Saturday, 23 December 2023

केतू

 || श्री स्वामी समर्थ ||


एखादा आजार दीर्घकाळ बरा न होणे किंवा बरा होण्यास विलंब लागणे हे शनीचे काम आहे. कारण विलंब हा त्याचा स्वभाव आहे. दीर्घ आजारपणात एखादा शरीराचा भाग सडतो किंवा कुजतो ह्यासाठी सुद्धा शनीच कारणीभूत आहे पण शेवटी हा सडलेला अवयव शरीरापासून वेगळा करावा लागतो किंवा तो करणेच हितावह असते अश्यावेळी तिथे केतू कार्यरत असतो. एखादे कलम करणे , शरीरापासून नको तो कुजलेला अवयव वेगळा करणे हे केतूचे काम. शस्त्रक्रिया करण्यासाठी मंगळ . म्हणूनच एकंदरीत एखादा अवयव काढून टाकण्यासाठी प्रथम , अष्टम , व्यय भाव तसेच शनी मंगळ केतू हे ग्रह कार्यान्वित झालेले दिसतात . 


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230


Sunday, 10 December 2023

Attachment मग Detachment

 || श्री स्वामी समर्थ ||

केतू हा विरक्त करणारा ग्रह आहे. केतू म्हणजे पूर्व जन्मातील सुख दुक्खाचे गाठोडे जे आपण ह्या जन्मात घेवून येतो . केतू म्हणजे कळसा वरील पताका , केतू मंगळा सारखी फळे देतो अश्या अनेक गोष्टी आपल्या वाचनात आहेत. ज्योतिष हे तर्क शास्त्र आहे . आपल्याला अनुभूती मिळाली कि नियम बरोबर लागला असे समजायला हरकत नाही .

केतू हा विरक्त करतो पण आपण विरक्त कुणापासून होतो ज्यांच्याशी आपण एके काळी खूप जवळचे असतो किंवा घट्ट मैत्री असते . ज्यांच्याशी खूप attached असतो त्यांच्यापासूनच दूर जातो म्हणजे विरक्त होतो .

परवा एक पत्रिका पाहताना हा अनुभव आला . तृतीय स्थान हे भावंडे आणि शेजारी . जातकाने शेजारी असो कि भावंड त्यांच्यासाठी आपले प्रेम पणाला लावले. माया केली . त्यांच्या सुखासाठी पदरचा पैसाही खर्च केला . पण तृतीयातील केतू वरून जेव्हा गोचर केतूचे भ्रमण झाले तेव्हा घडलेल्या अनेक घटनांतून ह्याच लोकांपासून जातक विरक्त झाला. आता त्याला त्यांची तोंडे सुद्धा पहावीशी वाटत नाहीत इतके बरेवाईट अनुभव जातकाला आले आणि शेवटी तृतीय भावातून दर्शवलेल्या व्यक्तीसापेक्ष संबंधातून तो विरक्त झाला. 

एकेकाळी ज्यांच्याशिवाय पान हलत नव्हते त्यांची आज आठवण सुद्धा नकोशी वाटावी इतकी विरक्ती आज जातकाला केतूने दिलेली आहे. खरे सांगायचे ते हे सर्व लोक जातकाचे कधीच नव्हते पण ते समजायला वेळ यावी लागते . आधी attachment आणि शेवटी detachment. शेवटी काय तर आपले स्वतःचेच अनुभव आणि ग्रह आपल्याला वेळ आली कि फळे देत असतात , अनुभवांनी संपन्न करत असतात . प्रश्न अंतर्मुख होऊन विचार करण्याचा आहे इतकच . इथे तृतीयेश आणि तृतीय भावाचा कारक मंगळ ह्यांचाही विचार आवश्यक आहे.  हाच अनुभव तृतीयेश किंवा तृतीय भावाचा कारक मंगळ बिघडला तरी सुद्धा येतो . 

आपले अनुभव सुद्धा कळवा .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


Wednesday, 6 December 2023

मनस्वी चंद्र

 || श्री स्वामी समर्थ ||



प्रेमिकांचा ,कवींचा लाडका चंद्र .आयुर्वेदात शरदपौर्णिमेच्या चांदण्याचा औषधासाठी उपयोग करून घेतला जातो. पृथ्वी वायुरूप अवस्थेतून घनरूपात येताना सूर्याच्या आकर्षणामुळे पृथ्वीचा एक मोठा तुकडा तिच्यापासून वेगळा झाला आणि पृथ्वीभोवती फिरत राहिला अशी चंद्राची जन्मकथा आहे. 

पत्रिकेचा अभ्यास करताना रवी आणि चंद्र हे दोन ग्रह सर्वप्रथम तपासणे आवश्यक आहे. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. रवी आत्म्याचा तर चंद्र हा मनाचा कारक आहे. विश्वाचा गाडा सुरळीत चालू ठेवण्याचे महान कार्य परमेश्वराने स्त्रीकडे सोपवले आहे .म्हणूनच संसार हा स्त्री शिवाय अपूर्ण असतो . अखंड विश्वात जे सुंदर , कोमल , पवित्र आहे ते स्त्रीमध्ये सामावले आहे तसेच चंद्राची सात्विकता , कोमलता ह्याचाही संगम स्त्रीमध्ये असतोच. स्त्री ला आपण भावी पिढीची निर्मिती म्हंटले तर वावगे ठरू नये. स्त्रीमध्ये जी आकर्षण शक्ती आहे तीच चंद्रात सुद्धा आहे . चन्द्रमाः मनसो जातः .चंद्र हा आपल्या मनाचा कारक ग्रह आहे म्हणूनच माणसाची मानसिकता हि पत्रिकेतील चंद्रावरून समजते. चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला 27 दिवस 7 तास 43 मिनिटे लागतात .म्हणून चंद्र एका राशीत सव्वादोन दिवस असतो. चंद्र हा शीघ्र गतीने जाणारा ग्रह आहे त्याला एका जागी थांबणे माहीतच नाही .

चंद्राचे कारकत्व सागरासारखे अत्यंत विशाल आहे. माणसाचे मन कधीच कुणाला कळत नाही . असंख्य विचारांची भाऊगर्दी माणसाच्या मनात होत असते. अश्या च्या चंचल मनाचा कारक चंद्र आहे. 

आई , मातृसुख , सफेद रंग आणि सफेद वस्तू , मोती , चांदी ,प्रवाही पदार्थ , जलाशय , पाण्यासंबंधी असणारे व्यवसाय , बोटी , स्नानगृहे , स्विमिंग पुल , औषधे ,फळेफुले , बागायत ,मासेमारी ,सुगंधी द्रव्ये , अत्तरे , काव्यगायन चंद्राच्या अधिपत्याखाली येतात .

चंद्र हा मातेशी संबंधित असल्यामुळे चेतना , स्फूर्ती , माया ममता , वात्सल्य ,कुटुंबियांबद्दल असणारी आत्मीयता ,काटकसर , धरसोड,सावध वागणूक तसेच शरीरातील शिरा ,धमण्या , स्पर्शजन्य ज्ञान , जलोदर , घश्याचे आजार ,खोकला , डोळे दुखणे , पक्षाघात ,लहानमोठे आतडे ,दमा ,स्तन , मासिक पाळीचे आजार चंद्रावरून दर्शवले जातात .वृषभ आणि कन्या राशीत म्हणजे पृथ्वितत्वाच्या राशीत चंद्र असणारी मंडळी] निरोगी , शरीराने मजबूत असतात .कुंडलीचे उदित भाग म्हणजे लाग्न्बिंदू ते सप्तम बिंदू येथील चंद्र जीवनशक्ती आणि चांगले आरोग्य देतो . अग्नितत्वाच्या राशी चंद्राला विशेष अनुकूल नसतात . आरोग्याच्या दृष्टीने चंद्राला प्रतिकूल राशी म्हणजे मकर आणि वृश्चिक . वृश्चिक राशीत चंद्र असेल तर स्त्रियांचा मासिक धर्म हा अनियमित असतो . स्त्रियांच्या गर्भाशयावर सुद्धा चंद्राचा अंमल आहे. अग्निराशीतील चंद्रावर शनी ,राहू , मंगळ ,हर्शल ह्यांचा अशुभ दृष्टीयोग असेल तर स्त्रियांच्या अंगावरील दुधाचे प्रश्न निर्माण होतात. स्त्रीच्या शरीरात दुध उत्पन्न करण्याचा कारक चंद्र असून अश्रू निर्माण करण्याचे कामही तोच करतो.

चंद्राचा जप 11000 आहे. तसेच पत्रिकेत चंद्र बिघडला असेल तर शंकराची उपासना सांगितली आहे. मोती हे चंद्राचे रत्न सांगितले आहे. 

चंद्र हा रजोगुणी आणि जलतत्वाचा आहे. जलतत्व हे निरागस , संवेदनशील , हळवे ,कोमल पण बिघडले तर निराशावादी अश्या गुणाचे तत्व आहे. रवी समोर चंद्र असतो तेव्हा पौर्णिमा आणि रवी समोर चंद्र असतो तेव्हा अमावास्या असते. रविला चंद्राने मित्र म्हणून जवळ केले आहे. अग्नी तत्वाच्या रविला चंद्राने मित्र म्हणून जवळ करावे हे एक कोडेच म्हणावे लागेल.बुधाने चंद्राला शत्रू मानले असले तरी चंद्राने बुधाला आपला मित्र मानले आहे. चंद्राने राहू सोडला तर सगळ्यांनाच आपल्या मैत्रीचा आहात पुढे केला आहे. चंद्राची स्वराशी कर्क असून चंद्र वृषभ राशीत उच्चीचा आणि वृश्चिकेत निचीचा आहे. 

रोहिणी , हस्त आणि श्रवण हि ३ नक्षत्रे चंद्राची आहेत .रोहिणी हे मनुष्य गणी तर  इतर दोन नक्षत्रे हि देवगणी आहेत.

चंद्र हे जलतत्व आहे . मोक्ष त्रिकोणाची सुरवात जलतत्वापासूनच होताना दिसते कारण चतुर्थात चंद्राचीच कर्क राशी येते .संवेदना असल्याशिवाय अध्यात्मिक प्रगती होणारच नाही . सद्गुरूंचे चरण किंवा नुसती आठवण आली तरी डोळ्यातून अश्रू येणे हेच पारमार्थिक प्रगतीचे पहिले पाऊल आहे. 

मन आहे फक्त ते दिसत नाही आणि त्या मनावर चंद्राचे अधिराज्य आहे . मन उदबत्तीच्या धुरासारखे असते ..सतत गतिमान ..माणसाचे मन स्थिर असेल तर तो जग जिंकेल आणि तेच मन निराश झाले तर आयुष्य नकोसे होईल. जीवनातील रस निघून जायील. 

चंद्र हा जलतत्व आहे आणि जल म्हणजे पाणी ,लक्ष्मी , जीवन , संवेदना , प्रेम. आयुष्यातून प्रेम वजा केले तर काहीच राहणार नाही . माणूस हा सदैव प्रेमाचा भुकेला असतो . दोन गोड शब्द माणसाला आयुष्यात पुन्हा उभे करू शकतात . हीच चंद्राची आणि आपल्या गुरुंचीही शिकवण आहे . 

चंद्रासारखे होण्याचा प्रयत्न करुया .शीतल , निर्मळ मनाने कुटुंब आणि माणसेही जपूया .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230  


Monday, 4 December 2023

ब्रम्हांडातील शक्ती

 || श्री स्वामी समर्थ ||




रोज अगदी प्रत्येक क्षणी आपले षडरिपू आपल्या अवती भोवती फिरतच असतात . कधी आपण मोहाच्या आहारी जातो तर कधी क्रोधाच्या . कुठलातरी रिपू आपल्यावर हाबी होत असतोच . हे सर्व रिपू आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. एखादी  घटना आपल्याला सुखावते तर एखादी दुक्खाचे पहाड उभी करते. कधी आपला आत्मविश्वास द्विगुणीत होतो तर कधी आपण निराशेच्या गर्तेत खोलवर गोते खातो . आनंद आणि दुक्ख हेच जीवन नाही तर त्याही पलीकडे अनेक भावनांचे मिश्रण म्हणजे जीवन. अत्यंत अशाश्वत असे हे आपले जीवन आणि म्हणूनच आत्ताचा क्षण महत्वाचा आहे . पुढच्या क्षणाचे कुणाला ज्ञात आहे? कुणालाही नाही . 

आत्ताचा क्षण भरभरून जगणारा नेहमीच आनंदी असतो. सुखाचा सदरा परिधान करून शांत झोप घेणारा माणूस आत्ताच्या क्षणाचा पुरेपूर आस्वाद घेणारा असतो . आजच्या जगतात हे खूप कमी पाहायला मिळते . पण खर सांगू का इतर गोष्टी सोडा पण हे अंगवळणी पाडून घ्या तर आणि तरच जीवनाचा आनंद लुटता येयील . कारण आत्ताचे जीवन आणि आपले प्रश्न हे आपली शेवटच्या क्षणापर्यंत पाठ सोडणार नाहीत पण ह्या सर्वात जीवन जगायचे मात्र राहून जायील.

प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे घडेल असे नाही. कधी कुणी आपल्याला दुखावते , आपल्या मनाविरुद्ध वागते , कुणी अपमानास्पद बोलते वागते , आपल्याला कमी लेखते .अश्यावेळी आपण पण शब्द संहार करून समोरच्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी तिथेच आपण चुकतो. त्याने चुकीचे कर्म केले आहे त्याची परतफेड करण्यासाठी आपण कश्याला आपले कर्म वाढवून घ्यायचे ? आणि मग ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा. का कश्यासाठी . ज्याचे त्याच्यापाशी मग ते चांगले असो अथवा वाईट . ते त्याला फेडायलाच लागते . कर्म केले कि त्याचे फळ भोगणे हे आलेच कि कारण कर्म तुम्हाला चिकटलेले असते .

आपल्या ब्रम्हांडात अश्या अनेक शक्ती आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत पण अनुभवायला येतात . त्यांचे दिव्य अनुभव आपल्याशी जोडले गेलेले आहेत . ह्या शक्ती म्हणजे पंचतत्व , दिशा , आकाशातील तारे  आणि सर्वात महत्वाचे आपले मन . ह्याहीपलीकडे एक सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे सद्गुरू . आपल्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे लक्ष आहे. आपण आपल्या सद्गुरूंच्या दृष्टीक्षेपात आहोत ह्यासारखे पुण्य ते काय ? 

कुठल्याही स्थितीत आपण आपले कर्म वाढवून घ्यायचे नाही . हे सोपे नाही पण अशक्यही नाही. ब्रम्हांडातील ह्या शक्ती सर्वच हिशोब ठेवतात त्यामुळे आपण आपले कर्म प्रतिशोध घेण्याच्या धुंदीत वाढवून ठेवू नये. त्याने काहीच साध्य होणार नाही . कारण ते परत आपल्यालाच फेडायला लागणार आहे. 


सतत काहीतरी वाईट होईल हि भीती मनातून काढून टाकली पाहिजे . आणि जर होणारच असेल तर आपण विचार करून ते बदलणार नाही उलट आपल्याला मानसिक अस्वास्थ्याला तोंड द्यावे लागेल.  सतत घाबरत जगणे , चिंता , कल्प विकल्प ह्यांनीच अनेकांचे जीवन व्यापलेले पाहतो आपण . चिंता करून नवीन प्रश्न उभे राहणार आहेत , सुटणे तर दूर राहिले. 

