|| श्री स्वामी समर्थ ||
श्रावणी सोमवार ,शनिवार विशेष मानले जातात. नवविवाहित मुलींना मंगळागौरी निम्मित्त माहेरी यायची ओढ लागते. पशु पक्षीच काय तर संपूर्ण निसर्ग आनंदाने डोलू लागतो. सृष्टीचा हा अप्रतिम नजरा डोळे भरून पाहणे हे सुख काही औरच असते.
श्रावणातील रिमझिम पाऊस धरणीलाच नव्हे तर मनालाही ओलेचिंब करतो. थोडक्यात काय तर एक वेगळीच उर्जा घेवून आलेल्या ह्या श्रावण मासाचे सर्वत्र मोठ्या दिमाखात स्वागत होते. मंगलागौरी पूजन , नाग पंचमी , नारळी पौर्णिमा , रक्षाबंधन ,श्रावणी सोमवारची शिवामूठ ,श्रीकृष्ण जयंती , गोपाळकाला ह्या सणांची हजेरी लागते.
महिला वर्गही सणांच्या स्वागतास सज्ज होतो. श्रावणात अनेक व्रते आणि सणांमुळे घरात विविध पक्वान्ने केली जातात आणि त्यामुळे बालगोपाळ मंडळीही खुश असतात . जिभेचे चोचले पुरवणारया ह्या श्रावणाची सर्वच आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावण लहानथोर सर्वांचाच आहे. घरातील वडिलमंडळी व्रते वैकल्यात मग्न होतात तर बच्चे कंपनी गोपाळकाला येणार म्हणून खुश असतात. शेतकरी वर्ग नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करतो आणि पाऊस चांगला झाला म्हणून सुखावतोही.
आपल्या हिंदू धर्मात सणांची रेलचेल आहे आणि प्रत्येक सणाला होणारे पदार्थही वेगळे आहेत. आज गतिमान झालेल्या जगाने कुटुंबे विभक्त केली आहेत . घड्याळ्याच्या काट्यासोबत बांधलेल्या जीवनात वेळे अभावी आणि इच्छा असूनही अनेक गोष्टींचे पालन होवू शकत नाही .काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या. पूर्वी एकत्र कुटुंबे होती . स्वयपाक घर जावा , नणंदा, सासू, ,लेकीसुनांच्या हसण्याने आणि बांगड्यांच्या किणकीणीने भरून गेलेले असायचे .
माहेरवाशिणींचे कोडकौतुक व्हायचे पण आता एकत्र कुटुंबपद्धती नामशेष होत चालली आहेत. त्यामुळे पूर्वीसारखे एकत्र पंक्तीभोजन , पुरणपोळी वर ताव मारणे काळाच्या पडद्याआड गेले आहे .काही घराण्यात सवाष्णीस गोडधोडाचे भोजन करून तिची ओटी भरण्याची प्रथा आहे.
श्रावणाची खरी मजा लुटायची तर ती कोकणात. हिरवागार शेला नेसलेल्या डोंगरदर्या, पाटातून वाहणारे झुळूझुळू पाणी, आल्हाददायक निसर्ग , हवेतील गारवा , सारवलेली जमीन आणि मातीचा सुगंध मन मोहून टाकतो. पाटाच्या पाण्यात कागदी बोटी सोडून आनंद घेणे खरच नशिबी असावे लागते . झाडाच्या
पारंब्याना झोका बांधून गाणी म्हणत उंचच उंच झोका खेळताना मुलीना आकाश जणू ठेंगणे होते. असा हा श्रावणाचा गंध अनुभवणे आणि त्यात हरवून जाणे ह्याची मजा ज्याची त्यांनीच अनुभवायची ,हे सर्व शब्दांकित करणे केवळ अशक्य. गावातील आणि शहरातील जीवनशैली भिन्न असल्याने हि मजा शहरात पाहायला मिळणे विरळाच. केळीच्या पानावरील गरम वरणभात , सुक्या बटाट्याची भाजी, नुकतेच घातलेले कैरीचे लोणचे ,लिंबाची फोड आणि त्यावर साजूक तुपाची धार ,जोडीस कुरडया ,पापड , खीर पुरण आणि आलेमीठ लावलेले ताक हे जेवण म्हणजे खरोखरच स्वर्गसुख. मंगळागौरी पूजन आणि फुगड्या घालत रात्र जागवण्याची मजाही खासच .नागपंचमीला दिंड षष्ठीला पातोळे केले जातात .शिळा सप्तमीला सांदणी ह्या गोड पदार्थासोबत अळूची भाजीही केली जाते.गोकुळाष्टमीला दही, पोहे ,लाह्या एकत्र करून गोपाळकाला केला जातो तर नारळी पौर्णिमेला नारळी bhat , करंज्यांचा खास असा मेनू असतो .श्रावण अमावास्येला म्हणजेच पिठोरीला खीर पुरी केली जाते.अनेक घरातून जिवतीपूजनही केले जाते.आजकाल मुलांना पारंपारिक पदार्थांची नावे सुद्धा माहित नसतात त्यामुळे न्ह्या निम्मित्ताने त्यांचीही तोंड ओळख होते.
ह्या सर्व सणांच्या निम्मित्ताने अनेक पिढ्यातील लोक एकत्र येतात,घरातील स्त्रीवर्गाची दागदागिने घालून मिरवण्याची हौस फिटते , एकमेकांच्या हातचे पदार्थ खायला मिळतात आणि कुटुंबातील एकोपा वाढतो. पुढील पिढीस आपल्या रीतीरिवाजांची ओळख होते , कुटुंबातील नात्यातील वीण घट्ट होते आणि प्रेम वृद्धिंगत होते.
सर्वार्थाने आपल्याला समृद्ध करणारा साजिरा श्रावण आपल्या दरवाज्यावर दस्तक देत आहे.
चलातर मग श्रावणसरी अंगावर घेवून त्याचे स्वागत करुया आणि श्रावणाचा खरा आनंद लुटुया.
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वर अभिप्राय जरूर द्या.
Antarnad18@gmail.com
लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.
#antarnad #shravan #rain #generations @nagpanchami #festivals #krishnjanm #family
#अंतर्नाद #श्रावण #पाऊस #पिढ्या #नापंचमी #रूढी #सणवार #श्रीकृष्णजन्म #कुटुंब #नारळाची वडी
खुप छान लिहिलंयस
ReplyDelete