|| श्री स्वामी समर्थ ||
फक्त डोळ्यातून घळघळा पाणी येवू लागले..मन भरून आले. खर सांगू का आपण कितीही ठरवले तरी शेवटी स्वामींसमोर गेल्यावर तिथे आपण काहीतरी वेगळेच बोलतो किबहुना त्यांना जे हवे तेच आपल्या मनात येते आणि बोलून जातो. महाराजांच्या डोळ्यात पहिले आणि जणू महाराज “ मुली किती दूरचा प्रवास करून माझ्या ओढीने आलीस ,बाळ दमली असशील ना? मीही तुझी आतुरतेने वाटच पाहत होतो ग .” असेच मला म्हणत आहेत असा भास झाला. महाराजांच्या शिवाय ना दुसरे काही दिसत होते न दुसरा मनी कुठला विचार होता. आपल्या गुरूंचे दर्शन आणि तेही प्रत्यक्ष अक्कलकोटी ह्यावर माझा खरतर विश्वासच बसत नव्हता इतका हा योग सहज जुळून आला. गाभार्यात अजिबात गर्दी नसल्याने महाराजांच्या समोर बसून शांतपणे ध्यानस्थ झाले आणि मानसपूजा ,नामस्मरण ह्यात रममाण झाले. त्यांनी इतके दिलेय कि काही मागणे उरलेच नाहीय तरीही आपण सामान्य माणसे काही नको काही नको म्हणून काहीतरी मागणारच ...म्हणून सांगितले आज मला इथे काहीतरी प्रचीती द्या नाहीतर मी जाणारच नाही . पण खरे सांगू मी हक्काने त्यांच्याशी कितीही भांडत बसले तरी ते सर्व क्षणार्धात विसरूनही जाते.
दुपारी अन्नछत्रात अप्रतिम प्रसादाचा लाभ घेवून पुन्हा स्वामी दर्शनाला गेले .खरतर आता काही वेळात अक्कलकोट सोडून पुन्हा परतीचा प्रवास सुरु होणार होता ...म्हणतात ना दुःखाचे दिवस आणि आनंदाचे क्षण असत्तात अगदी तसेच मी आनंदाच्या उच्च शिखरावर असल्याने हे समाधानचे ,आनंदाचे क्षण कसे भुरकन निघून गेले ते समजलेच नाही आणि आता काही वेळातच परतीचा प्रवास सुरु होणार ह्याची जाणीव झाली. मनापासून परत जायचेच नव्हते त्यामुळे पुन्हा मन गहिवरून आले आणि अश्रू वाहू लागले...महाराजांच्या समोर किती काळ बसले तरी आपले भक्तांचे थोडेच पोट भरणार आहे .मनात भांडण चालूच होते ,तुमचे माझ्याकडे लक्षच नाही तुम्हाला काय लाखो भक्त तुम्ही कश्याला बघाल माझ्याकडे असा लटका राग नाकावर घेवून मनाचे द्वंद्व चालू होते. तेव्हड्यात गुरुजींनी माझ्या मुलाला अनमोल ला हाक मारली आणि सांगितले आज महाराजांना तुम्ही अर्पण केलेली शाल पांघरली आहे.आणि त्याला प्रसाद ,श्रीफळ दिले. माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल त्यासाठी माझ्याकडे शब्दसंपदा नाही . अनमोल CET छान मार्क मिळवून पास झाला तेव्हा त्याने महाराजाना मी शाल अर्पण करीन असे सांगितले होते आणि तो नवस आज पूर्ण झाला होता .पण आपल्या समोर त्यांनी ती शाल महाराजांना पांघरावी ह्यासारखी आनंदाची आणि भाग्याची दुसरी गोष्टच काय ? अक्कलकोट येथे रोज महाराजांना कुठली शाल अर्पण करावी ह्याचे रंग ठरले आहेत त्याचप्रमाणे तिथे शाल अर्पण केली जाते.
काल बुधवार असल्याने पांढरा किंवा ग्रे , बिस्कीट रंग होता. आमची शाल ग्रे रंगाची असल्याने त्यांनी ती लगेच अर्पण केली हा योगायोग आहे कारण ह्या ठराविक रंगांच्या बाबत मला काहीच कल्पना नव्हती . खाडकन डोळे उघडले . मी हट्ट केला ,अर्थात चांगल्याच गोष्टीचा , आणि महाराजांनी मला देवस्थानात अखंड प्रचीती दिली आणि मी ती ह्याची डोळा ह्याची देही पहिली .महाराजांच्या समोर नतमस्तक झाले. आपण प्रेमाने आणलेली शाल महाराजांनी पांघरली आहे ह्यासारखी दुसरी प्रचीती काय असू शकते ? महाराज कधीच भक्तांमध्ये भेद करत नाहीत ,त्यांना हवी असते कळकळीची हाक आणि मनापासून केलेले प्रेम. महाराजांना म्हंटले आज माझे आईवडील हयात नाहीत पण तुम्ही प्रत्येक क्षणी सांभाळत आहात....माझ्या जन्माचे खरच सार्थक झाले आहे..
आपला भाव सदैव गुरु चरणी असावा पुढे काहीही मागावयास उरतच नाही, नाही का? आपला जन्म सेवेसाठी आहे आणि आपण तेच करायचे आहे .
आपण स्वतः महाराज व्हायला जायचे नाही हे भक्तांनी सदैव स्मरणात ठेवले पाहिजे .
आज हि लाख मोलाची प्रचीती माझ्या तोडक्या मोडक्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहचावी म्हणून हा लेखन प्रपंच आज देहाने घरी असले तरी तनमनधन स्वामी चरणीच आहे.
अक्कलकोट सोडले शेवटी आपण प्रापंचिक माणसे पण मन आनंदाने नाचत गात होते.
तुझे रूप चित्ती राहो
मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास
सुखे करो काम...
अस्मिता