आजचे जीवन सहज नाही स्ट्रेस फुल आहे पण आता जे आहे ते आहे त्यातूनही आपला आनंद उत्साह कसा टिकून राहील आपल्या चेहऱ्यावरील आणि मनातील सकारात्मक भावना लोप पावणार नाही हे पहिले पाहिजे. आपले बोलणे वागणे आपले शब्द आपले वाचन आपला दृष्टीकोण , लिखाण ,देहबोली , आजूबाजूला असणारी माणसे , फोनवर येणारे मेसेज सर्व काही सकारात्मक ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे . असे झाले तर जीवनातील आनंदापासून आपण तसूभर सुद्धा दूर जाणार नाही . सकारात्मक राहणे आपल्याच हाती आहे आणि ते अशक्य नाही. तुम्ही मनात एखादा विचार आणलात तर ह्याच ब्रम्हांडातील लहरी तुमच्याकडे आकर्षित होतात . तुम्ही सकाळी उठल्यावर म्हणा कि माझे डोके दुखत आहे ....सकाळी 11 वाजता खरोखरच डोके दुखायला लागेल. मनातील विचार शरीरावर मेंदूवर प्रभावित होत राहतात . ब्रम्हांडातील नकारात्मक उर्जेला तुम्ही तुमच्याही नकळत खेचून घेतलेत आणि म्हणून डोके दुखायला लागले. त्यापेक्षा सकारात्मक विचार ठेवा मग सर्व सकारात्मक गोष्टी आकर्षित होण्यास वेळ लागणार नाही. मनाची ताकद सर्वश्रेष्ठ असते आणि ती आपण करत असलेल्या विचारांवर अवलंबून असते . विचार कश्या प्रकारे आहेत त्याप्रमाणे दिवस व्यतीत होत असतो. 

संपूर्णतः मानसिक शारीरिक दृष्टीने सकारात्मक राहिलो तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा घडू लागतात .ह्या ब्रम्हाडात आपल्याला घेण्यासारखे खूप आहे , पण आपण ते घेतच नाही हा आपला प्रोब्लेम आहे. सतत दुक्ख उगाळत राहण्यारया लोकांच्या मागे दुक्खच लागते .... ह्या शक्ती अतिंद्रिय आहेत . त्यांचा प्रभाव आपल्यावर आहेच अर्थात आपल्या प्रराब्धप्रमाणे तो कमी अधिक असणार आहे . त्या सर्वांशिवाय जीवनाचा प्रवास सुद्धा फोल आहे .


आपले आयुष्य आपल्याच हातात आहे आणि ते क्षणाक्षणाला ओंजळीतून वाहत चालले आहे . यु टर्न नाही आहे त्यामुळे आज अगदी आत्ता ह्या क्षणापासून सकारात्मक राहा आणि इतरानाही सकारात्मक राहण्यासाठी प्रेरणा द्या. 

अर्थात सुरवात स्वतःपासून करा ....

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



 



मा फलेषु कदाचन -एक तपस्वी

 || श्री स्वामी समर्थ ||


नवग्रहांचा राजा रवी. सूर्य किंवा रवी हा केंद्रबिंदू मानून त्याचे भोवती फिरणाऱ्या ज्ञात आणि असंख्य अज्ञात ग्रहांच्या या मालिकेला आकाशगंगेतील एक सूर्यमाला असे म्हणतात . ग्रह हे परप्रकाशित असतात पण सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे . सूर्य तारा आहे पण शास्त्रात त्याला ग्रह म्हंटले आहे. रवीच्या भोवती पृथ्वी ज्या वर्तुळामध्ये फिरते त्याला क्रांतीवृत्त असे म्हंटले जाते .ह्या दीर्घ वर्तुळाचे १२ समान भाग करण्यात आले असून त्यांना १२ राशींच्या संज्ञा दिल्या आहेत . 

रवी मुळे जीवसृष्टी अबाधित आहे. प्रकाश , प्राणवायू सूर्यामुळे मिळतो .त्यामुळे सूर्याला आपण जीवनदायी म्हणतो. D जीवनसत्व देणारा रवी हा आपल्या आयुष्यात आत्यंतिक महत्वाचा आहे. ज्योतिष शास्त्रात रवीला “जगत् पिता ” म्हंटले आहे. तसेच रवी हा आरोग्यकारक , आयुष्यकारक  आणि आयुष्य देणारा ग्रह मानला आहे. जीवनशक्ती ,सद्गुण , नीती , अलौकिक ईश्वरभक्ती ,शुद्ध सात्विक विचार ,अंतर्ज्ञान , अंतस्फुर्ती ,ध्यानधारणा , धैर्य , वैद्य , औषध , सरकार , जगातील राजे आणि राजसत्ता , व्यवस्थापीय अधिकार ,वरिष्ठ अधिकारी , पिता , पितृत्व ,पती इत्यादीचा कारक रवी आहे. स्वयंपाक घरातील वस्तू व पदार्थ तयार करतात त्यात अग्नीचा वापर होतो त्यावर रवीचा अंमल आहे. 

रवी प्रधान व्यक्ती हुकुमत गाजवणार्या , गर्विष्ठ , अहंकारी असतात , शरीर उंच, चेहरा रुंद ,रुबाबदार , स्वभाव पण मनमोकळा ,स्पष्टवक्ता ,उदार आणि महत्वाकांक्षी असतात .

सोन्यातील पिवळा रंग हा रविचा मुख्य रंग आहे. तांबे ह्या धातूवर तसेच पूर्व दिशेवर रवीचा अंमल आहे. माणिक हे रविचे रत्न असून देवघर , देवळे ह्यावर रवीची सत्ता आहे. 

रवीचा मुख्य अंमल हा हृदयावर असून शरीरातील रक्ताभिसरण क्रिया ,हाडे  ,पुरुषांचा उजवा तर स्त्रियांच्या डाव्या डोळ्यावर तसेच गळा , मेंदू ह्यावर रवीचा अंमल आहे. डोकेदुखी , पित्त , कुष्ठ ,नेत्रविकार रविमुळे होतात . वास्तविक पृथ्वी हि रवीभोवती फिरत असते पण पृथ्वीवरून आपल्याला  रवी फिरत असल्याचे जाणवते.

रविचे भ्रमण खालीलप्रमाणे १२ राशीत .

मेष राशी   १३ एप्रिल ते १२ मे

वृषभ राशीत  १३ मे ते १४ जून

मिथुन राशीत  १५ जून ते १५ जुलै

कर्क राशीत  १६ जुलै ते १६ ऑगस्ट

सिंह राशीत  १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर

कन्या राशीत  १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर

तूळ राशीत १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर

वृश्चिक राशीत  १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर

धनु राशीत  १५ डिसेंबर ते १३ जानेवारी

मकर राशीत  १४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी 

कुंभ राशीत  १४ फेब्रुवारी ते १३ मार्च

मीन राशीत  १४ मार्च ते १२ एप्रिल

रवीचा उत्तरायण कालखंड हा 23 डिसेंबर ते २१ जून पर्यंत असून दक्षिणायन २२ जून ते २२ डिसेंबर असा असतो.

रवी हा लग्न ,कर्म आणि भाग्य स्थानाचा कारक आहे. रवी हा मेष , सिंह , धनु ह्या अग्नी तत्वाच्या राशीत बलवान असतो त्यामुळे मनुष्य महत्वाकांक्षी ,उच्च विचारांचा , कर्तव्यनिष्ठ ,दिलदार असतो . धनस्थानातील रवी हा कुटुंब सौख्य देत नाही  इथे रवी थोडासा मानी होतो आणि कुटुंब प्रमुखाला मान हा वर्चस्व गाजवून मिळत नाही तर तो आपल्या प्रेमाने मिळवावा लागतो .व्ययस्थानी आणि अष्टमस्थानी धननाश , शारीरिक कष्ट करवतो .षष्ठात शत्रुपिडा करतो . चतुर्थात चिंता ठेवतो .रवी सिंह राशीत स्वगृही, मेषेत उचीचा तर तूळ राशीत निचीचा मानला आहे .

वृषभ , कन्या , मकर ह्या पृथ्वी तत्वात रवी फारसा आनंद देणार नाही . अग्नीतत्वाच्या राशी ह्या रवीच्या मित्र राशी आहेत कारण तो स्वतः अग्नी तत्वाचा आहे.  चंद्र मंगळ बुध गुरु हे मित्र तर शुक्र शनी हे शत्रू आहेत . शनी शत्रू असल्यामुळे मकर कुंभ ह्या सुद्धा शत्रू राशीच आहेत .रवी आणि शनी हि एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यामुळे कि काय रवीने मेष राशी आपली उच्च रास मानली आहे जिथे शनी निचीचा होतो. आणि केवळ शत्रुत्व म्हणून कि काय तूळ हि निचीची रास स्वीकारली असावी .

रवीचे सर्वात जुळते कुणाशी तर चंद्राशी .रवी पिता तर चंद्र माता आहे. रवी चंद्र प्रतियोग म्हणजे पौर्णिमा आणि एकत्र म्हणजे युती असेल तर ती अमावास्या .जीवनातील सुख आणि दुख हि चंद्र रवीचा अभ्यास केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत .रवीच्या सप्तमात जे ग्रह येतात ते वक्री होतात आणि वक्री ग्रह हे अधिक बलवान असतात .रवीची महादशा हि ६ वर्षाची असते. 

रविपासून ३ गोष्टी शिकूया 

१. रवी हा कर्म योगी आहे. सतत कर्म करत राहणे हे रविचे काम आहे .रवी कधीच सुट्टी घेत नाही . भारतात रात्र असते तेव्हा अमेरिकेत दिवस म्हणजे रवी सतत प्रकाशमान असतोच .विश्रांती हा शब्द जणू त्याच्या शब्दकोशात नाही . 

२. भेदभाव नाही . रवी जे नित्यकर्म करत असतो त्यात भेदभाव कधीच करत नाही समान वाटप करणे हीसुद्धा एक मोठी योगसाधना आहे.

३. कुठलीही अपेक्षा नाही. No Expectation.  कर्मयोगाची व्याख्या काय तर “ मा फलेषु कदाचन ”.कर्म करा पण फळाची आशा करू नका .

सूर्योपासना हि सर्व श्रेष्ठ उपासना आहे. सूर्य अधिक बलवान करायचा असेल तर सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यनमस्कर घालणे हि साधना करावी. गायत्री मंत्र म्हणणे हि सुद्धा सूर्य उपासना आहे. 

ग्रह कमजोर केंव्हा होतात. जेंव्हा ते नीच राशीत असतात. शत्रू राशीत, शत्रू ग्रहासोबत राहू केतू यांनी युक्त असतील किंवा पाप कर्तरी योगात असतील शत्रू ग्रहांची दृष्टी असेल तर ग्रह कुंडलीमध्ये पीडित अथवा कमजोर अवस्थेत असतो. 

कुंडलीतील कमजोर रवी 

रवी म्हणजे नैसर्गिक ऊर्जास्रोत, एक जीवनदायीनी, सृष्टीचे भरण पोषण करणारा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण सृष्टीचा आत्मा आणि ज्योतिष शास्त्रात ही रवी हा आत्म्याचा कारक आहे. रवी म्हणजे तेज, रवी म्हणजे आत्मविश्वास, रवी म्हणजे आत्म सम्मान, रवी म्हणजे पिता, आज अवकाशात रवी नसेल तर आज राहू केतू सुद्धा नसते. असा हा ग्रहांना सुद्धा ऊर्जा प्रदान करणारा रवी नारायण कुंडलीत जेंव्हा कमजोर होतो. तेंव्हा सर्व प्रथम तो व्यक्तीचं आत्मिक बळ कमी करतो. व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती 

कमी करतो. आत्मा पूर्ण सक्रिय होत नाही. व्यक्ती मध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जी जिद्द कठीण परिश्रम करण्याची तयारी आणि येणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींना तोंड देण्याची क्षमता. त्यासाठी लागणारे आत्मिक बळ व्यक्ती मध्ये नसते. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची प्रिसिद्ध होण्याची इच्छा असते. एखाद्या यशस्वी व्यक्तीला पहिले की ते यश आपल्याला सुद्धा खुणावत असते. 

इथे कमजोर रवी असलेल्या व्यक्ती फक्त ते यश आणि प्रसिद्धी इतकंच पाहतात. पण ते मिळवण्यासाठी केलेले कष्ट, अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन, परिस्थितीशी केलेला सामना या गोष्टी पाहत नाहीत. कारण कमजोर रवी असलेल्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टी ह्या सोप्या पद्धतीने कमी कष्टात, कोणतीही अडथळे न येता हव्या असतात. पण रवी हा राजा आहे. आणि राजा होण्यासाठी जनतेच्या परीक्षेत पास होणं महत्वाचे असते. मेहनत केल्याशिवाय कुणीही राजा बनत नाही हा रवीचा उपदेश आहे . त्याचे वर्चस्व त्याच्या गुणांनी त्याला हे सिद्ध करून द्यावं लागत की तो आपल्या प्रजेचे रक्षण, भरणं पोषण उत्तम करू शकतो. तेंव्हाच तो राजा होण्यासाठी योग्य ठरतो. जेंव्हा रवी कुंडलीत कमजोर होतो तो तूळ राशीत ग्रहण योगात किंवा शत्रू ग्रह राशीत, सोबत किंवा दृष्टी योगात असतो. तेंव्हा तो व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी किंवा कोणत्या कार्यासाठी जी आत्मशक्ती आवश्यक असते. जी प्रेरणा आवश्यक असते त्यापासून तो जातकाला वंचित करतो. पर्यायाने अशा व्यक्ती ह्या उदासीन असतात. बऱ्याचदा हे वाक्य त्यांना अतिशय समर्पक ठरते. ""ठेविले अनंते तैसेचि राहावे """याव्यक्ती जीवनात उत्कृष्ट करण्यासाठी फार प्रयत्नशील नसतात किंवा लवकर हार पत्करतात. 

कुंडलीत  रवी उच्च स्थानी आहे इतर ग्रह देखील चांगले आहेत आणि तरीही व्यक्तीला अपयशाचा सामना करावा लागत असेल. तर कुंडलीत राहूची स्थिती अवश्य पाहावी. कारण राहू सूर्याच्या उर्जेला बांध घालतो. कुंडलीत रवी कमजोर जरी असला तर व्यक्तीला जीवनात बरीच मेहनत घ्यावी लागते. तसं पाहायला गेले तर शनी हा रवी पेक्षा ही जास्त शक्तिशाली आहे. जर कुंडलीत शनी चांगला असेल तरी सुद्धा व्यक्ती सफलता प्राप्त करतो . 

रवी हा सामर्थ्य आहे.आत्मा आहे. जर तो कुंडलीत कमजोर असेल तर  जीवनात प्रेरणा, सामर्थ्य, आत्मविश्वास, प्रतिकार शक्ती, चा अभाव असलेलं जीवन असू शकते .


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230


Friday, 1 December 2023

लग्न आणि नवमांश

 || श्री स्वामी समर्थ ||


नवमांश कुंडली हि लग्न कुंडलीचे सूक्ष्म स्वरूप आहे हे खरे असले आणि नवमांश पाहिल्याशिवाय फलादेशाला मूर्त स्वरूप येत नाही तरीही ह्या दोन्ही कुंडल्यांचा अभ्यास करताना अनेकांचा संभ्रम होतो हे पाहायला मिळते .

प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्रे येतात आणि प्रत्येक नक्षत्राला चार चरण म्हणजेच प्रत्येक राशीत आपल्याला 9 चरणे पाहायला मिळतात . उदा. मेष राशीत अश्विनी , भरणी आणि कृत्तिका हि 3 नक्षत्रे अनुक्रमे 4 4 1 अशी चरणे येतात . म्हणजेच आपल्याला 9 प्रकारची व्यक्तिमत्व फक्त मेष राशीतच पाहायला मिळतील. मेष राशीचे सर्व लोक खूप चिडणारे संताप करणारे लोक आहेत असे सरसकट विधान आपण नाही करू शकत. मेष राशीचा मंगळ धाडसी , आक्रमक स्वभावाचा ,भांडायला उठणारा , अति महत्वाकांक्षी आहे पण त्याचेही अनेक पेहलू आहेत .उदा. अश्विनी नक्षत्राच्या तृतीय चरणात बुध काम करतो म्हणून मेष (मंगळ ) + अश्विनी ( केतू ) + तृतीय चरण (बुध) हे समीकरण येते जे महत्वाकांक्षी + थोडे अध्यात्मिक + बुद्धिमान आहे. हा जातक शब्दांच्या कोट्या करण्यात हुशार असणारच .तसेच हुशार , देवावर श्रद्धा पण सतत देवदेव न करणारा आणि पैशाची गणिते मांडणारा बुद्धीच्या जोरावर अर्थार्जन करणारा असेल.


