांचे आपल्याला अपेक्षित असणारे अर्थ लावत असतो आपण.
प्रातःसमयी कोकिळेचा आवाज ऐकू आला , भारद्वाज पक्षी दिसला तर शकून समजतो आपण. रस्त्यात हत्ती दिसला तर धनलाभ होतो असेहि ऐकून आहे.
प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या स्वानुभवावरून सर्व ठोकताळे बांधत असतो ,पण त्याच्या किती आहारी जायचे हे आपण ठरवले पाहिजे. परमेश्वर सर्वत्र आहे ,चांगले वाईट ,पाप पुण्य ह्या सर्व ठिकाणी देव आहेच. एखाद्या घटनेकडे पाहताना सर्व बाजू विचारात घेतल्या पाहिजेत ,एकांगी विचार उपयोगाचा नसतो .
शकून अपशकून हे मानवी मनाचे खेळ आहेत कि त्यात खरेच काही तथ्य आहे मला नाही माहित .पण आपण फार सामान्य आयुष्य जगतो त्याही पलीकडचे इतकच मला माहित आहे.
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com
लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.