Tuesday, 14 July 2020

रंग माझा वेगळा

|| श्री स्वामी समर्थ ||




मंडळी ,डोळ्यासमोर नुसता एखादा रंग आणलात किंवा त्याची कल्पना केलीत तरी चेहऱ्यावर स्मितहास्य उमटते. विधात्याने ह्या अनेकविध रंगांची निर्मिती करून आपल्या जीवनात आनंद निर्माण केलाय पण त्याचसोबत अनेक गोष्टीही शिकवल्या आहेत.

चित्रात जसे अनेक रंग हवेत तसेच जीवनात अनेक रंगांची (सुरवातीला नाही दाखवत ती आपले खरे रंग )माणसे हि हवीत. माणूस समाजप्रिय प्राणी आहे तो एकटा नाही जगू शकत म्हणून मग तो माणसे जोडतो आणि सर्व नाती जन्माला घालतो. प्रत्येक रंग आपल्याजागी श्रेष्ठ आहे आणि त्याची दुसर्या रंगाशी तुलना करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा ,अगदी हाच नियम प्रत्यक्ष आयुष्यातहि लागू पडतोच . प्रत्येक माणसात विधात्याने काहीतरी वेगळे असे दिलेच आहे आणि त्याची तुलना दुसर्याची करणे अयोग्यच कारण ती होवूच शकत नाही. जो तो आपापल्या जागी श्रेष्ठच.

मंडळी , आज आजूबाजूला पाहिलेत तर कित्येक जण आपल्याच रंगीत आयुष्यात धुंद असलेल दिसतील तर काहींचे आयुष्य रंगहीन , उदासीन आहे हि वस्तुस्थिती आहे.

म्हणूनच खर्या अर्थाने होळी साजरी करायची असेल तर “ निदान एकाला तरी मी मदतीचा , सहकार्याचा हात पुढे करून त्यांचे जगणे सुसह्य करायचा प्रयत्न करीन. “ असे ठरवूया ..काय वाटते तुम्हाला..??. प्रत्येकाचे आयुष्य आपल्या चार गोड शब्दांनी रंगमय ,आनंदी होवूदे . कुणाचेही आयुष्य त्याच्या मागे बोलून, विनाकारण निंदा नालस्ती करून , त्याला त्रास देवून रंगहीन करण्याचा आपल्या कुणालाही कसलाही अधिकार नाही.

मंडळी कुणाचे चांगले करता आले नाही तर कमीतकमी वाईट तरी करू नये , कुणाबद्दल चांगले बोलायला जमले नाही तर निदान वाईट तरी बोलू नये . ह्या सृष्टीत चराचरात भरलेल्या ईश्वराचे अस्तित्व आपल्याला जाणवत नसले तरी तो आहे ह्याचे भान ठेवून जगले पाहिजे . सगळ्या रंगात म्हणजेच माणसात असूनही आपला रंग वेगळा हि कला ज्याला जमली त्याचे आयुष्य कधीही रंगहीन होणार नाही आणि त्याच्या आयुष्याचा खर्या अर्थाने सोहळा होयील ह्यात शंकाच नाही .

आपले जीवन हे एक शुभ्र पंधरा कॅनवास आहे आणि त्यात कुठले रंग भरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. हे सर्व सण साजरे करत असताना त्यामागील उद्देश समजून घेतला तर तो खर्या अर्थाने साजरा झाला असे समजायला हरकत नाही. प्रत्येक सण हा विशिष्ठ ऋतुमधेच का येतो ? त्या दिवशी अमुक एक पदार्थच का केले जातात ? ह्या सर्वामागे आपल्या संस्कृती ,परंपरा रूढी तर आहेतच पण त्याला शास्त्रीय बैठक सुद्धा असते ती समजून घेतली पाहिजे आणि हा वारसा पुढील पिढ्यांना सुपूर्द केला पाहिजे .प्रत्येक सण आपल्या मानवी मूल्यांशी ,आयुष्याशी निगडीत असतो ,काहीतरी संदेश देत असतो आणि म्हणूनच नुसते खा प्या मजा करा ह्याही पलीकडे पाहण्यास शिकले पाहिजे.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा सण नवचैतन्य घेवून येऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

श्री स्वामी समर्थ.

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com


लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.