ह्याचा अर्थ असा कि हा जातक मेष राशीत अश्विनी नक्षत्रात पण तृतीय चरणात जन्माला आहे . तेव्हा म्हणताना मेष राशीत जन्मला आणि नवमांशात तो बुधाच्या मिथुन राशीत आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरले आणि हेच अनेकदा म्हंटले जाते . जातकाची मेष रासच आहे ती त्याने सोडून मिथुनेत उडी नाही मारली . चंद्र हा मेष राशीतच आहे फक्त तो बुधाच्या तिसर्या नवमांशात आहे ज्याची तो प्रकर्षाने फळे देणार आहे त्यांनी रास बदलून तो बुधाच्या राशीत नाही गेला तर फक्त नवमांश बुधाचा आहे . ह्याचा सखोल अभ्यास झाला तर जातकाच्या  व्यक्तिमत्वाचे कंगोरे समजतील. 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Thursday, 23 November 2023

उत्तम ज्योतिषी व्हायचे आहे ?

 || श्री स्वामी समर्थ ||



आज ज्योतिष शास्त्राचा प्रसार आणि अभ्यास जगात सर्वत्र चालू आहे. हे इंटरनेट चे युग असल्यामुळे सोशल मिडिया प्रगत आहे आणि म्हणून ह्या शास्त्राच्या अभ्यासाला आणि प्रसाराला गती मिळाली आहे. असो.

 

आपल्या भविष्यात काय घटना घडतील ह्याची उत्सुकता कमी अधिक का होईना पण प्रत्येक व्यक्तीला असतेच असते . ज्योतिष शास्त्र आहे कि नाही ह्याबद्दल अनेक जणांची अनेक मते आणि मत प्रवाह आहेत अर्थात आज आपण त्याबद्दल विचार करत नाही . पण आज अनेक जण ह्या शास्त्राचा अभ्यास करताना दिसत आहेत हि आनंदाची बाब आहे. 


अनेकदा एक उत्सुकता म्हणून आपण ह्या शास्त्राचा अभ्यास करतो . काही जण ह्या शास्त्राच्या उत्सुकतेपोटी त्याचा अभ्यास करतात . काही फक्त कुतूहल म्हणून ह्याचा अभ्यास करतात आणि मग अभ्यासाची खरच गोडी लागते आणि पुढे सखोल अध्ययन करताना दिसतात . अनेकवेळा एखाद्याच्या आयुष्यात एखादा मन हेलावून टाकणारा प्रसंग घडतो आणि तो का घडला ह्याचा शोध घेण्यासाठी सुद्धा ह्या अभ्यासाकडे वळणाऱ्या लोकांची उदा आहेत . 


ज्योतिष शास्त्राचा अभ्यास सखोल आहे आणि तो करायचा असेल तर वरवरचा करून चालणार नाही. त्यासाठी अथक परिश्रम , अध्ययन , संशोधक वृत्ती , समर्पण आणि ह्या शास्त्राबद्दल तळमळ असेल तरच अध्ययन उत्तम होईल अन्यथा सर्व फोल आहे. आजकाल दोन पुस्तक आणि एखाद दुसरी  कार्यशाळा करून सुद्धा लोक स्वतःला ज्योतिष समजू लागले आहेत . असो तर सांगायचे असे कि ज्योतिष नामक महासागरात उडी मारली कि न संपणारा अभ्यास सुरु होतो आणि तो करताना उपासनेची जोड पण लागते . नुसती पुस्तके प्रवचने आणि कार्यशाळा करून ज्योतिष होता येत नाही . स्वतःचे योगदान लागते . २४ तास डोळे कान उघडे ठेवायला लागतात , निसर्गाशी एकरूप व्हावे लागते कारण तोच आपल्याला उत्तरे देत असतो .


आपल्या कडे आलेल्या जातकाचा , त्याच्या मानसिक जडण घडणीचा , व्यक्तिमत्वाचा  एखाद्या प्रसंगात तो जातक काय आणि कसा वागेल ह्या सर्वच सखोल अभ्यास करावा लागतो मग त्याचा प्रश्न कुठलाही असो. 

ते तर्कशास्त्र आहे त्यामुळे एखाद्याचे लॉजिक उत्तम असावे लागते . पत्रिकेतील ग्रहतारकांशी संवाद साधण्याची कला अवगत झाली तर जातकाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतील. आपल्याला हे शास्त्र अवगत आहे ह्याचा तसूभरही अहंकार नसावा , प्रत्येकानं स्वतःला अभ्यासक समजावे कारण हे इतके दिव्य शास्त्र आहे आणि महासागरासारखी त्याची व्याप्ती आहे त्यामुळे पूर्ण हयातीत सुद्धा त्याचे संपूर्ण आकलन होणे कठीण आहे. आपले भाकित बरोबर ठरले तर अहंकाराचा वारा लागू नये आणि चुकले तर पुनश्च अभ्यास करावा.


आज आपण पत्रिकेत उत्तम ज्योतिषी होण्याचे काही ग्रहयोग बघुया . तर्कशास्त्र म्हणजे बुद्धीशी संबंध म्हणून अर्थात बुध आणि ज्ञानाचा कारक गुरु हे सुस्थितीत असावेत. लग्नेश बलवान असणे अत्यावश्यक आहे तसेच त्याचा संबंध अष्टमेशा सोबत असावा. शनी हा सुद्धा अति महत्वाचा ग्रह आहे. शनीचा संबंध अष्टम भावाशी असेल आणि गुरु बुध बलवान असतील त्याचसोबत शनी गुरूने दृष्ट असेल तर व्यक्तीची शास्त्रात उत्तम प्रगती होते. अष्टम पंचम भावाच्या दशेत तसेच राहूच्या दशेत उत्तम ज्योतिषी  तयार होण्याचे योग असतात . शनी नेप युती किंवा नवपंचम योग तसेच अंतर्स्फुर्तीचा कारक नेप ची भाग्येश ग्रहासोबत युती किंवा शुभ योग ह्या शास्त्राच्या अध्ययनाला पूरक ठरतात . थोडक्यात बुध गुरु चंद्र नेप शनी केतू अभ्यासावेत .

एखादी घटना का घडली हे पाहताना त्या घटनेच्या खोलाशी जाण्याची जिज्ञासू वृत्ती हवी . उदा . कुणीही जन्मतः व्यसनी नसते तर त्याच्या आयुष्यातील एखादा कालखंड आणि त्यात घडणाऱ्या घटनांमुळे तो व्यसनाकडे वळलेला असतो . उगीच उठसुठ कुणी व्यसनी होत नाही. कमकुवत मानसिकता , आयुष्यातील कठीण स्थितीला तोंड देण्यास असमर्थ , आव्हाने पेलण्याची कुवत नसणे , आर्थिक कुचंबना अशी अनेक करणे त्यास असू शकतात . तेव्हा ह्यातील कुठले कारण आहे ते शोधता आले पाहिजे आणि त्यातून जातकाला बाहेर सुद्धा काढता आले पाहिजे . अनेकदा प्रश्नाच्या मुळाशीच त्याचे उत्तर सुद्धा असते . असो सांगायचे तात्पर्य जातकाच्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाता आले पाहिजे आणि म्हणूनच पत्रिकेतील ग्रहांची बैठक कशी आहे हे समजले पाहिजे. ग्रह आपले वाईट करण्यासाठी निश्चित नाहीत . एखादा पापग्रह सुद्धा आयुष्यात आपल्याला खूप उंचीवर नेण्यास कारणीभूत ठरतो .

अजूनही लिहिता येण्यासारखे खूप आहे तूर्तास इथेच पूर्णविराम देते .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  


Monday, 13 November 2023

एक पाऊल पुढे

 || श्री स्वामी समर्थ ||



पाडव्याच्या नुसत्याच शुभेछ्या नाहीत तर विचार करायला लावणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊन पुढील वर्ष खर्या अर्थाने समृद्ध करुया . आज जागतिक आव्हाने आणि त्यात भरडली जाणारी आपली युवा पिढी त्यातून स्ट्रेस वाढतोय . आपले  विचार अत्यंत खालच्या थराचे आणि मने  नको त्या अहंकाराने आणि अत्यंत टुकार गोष्टीनी भरलेली आहेत , त्या सर्व अहंकाराला , मत्सर , दुसर्यापेक्षा मी कसा सरस ह्या खोट्या अहंकारातून वाढीला लागलेल्या भावनांना आज तिलांजली देण्याचा प्रयत्न करुया . कुणाशी स्पर्धा आहे आपली ? जमले तर स्वतःशीच करा , तरच आयुष्य खर्या अर्थाने पुढे जायील. दुसर्याला कमी लेखणे बंद करा . मीच काय तो शहाणा ह्यामुळे स्वतःचीच शोभा होतेय ती करून घेवू नका. इतरानाही बुद्धी आहे , त्यानाही विचार शक्ती आहे त्यांच्याही मतांचा आदर करा . नुसते अविचारी ,आत्मप्रौढी मिरवणे नको , खूप झाले . नुसते बोलणे नको तर प्रत्यक्षात आणले पाहिजे तरच हे सर्व सण खर्या अर्थाने साजरे होतील . एकजुटीचा अभाव आहे त्यासाठी  खर्या अर्थाने प्रयत्नशील राहूया . 


प्रगत जगाचा भाग आहोत आज आपण जिथे यूट्यूब गुगल – विकिपीडिया वापरात आहोत . फेसबुक - लिंक्डइनची च्या मोठ्या गप्पा मारत आहोत . ट्विटर – इंस्टाग्रामच्या  जगात वावरत आहोत पण मने कोत्याच मनोवृत्तीची आहेत . परदेशातील रस्ते किती सुंदर हे सांगणारे आपण आपल्याच रस्त्यांवर बिनधास्त बिन बोभाट थुकत आहोत .


आजची युवापिढी तरुण मुलेमुली  हि सर्व आव्हाने समर्थपणे पेलत आहे , त्यांना पाठींबा द्या . त्यांना त्याचीच अधिक गरज आहे. त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिलो तर समर्थ भारताची निर्मिती आपल्या हयातीत आपल्याला पाहायला मिळेल. आज तरुण पिढी घर , नोकरी ह्याच प्रश्नात अडकून आहे . कर्तुत्व असूनही जीवघेण्या स्पर्धेचा भाग होणारी आणि त्यातून निर्माण झालेल्या चिंतेमुळे व्यसनांकडे झुकणारी , घरासाठी कर्ज देणार कोण आणि मिळाले तर फेडणार कसे ,त्यात असंख्य इमारती पुनर्विकासात अडकलेल्या , मुलांचे विवाह तोंडावर आहेत ह्या सर्व चिंता आणि व्यथा हे आजकालची तरुणाई समोरील आव्हान आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने सोडवत आहेत , त्यांच्या पाठीवर विश्वासाची थाप हवी आहे .पुढे जाण्यासाठी त्यांना बळ हवे आहे . अनेक सुसंस्कृत कुटुंबातील युवक आज खरच उत्तम माणूस असूनही व्यसनाधीन होताना दिसत आहेत पण त्याची कारणे शोधली आहेत का आपण कधी ? त्यांची मजा पाहण्यापेक्षा त्यांचे मन आणि मते समजून घेतली आहेत का आपण कधी ? त्यांना त्यातून बाहेर काढण्यचा खर्या अर्थाने एकदातरी प्रयत्न केलाय का आपण ? उत्तर आहे कधीही नाही . 


आपल्या आजूबाजूला घटनांचा , समाजाचा आपण सुद्धा एक भाग आहोत त्याचे भानच हरपून जात आहे आज. मी आणि माझे आयुष्य असे नसते आणि कधी नव्हतेच . जाती जमातीमध्ये आणि वैयक्तिक राजकारणातून क्लेश निर्माण होतात  आणि नाती तुटतात तीही कायमची. एकजूट कुठेच दिसत नाही दिसते ती फक्त इर्षा , दुसर्यापेक्षा मी कसा शहाणा हे सिद्ध करण्यात उभी हयात जाते आहे आपली आणि काय आदर्श ठेवणार आपण आपल्या पुढील पिढीकडे ? हाच का कि समोरच्याच्या मतांचा आदर न करता त्याच्या विरुद्ध सतत उभे राहून नको त्या गोष्टीना प्राधान्य देत बसा. अहो जग कुठे चालले आहे पहा जरा .


आपले चिमुकले जग आहे त्यातून जरा बाहेर या मोकळा श्वास घ्या , सामाजिक आर्थिक मानसिक राजकीय सर्व स्थरांवर प्रचंड बदल उलथापालथ होत आहे. इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे पण आपली मने ? त्यांचे काय ? ती खरच जवळ आली आहेत का? सतत दुसर्याचा दुस्वास ,अपमान करत राहणे . पराकोटीचा अहंकार जपत आणि जोपासत आहोत आपण . हो हो अगदी रोज तेच करत असतो आपण आणि त्यातून अधोगती होत आहे कुणाची ? तर आपली स्वतःचीच . जरा थोडेसे ब्रोड माइंडेड व्हा आणि डोळसपणे जगाकडे पहा , स्वतःच्या चुका स्वीकारण्यात अजिबात कमीपणा नाही त्यातून झालीच तर प्रगतीच होईल आपली आणि सर्वांचीच .


धन्यवाद देवूया आजच्या प्रगत युगाला , संशोधनाला आणि संशोधकांना . किती आयुष्य आहे आपले अजून ? गेलेला वेळ गेलाच आहे पण जो हातात आहे त्यात अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत . आज एकत्र ( तन मन धन ) येण्याची खर्या अर्थाने गरज आहे . पण त्यासाठी खोट्या अहंकाराची कवचकुंडले टाकून द्यावी लागतील . जमणार आहे का? जमवावेच लागेल . बदल एका क्षणात सुद्धा घडतो , अशक्य काहीही नाही आणि नसणार आहे . आपण पृथ्वीतलावर यायच्या आधीही सर्व छान चालू होते आणि आपण गेल्यावर सुद्धा अगदी तसेच किबहुना अधिक छान चालू राहणार आहे तेव्हा स्वतःला महत्व देणे प्रथम बंद केले पाहिजे . मीच काय तो बाकीचे मूर्ख आणि आपल्याशिवाय सगळ्यांचे अडते ह्या खोट्या कल्पना विश्वातून बाहेर या .त्यात आपले भलेच आहे. जीवन सुंदर आहे माणसे तोडू नका तर जोडा .


माणूस कुठेही असो कसाही असो विचारधारा बदलली पाहिजे . अशक्य काहीच नाही पण ते करण्याची आंतरिक कळकळ हवी इतकेच . आज एकमेकांबद्दल प्रेम ओढ माणसातील माणुसकीच संपत आली आहे . नुसते फालतू मेसेज इथून तिथे पाठवायचे . कुणाला फोन करायचा नाही कुणाचा उचलायचा नाही . कुठलाही पुढचा मागचा विचार न करता चांगल्या लोकांशी संबंध तोडून टाकायचे . समोरच्याने फोन केला मेसेज केला तरच मी करणार , कीव करावीशी वाटते अश्या लोकांची .माणसांशिवाय अस्तित्व शून्य आहे आपले . पण आज घरी कुणी यायला नको आपल्याला कुणाकडे जायचे नाही सगळे अगदी सिक्रेट ठेवायचे. कसले डोंबलाचे सिक्रेट .  एक दिवस अश्या लोकांचा फोन वाजणे बंदच होईल. कारण तुम्ही मी मी मी करत बसणारे स्वतःच्याच धुंदीत मश्गुल आहात .तेच करा मग . आपल्याच आयुष्याची सगळ्यांना पडली आहे ह्या भ्रामक कल्पनातून बाहेर या आणि मोकळ्या खुल्या दिलाने जगुन बघा, मोकळा श्वास घ्या , माणसे नाती जोड तेच आयुष्य अत्यंत सुरेल होईल .


अत्यंत कोत्या मनोवृत्तीची लोक ह्या सर्वावर टीका नक्कीच करतील , होवूदे टीका पण त्यातील काही जण तरी डोळसपणे ह्याचे वाचन आणि मनन करतील. एकात जरी बदल झाला तरी लेखन प्रपंच फळास गेला असे समजूया. मनावरची जळमटे दूर करायची वेळ आली आहे .

 

आज प्रतिपदा , सर्वाना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेछ्या . येणारे वर्ष आपल्या संकल्प पूर्तीचे असुदेत उत्तम उपासनेचे , ध्येयाकडे वाटचाल करणारे , आर्थिक घडी बसवणारे , माणसांशी कनेक्ट करणारे , इतरांना प्रेरित करणारे कार्य हातून होणारे ,  उत्तम आरोग्याचे असुदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .


सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230 


Friday, 3 November 2023

शनी – आंतरिक परिवर्तन

 || श्री स्वामी समर्थ ||


शनी हा आपल्या सगळ्यांचा जवळचा मित्र आहे . “ आपल्यातील “ आपल्याला तो सदैव घडवत असतो . आपल्या क्षमतांची आपल्याला खरी ओळख करून देत असतो . काहीही झाले तरी त्याच्यावर खापर फोडणारे आपण , तरीही तो आपल्याला चांगल्या वाईटाची पारख करून देत असतो . नुसता जप उपयोगी नाही , त्याचा उपयोग खर्या अर्थाने होईल जेव्हा आपल्यात अंतर्बाह्य बदल होईल हाच त्याचा संदेश आहे. ज्योतिष शास्त्रावर बोलताना शनीबद्दल काही भाष्य केले नाही असे होत नाही इतका खोल प्रभाव जनमानसावर शनीचा आहे. पण मनात खोलवर कुठेतरी त्याची भीती आहे, धाक आहे . एका अर्थी हि चांगलीच गोष्ट आहे कुणाचातरी जीवनात धाक हवाच , बंधन सुद्धा हवेच नाहीतर सगळाच कारभार बेधुंद होयील. 

कुंभ राशीतील धनिष्ठा नक्षत्राच्या चौथ्या चरणात आपली वक्र गती सोडून  शनी मार्गी होत आहेत . शनी हा धीम्या गतीने जाणारा ग्रह आहे . ग्रहमालिकेतील बाह्य वर्तुळातून भ्रमण करणारा ..आयुष्याच्या संध्याकाळी भेटणारा म्हणूनच वार्धक्या चाही कारक आहे. एका राशीत शनी अडीच वर्ष वास्तव्य करतो. शनी हा कर्मदाता आहे . थोडक्यात जसे कर्म तसे फळ . त्याचे कुणाशीही न मित्रत्व ना शत्रुत्व . त्याच्याकडे लाचलुचपत चालत नाही .राजमार्गाने कष्ट करून भाकरी मिळवणाऱ्या लोकांना शनी भरभरून देतो. 


शततारका ते धनिष्ठा आणि आता पुन्हा धनिष्ठा ते शततारका असे शनी महाराजांचे भ्रमण होत आहे. शनी आधीच संथ आहे आणि वक्री झाल्यावर तो अजूनच संथ गतीने जाणार आणि बलवान होणार. आपल्या कर्माकडे अगदी जवळून कटाक्ष टाकणार त्यामुळे सावधान. शनी ला दंडाची शिक्षा देण्याचा अधिकार आहे आणि ती तो निरपेक्षपणे देतो , त्याच्याजवळ गोडीगुलाबी चालत नाही. 

सूर्य सकाळी उगवतो पण लगेच तो तळपत नाही. सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यायला सर्वांनाच आवडते पण मध्यान्हीच्या  तळपत्या सूर्याकडे पाहवत नाही. अगदी हिच शनी महाराजांची शिकवण आहे . एखाद्या गोष्टीची सुरवात झाली कि त्यात लगेच यश मिळत नाही , यश प्रगती आणि व्यवसायातील उत्पन्न , नोकरीतील उन्नती साध्य करण्यासाठी काही काळ जाणे आवश्यक असते . थोडक्यात संयम ठेवला तर वेळ आली कि यशाची दालने शनी महाराज आपल्यासाठी खुली करणार हे नक्की. शनी हा विलंबाचा कारक आहे म्हणूनच एका राशीत अडीच वर्ष . तो रोज फटके मारत नाही आपण त्याच्या नजरेच्या टप्प्यात असतो पण साडेसातीत तो 1000 चुकांचा एकच फटका मारतो जो जन्मभर लक्ष्यात राहील जसे मातृ पितृ छत्र हरवणे , धंद्यात ध्यानी मनी नसताना आलेले अपयश .

शनी महाराज आता आपली वक्र अवस्था सोडून मार्गी होत आहेत . शनी महाराजांना घाबरू नका . खरतर कुठल्याच ग्रहाला घाबरण्याचे मुळात कारण नाही . घाबरायचे असेल तर आपल्या हातून केलेल्या चुकीच्या कर्माना घाबरा. कारण शनीच नाही तर प्रत्येक ग्रह आपल्या कर्माचे फळ आपल्या पदरात टाकत असतो.

आपल्या ह्या अस्तित्वाच्या लढाईत शनी मोठी भूमिका पार पाडत असतो पण आपण त्याचे आभार मानायचे सोडून त्यालाच दोष देतो .

आपले कर्म शुद्ध आणि नियत स्वच्छ असेल तर शनी महाराज त्याचे योग्यच फळ देणार हे त्रिवार सत्य आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230   




Wednesday, 1 November 2023

रोग ऋण शत्रू

 || श्री स्वामी समर्थ ||


आजकालच्या जगात सर्वात श्रीमंत तोच माणूस असतो ज्याला कुठलेही आजार नाहीत . हे माझे वैयक्तिक मत आहे. पण ते तुम्हालाही पटेल . कुणाच्याही ऋणात म्हणजे कर्जात नसणे , कसलाही आजार नसणे आणि कुणाशीही शत्रुत्व नसणे ह्यासारखे सुख ते काय ? अर्थात हे सर्व अगदी 100% सही होणार नाही हे खरे , पण झाले तर त्यासारखा आनंद नाही. 

आपल्या ऋषीमुनींनी निसर्ग कुंडली किती विचारपूर्वक तयार केली आहे खरच. ह्या निसर्ग कुंडलीतील षष्ठ भाव म्हणजेच रोग ऋण शत्रू भाव ह्याबद्दल आज जाणून घेवूया .


पत्रिकेतील 12 भावांची माहिती अगाध आहे. प्रत्येक भावाचे आपल्या आयुष्यात काही ना काही योगदान आहे . आपल्या संपूर्ण शरीराचे अवयव सुद्धा इथे प्रत्येक भावातून ज्ञात होतात . षष्ठ भाव हा महत्वाचा भाव . अर्थ त्रिकोणातील हा गाभा आहे. मुलगा शिकला कि अर्थात त्याला अर्थार्जनाकडे वळायला लागते . साहजिकच आहे स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि स्वावलंबी होणे महत्वाचे आहे. त्यामुळे नोकरी साठी हा भाव पाहावा लागतो . ज्यांना षष्ठ भावाची दशा आहे त्यांनी नोकरी जाण्याची चिंता कधीच करू नये . तुम्ही सोडल्याशिवाय नोकरी जाणार नाही . अर्थ त्रिकोण म्हणजे पत्रिकेतील 2 6 10 भाव . दशम भावावरून आपण नोकरी धंदा कुठला करणार ते समजते , आपली कारकीर्द किती उंची गाठणार , किती वेळा नोकर्या बदलणार त्याचा अंदाज येतो तसेच नोकरी व्यवसायाचे स्वरूप कसे असेल ते समजते. व्यवसाय भागीदारीत करावा कि एकट्यानेच किंवा करूच नये कारण तो फळणार नाही ह्याबद्दल इथेच उहापोह होतो.


आजकालच्या जीवनात वेळ हा महत्वाचा असतो , चाकरमानी मंडळी सकाळी लवकर उठून कामाला निघतात आणि रात्री उशिरा घरी परत येतात त्यामुळे दिवसभरात अनेकदा जिथे मिळेल ते पोटात ढकलून तात्पुरती  भूक भागून घेणे पण त्याचा दुरगामी  परिणाम चांगला होत नाही आणि अनेक आजारांची नांदी त्यातून होत जाते . पूर्वीच्या काळी लोक अंग मेहनतीचे काम खूप करत पण आता एक मोबाईल घेऊन किंवा टीव्ही समोर तासंतास बसून राहणे ह्यामुळे पचनशक्ती  बिघडून अनेक व्याधी जडतात , तसेच वर्टिगो , मानसिक समस्या होतात ह्या सर्वाचा परामर्श घेणारे हे षष्ठ स्थान आहे. आपले आजोळ सुद्धा ह्या भावातून पहिले जाते. 

षष्ठ भाव म्हणजे रोजचे आयुष्य ज्याला आपण “ डे टू डे लाईफ “ म्हणतो. मग रोजच्या आयुष्यात जे होते ते सर्व इथूनच पाहावे लागते जसे रोज आपण नोकरीसाठी जातो . रोज ऑफिस ला जातो म्हणून महिन्याच्या अखेरीस पगार मिळतो. रोज आपल्याकडे मोलकरीण येते , आपल्या घरातील प्राणी , पक्षी तसेच घरातील झाडे झुडपे ह्यानाही रोज पाणी लागते .ह्या सर्व गोष्टी रोज नियमित होत असतात म्हणून षष्ठ स्थान महत्वाचे आहे. 


आयुष्यातील प्रगती होते तशी शत्रुहि निर्माण होतात , ह्या भावावरून आपले शत्रुत्व कुणाशी कसे हे पहिले जाते. कोर्ट केसेस मधून मिळणारे यशापयश , नोकरचाकर , नोकरीत मिळणारा दुय्यम दर्जा , रोजचे आयुष्य इथून पाहतात .ऋण काढून सण साजरे करू नये अशी म्हण असली तरी अनेकदा शिक्षण , विवाह , आजारपण ह्या साठी कर्ज काढावे लागते . कर्ज मिळणार कि नाही हे हा भाव दर्शवतो .हे सप्तम भावाचे व्यव भाव आहे त्यामुळे पत्नीपासून होणारा वियोग इथे दिसतो . 


षष्ठ भाव हा त्रिकभाव आहे. इथे पापग्रह अधिक फळतील . शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करणारा ग्रह आहे आणि तो षष्ठात असेल तर आजार इतकं बळावतो किंवा त्याचा कंटाळा येतो आणि अनेकदा परलोकाची वाट धरायला सुद्धा भाग पाडतो. षष्ठ भावात चंद्र असेल तर प्रकृती नाजूक असू शकते , ऋतू बदलला कि ह्यांना लगेच सर्दी पडसे होते . षष्ठ भावावरून आपल्या रोजच्या ( अर्थात चुकीच्या )जीवनशैलीतून निर्माण होणारे आजार आणि अष्टम भावातून अनुवांशिक आजार . 

षष्ठ हे दशमाचे भाग्य आणि भाग्याचे दशम आहे . वडिलांची सांपत्तिक परिस्थिती आणि आजारही इथून ज्ञात होतात .

लग्नेश षष्ठात असेल तर स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर नुकसान सोसावे लागते . षष्ठेश लग्नात आणि तोही मंगळ असेल तर पोलीस खात्यात नोकरी साठी उत्तम लाभ देतो. षष्ठेश षष्ठात किंवा अष्टमात , व्यय भावात विपरीत राजयोगाची निर्मिती करतो. षष्ठेश सप्तम भावात योग्य नाही . अश्या लोकांच्या वैवाहिक जीवनात कलह , वादळे निर्माण होतात तसेच भागीदारीत यश मिळत नाही. षष्ठात चंद्र असेल तर समाजात प्रसिद्ध आवडते असतात कारण ते दशमाचे भाग्य आहे. पण षष्ठातील चंद्र प्रकृतीला विशेषकरून शनीने दृष्ट असेल तर कफाचे आजार देतो.

ग्रह हे त्यांच्या दशा अंतर्दशेत फळे अधिकतम देतात .


पत्रिकेतील प्रत्येक भाव आपले विशिष्ठ अधिष्ठान आणि अधिकार ठेवुन आहे त्यामुळे कुठलाच भाव दुसर्या कुठल्याही भावापेक्षा कमी नाही . प्रत्येकाची एकमेकांत असलेली गुंफण आयुष्याला खरा अर्थ प्राप्त करून देते.


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230    


Saturday, 28 October 2023

Harmony- शुक्र

 || श्री स्वामी समर्थ ||



शुक्राचा ठसा प्रत्येकाच्या आयुष्यावर कमी अधिक असतोच . आयुष्यातून सुख आनंद वजा केले तर आयुष्याला अर्थच उरणार नाही ते निरस होईल . शुक्र म्हणजे सकारात्मकता , निखळ आनंद आणि धबधब्यासारखे हास्य . शुक्रप्रधान व्यक्ती आजूबाजूला असतील तेव्हा वातावरण ताजेतवाने असते ,  शुक्राचा गोडवा हा माणसे जोडणारा आहे. असा हा शुक्र मने जोडणारा मनमिळाऊ आहे  म्हणूनच तो माणसातच रमतो .  भांडकुदळ नाही . असा हा शुक्र आपले आयुष्य सदाबहार ठेवत असतो. आपल्या चेहऱ्यावर निरागस हसू असणे हि देवाची देणगीच आहे . 


शुक्राचे अनेक रंग आहेत . शुक्र हा जलतत्व दर्शवतो . हा नुसताच प्रणयाचा , शृंगाराचा रस नाही तर उच्च कोटीची अध्यात्मिकता भक्तीचा  रस पण आहे. मागील लेखात आपण शुक्राचे उच्चत्व अनुभवले. रस म्हणजे ज्यामुले आपली तृषा भागते ,  आपल्याला आनंद मिळतो , आपली रसिकता शुक्र दर्शवतो मग ती कश्यातही असू शकते , एखादे वाद्य वाजवण्यात , अभिनय , फोटोग्राफी , सौंदर्यशास्त्र , पाकशास्त्र काहीही . शुक्रात प्रचंड आकर्षण शक्ती आहे . सिंह ह्या राजराशीतील शुक्र कमालीचा मादक असतो आणि राजासारख्या रुबाबात वावरणारा असतो . लग्नी शुक्र असणार्या व्यक्ती नेहमीच आनंदी , उत्साही , happening mode on असणार्या असतात . सकारात्मक आणि कलासक्त असतात . आज शुक्र कन्या राशीत कसा फलित  होतो ते पाहूया . कन्या राशी हि बुधाची , व्यावहारिक आणि अर्थ त्रिकोणातील राशी . भयंकर चिकित्सक आणि हुशार पण इथे शुक्राला न मानवणारे वातावण असल्यामुळे इथे तो चांगली फळे न देता निचीचा होतो. बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे. पृथ्वीच्या पोटात कायकाय सामावले आहे म्हणजेच सर्व गोळा करून ठेवण्याची वृत्ती आहे बुधाची , मला काय मिळणार हे पाहणारा आहे , त्यामुळेच त्याला वाणी म्हंटलेले आहे. उत्तम बुध असणारे लोक उत्तम व्यावसायिक असतात ते ह्याच कारणामुळे , इथे सगळी देवघेव आणि पैशांचे हिशोब , आकडेमोड आहे. शुक्र भाव भावनांच्या विश्वात रमणारा आहे आणि बुधाला तसेही तुमच्या इमोशन्स शी फारसे घेणे देणे नाही . त्यामुळे इथे शुक्र कोमेजून जायील , त्याच्या मोकळ्या स्वभावाला न पेलणारी हि बुधाची राशी आहे. 


नुसत्या आकर्षणावर बुध काम करत नाही .  बुधाचा तर्क आणि शुक्राचे प्रेम ह्या दोन भिन्न गोष्टी कश्या बरे एकत्र येतील ? थोडक्यात शुक्राची स्टाईल वेगळी आहे .

निसर्ग कुंडलीत कन्या राशी षष्ठात येते जिथे आपले रिपू आहेत , इथे सेवा आहे . मोजून मापून प्रेम करणे किंवा मला काय मिळणार ह्या भावनेपोटी फक्त प्रेम करणे हे शुक्राला मुळीच मान्य नाही . शुक्र धबधबा आहे मग तो प्रेमाचा असो कि हास्याचा ..निर्मळ आहे , सौख्य प्रद आहे.  व्यावहारिकता ह्या गोष्टीशी शुक्राचा ह्या गोष्टींशी दूरदूरचा संबंध नाही कारण त्याला मदहोश , मनसोक्त जगणे माहित आहे त्यामुळे इथे शुक्र नीच होतो. 

वैवाहिक सुख म्हंटले कि सर्वप्रथम लक्ष्य जाते ते शुक्र ह्या ग्रहावर . शुक्र नीट तपासावा लागतो . शुक्राचे नवमांश बळ पाहिले पाहिजे . शुक्र जर कन्या राशीत आणि कन्या नवमांशातच असेल तर अश्या पत्रिकांचा अभ्यास  वैवाहिक सुखासाठी केला तर उत्तर मिळेल . 

शुक्र केतू युती हि शुक्राचे सर्व रसिक, सकारात्मक गुण शोषून त्याला शुष्क करणारी आहे. केतुला तर काहीच दिसत नाही तो मनाचा चष्मा लावून जग बघतोय आणि शुक्र हा आनंदाचा स्त्रोत त्यामुळे हि युतीही अभ्यासावी लागते . एका ओळखीच्या स्त्रीची पत्रिका पहिली . अनेक वर्ष मी त्यांना ओळखत होते . कधीच खळखळून न हसणे , साधे कपडे , 30 वर्षाच्या वयात ५० वर्षाच्या स्त्रीचा पोक्तपणा , नटण्याची आवड नाही . पत्रिकेतील शुक्र केतू युतीने मला सगळी उत्तरे दिले . शुक्र वैवाहिक सुखाचा कारक ,त्यांचे सप्तम स्थान पापकर्तरीत आणि सप्तमेश हर्षलच्या कुयोगात त्यात भर म्हणून शुक्र केतूच्या अंशात्मक युतीत . अकाली वैधव्य आले. शुक्र केतू युती ने जीवनातील सर्व मधुर रसांची चव चाखू दिली नाही .

शुक्र म्हणजे अष्टलक्ष्मी. शुक्राच्या दशेत कुलस्वामिनीची सेवा करावी . सर्वच स्त्रियांनी आपल्या कुलदेवीचा जप करावा. शुक्रवारी पांढरे वस्त्र किंवा तांदूळ दान करावेत . नवग्रह स्तोत्रात दिल्याप्रमाणे शुक्राचा जप करावा .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 

  





Friday, 27 October 2023

हृदयस्पर्शी लेखन – गुरुकृपा

 || श्री स्वामी समर्थ ||



आपल्या मनातील भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचे “ शब्द “ हे एक प्रभावी माध्यम आहे. उत्तम शब्द संग्रहातून एका प्रभावी लेखाची निर्मिती होत असते. लेखन हे खरोखरच एक कौशल्य आहे . मोजक्याच शब्दात भला मोठा आशय व्यक्त करणे हे एक स्कील आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. लेखन हे हृदयस्पर्शी  असले पाहिजे. शब्दांची योग्य मांडणी , योग्य वेळी परिच्छेद ,अवघड शब्द न घेता सहज सुलभ ओघवती भाषा समोरच्याला चटकन समजते. लेखात रोजच्या जीवनातील उदाहरणे असावीत , फार क्लिष्ट आणि अलंकारित भाषा कंटाळवाणी असते. आजकाल लोकांना वेळ कमी असतो त्यामुळे पटकन प्रवासात , चहा घेताना किंवा अगदी बस ची वाट पाहत असताना सुद्धा एखादा लेख पटकन वाचून होईल अश्याप्रकारे त्याची रचना असेल तर लोकांना वाचायला नक्कीच आवडेल. थोडक्यात लेखाचा मुख्य विषय मांडताना तो व्यवस्थित मांडलाही पाहिजे पण लेखाची लांबी रुंदी लक्ष्यात घेवून.

अनेक लोक माईक हातात आला कि सोडतच नाहीत शेवटी लोक टाळ्या वाजवायला लागतात तसेच लेखणी हातात आली आहे म्हणून काय आणि किती लिहायचे ह्याचे भान हवे. लेख मोठा असेल तर “ क्रमशः .. “ असलेला बरा. मुळात ज्या विषयावर आपल्याला लेखन करायचे आहे त्या विषयाची उत्तम जाण असली पाहिजे . लेखातून आपल्याला काय संदेश द्यायचा आहे आणि त्याच्याशी आपण स्वतः सहमत आहोत ना ह्याची खात्री असली पाहिजे . हा लेख कुठल्या वयोगटातील लोकांसाठी आहे हेही माहित हवे. थोडक्यात आपल्या लेखाचा वाचक वर्ग कोण असणार आहे ? लेखांवरती येणाऱ्या सर्व प्रतिक्रिया मग त्या काहीही असोत , मोठ्या मनाने स्वीकारता आल्या पाहिजेत . फक्त आपल्यालाच अक्कल आहे असे नाही तर लोक आज चोखंदळ आहेत , उत्तम लेखक कोण निर्माण करतात तर उत्तम वाचक त्यामुळे वाचकांच्या मतांचा योग्य आदर सन्मान करून त्यांच्या सूचनांचा विचार सुद्धा झाला पाहिजे.  सोशल मिडियावर अनेकदा कुणी काही व्यर्थ , अर्थहीन किंवा त्रास द्यायला सुद्धा कॉमेंट करू शकतात त्यामुळे काय घ्यायचे आणि काय सोडायचे , कुठे दुर्लक्ष करायचे तेही माहिती हवे अर्थात अनुभवाने ह्या सर्वच गोष्टी येतात .


सर्वात महत्वाचे आहे ते लेखाचे “ शीर्षक “ . आजकालच्या भाषेत सांगायचे तर ते “Catchy “ म्हणजेच आकर्षक असले पाहिजे त्यातून लेखाचा विषय समजला पाहिजे . शीर्षक वाचून लेख वाचायची उत्सुकता निर्माण होईल इतके ते मर्म भेदक असले पाहिजे . लेखकाच्या शीर्षकातच लेखाचे गुपित आणि विषय दडलेला आणि लेखाचे यश असते. 

लेखन हे एक प्रभावी माध्यम आहे. समाजाची विचारधारा संपूर्णपणे बदलण्याची ताकद ह्या लेखणीत आहे त्यामुळे सर्वप्रथम ह्या लेखणीला तसेच आपल्या सद्गुरुना वंदन करूनच लिहावे . मनात विषयाची समज पक्की हवी . मूळ मुद्दे हवे तर लिहून काढावे आणि त्यानुसार परिच्छेद करून लिहावे. विषय कुठेही भरकटत जाणार नाही ह्याचे भान असावे. आपले म्हणणे वाचकांच्या  हृदयाचा ठाव घेणारे असेल तरच त्याची पोचपावती आपल्याला मिळेल. अनेकांचे अनेक विचार असू शकतात , म्हंटले आहे ना  व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे आपले विचार दुसर्याच्या गळी मारू नये किबहुना तसा अट्टाहास अजिबात नसावा , प्रत्येकच दृष्टीकोण अर्थात वेगळा असणारच आहे . लेखन हे फक्त “ Likes “ मिळवण्यासाठी नसावे तर समाजाला वाचकांना त्यातून काहीतरी मिळाले पाहिजे . काहीतरी देणारे , बुद्धीला खाद्य आणि विचार मंथन , जनजागृती करणारे लेखन असावे . 

आजवर मी केलेलं लेखन मला अतीव समाधान देऊन गेले आहे. माणसाने तेच काम करावे ज्यात त्याला आनंद मिळतो आणि समाधान. अध्यात्मिक लेख लिहिताना मला अनेकदा ईश्वरी अनुभूती सुद्धा आली आणि तीच माझ्या लेखनाला प्रेरणा ठरली असावी . लेखन हे सकारत्मक असले पाहिजे, विचार मंथन करायला लावणारे असले पाहिजे . दुसर्याला आणि स्वतःलाही जगायला लावणारे असले पाहिजे . जगण्याची उमेद निर्माण करणारे आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणारे असावे.  उत्तम लेख म्हणजे ज्ञानमय ज्योत आणि त्या  ज्योतीच्या प्रकाशात  स्वतःचे आत्मचिंतन आणि स्वतःतील 

“ मी “ शोधता आला तर लेखन प्रपंच फळास आला असे समजायला हरकत नाही .

ज्योतिषीय दृष्टीकोनातून लेखन कौशल्य अभ्यासताना मी माऊलींच्या पत्रिकेचा अभ्यास करीन . ज्ञानेश्वर माऊली ह्यांनी लिहिलेली ओं नमोजी आज्ञा , मोगरा फुलाला , अजी सोनियाचा दिनू हि काव्ये अजरामर झालेली आहेत . लेखनाचा मुख्य ग्रह बुध आणि ज्ञानाशिवाय लेखणी उजळणार नाही त्यामुळे ज्ञानाचा सागर गुरु. बुध ला योग्य रीतीने वळवायचे काम गुरूकडे आहे. लेखन हाताने लिहिले जातात म्हणून हात , बाहु महत्वाचे . बुध आणि गुरु सोबत नेप हा लेखनासाठी अंतस्फुर्ती  देणारा ग्रह तसेच मनाचा कारक चंद्र सुद्धा तितकाच महत्वाचा . ज्ञानेश्वर माऊलींचे बुद्धीसामार्थ्य अचाट आणि विस्मय चकित करणारे होते . इतक्या लहान वयातील त्यांची समज वाखाणण्याजोगी होती. वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानाने भरलेला अमृतासारखा ग्रंथ त्यांनी रचला जो आज पुढील कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. कुंडलीच्या लाभ ते तृतीय भावापर्यंत त्यांच्या कुंडलीत गुरु चंद्र शुक्र राहू बुध ह्यासारख्या बलाढ्य ग्रहांचे अधिष्ठान आहे खांद्याचा वरचा भागात हे सर्व ग्रह आहेत . खांद्याचा वरील भाग म्हणजे जिथे मेदू आहे म्हणजेच बुद्धी मन विचारप्रणाली . बुद्धीचा कारक गुरु लाभेश लाभात , लग्नात उच्चीचा चंद्र जो तृतीयेश सुद्धा आहे ,चंद्र स्थिर राशीत ,  बुध गुरु नवपंचम , शुक्र बुधाच्या राशीत , चंद्र बुध लाभ , लग्नेश शुक्रवार व्ययेश मंगळाची दृष्टी , कीर्ती सातासमुद्रापलीकडे गेली , तृतीय स्थान आणि चंद्र शुक्र गुरु ह्यामुळे जनमानसात प्रसिद्धी मिळाली . त्यांच्या लिखाणात तरलता आणि अपार सौंदर्य होते.

लेखन हि एक कला आहे आणि अनेकदा ती उपजत असायला लागते हा माझा अभ्यास सांगतो . ठरवून काहीही लिहिता येत नाही पण अभ्यास पूर्ण लेखन लेखनाचा दर्जा उंचावते . ओघवती आणि सहज सोपी भाषा वाचकांशी जवळचे नाते जोडते. सरतेशेवटी सर्वात मुख्य म्हणजे सद्गुरूंचा आशीर्वाद . स्वतःची साधना , उपासना , वाचन , संशोधन , विचार मंथन , अंतर्स्फुर्ती , योग्य वेळी योग्य विषयाची निवड करून केलेल्या लेखांची निर्मिती आत्यंतिक समाधान देते आणि वाचकांना अंतर्मुख होण्यास कारणीभूत ठरते.

लेखन कौशल्य हा गुरूंचा आशीर्वाद . लेखन करणे हे खचितच सोपे नाही त्यालाही कष्ट आहेत , आपला जीव ओतावा लागतो . लेखन हि गुरुकृपा आहे त्याचा योग्य मान ठेवावा ,  इतरांचे लेख चोरून साहित्य चोरी करून आपण सद्गुरूंच्या रोषास कारणीभूत होणार ह्याचे भान ठेवावे कारण आजकाल साहित्य चोरी हा प्रकार सर्रास आढळतो . तसेही लेख चोरून लेखकाची प्रतिभा तर नाही चोरता येणार हेही तितकेच खरे आहे. विचार व्हावा .  


आज ह्या लेखाच्या निम्मित्ताने सर्व वाचकांना माझा सादर प्रणाम , आपल्या वेळोवेळी मिळालेल्या अभिप्रायांमुळे लिहिण्यास प्रोत्साहन मिळाले त्यामुळे मी आपली सर्वांची मनापासून ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सूचना अनमोल आहेत आणि आपले आशीर्वाद सुद्धा ते असेच पाठीशी असुदेत .श्री स्वामी समर्थ . 

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230 






Wednesday, 25 October 2023

निस्सीम भक्ती

|| श्री स्वामी समर्थ ||



लहान मुले घरात खेळत असतात , खेळतात खेळता भांडतात , कधी भूक लागते मग आईला हाक मारतात . आई स्वयपाक घरातूनच ओरडते “ थांब जरा आले हातातले काम झाले कि येते “ . पण जेव्हा मुलाला कुठेतरी लागते तेव्हा तो जोरात आईला हाक मारतो आणि तेव्हा मात्र क्षणाचाही विलंब न लावता आई धावत येते. 


आपलेही तसेच आहे. आपण रोज आपल्याला जमेल तशी भगवंताची , आपल्या महाराजांची सेवा करत असतो . पूजा , नामस्मरण , प्रदक्षिणा  , पोथी वाचन माध्यम काहीही असो पण आपली तोडकी मोडकी भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. अनेकवेळा आयुष्यात चढ उतार येतात आणि अश्यावेळी आपण आपल्या महाराजांच्या चरणाशी धाव घेतो. खरतर काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती करू नये. जे हवे आहे ते महाराज न मागताच देणार आहेत तेही भरभरून . गजानन रुपी जमिनीत जेजे पेराल ते ते बहुत करून मिळे तुम्हा हे दासगणुनी लिहिले आहे आणि त्याची प्रत्येक क्षणी प्रचीती भक्तांना येतेच आहे. 


आपल्या भक्तीत सातत्य हवे , निर्मळ मनाने फक्त महाराजांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या नामाचा ध्यास हवा , श्वासात त्यांना विराजमान केले आणि त्यांचे गुणगान गायले तर आयुष्य किती उंचीवर जायील हे सांगणे नको. 


आज हजारो लोक श्री गजानन विजय ग्रंथाचे पठन करत आहेत , नामस्मरण करत आहेत पण तरीही आम्ही इतके करूनही आमची संकटे विघ्ने दूर होत नाहीत असा तक्रारीचा सूर असतो.  ह्याचे कारण म्हणजे वर दिलेले उदा. अंतर्मनापासून महाराजांना साद घातली तर आई जशी सर्व कामे सोडून मुलासाठी धाव घेयील अगदी तसेच महाराज सुद्धा येणार ह्याची खात्री बाळगा. वरवरची भक्ती उपयोगाची नाही. त्यातील आर्त भाव , त्यातील भाव आणि भक्ती त्यांच्या पर्यंत त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे . ती कळकळ त्यांना जाणवली पाहिजे . तारा अथवा मारा हि भावना त्यांना आपल्यापर्यंत आणल्याशिवाय राहणार नाही.  


अध्यात्म सोपे नाही तिथे समर्पण पाहिजे. आई आणि मुलाचे जे नाते तेच आपले आणि आपल्या गुरूंचे आहे . नुसतेच घरात फोटो लावून आणि नेवेद्य करून होणार नाही . देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ...पण निदान तो क्षण तरी तू आणि मी दोघेच असू त्यात तुझी भौतिक सुखे आणि आजूबाजूचे जग नको इतकेच मागणे आहे त्या भगवंताचे आपल्याकडे .पण आपण तो क्षण सुद्धा त्याचे होऊ शकत नाही मग तो तरी आपला कसा होणार सांगा बर . पटतय का?


ज्याच्यासाठी एक क्षण आपण समर्पित करू शकत नाही तो आपल्यासाठी वाटेल त्या वेळी हाकेला धावून येयील अशी वेडी आशा का ठेवावी आपण. मुळात उठ सुठ त्यांना हाक मारू नये. आपले भोग आपणच भोगून संपवायचे आहेत . जन्म मृत्युच्या फेर्यात ते काहीही करणार नाहीत पण आपल्या आतला आवाज ते ऐकल्याशिवाय राहणार नाहीत हेही खरे.

भक्तीत समर्पण पाहिजे. बापूना काळे ला जेव्हा महाराजांनी दर्शन दिले तेव्हा त्यांनी हेच सांगितले कि त्याच्यासारखी भक्ती करा . महाराज त्याच्या सोळा आणे भक्तीनेच तर प्रसन्न झाले. आपण पुरणपोळीचा नेवैद्य दाखवतो पण जप करताना कुकरच्या शिट्या किती होतात ह्या कडे लक्ष्य असते . संपूर्ण ब्रम्हांडात महाराज आणि आपण दोघेच आहोत असे समजून ध्यान करा , जेव्हा पोथी वाचाल नाम घ्याल तेव्हा ते समोर बसले आहेत अगदी सगुण रुपात असे मनी ठेवा आणि मग बघा काय सेवा होईल तुमच्याकडून . मानसपूजा हि सर्वश्रेष्ठ आहे त्यात नक्कीच दर्शन देतील ते आपल्याला. 

सेवा भाव सर्व श्रद्धेच्या खोलीवर आहे. जितकी आपल्या श्रद्धेची खोली अधिक समर्पणाची शक्ती अधिक तितके फळ अधिक. मी माझा लेख त्यांच्याचरणी ठेवते आणि नतमस्तक होते पुढे तो कुणी वाचायचे हे तेच ठरवतात ह्यावर माझा विश्वास आहे.  

आपला जन्मच मुळी मोक्षाला जाण्यासाठी आहे पण आपण धर्म अर्थ काम ह्यात अडकून जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यापासून परे राहतो . हजारो लोक रस्त्याने जात होते पण बंकटलाल आणि पितांबरलाच महाराज कसे दिसले. किती दिव्य दृष्टी असेल त्यांची . आपणही कान नाक डोळे उघडे ठेवले तर निसर्ग आपल्या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक क्षणी आपल्याला देत असतो . 

बंकटलाल , बापुना काळे , साळूबाई , पितांबर , गणू जवर्या , खंडू पाटील ह्यासारखे भक्तांचे जीवन महाराजांच्या सेवेमुळे सार्थकी लागले. आपण नको त्या गोष्टींचे अनुकरण करण्यापेक्षा ह्यातील एखाद्या भक्ताचे , त्यांनी केलेल्या भक्तीचे आणि समर्पणाचे , सेवेचे अनुकरण केले तर आपलेही जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही.

सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230 


 

 

भवसागरातील राहू ( राहू चा राशी बदल )

 || श्री स्वामी समर्थ ||



राहू आता राशी बदल करत आहे . राहूला सुद्धा  शनी सारखे सर्वांनी व्हिलन करून टाकले आहे . राहू दशा आली आता आपले बारा तेरा वाजणार असे आपण गृहीतच धरतो. ज्योतिष शास्त्राला राहू केतुनी जणू काही ग्लामर प्राप्त करून दिले आहे. राहू केतूचे लेख आज सोशल मिडीयावर वाजत गाजत येताना दिसतात . त्याला कारणही तसेच आहे राहूची जनसामान्यांच्या मनात असलेली अनामिक भीती . ती खरच खरी आहे का? बघुया .


राहू आणि केतू दर 18 महिन्यांनी राशी परिवर्तन करतात . त्यांना स्वतःची राशी नाही त्यामुळे ते राशी स्वामीचे  फळ प्रदान करण्यास बांधील आहेत तसेच त्यांच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे सुद्धा फळ देतात. कृष्णमुर्ती मध्ये राहू आणि केतू ह्यांना अनन्य साधारण महत्व दिले आहे. तसेही कुंडलीत असलेला राहू सर्वप्रथम लक्ष्य वेधून घेतोच . पण प्रत्येक वेळी तो वाईट करेल असे निदान करणे म्हणजे आपल्या तोकड्या अर्धवट ज्ञानावर शिक्कामोर्तब आहे. 


राहू  सुद्धा अध्यात्माचा ग्रह आहे आणि मीन राशीसारख्या मोक्ष दायी राशीत येणारा ग्रह आपल्या सर्वाना स्वतःच्या बद्दल विचार करायला अंतर्मुख होण्यास भाग पाडणार आहे. आपल्या आतमध्ये आपले अस्तीत्व  शोधायला लावणार आहे. त्यामुळे योगा , साधना , आत्मचिंतन ह्यात आता मानवजात प्रगती करेल आणि एका उच्चतम अश्या अध्यात्मिक जगताची निर्मिती होईल.  आजच्या स्पर्धात्मक जगतातील प्रत्येकाला जो घड्याळ्याच्या काट्यावर आपले जीवन व्यतीत करत आहे, प्रचंड स्पर्धेला तोंड देताना ज्याची दमछाक होत आहे अश्या प्रत्येकाला आज थोड्या शांततेची आवश्यकता आहे ती मीनेतील राहू नक्कीच देणार आहे. 

राहुला  स्वतःची रास नाही त्यामुळे आता मीन राशीच्या स्वामीप्रमाणे तो फळ देयील म्हणजेच गुरूप्रमाणे फळ देणार आहे. 

गुरु हा नैसर्गिक शुभ आणि आत्मिक उन्नती करणारा पारमार्थिक प्रवासाची आस असणारा ग्रह आहे. गुरु ब्राम्हण आहे संन्यस्थ आहे. प्रापंचिक जबाबदार्या पूर्ण करून परमार्थाकडे चला हे आत्म प्रबोधन करणारा आहे .त्यामुळे आता राहूची पाऊले गुरूच्या आदर्श मार्गावर चालणार आहेत .

मीन रास म्हणजे आता समुद्रमंथनाची पुनरावृत्ती होणार . स्वरभानू राक्षस हा समुद्र मंथनाच्या वेळी देवतांच्या वेशात देवतांच्याच मध्ये जाऊन बसला होता . त्यामुळे आता पुढील दीड वर्ष आपण सर्वांनी आपल्याला भेटणारी माणसे हि सज्जन आहेत कि दुर्जन असून सज्जनांच्या मुखवटा धारण केलेली आहेत . आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती देव आहे कि दानवांच्या रूपातील देव ह्याची खात्री करूनच पुढे पाऊल टाकायचे आहे. आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे कि नाही हे पुन्हा पुन्हा तपासून बघणे आवश्यक होणार आहे. 


गुरूच्या रुपात राहू तर नाही ? चुकीच्या गोष्टींपासुन दूर राहण्यासाठी सावकाश निर्णय घेणे आवश्यक आहे. मीन हि मोक्षाची राशी आहे आणि इथे भक्ती समर्पण आहे. पण राहू भरकटायला लावणार आहे तेव्हा आपण भक्ती नेमकी कश्याची करत आहोत आणि आहारी कश्याच्या जात आहोत ते महत्वाचे आहे. सागर सर्व काही वाहून नेणारा आहे पण वाहवत जाण्यासाठी भक्ती करायची नाही तर आयुष्यात स्थिरता येण्यासाठी भक्तीचे प्रयोजन असले पाहिजे . कुठल्याच गोष्टीत राहू आपल्याला वाहवत तर नाही ना नेत त्याचे आत्मचिंतन झाले पाहिजे. आपण गुरु चरणांवर समर्पित होत आहोत कि चुकीच्या मार्गाने जात आहोत हे समजण्यासाठी ध्यान धारणा , शांतपणे निर्णय घेणे आवश्यक आहेत . जीवनाचा  संपूर्ण प्रवास बदलण्याची ताकद ह्या मीनेतील राहुमध्ये आहे  ज्याला आपण परिवर्तन म्हणतो. एका नवीन रूपातील तुमचा प्रवास सुरु करण्याचे काम राहू करणार . मद्य सेवनात मदमस्त होऊन समुद्रातील भोवर्यात अडकायचे कि उच्च कोटीची साधना करून अध्यात्माची कास धरायची ते प्रत्येकाने ठरवायचे . 


राहू हर्षलची साथ सोडून स्वतंत्र होणार. शनि आणि हर्षलच्या कर्तरीत येणार. तेव्हा नव्या-जुन्याचा संघर्ष अटळ आहे. पण शनिमहाराज कुंभेत आहेत. ते न्यायाधीशाच्या भूमिकेतून न्याय करणार. तेव्हा राहूच्या प्रभावाखालील बॉलीवूडने आणि राजकारण्यांनीही न्यायाधीशांचा सामना करण्याची तयारी ठेवावी. गुरु सुद्धा राहूच्या कचाट्यातून मुक्त होणार आहे त्यामुळे गुरु आणि शनी उत्तम काम करतील. कुठलेही ग्रह आपले शत्रू नाहीत , एखादी घटना आयुष्यात घडणे हे सर्वस्वी आपल्या केलेल्या कर्मावर अवलंबून आहेत . आपण आपली कर्म शुद्ध ठेवावीत हे उत्तम , उठसुठ ग्रहांवर खापर फोडणे बंद करावे. ग्रह आपल्या कल्याणासाठी आहेत त्यांना दुषणे का लावायची , पटतय का? आज पाकशास्त्र असो अथवा ज्योतिष , विज्ञान . गेल्या काही वर्षात youtube सारखे माध्यम जनमानसात फार वेगाने प्रचलित झाले आणि आज अनेक लोकांच्या कर्तुत्वाला youtube च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली ती कुणामुळे ? अर्थात राहूमुळे . आपल्या विचारांना ,  कलेला लाखो लोकांपर्यंत नेणारा राहू हा आधुनिक जगतातील दूत आहे आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षात प्रसिद्धी मिळालेल्या अनेकांचे  हजारो फोलोअर झपाट्याने वाढत गेले हे यश राहुचेच आहे. प्रगत युगाचा आणि पर्यायाने सोशल मिडीयाचा राहू हा “ कणा “ आहे.

प्रत्येक शुभ ग्रह हा संपूर्ण शुभ नाही आणि पापग्रह हा संपूर्ण पापग्रह नाही. आपली सोच आणि विचार , संशोधन ,अभ्यास आपल्याला ह्या ग्रहांच्या खर्या तत्वांची ओळख करून द्यायला सक्षम आहेत . सोशल मिडीया द्वारे आणि इंटरनेट च्या माध्यमातून आज राहुने जग जवळ आणले आहे. माझा हा लेख तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या राहुला सलाम .

भवसागराच्या राशीतील राहू आपल्याला अध्यात्माची गोडी लावेल आणि मोक्षाची द्वारे खुले करून देण्यास उत्सुक आहे , आपण किती समर्पित आहोत ह्यावर सर्व काही अवलंबून आहे. 


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230





Tuesday, 24 October 2023

शुक्राचे अध्यात्म

 || श्री स्वामी समर्थ ||


जिथे आनंद तिथे शुक्र . शुक्र हा भौतिक सुखाचा मेरुमणी आहे.  माणसाला सुखासीन आयुष्य जगायला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा कारक शुक्र आहे. मग अलिशान वाहन असो कि पर्यटन , उंची वस्त्रे असो कि मौल्यवान दागिने , मधुर वाणी असो कि अत्तर किंवा सुमधुर संगीत...सर्वांवर हक्क शुक्रचाच . शुक्र हा कन्या राशीत  नीच फळे देतो तर मीन राशीत उच्च . मीन राशीच त्याने उच्च होण्यासाठी का निवडली असावी हा प्रश्न अभ्यासकांना पडला पाहिजे कारण जितके प्रश्न अधिक तितका अभ्यास सखोल .

मीन हि कुंडलीतील व्यय भावात येणारी राशी , ह्या राशीला मोक्षाची राशी सुद्धा म्हंटले जाते . इथे शरीराची पाऊले येतात. मीन हि अथांग महासागराची रास आहे. सागर सर्वांनाच समाविष्ट करणारा त्यामुळे हि लोक सर्वाना हृदयात सामावून घेणारी , सदाचारी , सहानुभूती , भूतदया असणारी असतात . इथे संवेदनशीलता , प्रेम आहे. ह्याचे बोध चिन्ह पाहिले तर उलट सुलट मासे म्हणजे जणू काही आत्मा आणि परमात्म्याचे मिलन करणारी हि राशी .व्यव भाव हा मोक्ष त्रिकोणातील अखेरचा भाव . 

ह्या महासागरात जीवनातील सगळे चढ उतार , सुख दुक्ख सामावलेली आहेत .मीन राशीत आपल्या आयुष्याची यात्रा संपते आणि पुन्हा जेव्हा आपण मेषेत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आत्म्याचा नवीन प्रवास सुरु झालेला असतो . आपला आत्मा म्हणजेच रवी , सूर्य . म्हणूनच मीन राशीतून सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा तो उच्चीची वस्त्रे परीधान करतो. 

ह्या भावापर्यंत यायला व्यक्तीला आधीच्या अकरा भावातून प्रवास करावा लागतो तेव्हा कुठे तो मोक्षाला पोहोचतो. आयुष्य सर्वार्थाने म्हणजेच धर्म अर्थ काम ह्या त्रिकोणांचा पुरेपूर अनुभव घेतल्याशिवाय मोक्षाचा खरा आनंद दुर्मिळ आहे. 

सूर्य आणि चंद्र हे प्रकाश देणारे आहेत . आपल्याला मार्ग दाखवणारे आहेत . पण प्रकाशासोबत सावली सुद्धा येते त्यामुळे त्याचाही विचार असला पाहिजे . असो .


मी नामस्मरण करतेय पण मन शांत नाही कारण काही ना काही इच्छा अजून अपूर्ण आहे. सर्व इच्छा पूर्ण होतात तेव्हाच मन परमेश्वराच्या चरणाशी खर्या अर्थाने रमते . आयुष्याची अखेरच आपल्याला खरे ज्ञान देत असते. आणि ते देणारा दुसरा तिसरा कुणी नाही तर सगुण भक्तीचा कारक “ शुक्र “ आहे. अनेक संतांच्या पत्रिकातून आपल्याला हा मीनेतील शुक्र भेटतो . शुक्र हा फक्त विलासी ग्रह नाही . असे असेल तर शुक्राचा अभ्यास अपूर्ण आहे असे म्हंटले पाहिजे. मीन रास हि मोक्षाची आहे आणि तिथे गुंतवणूक आहे ती फक्त पैशाचीच नाही तर भावनांची सुद्धा . आपले सर्वस्व परमेश्वराच्या चरणावर वाहताना भक्ताच्या डोळ्यातून ज्या अश्रुधारा वाहतात त्या म्हणजेच “ शुक्र “ . हे संवेदना वाहून नेणारे जल आहे. हा शेवटचा क्षण  तेव्हा काहीच आठवत नाही , आठवते ते फक्त त्याचे रूप , निर्गुण आणि निराकार . शेवटच्या प्रवासात जेव्हा सर्व बंधने तुटली जातात , सर्व सोडून जातात तेव्हा त्याचे आपल्याभोवतीचे अस्तित्व जाणवू लागते आणि तोच खरा सर्वार्थाने आनंद देणारा क्षण फक्त “ शुक्र “ आपल्याला देऊ शकतो. जितक्या आनंदाने संपूर्ण आयुष्य जगलो त्याही पेक्षा स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करणारा तो क्षण किती सुखद , परमोच्च आनंदाचा असेल नाही आणि त्या क्षणाचे प्रतिक म्हणूनच ह्या शुक्राने ह्या सागरा सारख्या विशाल मनाच्या मीन राशीत स्वतःला उच्च होण्याचा मान दिला असावा. मीन राशी खोल अथांग सागराची असल्यामुळे इथे गूढत्व , सखोल ज्ञान आहे. 


व्यय म्हणजेच मोक्षाच्या भावापर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला अकरा भावांचा प्रवास करायला लागतो तेव्हा परमेश्वर प्राप्ती होते आणि त्याच्या अस्तित्वाची अनुभूती मिळते . अगदी तसेच शुक्राला सुद्धा अकरा राशीतून प्रवास केल्यावरच मोक्ष्याच्या राशीत उच्च होता येते . सर्व सुखांचे आगर म्हणजे भगवंताचे चरण आहेत आणि आजवर अनुभवलेले सुख परमेश्वर सानिध्याच्या पुढे किती कवडीमोलाचे आहे हे मोक्षाच्या राशीतील हा आध्यात्मिक सगुण भक्तीच्या आनंदाचा आस्वाद घेतल्या शिवाय समजणार नाही. भौतिक सुखात गुरफटलेला हा आत्मा शेवटी भगवंताच्या चरणीच विलीन होतो तोच खरा “ शुक्र “ . सगुणभक्ती हि अनुभवायची असते , ज्याला आत्मिक मानसिक ओढ आहे त्यालाच ते चरण दिसतील आणि त्या चरणांना  आपल्या डोळ्यातील  अश्रूंनी भिजवून टाकताना जो परमानंद मिळतो तो जन्मोजन्मी टिकणारा असतो . मिनेतील शुक्र परमेश्वराच्या सान्निध्याची ओढ लावतो . जन्मल्यापासून आपण शुक्र जगात आहोत पण अखेरच्या काळातील मोक्षाच्या उबरठ्यावर नेणारा शुक्र आपल्या खर्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. भक्ती आणि सेवा हेच खरे जीवन आहे हे पटवून देणारा शुक्र इथेच भेटतो . समाधानाच्या उच्च शिखरावर नेणारा आणि आपल्या शेवटच्या प्रवासात त्याचा हात आपल्या हातात देणारा हा शुक्रच आहे. शुक्राचे हे असीम अध्यात्मिक महत्व ज्याने जाणले त्याला मोक्षाचे द्वार खुले झालेच म्हणून समजा. . 


रेवतीच्या चतुर्थ चरणात 27 अंशावर उच्चत्व प्राप्त करणारा हा शुक्र असामान्य आत्मिक सुखाची परम अनुभूती देणार आहे.  हे सुख सहज नाही म्हणूनच 108 नक्षत्र चरणांचा प्रवास त्याला करावा लागला तेव्हा कुठे रेवतीचे चतुर्थ चरण त्याला दिसले. त्याच्या चरणाशी लीन होण्यासाठीच आपला जन्म आहे आणि त्याची सेवा म्हणजेच आपले आयुष्य आहे हेच तर जणू ह्या शुक्राला सांगायचे नसेल ना , म्हणूनच शुक्राने उच्च होण्यासाठी रेवती सारखे देवगणी नक्षत्र निवडले असावे . मीन रास म्हणजे वैकुंठ आहे आणि शुक्र स्वतः महालक्ष्मी चे प्रतिक आहे. शुक्र म्हणजे लक्ष्मी , अष्टलक्ष्मी . आयुष्यात उच्च शिखरावर जायचे असेल तर महालक्ष्मी आणि महा विष्णू ची उपासना फळ देयील. 


आजवर मिळवलेले सर्व काही शाश्वत नाही पण परमेश्वराच्या चरणाशी मिळालेला असीम आनंद खरोखरच शाश्वत आहे म्हणूनच तर तो सतचित आनंद आहे. 


क्षणभर विचार करा चंद्रभागेच्या काठाशी टाळ मृदुंगाच्या गजरात प्रत्यक्ष पांडुरंग जेव्हा देहभान विसरून गेलेल्या आपल्या वारकरया सोबत ज्ञानबा तुकाराम म्हणत टाळ धरतो त्याचे वर्णन कश्यात करणार आपण ? हे सर्व आपल्या आकलनाच्या बाहेर आहे , ह्या सर्वाचे शब्दात वर्णन होऊच शकत नाही,  हे फक्त अनुभवायचे असते . अगदी ह्याच प्रमाणे आपल्या आयुष्याची अखेर होताना त्याचा हात धरूनच त्याच्याच चरणाशी विलीन होतानाचा आनंद परमोच्च सुखाचा अविष्कार नाहीतर काय आहे . त्याची तुलना आयुष्यभर मिळवलेल्या कुठल्याच सुखाशी होऊ शकत नाही. 


मला लेखनाचा आनंद हा शुक्रच बहाल करत असावा. लिहिताना कुणीतरी आपल्याकडून लिहून घेत आहे असा भास मला अनेकदा होत असतो आणि माझ्याकडून तोच हे शब्दभांडार जणू खुले करत असावा . सांगायचे तात्पर्य असे कि ज्या सुखाच्या मागे आपण आयुष्यभर असतो ते शाश्वात सुख नसतेच . खर्या अर्थाने सुख हे आयुष्याच्या अंतिम क्षणी अनुभवायला मिळते ते मीन राशीत . कारण महाराजांच्या चरणाशी असणारा हा आनंद दुर्मिळ आहे आणि जेव्हा उमगते कि आयुष्यभर आपण ज्याला आनंद सुख म्हणत होतो तो सुखाचा निव्वळ भ्रम होता. खरे सुख तर भगवंताच्या चरणाशी आहे आणि हे चरण म्हणजेच पाउले जी मीन राशी दर्शवते . आपल्या महाराजंच्या चरणाशी विलीन होणे हे भाग्याचे लक्षण आहे.

सर्व अहंकार सोडून त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा हे सांगणारा हा व्यय भाव आहे म्हणूनच इथे शरीराची पाउले आहेत .

नतमस्तक झाल्याशिवाय , आत्मसमर्पण केल्याशिवाय मोक्ष नाही. 

आज विजया दशमी ह्या साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या अत्यंत पवित्र दिवशी आपण ह्या सगुण भक्तीचा आनंद लुटुया आणि हा शाश्वत आनंद टिकवण्याचा मनोमन निर्धार करुया , त्याच्या चरणी आपले संपूर्ण आयुष्य विलीन करुया कारण शेवटी तो त्याच्या अस्तित्वाची ग्वाही तुम्हाला तुमच्या अखेरच्या प्रवासात देतोच देतो. 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Saturday, 21 October 2023

मनस्वी " छबी "

 || श्री स्वामी समर्थ ||



आपल्या मनासारखे काम करायला मिळणे हे एक भाग्याचेच लक्षण आहे. आपले छंद जोपासणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही पण त्याहीपलीकडे आपल्याला आवडणारी गोष्ट नुसतीच एका छंदापुरती मर्यादित न ठेवता  त्याला व्यवसायाचे रूप देणे ह्यासाठी जिद्द , अभ्यासू वृत्ती , अपार कष्ट मेहनत लागते . 

साडी हा पेहराव सर्व स्त्रीवर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. वय कुठलेही असो साडी म्हणती कि कुठल्याही स्त्रीच्या चेहऱ्यावर लगेच स्मितरेषा उमटते . आजकालच्या आधुनिक जगात रोज आपल्याला वेगवेगळ्या फ्याशनचे कपडे बघायला मिळतात. ह्या सर्व स्पर्धेत टिकून राहणे हे एक आव्हान आहे . आज आपण अशाच एका मैत्रिणीची ओळख करून घेणार आहोत जिने हे आव्हान लीलया पेलले आहे. आपल्यातील कला आणि आधुनिकतेची जोड ह्याची सुरेख सांगड घालून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तिने “ छबी “ ह्या ब्रांड मध्ये आपल्यासाठी आणल्या आहेत .चला तर गप्पा मारुया “ छबी “ ह्या ब्रांड च्या सर्वेसर्वा  सुप्रिया ढपाले पोवार सोबत.

आजकाल सगळ्यांना  काहीतरी “ हटके “ म्हणजेच काहीतरी वेगळे हवे असते . आजकाल विवाह , साखरपुडा , संगीत मेहेंदी ;अश्या अनेक सोहळ्यात वधू वेगवेगळ्या पेहरावात दिसते . आपण जग कितीही बदलले असे म्हंटले तरी जुने ते सोने हे खरे आहेच . विवाह सोहळा म्हंटला कि आपले सगळे पारंपारिक दागिने आणि साड्या डोळ्यासमोर रुंजी घालतात . अश्यावेळी “ हटके “ अश्या आणि वेगळेपणाचा ठसा असणार्या “ छबी “ ह्या सुप्रिया च्या ब्रांड च्या साड्या मन आकर्षित करतात . 


सुप्रिया मुळची कोल्हापूरची आणि राजाराम महाविद्यालयातून तिने आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . पुढे MSc ( Environmental Science ) केल्यावर लगेच पुण्यात नोकरी मिळाली . सर्वसामान्य लोकात रमणारी सुप्रिया आजही आपल्या नोकरीतील सर्व सहकार्याशी उत्तम संपर्क ठेवुन आहे . 

नोकरी आणि व्यवसाय ह्यात खूप फरक असतो . व्यवसायात खूप चढ उतार असतात आणि त्यामुळे सर्व कुटुंबाचा पाठींबा असला तरच व्यवसाय यशस्वी होतो. सुप्रियाला तिच्या यजमानांनी आणि घरातील सर्वानीच खूप सहकार्य केले आणि त्यामुळेच आजचे सोन्याचे दिवस ती बघत आहे . नुसताच व्यवसाय नाही तर एक व्यक्ती म्हणून सर्वार्थाने त्यांनी मला घडवले आहे हे ती अभिमानाने सांगते . लग्नानंतर बाळाची चाहूल लागली आणि नोकरी ची मोहीम घराकडे वळली . माहेरी साड्यांचा व्यवसाय होता आणि अगदी कापड कसे विणले जाते ह्या लहान सहान गोष्टींची आणि त्यातील बारकाव्यांची तिला पहिल्यापासून माहिती होती . तिची आई सुद्धा फ्याशन डिझायनर आहे. पण हा व्यवसाय आजच्या प्रगत सोशल मिडीयावर आणण्याचे तिने ठरवले . Digital Marketing चा Course करून आपला व्यवसाय आणि आपले उत्पादन FB , Insta ह्या माध्यमातून लोकांपर्यंत कसे पोहोचवता येयील ह्यासाठी अहोरात्र मेहनत केली . सुप्रियाच्या प्रत्येक गोष्टीमागे अभ्यास असतो त्यामुळे त्याला एक खास असा प्रोफेशनल लुक असतो. आजच्या स्पर्धेला तोंड देताना ग्राहकाला काहीतरी वेगळे देण्याचा सततचा प्रयत्न आणि त्यातूनच निर्माण झालेला खास असा सुप्रिया टच असलेला “ छबी “ हा ब्रांड फार कमी वेळात लोकप्रिय झाला आहे. 

“ खण “ हि महाराष्ट्राची परंपरा , पारंपारिक वस्त्र आहे आणि ह्या परंपरेला आधुनिकतेची झालर लावून काहीतरी वेगळा साज चढवला तर सर्व वयोगटातील स्त्रियांना तो आवडेल हा विचार “ छबी “ तील प्रत्येक साडी करताना होता . “ खण “ ह्या पारंपारिक साडीच्या प्रकारातून काहीतरी वेगळे करण्याचे तिने ठरवले. आजकाल प्रत्येक कापड हे अगदी Authentic असतेच असे नाही त्यात इतरही धागे असतात . त्यामुळे आपण संपूर्णपणे “ Authentic खणाच्या “ साड्या त्याही वेगळ्या लुक मध्ये ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करायचा असे मनोमनी ठरवले आणि सुप्रिया कामाला लागली. तिच्या छबी मधील प्रत्येक साडी वेगळी आहे आणि त्याची रंगसंगती तर मनाला भुरळ पाडणारी आहे. तिच्या studio मध्ये रेशमाच्या रंगांची जणू उधळण आहे आणि मनाला सुखावणार्या आणि मोहित करणाऱ्या वेगवेगळ्या साड्यांची दालने आहेत . 


छबी च्या साड्या वेगळेपणाचा ठसा उमटवतात . स्त्रियांना विचारले कि खरा खण ओळखायचा कसा ? तर त्याचे उत्तर कदाचित देता येयीलच असे नाही त्यामुळे सुप्रियाने खरा खण कसा ओळखायचा ह्याला प्राधान्य दिले आणि त्याबाबत आपल्या ग्राहकांची जनजागृती करण्यास सुरवात केली . खरा खण साड्यांमध्ये काठ हे अधिक पोलिश दिसत असतील तर त्यात polister mix असणार तेव्हा तो खरा खण नाही .  सुप्रियाने 80% कॉटन आणि उरलेले सिल्क म्हणजेच रेशमाचा वापर करून ह्या साड्या तयार केलेल्या आहेत . खण हा जरी पारंपारिक असला तरी आधुनिक फ्याशनची त्याला जोड देऊन सर्वच वयोगटात तो कसा आवडेल हा विचार करून तयार केलेल्या छबिच्या साड्या आज सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहेत . सध्याचा ट्रेंड हा मल्टीडिझायनर आहे म्हणून सुप्रियाने खण आणि इरकल ह्याचे फ्युजन करून एक वेगळाच लुक देणारी खणाची साडी तयार केली. साडी आकर्षक तर आहेच पण हलकी आहे . सहज नेसता येयील अशी आहे. ह्याव्यतिरिक्त फक्त सुती म्हणजे मल कॉटन साड्यांचे एक अप्रतिम दालन आहे. ज्यांना खण नको आहेत त्यांचे ह्या दालनात स्वागत आहे. सर्व प्रकारच्या हवामानात ह्या साड्या नेसता येतील असे सुप्रिया आवर्जून सांगते. 


“ छबी “ हे अगदी वेगळे पण ह्या व्यवसायाला अगदी साजेसे नाव कसे निवडलेस ह्यावर सुप्रिया म्हणाली ब्रांड जितका वेगळा तितके नाव सुद्धा हटकेच असले पाहिजे आणि तेही मराठमोळे . म्हणून तिने अनेक लावण्या ऐकल्या पण शब्द सुचत नव्हते . पण  “ छबीदार छबी “ हे गाणे सहज गुणगुणत असताना तिच्या डोक्यात “ छबी “ घट्ट रुजली . छबी म्हणजे प्रतिमा , एखाद्या स्त्रीची प्रतिमा , स्त्रीच्या सौंदर्याची , मनातील संसाराची प्रतिमा . आणि शेवटी “ छबी “ हे नाव सर्वांनाच आवडले आणि ते फायनल झाले. 

कोल्हापूर इथे सुरवात करत सुप्रियाने आता पुण्यापर्यंतची मजल गाठली आहे . कोल्हापूरचा studio आता अगदी कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात नव्याने साकारात आहे. आज प्रतिभा नगर कोल्हापूर मध्ये “ छबी “ अभिमानाने उभी आहे. 


मैत्रीणीनो , कुठलाही व्यवसाय सहज सोपा नसतोच . त्यात अपार कष्ट , मेहनत , यश अपयशाच्या पायर्या , कुटुंबाचा पाठींबा , भांडवलाची सोय अश्या एक ना दोन अनेक गोष्टी समाविष्ट असतात . असंख्य हात , अनेकांचे आशीर्वाद आणि आपल्या गुरूंचा वरदहस्त असेल तर काहीच अशक्य नसते . सुप्रियाने आपल्या मनातील स्वप्नांना मेहनतीचे पंख लावले आणि आज तिची छबी तुमच्या आमच्या मनातील खास कोपर्यात विराजमान झाली आहे. 


सोशल मिडीया वरचे , फेसबुक , इंस्टा वरील साड्यांचा लुक , रंगसंगती आपले लक्ष वेधून घेतल्या शिवाय रहात नाही. सुप्रिया आपल्यातीलच एक आहे. एक आई , एक गृहिणी आणि एक व्यावसयिक सुद्धा त्यामुळे प्रत्येक स्त्रीला नक्की काय हवे आहे हे तिला सहज समजते . त्यामुळे ग्राहकांना साडी खरेदी करताना तिच्या सूचनांचा नक्कीच उपयोग होतो . 


आपल्यातील अनेक मैत्रीणीना सुप्रियाचा हा प्रवास नक्कीच प्रेराणादायी ठरले ह्यात शंका नाही. तुमच्या आमच्यात दडलेल्या असंख्य सुप्रिया ह्यातून प्रेरणा घेवून आपापल्या स्वप्नांना फुलवतील तसेच उंच भरारी घेण्यास प्रयत्नशील राहतील अशी आशा आहे. 

सुप्रियाला तिच्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेछ्या . “ छबी “ आम्हाला नेहमीच नवनवीन रुपात पाहायला मिळूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230



  

 


सनई चौघडे

 || श्री स्वामी समर्थ ||


आप्तेष्ट किंवा नात्यात कुणाचा विवाह असेल तरी आपली त्यासाठी किती तयारी असते . आपलेही शॉपिंग आपल्याही नकळत सुरु होते . मग स्वतःचा विवाह असेल तर आपला उत्साह आसमंताला भिडला तर नवल वाटायला नको.

तुळशीचे लग्न झाले कि लग्न सराई सुरु होईल. दोन कुटुंबाना जोडणारा विवाह हा “ सेतू “ च आहे. आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षता पडताना पाहणे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते आणि ते डोळेभरून पाहता यावे ह्याची तिला आस असते. आजकालच्या काळात विवाहाच्या संज्ञा बदलल्या असल्या तरी शेवटी सप्तपदी करून सनईच्या मंगल सुरात  ते दोघे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले जातात , एकमेकांचे होतात आणि आयुष्यातील एका नाजूक हव्याहव्याश्या आणि मधुर सुरेल अश्या वाटेवर एकत्र वाटचाल करायला लागतात . 

हा सहजीवनाचा प्रवास सुखकारक आणि आनंददायी व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा , मनीषा असते . योग्य जोडीदार मिळणे हे खरच भाग्याचेच लक्षण म्हंटले पाहिजे . असो . पत्रिकेत वैवाहिक सुख पाहताना प्रामुख्याने प्रणयाचा ,शृंगाराचा ग्रह  शुक्र ह्या ग्रहाचा कसून अभ्यास करावा लागतो . विवाह हा सप्तम्स्थानाशी निगडीत असल्यामुळे सप्तम स्थान आणि सप्तमेश तसेच त्यासंबंधी असणारी इतर ग्रहांची स्थिती अभ्यासावी लागते . विवाहासाठी पूरक महादशा सुद्धा लागते . विवाह ज्या जातकाचा आहे त्याची विवाह करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती महत्वाची . तसेच 2 4 5 8 11 12 हि स्थाने आणि त्याचे भावेश पाहावे लागतात . राशी कुंडली मध्ये चंद्राचा सप्तमेश कोण आहे ,चंद्राच्या सप्तमात कुठला ग्रह आहे. तसेच शुक्राच्या सप्तमात कुठला ग्रह आहे हेही पाहावे. दोघांपैकी एकाची दशा षष्ठ स्थानाशी निगडीत असेल तर दुसर्याची नाही ना हे सर्वात आधी पाहावे .


दोन्ही पत्रिकेतील चंद्र अभ्यासावा कारण विवाहानंतर गुलाबी दिवस संपले कि खरा संसार सुरु होतो आणि त्यात अनेक चढ उतार येतात तेव्हा एकमेकांना पडत्या काळात साथ सोबत करण्याची तयारी असली पाहिजे. मी हे लग्न स्वतःच्या मर्जीने केले आहे आणि मी ते टिकवणार आहे हि खुणगाठ मनात पक्की असली पाहिजे कारण लग्न होणे महत्वाचे नाही ते होतेच पण टिकते किती जणांचे ते महत्वाचे आहे . इथे पोकळ अहंकार कामाचा नाही . नुसते 25 गुण आणि 34 गुण जुळतात त्याच्या मागे न लागता ग्रह मिलन पुढील 25-30 वर्षाच्या महादशा , दोघांचे आरोग्य , मानसिकता , संतती योग , अर्थार्जन हे सर्व काही काळजीपूर्वक तपासावे कारण 36 गुण जुळून विवाह केलेली जोडपी घटस्फोटासाठी आज कोर्टाच्या पायर्या झिजवताना दिसत आहेत हे विदारक सत्य आहे. 


आज पूर्वीचा काळ आणि विचार लयास गेले आहेत . आज मुलामुलींचे  विचार आणि अपेक्षा बदलत चालल्या आहेत . विवाहाचे वय सुद्धा पुष्कळ पुढे गेले आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

प्रत्येक गोष्टीचा योग असतो आणि नसतोही . अनेक वेळा पत्रिकेतील शापित योग , विष्टी करण जीवनात अडथळे निर्माण करते . गुण मिलन आणि ग्रह मिलन ह्या दोघानाही सारखेच महत्व आहे. नुसते घरच्या मंडळींसाठी विवाह नको कारण हे नाते तुमच्या हृदयाशी  निगडीत आहे आणि ते अनेक अपेक्षा घेवून येणार आहे . ते सर्वार्थाने पेलवणारे आहे कि नाही ह्याचा विवाहपूर्व नाही तर स्थळे पाहण्याआधीच विचार झाला पाहिजे .


सप्तमेश राक्षसगणी नक्षत्रात किंवा पापग्रहांच्या कुयोगात , निचीचा , दुर्बल असेल तर विवाह हे आयुष्यातील मोठे प्रश्नचिन्ह होते.  जातक हा वैचारिक आर्थिक शारीरिक मानसिक आणि लैंगिक दृष्टीने सक्षम असेल तर आणि तरच विवाहाच्या बाबत विचार करावा अन्यथा नाही. आपल्यातील शारीरिक किंवा मानसिक दुर्बलता वैवाहिक सुखात न्यूनता आणते त्यामुळे एखाद्याची फसवणूक करून पापाचे धनी होऊ नये. हे जन्मोजन्मीचे बंधन आहे .एकमेकांच्या मनाचा विचार इथे व्हायलाच हवा. पालकांनी सुद्धा एखादे स्थळ आपल्या अपत्यावर लादू नये. असे केल्यास हे बंधन पुढे जावून फार काळ टिकत नाही हे वेगळे सांगायला नको. 

विचारातील पारदर्शकता आणि खरेपणा हे नाते दीर्घकाळ टिकवेल. आज चंद्र शुक्राच्याच नक्षत्रात आहे. शुक्र हा वैवाहिक सुखाचा  , प्रणयाचा मुख्य कारक म्हणून आज विवाह ह्या विषयाबद्दल लेखन प्रपंच .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Wednesday, 18 October 2023

ग्रहांचे नवमांश बळ

 || श्री स्वामी समर्थ ||



जन्मलग्न कुंडलीचे नवमांश हे स्मुक्ष रूप आहे त्यामुळे नवमांशात ग्रहांचे बळ पाहिल्याशिवाय ग्रह कसे फळणार हे सांगता येत नाही आणि म्हणूनच नवमांश अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आहेत त्यामुळे 30 अंशात 9 चरणे म्हणजेच सवा दोन नक्षत्रे समाविष्ट केलेली आहेत . प्रत्येक चरण हे 3 अंश 20 कला चे आहे जो त्या राशीचा नवमांश आहे. आपला जन्मस्थ चंद्र कुठल्या नवमांशात आहे त्यावरून आपली अभिव्यक्ती समजते .

आज धनेशाचा संबंध नवमांशात कश्याप्रकारे येतो त्याबद्दल बघुया . धनस्थान हे तुमचे कुटुंब आणि धन प्राप्ती दर्शवते. 

धनेश जर चंद्राच्या नवमांशात असेल तर अत्यंत हळुवार लाघवी बोलणे असते . चंद्र म्हणजेच जल , जीवन , लक्ष्मी आहे त्यामुळे त्यांच्याकडे सदैव पैशाचा ओघ असतोच .चंद्र हा वनस्पतींचाही कारक आहे त्यामुळे पाणी , वनस्पती ह्या संबंधित व्यवसायातून धनप्राप्ती होते.  समाजिक संस्था किंवा सामाजिक जीवनाशी संबंधित कामातून धनप्राप्ती होते . रवीच्या म्हणजेच राजाच्या नवमांशातील ग्रह राजासारखीच फळे देतील. सन्मार्गाने राजमार्गाने मिळवलेले धन इथे दिसेल. तसेच उच्च अधिकार , रवी राजा आहे आणि विशाल हृदयी , सर्वांचा विचार करणारा , अधिकार असणारा आहे. शिक्षण क्षेत्र विशेष करून व्यवस्थापन क्षेत्रातून धनप्राप्ती आणि त्याच संबंधित शिक्षण असू शकते .

नवमांश मंगळ असेल तर उग्र वाणी नको तितके धाडसी आणि क्रूरपणा , टीकात्मक संवाद आणि त्यातून विसंवाद , अफाट खर्च , टोचून बोलणे , त्यासोबत राहू असेल तर जुगारी प्रवृत्ती आणि त्यातून अर्थार्जन  . मंगळ म्हणजे धाडस म्हणूनच पोलीस किंवा तीनही सेनादलातील नोकरीतून अर्थार्जन . उजवा डोळ्यातून पाणी येऊन उष्णतेचे विकार होतील.

धनेश बुधाच्या नवमांशात असेल तर ..बुध हा बुद्धीचा कारक , बिरबला सारखे चातुर्य , उत्तम गणिती , बुध हा वाणी आहे त्यामुळे पैशाच्या हिशोबात चोख , उत्तम तर्कशक्ती आणि त्याचे आपल्या संवादातून प्रदर्शन . डोळे मिचमिचे , बारीक .

शुक्रासारख्या रसिक ग्रहाच्या नवमांशामध्ये ग्रह असेल तर आनंद सौख्य प्राप्ती कारण शुक्र मनमिळाऊ माणसे जोडणारा गोडवा जपणारा आहे.कलेचा अविष्कार , स्त्रीकडून लाभ करून देणारा , बोलणे मधाळ , शुक्राच्या संबंधित व्यवसाय केले तर अर्थार्जन उत्तम होयील. शुक्र दुषित असेल तर जुगारी वृत्ती , व्यसनाधीनता हि फळे प्रकर्षाने मिळतील.


धनेश गुरु च्या नवमांशात असेल तर व्यक्ती आपल्या उत्तम वाणीतून पैसा मिळवेल. गुरु हा ज्ञानाचा महासागर आहे . वायफळ बोलणे नाही आणि त्याला तितका वेळ सुद्धा नाही . तर्कशुद्ध , ज्ञानात भर पडणारे आणि विचारमंथन करायला लावणारे असे उत्तम विचार त्याला मिळतील आणि त्यातून अर्थार्जनाचे मार्ग व्यक्ती शोधेल. गुरु अध्ययन दर्शवतो त्यामुळे शिक्षकी पेशा , महाविद्यालयात नोकरी .लोकांना मदत करण्याची वृत्ती आणि परोपकार त्यामुळे समाजात मनाचे स्थान आणि त्यातून लोकसंग्रह हा व्यवसायाला पूरक ठरतो. अनेकदा गुरु कफ पण देतो. मूळ पत्रिकेतील गुरु बिघडला असेल तर पोकळ डामडौल असतो . 

शनी असल्यास कमी बोलणारा शांत प्रवृत्तीचा ,निरस पण बोलेल तेव्हा कदाचित मोजक्याच शब्दात बोलणारा . शनी       कष्टकरी वर्गाचा कारक असल्यामुळे अथक परिश्रमातून अर्थार्जन होयील. सहज सोपे काहीच मिळणार नाही . आर्थिक स्थिती हळूहळू उंचावेल एका रात्रीत श्रीमंती कधीच नाही .बोलण्यात संथपणा , आणि दोष असू शकेल.  शनी वक्री असेल तर अचानक धन लाभ करून देयील आणि धन टिकणार सुद्धा नाही . 

नवमांश कुंडली आणि जन्मलग्न कुंडलीचा अभ्यास परिपूर्ण असावा . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

अध्यात्म योग

 ||श्री स्वामी समर्थ ||



ईश्वर हा आपल्या अवतीभवतीच असतो . आपल्या अध्यात्मिक प्रवासातील गुरु हे ईश्वराचेच सगुण रूप असतात . संतानी समाज सुधारण्यासाठी मनुष्य रूप धारण केले ,लोक निंदा सहन केली त्यांच्यात सुद्धा ईश्वराचा अंश असतोच . संत हे परमेश्वरी शक्तीचा अविष्कार आहे. आपली ईश्वरभक्ती खरी असेल तर त्याचे दर्शन अनेक माध्यमातून रूपातून आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही .


एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील अध्यात्मिक साधना मनाचा कारक चंद्र ,पंचमेश , पंचम स्थान , भाग्य स्थान , व्ययेश व्ययस्थान गुरु शनी नेप केतू ह्यांच्यावर असते. पत्रिकेतील मोक्ष आणि धर्म त्रिकोण सुद्धा ह्याबाबत संकेत देत असतो. 


उपासना , ध्यानधारणा ह्याचा कारक गुरु हा अध्यात्मिक मार्गातील एकेक वीट ठेवण्यास कारणीभूत होतो . चंद्र हा मनातील भावनांचा कारक ग्रह असून नेप गुरु ह्यांच्यासोबत होणार्या शुभ योगात उच्च कोटीची अध्यात्मिक साधना प्रदान करतो. भोग भोगून मुक्त व्हा हे सांगणारा शनी पूर्व सुकृताचे दर्शन घडवतो आणि मोक्षाकडे नेतो तर नेप अंत स्फूर्ती देतो.


अध्यात्मातील रुची देणारा गुरु तर भक्तीचा कळस गाठणारा शनी आणि केतू . अग्नितत्वाच्या राशी पारमार्थिक प्रगतीत अग्रेसर मानल्या आहेत.  प्रपंच करताना केलेला परमार्थ हाच सर्वश्रेष्ठ असतो . म्हणूनच म्हंटले आहे ..देवाचिये द्वारी उभा क्षणभरी .अध्यात्मात येण्याचेही योग असतात . एकदा ह्या वाटेवरून प्रवास सुरु झाला कि कश्याचेच भय वाटत नाही. सुख दुक्खाच्या पलीकडे नेणारा आणि मनाची शांतता संतुलित ठेवणारा हा योग आहे.  अध्यात्मिक आनंद लुटता आला पाहिजे . 

आपल्या आराध्याच्या सेवेत मन प्रसन्न करणारा हा योग प्राप्त होणे हे सौभाग्य आहे. 


साधारणतः गुरू च्या राशींचे लग्न वा कुंभ लग्न या लग्नावर जन्मलेल्या या संतांच्या कुंडलीत बहुतेक गुरू ,शनी सोबत  बुधाशी नवपंचम योग,  चंद्र गुरू  नवपंचम योग, वर्गोत्तम गुरू,लग्नेश व पंचमेश यांचे अन्योन्य योग, लग्नेश पंचमात, भाग्येश पंचमात,लग्नेश भाग्यात उच्च राशीला, पंचमेश पंचमात, रवि हर्षल युती हे योग ठळकपणे दिसतात.


पंचमस्थान व पंचमेश यांचा परमार्थातील उपासना, जपजाप्य, दैनिक व नित्य उपासना यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे


श्रद्धा भक्ति व उपासना यांचा विचार पंचम स्थानावरून केला जातो. पंचम स्थानी शुभ ग्रह, पंचमेश पंचमात, पंचम स्थानाचा शुभ ग्रहाचा योग आला असता व्यक्तीच्या जीवनात  नित्य उपासना , नामस्मरण व जप जाप्य यांना विशेष स्थान मिळते. शुक्र म्हणजे भक्ती गुरू म्हणजे ज्ञान आणि केतू व शनी म्हणजे वैराग्य यातच जर रवि हर्षल युती, चंद्र नेपचून युती वा बुधप्लुटो युती या तिन्ही युती अनुक्रमे शरीर ,मन आणि बुद्धी या तिन्ही पातळीवर अध्यात्मिक ज्ञानास प्रगतिकारक ठरतात


रवि हर्षल,रवि नेपचून, चंद्र हर्षल,गुरू नेपचून व बुध नेपचून या ग्रहांतील अंशात्मक  युती योग मंत्र शास्त्र व योगाभ्यास या साठी अत्यन्त परिणामकारक ठरतात.


लग्नी गुरू व्यक्तीला धर्म परायण,सांस्कृतिक प्रेम,समाजप्रेम हे गुण दर्शवतो. मंगळ गुरूच्या धनु व मीन राशीत धर्म अभिमान, उपासना, सांप्रदायिकता,अशी फळे देतो. शनी व गुरू यांच्यातील लाभ, नवपंचम हे शुभ योग व्यक्तीला वैराग्य, वेदांत अभ्यास व तत्त्वचिंतन या साठी सर्वोत्तम योग आहेत


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230